श्लायरमाखर, फ्रीड्रिख एर्न्स्ट : (२१ नोव्हेंबर १७६८ - १२ फेबुवारी १८३४). जर्मन तत्त्वज्ञ, प्रॉटेस्टंट पंथाचा ईश्वरविदयावेत्ता आणि भाषाशास्त्रज्ञ. जन्म बेस्लो (सायलेशिया, प्रशिया) येथे. आई-वडील धर्मोपदेशकांच्या कुटुंबात वाढलेले होते. ‘ मोरेव्हिअन बेदर्न ’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका धार्मिक गटाच्या निस्की येथील एका शाळेत त्याचे काही शिक्षण झाले. ग्रीक-लॅटिन भाषांविषयीची ओढ त्याला येथेच निर्माण झाली, तसेच धार्मिक जीवन जगण्याची जाणीवही उत्कट झाली. तथापि स्वतंत्र प्रज्ञेला आणि चिकित्सक वृत्तीला फारसा वाव नसलेल्या तेथल्या वातावरणाला कंटाळून त्याने हाल विदयापीठात शिक्षण घेतले. १७९० मध्ये धर्माधिकारदीक्षेसाठी (ऑर्डिनेशन) आवश्यक त्या परीक्षा त्याने दिल्या. १७९६ मध्ये धर्मोपदेशक म्हणून तो बर्लिनमध्ये स्थायिक झाला. तेथेच जर्मन साहित्यिक आणि समीक्षक ⇨ फ्रिड्रिख फोन श्लेगेल ह्याचा सहवास आणि मैत्री त्याला लाभली. १७९९ मध्ये ऑन रिलिजन : स्पीचिस टू इट्स कल्चर्ड डिस्पाइझर्स (इं. भा. १८९३) हा त्याचा गंथ प्रसिद्घ झाला. ह्या गंथामुळे त्याला राष्ट्रीय पातळीवरची कीर्ती प्राप्त झाली. त्यानंतर सालिलॉक्वाइझ (१८००, इं. भा. १९२६), आउटलाइन ऑफ ए किटिक ऑफ प्रिव्हिअस एथिकल थिअरी (१८०३, इं. भा.), द क्रिश्चन फेथ (१८२१-२२, सुधारित आवृ. १८३०-३१, इं. भा. १९४८, १९६३), बीफ आउटलाइन ऑफ द स्टडी ऑफ थिऑलॉजी (१८११, इं. भा. १८५०) हे गंथ प्रसिद्घ झाले. १८१० मध्ये बर्लिन विदयापीठात तो प्राध्यापक म्हणून काम करू लागला आणि आपले उर्वरित आयुष्य त्याने ईश्वरविदया, बायबलचा नवा करार, नीतिशास्त्र इ. विषय तेथे शिकविण्यात व्यतीत केले.
श्लायरमाखर हा ⇨ इम्यन्युएल कांट (१७२४-१८०४), ⇨ योहान गोटलीप फिक्टे (१७६२-१८१४), ⇨ हेगेल (१७७०-१८३१) ⇨फ्रीड्रिख व्हिल्हेल्म योझेफ फोन शेलिंग (१७७५-१८५४) ह्या तत्त्वज्ञांचा समकालीन होता व त्यांचा त्याच्यावर प्रभावही होता. आधुनिक काळात प्रभावी ठरलेल्या चिद्वादी तत्त्वज्ञानाचा उगम कांटच्या तत्त्वज्ञानात आढळतो. कांटने स्वतःच्या तत्त्वज्ञानाचे वर्णन चिकित्सक चिद्वाद वा अतिशायी चिद्वाद असे केले होते. त्याच्या ह्या चिद्वादाचा विकास फिक्टे, हेगेल आणि शेलिंग ह्यांनी केला. [⟶ चिद्वाद]. श्लायरमाखरने चिद्वादाची उभारणी केली नसली, तरी त्याच्या चिंतनाची बैठक चिद्वादीच होती. ईश्वर आणि आत्मा हे वेगवेगळे असले, तरी त्यांचे अस्तित्व अंतिमतः विभक्त असू शकत नाही, त्यामुळे धार्मिक श्रद्धा ही सर्व मानवांमध्ये निसर्गतःच असते, हा विचार त्याच्या सर्व विचारांच्या केंद्रस्थानी आहे. ह्या विचाराच्या धाग्याने त्याचे चिंतन ख्रिस्ती संत ⇨ सेंट ऑगस्टीन (इ. स. ३५४-४३०) ह्याच्या विचारांशी जोडले गेले आहे.
वर म्हटल्याप्रमाणे श्लायरमाखरवर कांटचा प्रभाव असला, तरी कांटचे शुद्ध बुद्धीवर आधारलेले नीतिशास्त्र आणि धर्मविषयक विचार त्याला अमान्य होते. ईश्वर आणि आत्मा ह्यांचे नाते बौद्धिक स्तरावरचे नसून भावनेच्या स्तरावरचे आहे, अशी श्लायरमाखरची धारणा होती. त्याच्या मते बुद्धीचे प्रकटीकरण नेहमी विशिष्ट व्यक्ती आणि संस्था ह्यांमधून होत असते. व्यक्तीच्या विशिष्टतेला वा विशेषत्वाला श्लायरमाखरच्या विचारविश्वात महत्त्वाचे स्थान आहे. स्थल, काल, समाज, संस्था इत्यादींव्दारे व्यक्तीच्या विशिष्टत्वाची जडणघडण होत असते. व्यक्ती म्हणजे केवळ शरीर आणि मन ह्यांची विशिष्ट स्थळकाळातील रचना नसते. प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धीच्या विशिष्ट रचनेमुळे ती इतरांपासून वेगळी ठरते. मात्र तिचे अनन्यत्व विचार करणे, ज्ञान मिळविणे, तसेच इच्छा वा कृती करणे, ह्यांमध्ये प्रत्यक्षपणे आणि पूर्णपणे कधीही अभिव्यक्त होत नाही. व्यक्तीच्या स्वजाणिवेची भावना (फीलिंग) हे जे रूप आहे, त्यात तिचे अनन्यत्व जाणता येते. त्या स्वजाणिवेच्या भावनेचा उच्चतम, अत्यंत परिणत आणि उत्कट असा आविष्कार म्हणजे धर्म होय. धर्म ही संपूर्ण अवलंबित्वाची वा शरणतेचे भावना असते. व्यक्तीच्या इतर व्यक्तींशी वा शक्तींशी असलेल्या संबंधांतून ही भावना निर्माण होऊ शकत नाही, ह्या नात्यांमध्ये सापेक्ष अवलंबित्वाचे वा सापेक्ष निरवलंबित्वाचे भान असते. ह्याउलट संपूर्ण अवलंबित्वाची भावना ईश्वराशी नाते असल्याच्या जाणिवेपेक्षा वेगळी नाही. ‘ ईश्वर ’ ह्या शब्दाचा मूळ अर्थ परिपूर्ण सत्ता (परफेक्ट बीइंग) असा नसून संपूर्ण अवलंबित्वाची होणारी भावनागर्भ जाणीव, संपूर्ण अवलंबित्वाचे अनुभवास येणारे नाते, हा आहे. धर्माचा उगम ह्या जाणिवेतच आहे. तात्त्विक दृष्टीने पाहता, धर्म हा आकारिक आणि अमूर्त असतो. वेगवेगळे विशिष्ट धर्म म्हणजे त्या मूळ धर्माची विशिष्ट अशी सामाजिक – ऐतिहासिक रूपे वा आकृतिबंध असतात. त्यांच्यावर त्यांच्या संस्थापकांची छाप असते. अशा सर्व धर्मांत ख्रिस्ती धर्म सर्वश्रेष्ठ असून मूळ आणि शुद्ध रूपातील धर्मभावनेचा प्रत्यय घेण्यासाठी सर्व मानवांना येशू ख्रिस्तामार्फत व्यक्तिगत पातळीवर ईश्वराशी नाते जोडावे लागते. धार्मिक श्रेयसाचा मार्ग येशू ख्रिस्त दाखवितो आणि सर्व समाजाचे नैतिक श्रेयस हे त्या समाजात शुद्ध नैतिक चारित्र्याच्या किती व्यक्ती आहेत, यावर अवलंबून असते.
धर्म, नीती आणि संस्कृती ही क्षेत्रे श्लायरमाखरच्या खास आवडीची आणि संशोधनाची होती तथापि अर्थविवरणशास्त्राला (हर्मेन्यूटिक्स) त्याने केलेले योगदानही महत्त्वाचे आहे. विसाव्या शतकात यूरोपमध्ये निर्माण झालेल्या तत्त्वज्ञानात अर्थविवरणास आलेल्या महत्त्वाचा विचार करता, ह्या संदर्भातही श्लायरमाखरचे महत्त्व ध्यानात येते.
धर्मगंथांचा विशेषतः बायबलच्या नव्या कराराचा अर्थ लावण्याच्या गरजेतून निर्माण झालेल्या ह्या शास्त्राला स्वच्छंदतावादी चळवळीमुळे एक वेगळे रूप मिळाले. ह्या चळवळीच्या प्रभावामुळे अर्थविवरणशास्त्रज्ञ गंथकर्त्याकडे निर्माता म्हणून आणि गंथसंहितेकडे त्याच्या निर्मितिक्षम ‘ स्व ’ ची एक कलात्मक अभिव्यक्ती म्हणून पाहू लागले. कांटच्या परंपरेतील आकलनाच्या संकल्पनेने प्रभावित झालेल्या ह्या अर्थविवरणशास्त्राचे कार्य आकलनातील अडचणी दूर करणे असे न राहता गैर आकलनाची शक्यता दूर करणे आणि आकलनाच्या शक्यतेच्या पूर्वअटींवर प्रकाश टाकणे, असे झाले. श्लायरमाखरच्या मते अर्थविवरणशास्त्राची गरज एखादया संहितेचे आकलन होत नसल्यामुळे भासते असे नसून चुकीच्या आकलनाच्या स्वाभाविक शक्यतेमुळे ती निर्माण होते. संहितेचा काळ आणि वाचकांचा काळ ह्यांतील अंतर, ह्या काळात शब्दांचे झालेले अर्थांतर, जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात पडलेला फरक इ. कारणांमुळे संहितेचे आकलन चुकीचे होण्याची शक्यता असते. संहितेतून जो अर्थ प्रतीत होतो असे वाटते, तो तिचा खरा अर्थ असेलच असे नसते. शिस्तबद्ध पद्धतीशास्त्रानुसार केलेल्या चिकित्सक विवरणातून खरा अर्थ उलगडतो. असे विवरण संहितेच्या काळातील ऐतिहासिक जीवनदृष्टीशी तिचा संबंध जोडीत असते.
पद्धतीशास्त्राच्या दृष्टीने पाहता, आकलनाचे वाचिक क्रियेशी साम्य असते. ह्या दोन्ही भाषिक कृती आहेत. सर्व मानवांमध्ये आढळणारी मूलभूत भाषिक क्षमता त्यांच्या मुळाशी असते. तसेच एखादे लिखित वा उच्चारित वाक्य समजून घेण्यासाठी त्याचे दोन भिन्न पातळ्यांवर आकलन होणे आवश्यक असते : (१) ते वाक्य ज्या भाषेतील असेल, त्या भाषेच्या व्याकरणीय नियमांनुसार निर्माण होणारा आकारिक संबंध, (२) त्या वाक्याच्या उपयोजनामुळे व्यक्तीच्या जीवनक्रियेशी येणाऱ्या संबंधातून निर्माण होणारे अर्थापन. ह्या दोन पातळ्यांना अनुसरून विवरणाच्या व्याकरणीय आणि संज्ञापनीय अशा दोन पद्धती असतात. ह्यांतील संज्ञापनीय पातळी मानसिक आहे, की नाही ह्याबद्दल अलीकडील तत्त्ववेत्त्यांत मतभेद आहेत. श्लायरमाखरच्या काळात ही पातळी मानसिक पातळीवरची आहे, असेच मानले जात असे.
अर्थविवरणाच्या पद्धतीशास्त्रासंबंधीचे त्याचे विवेचन महत्त्वपूर्ण आहे. मानसशास्त्रीय पद्धतीवर त्याने खूप भर दिला असल्यामुळे त्याच्यावर मानसशास्त्रीयवादी असल्याचा आरोप करण्यात येतो. त्याचप्रमाणे आकलन आणि विवरण ह्यांत सुस्पष्ट फरक करण्यात तो यशस्वी ठरला नाही, हेही नमूद करणे आवश्यक आहे.
बर्लिन येथे तो निधन पावला.
संदर्भ : 1. Barth, Karl, From Rousseau to Ritschl, London, 1959.
2. Brandt Richard, The Philosophy of Friedrich Schleiermacher, New York, 1941.
3. Niebuhr, Richard R. Schleiermacher on Christ and Religion, New York, 1964.
गंगावणे, दीप्ती
“