श्वसन साहाय्यक : अंतर्बाह्य वातावरणात विषारी वायू , बाष्प आणि ⇨वायुकलिल असल्यास त्यांपासून संरक्षण करण्याकरिता शुद्ध हवेचा पुरवठा करून श्वसनास मदत करणारी साधने म्हणजे श्वसन साहाय्यक होत. वायुवीजन होत नसलेली तळघरे, विहिरी, खाणी, आग लागलेल्या इमारती आणि ⇨अक्रिय वायू असलेल्या बंदिस्त जागा या ठिकाणी असे दूषित वातावरण असते. वातावरणातील धूळ, धुके आणि वाफारे यांचाही विविक्त (पृथक्) धोक्यांमध्ये समावेश होतो. सिलिका, परागकण, ॲस्बेस्टस, किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारे) कण यांची धूळ घनरूपात, रंगलेप तुषार, सिगारेटचा धूर, सधूम धुके द्रवरूपात आणि संघनन झालेले वाफारे (धातू व धातूंची ऑक्साइडे) घनरूपात असतात.
नैसर्गिक शुद्ध हवेत ऑक्सिजनाचे प्रमाण सु. २१% असते. कमीतकमी सु.१९.५% किंवा अधिक घनफळ असलेल्या ऑक्सिजनयुक्त हवेचा पुरवठा श्वसन साहाय्यकांव्दारे करण्यात येतो. या साधनांचा मोठया प्रमाणात वापर कारखान्यांमध्ये कामगारांचे धोकादायक वातावरणापासून आणि लष्करामध्ये सैनिकांचे रासायनिक, जैविक आणि किरणोत्सर्गी कारकांपासून (दूषितांपासून) संरक्षण करण्यासाठी केला जातो. शरीरांतर्गत विकारामुळे काही रूग्णांना शुद्ध हवा किंवा औषधी मात्रा या साधनाने द्यावी लागते.
बाहेरच्या हवेबरोबर येणारा विषारी वायू किंवा पदार्थ कण काढून टाकणे किंवा दूषित वायूमुळे ऑक्सिजनाची येणारी तूट भरून काढणे किंवा एकदम होत राहतील अशी व्यवस्था या साधनात केलेली असते. हे काम तीन पद्धतींनी करण्यात येते : (१) रासायनिक प्रक्रियेने, शोषणाने किंवा अधिशोषणाने (पृष्ठभागावरील शोषणाने) दूषित हवेतील दोष किंवा धोका नाहीसा करणे, (२) स्वतंत्र मार्गाने शुद्ध हवेचा पुरवठा करणे आणि (३) बाह्य वातावरणावर मुळीच अवलंबून न राहता उच्छ्वासित कार्बन डाय-ऑक्साइडाचे रासायनिक पद्धतीने शोषण करून किंवा तो बाहेरील वातावरणात फेकून उच्छ्वासित हवा शुद्ध करणे व शुद्ध हवेचा सतत पुरवठा करणे.
श्वसन साहाय्यकाचे प्रकार : विषारी वायू शोषणारा साधा मुखवटा : यामुळे वातावरणातील हवा श्वास घेताना श्वसन साहाय्यकातील बदलता येणाऱ्या गाळण्यांतून घेतली जाते. गाळण्यांतील शुद्धिकारक पदार्थाने हवेतील इजा व नुकसान करणारे घटक काढून टाकले जात असल्यामुळे शुद्ध हवा मिळते. श्वास सोडताना कार्बन डाय-ऑक्साइड असलेली हवा निष्कास झडपेतून बाहेर टाकली जाते. या साधनात निष्कास झडप नसल्यास श्वसनावाटे बाहेर टाकलेली हवा परत त्या शुद्धिकारक पदार्थातून (गाळण्यांतून) बाहेर जाते. अंतःश्वसन चालू असताना मुखवट्याच्या आतील बाजूस हवेचा ऋण दाब निर्माण होतो. यासाठी हवेची गळती टाळण्यासाठी मुखवटा चेहृयावर चामड्याच्या पट्ट्यांनी घट्ट बसवितात. यात पहाण्यासाठी डोळ्यांसमोर काचा किंवा पारदर्शक प्लॅस्टिकाचे तुकडे बसविलेले असतात. हा श्वसन साहाय्यक वजनाने हलका व वापरल्यानंतर फेकून देता येतो. (आ.१).
शुद्ध हवा भाता : रासायनिक कारखान्यात काम करणाऱ्यांना, तेलाच्या टाक्या साफ करणाऱ्यांना किंवा अशाच दूषित ठिकाणी काम करणाऱ्यांना शुद्ध हवेचा पुरवठा बाहेरून नळीवाटे करावा लागतो. डोळ्यावरून तोंडावर बसणारी एक बळकट टोपी असते, तिच्यातून स्पष्ट दिसेल अशी व्यवस्था असते व टोपीलाच बाहेरून येणाऱ्या शुद्ध हवेच्या पुरवठ्याची नळी जोडलेली असते. विद्युत् घटमालेवर चालणाऱ्या बाह्य भात्याने किंवा पायाने चालविता येणाऱ्या भात्याने शुद्ध हवा पुरविली जाते. या पद्धतीने बंदिस्त भागातील हवेची गळती कमी होते व श्वसन सहज होते.
संपीडित वायुसाठ्याचे साधन : बाहेरील दूषित हवा शुद्ध करून ती श्वसनास वापरण्याऐवजी संपीडित
(दाब दिलेली) हवा किंवा ऑक्सिजन असणारे पात्र जवळ ठेवून त्यातून हवा मिळण्याची व्यवस्था करण्यात येते. उच्छ्वासात असणारा कार्बन डाय-ऑक्साइड वायू बाहेरील वातावरणात फेकला जातो. द्रवरूप हवाही अशा साधनात वापरतात. उच्छ्वासावाटे टाकलेल्या हवेचा पुन्हा उपयोग केला जात नसल्यामुळे या पद्धतीला खुले मंडल पद्धती म्हणतात.
स्वयंपूर्ण श्वसन उपकरण : (सेल्फ-कंटेन्ड ब्रिदिंग ॲपॅरेटस SCBA). या श्वसन साहाय्यकात वापरणाऱ्याने बाहेर टाकलेल्या हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड रासायनिक पद्धतीने (उदा., सोडियम पेरॉक्साइडामधून जाऊ देऊन) वेगळा काढला जातो आणि राहिलेल्या हवेला ऑक्सिजनाचा पुरवठा केला जातो (आ. २). आग विझविण्याच्या वेळेस, खाणीत, अंतराळ संशोधनात व पाण्याखाली काम करताना अशा श्वसन साहाय्यकाचा फार उपयोग होतो.
पुनरूज्जीवन साधन : विषबाधितांना, बेशुद्धावस्थेत असलेल्यांना, विजेचा झटका बसलेल्यांना किंवा पाण्यात अर्धवट बुडाल्यामुळे श्वसनक्रिया तात्पुरती बंद झालेल्यांना एक प्रकारे जीवदान देण्यासाठी हे साधन वापरतात. रूग्णाच्या तोंडावर मुखवटा घालून त्याला लावलेल्या नळीवाटे ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड (७ %) यांचे मिश्रण नाकातोंडातून जाऊ दिल्यास त्याची श्वसनक्रिया हळूहळू सुरू होते. हा वायुप्रवाह सारखा चालू ठेवतात किंवा रूग्णाच्या फुप्फुसाच्या क्रियेनुसार त्यावर नियंत्रण ठेवतात.
विमानातील वातावरण निर्मिती साधने : खूप उंचीवरून विमानातून प्रवास करणाऱ्यांना पृथ्वीच्या पृष्ठभागावर जसा ऑक्सिजनाचा पुरवठा होतो तसा मिळत नाही. याकरिता प्रत्येक प्रवाशाला व्यक्तिगत श्वसन साहाय्यक देण्याऐवजी विमानातील सर्व वातावरण पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वातावरणाप्रमाणे ठेवले जाते. विमानात फार मोठया दाबाखाली संपीडित ऑक्सिजनाचा साठा ठेवलेला असतो व त्यातून आवश्यक असे वातावरण तेथे तयार केले जाते.
लष्करी वायुमुखवटे : पहिल्या महायुद्धात१९१५ साली जर्मनीने युद्धात विषारी वायू वापरण्यास सुरूवात केल्यामुळे इंग्लंड व मित्रराष्ट्रांनी सैनिकांचे अशा विषारी वायूपासून संरक्षण करण्यासाठी अगदी प्राथमिक अवस्थेत असलेले श्वसन साहाय्यक साधन किंवा विषारी वायू प्रतिबंधक मुखवटा तयार केला. त्यानंतर रासायनिक, जैविक व किरणोत्सर्गी आव्हानांना तोंड देता येणारे सुधारित मुखवटे तयार करण्यात आले. अशा काही साधनांमध्ये ती न काढताही खाद्यपदार्थ खातापिता येतील अशा सोयी असतात. वापरात नसताना हे साधन एका पिशवीत वा कॅरिअरमध्ये ठेवतात. यामुळे हे साधन व पृष्ठशोषक माध्यम यांचे संदूषण होत नाही.
पहा : श्वसन, कृत्रिम.
सूर्यवंशी, वि. ल.
“