सॅकॅरीन: (C6H4COSO2NH). संश्लेषित मधुरक. हे उसाच्या साखरेपेक्षा(सुक्रोजापेक्षा) ३००–५०० पट अधिक गोड असते. खाद्य किंवा पेय पदार्थांना गोड चव आणण्यासाठी याचा वापर करतात. पोषणमूल्य नसलेले सॅकॅरीन शरीरातून चयापचय (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक प्रकिया)न होता तसेच मूत्रावाटे बाहेर पडते. याची सोडियम व कॅल्शियम लवणे पाण्यात अतिशय विद्राव्य (विरघळणारी) असल्यामुळे त्यांचा मधुरके म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो [⟶ मधुरके]. ⇨ मधुमेह झालेल्या व्यक्ती साखरेऐवजी सोडियम सॅकॅरिनाचा वापर करू शकतात.
आइरा रेमसेन आणि कॉन्स्टंटीन फालबर्ग यांनी १८७९ मध्येजॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत सॅकॅरिनाचा शोध लावला. याला ग्लुसाइड, सॅकॅरिनॉल, सॅकॅरिनोज, सॅकॅरॉल इ. नावे आहेत. याचा रेणुभार १८३.१८ असून ते पांढऱ्या स्फटिकांच्या किंवा स्फटिकी चूर्णाच्या स्वरूपात मिळते. याचा वितळबिंदू २२८° से. आहे. हे ॲसिटेट, बेंझीन व अल्कोहॉल यांमध्ये विद्राव्य आणि पाणी व ईथर यांमध्ये किंचित विद्राव्य आहे.
सॅकॅरिनाच्या संरचनेतील इमिडो हायड्रोजन अम्लीय असल्यामुळे सॅकॅरीन व क्षार यांच्यात विक्रिया होऊन सॅकॅरीन लवणे तयार होतात. सोडियम सॅकॅरीन हे लवण सॅकॅरिनाइतकेच गोड असते. या लवणाचा रेणुभार २४१.२१ असून ते पाण्यात लगेच विरघळते. फुलारण्यामुळे याच्या पांढऱ्या स्फटिकात निम्म्याइतके पाणी राहते. सॅकॅरीन अथवा त्याची लवणे सेवन केल्यानंतर शेवटी जिभेवर रेंगाळणारी चव कडवट असते.
रेमसेन व फालबर्ग यांनी शोधून काढलेली सॅकॅरीन तयार करावयाची पद्घतीच आजही वापरली जाते. या पद्घतीत टोल्यूइन व क्लोरोसल्फोनिक अम्ल यांची ०° ते ५° से. तापमानाला विक्रिया होऊन ऑर्थो-व पॅराटोल्यूइन सल्फोनिक क्लोराइडाचे मिश्रण तयार होते. या मिश्रणात अमोनिया घातल्यास ऑर्थो- व पॅरा-टोल्यूइन सल्फोनामाइडे तयार होतात. दोन्ही घटक भागशः स्फटिकीकरणाने वेगळे करता येतात. ऑर्थो घटकाचे ऑक्सिडीकरण केल्यास ऑर्थो-कार्बो क्सिल-बेंझीन सल्फोनामाइड तयार होते. त्यातून पाण्याचा एक रेणू काढून टाकल्यास सॅकॅरीन तयार होते. १९५० च्या सुमारास थॅलिक ॲनहायड्राइडापासून सॅकॅरीन तयार करण्याची प्रकिया विकसित झाली.
सॅकॅरीन छोट्या गोळ्या, चूर्ण किंवा द्रव या स्वरुपात तयार करतात. याची सोडियम लवणे जलविद्राव्य असल्यामुळे खाद्यपदार्थांत व पेयांत वापरण्यास जास्त सोयीची असतात. कमी ऊष्मांक असलेली सौम्य पेये, साखररहित च्युईंग गम, जॅम, जेली, पुडिंग्ज आणि सॅलड ड्रेसिंग्ज या उत्पादनांमध्येही याचा वापर करतात [⟶ मेवामिठाई]. सॅकॅरीन औषधी रसायनांमध्येही वापरता येते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी याच्या गोळ्या व द्रावणे मिळतात.
सॅकॅरिनाच्या अतिसेवनाने कर्करोग होत असल्याची शंका आल्यामुळे अन्नपदार्थात ते वापरण्यास काही देशांत बंदी घालण्यात आली होती परंतु २००१ सालापासून ही बंदी उठविण्यात आली.
पहा : मधुरके.
मिठारी, भू. चिं.
“