संक्रियात्मक अन्वेषण : ‘कोणत्याही समस्येसाठी चुकीची व वाईट उत्तरे शोधून काढण्याची कला म्हणजे संक्रियात्मक अन्वेषण, कारण ही कला माहीत वा उपलब्ध नसती किंवा वापरली गेली नसती तर त्याच समस्येची अधिक चुकीची व अधिक वाईट उत्तरे मिळत गेली असती’, असे विनोदाने वा गंमतीने म्हटले जाते. या ज्ञानशाखेच्या निरनिराळ्या उपलब्ध व्याख्यांवरून पुढील सुयोग्य व्याख्या करण्यात आली आहे : (अ) मानव-व –यंत्रे यांच्याशी संबंधित असणाऱ्या सुसंघटित प्रणालींवर नियंत्रण मिळविण्यासाठी, (आ) विविध ज्ञानशाखांच्या जाणकार व्यक्तिसमूहाने एकत्रितपणे केलेले व (इ) संपूर्ण संस्थेच्या हितासाठी लाभदायक ठरेल अशा प्रकारे केलेले, (ई) वैज्ञानिक पद्धतीचे उपयोजन म्हणजे संक्रियात्मक अन्वेषण होय.

संक्रियात्मक अन्वेषणही अगदी अलीकडे माहीत झालेली ज्ञानशाखा आहे. एक प्रकारे ती दुसऱ्या महायुद्धाची जगाला मिळालेली देणगी आहे, असे मानले जाते. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरूवातीच्या काळात ब्रि टन हे राष्ट्र एकाकी लढत होते. अमेरिका त्या युद्धात सामील झालेली नव्हती. त्याकाळात उपलब्ध साधन सामग्रीच्या वाटणीशी निगडित असलेले, तसेच लढाईच्या संबंधातील डावपेच व व्यूहरचना विषयींचे असे काही प्रश्न उपस्थित झाले होते. त्या प्रश्नांची उकल प्रत्यक्ष लष्करातील व्यक्तींना होत नव्हती. ज्या समस्यांच्या उकली मिळविणे कठीण होऊन बसते अशा समस्या सोडविण्यासाठी शास्त्रज्ञांची मदत घेण्याची प्रथा आहे. त्या प्रथेनुसार त्या वेळेस शास्त्रज्ञांना लष्कराशी संबंधित क्रि यांमध्ये संशोधन करण्याकरिता पाचारण केले गेले. सर्व विषयांतील शास्त्रज्ञांनी लष्कराच्या विविध फळ्यांत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांसमवेत काम करण्यास सुरूवात केली. लष्करी क्रि यासंबंधात शास्त्रज्ञांकडून केल्या गेलेल्या कार्यातून निर्माण झालेल्या ज्ञानाच्या समुच्च्याला संक्रियात्मक अन्वेषण असे संबोधण्यात आले. अशा तऱ्हेने ‘संक्रियात्मक’ हा शब्द लष्करी संदर्भातून आणि ‘अन्वेषण’ हा शब्द या कार्याशी शास्त्रज्ञांच्या झालेल्या सहभागामुळे योजला गेला आहे.

कोणत्याही संस्थेची, मग ती संस्था लष्करी असो अथवा औदयोगिक असो काही उद्दिष्टे किंवा लक्ष्ये असतात. त्या संस्थेला ती उद्दिष्टे साध्य करावयाची असतात. एकूण खर्च कमीत कमी करणे, नफ्याची पातळी जास्तीत जास्त वाढविणे, कमाल उत्पादन गाठणे, क्षमतेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे अशी काही सर्वसाधारण उद्दिष्टे असतात. त्याचबरोबर काम करणारी माणसे, यंत्रसामग्री , कच्चामाल, पैसा, वेळ अशा सामग्रीचा उपलब्ध साठा मर्यादित असतो. कोणत्याही सुसंघटित कार्यप्रणालीच्या प्रमुखाला (व्यवस्थापकाला) हाती असलेल्या सामग्री चा इष्टतम उपयोग करून उद्दिष्ट साध्य करणे हे एक महत्त्वाचे काम असते. यासाठी त्याला घ्याव्या लागणाऱ्या निर्णय-प्रक्रियेसाठी स्वानुभव व स्वत:ची निर्णयक्षमता आणि शास्त्रज्ञांनी विकसित केलेली राश्यात्मक (परिमाणात्मक) तंत्रे या दोन गोष्टींचा आधार असतो. संक्रियात्मक अन्वेषण या ज्ञानशाखेत निर्णयाच्या प्रक्रियेत उपयोगी पडतील अशा अनेक तंत्रांचे भांडार उपलब्ध आहे. यामुळे या ज्ञानशाखेला उपयोजित निर्णय उपपत्ती असेही संबोधतात.

अमेरिकेतही ज्ञानशाखा क्रि यात्मक अन्वेषण (ऑपरेशन्स रिसर्च) म्हणून ओळखली जाते, तर ब्रिटनमध्ये ती संक्रियात्मक अन्वेषण (ऑपरेशनल रिसर्च) या नावाने संबोधिली जाते. अमेरिकेत ‘द ऑपरेशन्स रिसर्च सोसायटी ऑफ अमेरिका’ आणि ‘द इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स’ या व्यावसायिक संघटना आहेत. अनेक व्यक्ती या दोन्ही संघटनांचे सभासद आहेत. तसेच त्यांची अनेक अधिवेशने व बैठका संयुक्तपणे एकत्र होतात. या दोन्ही संघटनांची सभासद यादी व कार्य पाहिले की, संक्रियात्मक अन्वेषण व व्यवस्थापन शास्त्र यांमधील साधर्म्य लक्षात येते. आजकाल संक्रियात्मक अन्वेषण हा विषय गणित, सांख्यिकी, व्यवस्थापन शास्त्र व अभियांत्रिकी या विभागांतून शिकविला जातो. काही विदयापीठांत संक्रियात्मक अन्वेषण असा स्वतंत्र विभागही अस्तित्वात आहे (उदा., दिल्ली विदयापीठ). विविध संदर्भात निर्णय उपपत्ती, संक्रियात्मक विश्लेषण, संक्रियात्मक मूल्यांकन, प्रणालीअन्वेषण, प्रणालीविज्ञान, प्रणाली अभियांत्रिकी, संक्रियात्मक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनशास्त्र या नावांनी ही विदयाशाखा ओळखली जाते. प्रणालीसंबंधी समस्येची उकल शोधताना सारख्याच पद्धतींचा अवलंब केला जात असला तरी ज्या प्रणालींमध्ये मानवी वर्तणुकीचा महत्त्वाचा सहभाग असतो अशा प्रणालीं मधील उपयोजनाला ‘संक्रियात्मक अन्वेषण’ आणि ज्या प्रणालीत मानवी वर्तणुकीच्या सहभागाला स्थान नाही अशा प्रणालींमधील उपयोजनाला ‘प्रणाली अभियांत्रिकी’ असे संबोधण्याचा प्रघात आहे. सुरूवातीच्या काळात संक्रियात्मक अन्वेषणाचा भर अस्तित्वात असलेल्या प्रणालीत सुधारणा घडवून आणण्याकडे आणि प्रणाली अभियांत्रिकीचा भर नव्या प्रणाली तयार करण्याकडे होता परंतु काळाच्या ओघात हा फरक पुसला गेला आहे.

संक्रियात्मक अन्वेषण या विदयाशाखेचे (१) व्यापक दृष्टिकोण म्हणजेच प्रणाली-पद्धती, (२) कालावलंबित्व, (३) बहुमितीय किंवा विविध विदयाशाखानुवर्ती किंवा बहुविदयाशाखाधिष्ठित मार्ग आणि (४) नियंत्रणसंबंधित समस्यांना वैज्ञानिक पद्धतीचे उपयोजन हे चार आवश्यक विशिष्ट गुणधर्म आहेत. यांमध्ये वैज्ञानिक पद्धती वापरल्यानेच व्यक्ति निरपेक्ष पद्धतीने समस्या सोडविता येतात.

संक्रियात्मक अन्वेषण पद्घत कोणतीही समस्या सोडविण्यासाठी पुढील सहा टप्प्यांचा अवलंब करते : (१) समस्येची व्यवस्थित मांडणी करणे, (२) समस्येची (गणिती) प्रतिकृती तयार करणे, (३) त्या प्रतिकृतीची उकल शोधून काढणे, (४) ती उकल व ती प्रतिकृती यांची कसोटी घेणे, (५) त्या उकलीवर नियंत्रण प्रस्थापित करणे, (६) अंमलबजावणी करणे.

संक्रियात्मक अन्वेषण पद्धती उपयोगात आणली गेलेली काही कार्यक्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत : (१) उपलब्ध सामग्रीचे वाटप, (२) स्पर्धात्मक परिस्थिती, (३) गर्दीमुळे होणाऱ्या कोंडीसंबंधातील समस्या, (४) गोदामातील साठ्यां विषयीच्या समस्या, (५) उपकरणांची देखभाल व बदलांविषयक समस्या, (६) कामे करण्याचा अनुक्र म व समन्वय, (७) तपासकार्य, (८) वाहनांचे मार्ग ठरविण्याविषयक समस्या.

गणितीय कार्यक्रमण [विशेषेकरून रैखिक (रेषीय) कार्यक्रमण] या तंत्राचा उपयोग दुर्मिळ सामग्री च्या वाटपासंबंधीच्या समस्या सोडविण्यासाठी होतो. उदयोग-व्यापार, लष्कर, निवडणुका इ. स्पर्धात्मक परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या समस्या हाताळण्यासाठी ⇨खेळसिद्धांत या तंत्राचा वापर होतो. गर्दीतील कोंडीमुळे उत्पन्न होणाऱ्या समस्यांच्या उकलीसाठी ⇨ प्रतीक्षावली सिद्धांतामधील प्रतिकृती वापरता येतात. याचप्रमाणे इतर प्रतिकृती व तंत्रे विविध प्रकारच्या समस्यांच्या उकलीसाठी उपलब्ध आहेत.

दुसरे महायुद्घ संपल्यानंतर लष्करातील समस्या सोडविण्यात संक्रियात्मक अन्वेषण पद्धती ज्यांनी वापरल्या ते तज्ञ उपलब्ध होते. त्यांनी सुसंघटित कार्यप्रणाली संबंधित समस्या हाताळण्यासाठी शोधून काढलेली तंत्रेही उपलब्ध होती. समस्यांची जटिलता विचारात घेतल्यास लष्करातील समस्या व उदयोग जगतातील समस्या यांच्यातील मूलभूत साधर्म्य जाणकारांच्या लक्षात येऊ लागले आणि संक्रियात्मक अन्वेषण पद्धतींचा उदयोग जगतात वापर सुरू झाला. ह्याच सुमारास झालेल्या संगणकाच्या आगमनाने संक्रियात्मक अन्वेषणाच्या प्रगतीस पोषक वातावरण तयार झाले. कारण जटिल समस्यांच्या उकलीसाठी कच्च्या आधार सामग्री वर (प्रदत्तावर) करावयाच्या खूप आकडेमोडींची आवश्यकता होती. त्यासाठी संगणकामुळे प्रोत्साहन मिळाले. यामुळे एकंदरीतच व्यवस्थापन शिक्षणात संक्रियात्मक अन्वेषण या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले.

अशा तऱ्हेने माणसे, यंत्रे, पैसा व कच्चामाल (4 M’s – Men, Machines, Money व Material) यांना घेऊन कार्यवाही करणाऱ्या उदयोग, व्यापार, शासन, लष्कर अशा व इतर कोणत्याही मानवी कार्यक्षेत्रातील प्रणालींचा (उदा., विमानवाहतूक, खाणकाम, यंत्रे, औषधे, प्रसाधने इ. उत्पादन करणाऱ्या कंपन्या) अभ्यास करून अंमलबजावणीशी संबंधित कार्यकारी व्यवस्थापनाला त्यांच्या निर्णय प्रक्रियेत धोरणात्मक अथवा क्रियात्मक मदत करण्यासाठी या ज्ञानशाखेचा उपयोग होतो. या कार्यात गणित, सांख्यिकी, तर्कशास्त्र अशा पारंपरिक शास्त्रांचा आणि संदेशवहन, निर्णयसिद्धांत, संघटनसिद्धांत, वर्तनविज्ञान, संक्रांतिविज्ञान,सर्वसाधारण प्रणाली सिद्धांत अशा आधुनिक शास्त्रांची मदत घेतली जाते.

पहा : खेळ सिद्धांत प्रणाली अभियांत्रिकी प्रतिकृति प्रतीक्षावलि सिद्धांत व्यवस्थापन शास्त्र सदृशीकरण.

संदर्भ : 1. Budnick, F. McLeavey, D. Mojena, R. Principles of Operations Research for Management, 1988.

2. Hillier, F. S. Liebermann, G. Introduction to Operations Research, 1986.

3. Taha, H. A. Operations Research, 1987.

4. Wagner, H. M. Principles of Operations Research with Applications to Managerial Decisions 1982.

टिकेकर, व. ग.