झिगमोंडी, रिखार्ट : (१ एप्रिल १८६५–२४ सप्टेंबर १९२९). ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ. १९२५ च्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. कलिल रसायनशास्त्रात [अतिसूक्ष्म कण लोंबकळत्या स्थितीत असलेल्या विशिष्ट प्रकारच्या मिश्रणासंबंधीच्या रसायनशास्त्रात ⟶ कलिल ] आधुनिक काळात ज्या संशोधन पद्धती मूलभूत ठरल्या आहेत त्या झिगमोंडी यांनीच बसविल्या व त्यांचा उपयोग करून कलिल विद्राव विषमांगी असतात, हे सिद्ध केले. विद्युत् विच्छेद्यांमुळे (ज्या पदार्थाच्या विद्रावातून विद्युत् प्रवाह जाऊ दिल्यास त्यातील घटक अलग होतात अशा पदार्थांमुळे) कलिलांचे किलाटन होण्याची ( न विरघळणारा साका तयार होण्याची ) यंत्रणा व जेलांची  [कलिल विद्राव तसाच राहू दिला असता तयार होणाऱ्या आणि घन पदार्थासारख्या भासणाऱ्या पदार्थाची, ⟶ जेल ] संरचना यांसंबंधी त्यांनी मौलिक संशोधन केले. अतीत सूक्ष्मदर्शक (पदार्थाची स्थिती समजण्यासाठी प्रकाशाच्या विखुरण्याच्या गुणधर्माचा उपयोग करणारा सूक्ष्मदर्शक) हे उपकरण त्यांनी शोधून काढले. या बहुमोल कामगिरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. 

त्यांचा जन्म व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे झाला व तेथेच त्यांचे बरेचसे शिक्षणही झाले. १८८९ साली त्यांनी म्यूनिक (जर्मनी) विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी मिळविली. त्यानंतर दोन वर्षे तेथेच आउगुस्ट कुंट या भौतिकीविज्ञांना संशोधनात त्यांनी मदत केली. १८९३ मध्ये ग्रात्स येथील तांत्रिक विद्यालयात त्यांनी अध्यापन-कार्य पत्करले. काच आणि चिनी माती यांच्या वस्तूंना चमक देणाऱ्या रंगांसंबंधी त्यांनी जे कार्य केले त्यामुळे येना येथील ‘शॉट अँड गेनोसेन’ या काचकारखान्याशी त्यांचा संबंध आला व शॉट यांच्या सहकार्याने त्यांनी जे संशोधन केले त्यातून अनेक रंगांच्या काचा आणि येनाची प्रसिद्ध दुधी काच निष्पन्न झाली. या निमित्तानेच कलिल रसायनशास्त्राचा सखोल अभ्यास करावा, असे त्याना वाटू लागले व त्यांनी १९०० मध्ये सैद्धांतिक संशोधनास वाहून घेण्याचे ठरविले. त्यानंतर त्यांनी एच्. सीडेन्टॉफ यांच्या मदतीने अतीत सूक्ष्मदर्शक हे उपकरण बनविले. या उपकरणामुळेच कलिलांचे संशोधन पद्धतशीर करणे शक्य झाले. १९०७ मध्ये ते गटिंगेन विद्यापीठात प्राध्यापक व ‘इन्स्टिट्यूट ऑफ इनऑरगॅनिक केमिस्ट्री ’ या संस्थेचे संचालक झाले. तेथे त्यांनी केलेल्या संशोधनकार्यात जेलांची संरचना, अतिगालन (कलिल कण गाळून अलग करण्याची क्रिया), अपोहन [खऱ्या विद्रावातील विरघळलेला पदार्थ व कलिल अलग करण्याची क्रिया, ⟶ अपोहन] यांसंबंधीच्या कार्याचाही समावेश होतो. अतीत सूक्ष्मदर्शकात सुधारणा करून त्यांनी निमज्जन (ज्यात  वस्तू व वस्तुभिंग हे दोन्ही एखाद्या द्रवाने आच्छादिलेले असतात असा) अतीत सूक्ष्मदर्शक बनविला. त्यांच्या कार्यामुळे जीवरसायनशास्त्र, सूक्ष्मजंतुविज्ञान व मृदा भौतिकी या विषयांतील काही प्रश्न सोडविण्यास फार मदत झाली. १९२९ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांनी Lehrbuch der Kolloidchemie, Über das Kolloid – Gold  (पी. ए. थैसन यांच्या सहकार्याने) आणि Zur Erkenntnis der Kolloid  हे ग्रंथ लिहिले. ते गाटिंगेन येथे मरण पावले. 

जमदाडे, ज. वि.