श्विंगर, जूल्यॅन सीमॉर : (१२ फेबुवारी १९१८-१६ जुलै १९९४). अमेरिकन सैद्धांतिक भौतिकीविज्ञ. पुंज विद्युत् गतिकीची सूत्ररूप मांडणी केल्याबद्दल श्विंगर यांना जपानी भौतिकीविज्ञ ⇨शिन-इचिरो टॉमॉनागा आणि अमेरिकन भौतिकीविज्ञ ⇨रिचर्ड फिलिप्स फाइनमन यांच्याबरोबर१९६५ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी आइन्स्टाइन यांच्या मर्यादित सापेक्षता सिद्धांताशी पुंजयामिकीचा मेळ बसविला. पुंज विद्युत गतिकी सिद्धांतामुळे मूलकण भौतिकीवर महत्त्वाचा परिणाम झाला [⟶ पुंजयामिकी पुंज सिद्धांत]. त्यांनी इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन युग्म असलेला आविष्कार (श्विंगर परिणाम) स्थापित केला.
श्विंगर यांचा जन्म न्यूयॉर्क सिटी येथे झाला. त्यांनी कोलंबिया विदयापीठातून भौतिकी या विषयात बी.ए. (१९३६) व पीएच्.डी. (१९३९) या पदव्या संपादन केल्या. त्यांनी बर्कली येथील कॅलिफोर्निया विदयापीठात ⇨जूलियस रॉबर्ट ओपेनहायमर या सैद्धांतिक भौतिकीविज्ञाच्या मार्गदर्शनाखाली काम केले (१९३९-४१). त्यांनी पर्द्यू विदयापीठ, मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि हार्व्हर्ड विदयापीठ येथेही कार्य केले (१९४१ – ७२). त्यानंतर त्यांनी लॉस अँजेल्स येथील कॅलिफोर्निया विदयापीठात शेवटपर्यंत उगम सिद्धांतावर कार्य केले.
श्विंगर यांनी प्रारणासंबंधीच्या पुंज सिद्धांताचा विकास केला. त्यांनी विद्युत् भारित कण आणि विद्युत् चुंबकीय क्षेत्र यांमधील परस्परक्रियांचे अध्ययन करता येऊ शकेल असे गणितीय विशिष्ट रूप तयार केले. तसेच त्यांनी विद्युत् भार आणि वस्तुमान यांचे प्रसामान्यीकरण करून इलेक्ट्रॉनाची पुंजीकृत प्रारण क्षेत्राशी होणाऱ्या परस्परक्रियेमुळे इलेक्ट्रॉनाच्या ऊर्जेमध्ये झालेल्या बदलांसंबंधीच्या अडचणी दूर केल्या. श्विंगर यांनी पुंज विद्युत् गतिकीची केलेली सूत्ररूप मांडणी सापेक्षता सिद्धांताशी सुसंगत असून प्रयोगाच्या कसोटीलाही उतरते.
इलेक्ट्रॉनाची विद्युत् चुंबकीय क्षेत्राच्या तरंगासारख्या गतीबरोबर परस्परक्रिया होते. या परस्परक्रिया ऊर्जेमध्ये अनंत श्रेणीच्या स्वरूपातील विद्युत् चुंबकीय स्वयंऊर्जा पदे असल्याचे श्विंगर यांच्या लक्षात आले. विद्युत् चुंबकीय क्षेत्राच्या तरंगासारख्या गतीमुळे इलेक्ट्रॉनाला अतिरिक्त विद्युत् चुंबकीय वस्तुमान मिळते. वस्तुत: निरीक्षणाने मिळालेले इलेक्ट्रॉनाचे वस्तुमान (मोजण्यात आलेले वस्तुमान) हे यांत्रिक वस्तुमान आणि विद्युत् चुंबकीय वस्तुमान यांची बेरीज असते. डिरॅक समीकरणामध्ये एकूण वस्तुमानाऐवजी यांत्रिक वस्तुमान अशा चुकीच्या इलेक्ट्रॉन वस्तुमान पदाचा समावेश असल्याचे श्विंगर यांनी दाखविले. फाइनमन आणि टॉमॉनागा यांनी स्वतंत्रपणे या समस्येवर अशाच प्रकारचे संशोधन केले.
श्विंगर यांना नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्यत्व (१९४९) व विज्ञानाचे राष्ट्रीय पदकही मिळाले (१९६४). डिस्कन्टिन्यूटीज इन वेव्हगाइड्स (डी. एस्. सॅक्सन यांच्याबरोबर १९६८), पार्टिकल्स अँड सोर्सेस (१९६९), क्वांटम कायनेमॅटिक्स अँड डायनॅमिक्स (१९७०) आणि पार्टिकल्स, सोर्सेस अँड फील्ड्स (खंड पहिला १९७०, खंड दुसरा १९७३) ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
लॉस अँजेल्स येथे त्यांचे निधन झाले.
सूर्यवंशी, वि. ल.