श्रॉफ, गोविंददास मन्नुलाल : (२४ जुलै १९११    २१ नोव्हेंबर २००२). बिटिशांकित हिंदुस्थानातील गोविंदभाई श्रॉफहैदराबाद संस्थानातील जनतेच्या मुक्तिलढयाचे एक नेते व ⇨स्वामी रामानंद तीर्थ यांचे निकटचे सहकारी. त्यांचा जन्म विजापूर (कर्नाटक राज्य ) येथे झाला. औरंगाबाद  येथे शासकीय प्रशालेत शिकत असताना गणेशोत्सवात पुढाकार घेतल्यामुळे हेडमास्तरांनी केलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ ते औरंगाबाद सोडून पुढील शिक्षणासाठी हैदराबादच्या चादरघाट हायस्कूलमध्ये आले. मॅट्रिकच्या परीक्षेत संस्थानात सर्वप्रथम. मद्रास विदयापीठाची इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण  झाल्यावर स्वातंत्र्य-चळवळीत भाग घेण्यासाठी शिक्षण स्थगित केले परंतु चळवळ थांबल्यामुळे पुन्हा शिक्षण सुरू. कार्ल मार्क्सच्या विचारांचे अभ्यासमंडळात अध्ययन. कोलकाता येथील सिटी कॉलेजमधून गणित विषय घेऊन बी.एस्सी. ( ऑनर्स ). पुण्याच्या फर्ग्युसन महाविदयालयातून १९३५ मध्ये त्यांना गोखले स्कॉलर म्हणून गौरविण्यात आले. गणित विषय घेऊन ते एम्.एस्सी. झाले आणि नंतर १९३६ मध्ये त्यांनी एल्एल्.बी. पदवी  घेऊन काही काळ औरंगाबादच्या शासकीय विदयालयात अध्यापन केले. याच सुमारास त्यांचा विवाह मुरादाबादच्या मेहता घराण्यातील सत्यवती ऊर्फ सत्याबेन या सुविदय मुलीशी झाला (१९३७). त्यांना डॉ. अजित, डॉ. संजीव व राजीव हे तीन मुलगे असून डॉ. उषा सुरीया या त्यांच्या स्नुषा होत.

काँग्रेससारख्या राजकीय संघटनेस परवानगी नसल्यामुळे जून १९३७ मध्ये परतूर येथे महाराष्ट्र परिषद या नावाने भरलेल्या कार्यकर्त्यांच्या अधिवेशनास ते उपस्थित होते. स्वामी रामानंद तीर्थ यांच्याशी त्यांचा तेथे परिचय झाला. सप्टेंबर १९३८ मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसवर स्थापनेपूर्वीच बंदी आल्यामुळे सत्यागह आंदोलन करण्याचे ठरले. नोकरीचा राजीनामा देऊन सत्यागहींची नोंदणी करण्याचे काम त्यांनी केले. ‘ वंदे मातरम् ’ गीत शासकीय शाळा आणि वसतिगृहांत गाण्याला बंदी करण्यात आल्यामुळे विदयार्थ्यांनी केलेल्या संपाचे त्यांनी नेतृत्व केले. जानेवारी १९४१ मध्ये कम्युनिस्ट असल्याच्या संशयावरून डाव्या विचारांच्या सहकाऱ्यांबरोबर अटक होऊन बीदरच्या तुरूंगात त्यांना स्थानबद्ध करण्यात आले (१९४१-४२). ऑक्टोबर १९४२ मध्ये त्यांची सुटका झाली. स्वातंत्र्यलढयाच्या शेवटच्या टप्प्यात आर्थिक धोरण, कम्युनिस्टांबरोबरील सहकार्य व चळवळीचे स्वरूप यांबाबत झालेल्या मतभेदांमुळे स्टेट काँग्रेसमध्ये दोन गट पडले. त्यांतील स्वामी रामानंद तीर्थांचे नेतृत्व मानणाऱ्या जहाल गटाचे ते नेते व तात्त्विक मार्गदर्शक होते. १९४७-४८ मधील निर्णायक लढयाचे मार्गदर्शन करणाया चार सदस्यीय कृती समितीचे ते सदस्य होते.

स्वतंत्र भारतातील काँग्रेस पक्षाच्या राजकीय स्वरूपाबद्दल निराशा वाटल्याने सहकाऱ्यांसह त्यांनी काँग्रेस संघटनेचा त्याग केला आणि लीग ऑफ सोशालिस्ट वर्कर्स या लोकशाही समाजवाद मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संघटनेची त्यांनी स्थापना केली. पुढे त्यांनी कम्युनिस्टांसह डाव्या राजकीय पक्षांची पीपल्स डेमॉकॅटिक फ्रंट या आघाडीची स्थापना केली. हैदराबाद विधानसभेच्या निवडणुकीत लीग ऑफ सोशालिस्ट वर्कर्सच्या बहुतेक नेत्यांप्रमाणे त्यांना पराभव पतकरावा लागला. पुढे या पक्षाच्या विसर्जनानंतर पक्षीय राजकारणातून निवृत्ती घेऊन त्यांनी सामाजिक व शैक्षणिक कार्यास वाहून घेतले. हैदराबाद राज्याचे त्रिभाजन करून भाषिक राज्ये निर्माण करावीत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मराठवाडयाच्या विकासप्रश्नांसाठी त्यांनी विविध आंदोलने केली. शिक्षण आणि खादी या दोन क्षेत्रांत त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. श्री सरस्वती शिक्षण संस्था, औरंगाबाद स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापिलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि योगेश्वरी  शिक्षण संस्था, आंबेजोगाई इ. शिक्षणसंस्थांचे ते एक मार्गदर्शक व पदाधिकारी होते. मराठवाडा खादी ग्रामोदयोग समितीचे संस्थापक तसेच संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते एक महत्त्वाचे नेते होते. मराठवाडयासाठी राज्यघटनेतील तरतुदीनुसार वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याचा आग्रह त्यांनी धरला व त्यात यश संपादन केले (१९७०). मराठवाडा विदयापीठाच्या स्थापनेसाठी, औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे एक न्यायपीठ स्थापन करण्यासाठी आणि औरंगाबाद रेल्वेच्या ब्रॉडगेजवर आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शोभा कोरान्ने या महिलेने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा प्रबंध ‘ गोविंदभाई श्रॉफ यांचे हैदराबाद मुक्तिलढयातील योगदान’ या शीर्षकाने विदयापीठास सादर करून पीएच्.डी. पदवी मिळविली आहे (२००४).

श्रॉफ यांचे वृद्धापकाळाने औरंगाबाद येथे निधन झाले.

संदर्भ : १. चपळगावकर, नरेंद्र, कर्मयोगी संन्यासी, मुंबई, १९९९.

            २. बोरीकर, दिनकर, गोविंदभाई श्रॉफ गौरवगंथ, औरंगाबाद, १९९२.

            ३. भालेराव, अनंत, मांदियाळी, मुंबई, १९९४.

            ४. भालेराव, अनंत, हैदराबादचा स्वातंत्र्यसंगाम आणि मराठवाडा, पुणे, १९८७.

 

चपळगावकर, नरेंद्र