श्वे डागोन पॅगोडा : जगप्रसिद्ध भव्य व आकर्षक पॅगोडा. भगवान बुद्धाच्या आणि बौद्ध भिक्षूंच्या पवित्र अवशेषांचे जतन करण्यासाठी प्रामुख्याने आशिया खंडात ⇨ पॅगोडा नामक पवित्र स्मारकवास्तू बांधण्यात आल्या. त्यांपैकी श्वे डागोन पॅगोडा सर्वांत प्राचीन, नयनरम्य व वैशिष्ट्यपूर्ण असून तो म्यानमार (ब्रह्मदेश) मधील श्वे डागोन पॅगोडा : बौद्ध धर्मीयांचे पवित्र ठिकाण, यांगोन (रंगून).यांगोन [⟶ रंगून] येथे आहे. हा पॅगोडा सु. २५०० वर्षांपूर्वीचा असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. या पॅगोड्याच्या आसपास प्रथम जी वस्ती झाली, तिला मध्ययुगापासून ‘ डागोन’असे नाव होते. पंधराव्या शतकाच्या प्रारंभी मॉन राजांनी डागोनचे शहरात रूपांतर केले. तत्कालीन राज्यकर्ती राणी शिन्सॉबू हिने पॅगोडाला सुवर्ण मुलामा दिला. शिन्‌ब्यूशीन या अवाराज्याच्या राजाने १७७४ मध्ये या पॅगोडाला भव्य रूप दिले आणि त्याची उंची वाढवून त्यास आपल्या वजनाइतक्या सोन्याने मढवून त्याचे बाह्य रूप मोहक केले.१७७८ मध्ये त्याचा मुलगा सिंगू राजा याने पुन्हा त्यावर सोन्याचा मुलामा देऊन सोळा टनांची ब्राँझ-घंटा घडविली. सांप्रत ती व्यासपीठाच्या वायव्य कोपऱ्यात आढळते. यांगोन शहरातील हा पॅगोडा सर्वांत उंच (सु.११२.१६ मी.) असून तो सु. ५१ मी. उंचीच्या टेकाडावर उभारलेला आहे. त्याच्या उत्तुंग सोनेरी कळसामुळे तो उठून दिसतो. त्याचे बांधकाम विटांचे आहे. एखादया प्रचंड घंटेसारखा त्याचा आकार भासतो. त्याची रचना व सजावट विशेषत्वाने तत्कालीन स्थानिक ब्रह्मी अलंकरण-शैलीत केलेली आहे. पारंपरिक समजुतीनुसार या पॅगोड्यात भगवान गौतम बुद्धांचे आठ केस पवित्र अवशेष म्हणून जतन केलेले आहेत. त्याचबरोबर अन्य तीन बौद्ध भिक्षूंचे पवित्र अवशेषही त्यात आहेत. हा पॅगोडा तळापासून शिखरापर्यंत विविध राजवटींत संपूर्णत: शुद्ध सोन्याने मढविण्यात आला. सांप्रत लोकनिधी जमवून सुवर्णाच्या आवरणाचे प्रसंगविशेषी नूतनीकरण केले जाते.

श्वे डागोन पॅगोडा पूर्वीपासूनच बौद्ध धर्मीयांचे पवित्र तीर्थस्थान व पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. सण व उत्सवसमयी पॅगोड्यामध्ये सामूहिक धार्मिक संगीत सादर केले जाते. महत्त्वाच्या धार्मिक उत्सवप्रसंगी देशाच्या सर्व भागांतून बौद्ध भाविक येथे एकत्र जमतात व उपासना करतात. सभोवतालची विशाल आकाराची (सु. २७४ -२०९ मी.) संगमरवरी फरसबंदी गच्ची हे उपासनाकेंद्र म्हणून वापरले जाते. या उपासनाकेंद्रात सर्वत्र प्रार्थनामंदिरे बांधली असून, त्यांत बुद्धाच्या विविध आसनांतील लहानमोठया आकाराच्या अनेक मूर्ती आहेत. तेथील वेदीवर भक्तगण उदबत्त्या, मेणबत्त्या व फुले ठेवतात.१९५२ मध्ये भगवान गौतम बुद्धाच्या महानिर्वाणाला २५०० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने या पॅगोड्याच्या उत्तरेला आधुनिक ‘विश्वशांती’ पॅगोडा (‘काबू अये ’) स्वतंत्र ब्रह्मदेशाचे पहिले पंतप्रधान ऊ नू यांच्या हस्ते उभारण्यात आला. त्याच्या नजीकच एक कृत्रिम गुहा व सभागृहही १९५३-५४ मध्ये बांधण्यात आले. (पहा : मराठी विश्वकोश : खंड ११ ).

संदर्भ : Singh, Nagendra Kumar, Ed., International Encyclopedia of Buddhism, Vol. 4, New Delhi, 1996.

इनामदार, श्री. दे.