श्रवण साहाय्यक : कानाचे विकार अथवा तंत्रिकीय दोषांमुळे [⟶ तंत्रिका तंत्र] निर्माण झालेल्या श्रवणन्यूनतेच्या स्थितीत ऐकू येण्यास मदत करणाऱ्या उपकरणांना श्रवण साहाय्यक म्हणतात. कानावर पडणाऱ्या आवाजाची तीव्रता ( गरिमा ) वाढवून ही उपकरणे ध्वनीची पातळी त्या व्यक्तीच्या श्रवण तलसीमेपेक्षा म्हणजे ऐकू येऊ शकणाऱ्या किमान पातळीपेक्षा अधिक अशा पातळीवर नेतात. मानवी श्रवणेंद्रिये वातावरणातील १६ ते २०,००० हर्ट्झ कंप्रतेचे ध्वनितरंग ग्रहण करून त्यांचे ऐकण्याच्या संवेदनात रूपांतर करू शकतात. ही क्षमता ३०० ते ४,००० हर्ट्झ या कंप्रतेमध्ये सर्वाधिक असते. ध्वनीची शून्य ते १३० डेसिबेल गरिमा श्रवणक्रियेसाठी उपयुक्त असते. एखादया व्यक्तीस ८२ डेसिबेलपेक्षा कमी तीव्रतेचा आवाज ऐकू येत नसल्यास (श्रवण तलसीमा शून्याऐवजी ८२ असल्यास ) ती व्यक्ती मंदश्रवण किंवा श्रवणन्यूनता हे लक्षण दाखवीत आहे, असे मानले जाते. अशा व्यक्तीच्या परिसरातील सर्वाधिक उपयुक्त कंप्रतेचे ध्वनी ( ३०० ते ४,००० हर्ट्झ ) मोठे करून त्यांची गरिमा श्रवण तलसीमेपर्यंत आणि त्यापेक्षा जास्त परंतु नियंत्रणाधीन ठेवून वाढविणे हा उद्देश पुढे ठेवून उपकरणांची रचना केली जाते. [⟶ ध्वनि].
श्रवणन्यूनतेचे मुख्यत: दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात म्हणजे संवाहकन्यूनतेमध्ये बाह्यकर्ण व मध्यकर्ण यांतील दोषांमुळे ध्वनितरंगांचे वहन, त्यांच्यामुळे होणारी कर्णपटलाची हालचाल ( कंपन ) व हाडांच्या साखळीकडून कर्णपटलाचे कंपन आंतरकर्णास पोहोचविण्याची क्रिया यांत कोठे तरी व्यत्यय येत असतो.
[⟶ कान]. दुसऱ्या प्रकारास संवेदी तंत्रिकीय न्यूनता म्हणतात. त्यातील संवेदी घटकाचे मूळ आंतरकर्णात असते. तेथील संवेदन यंत्रणा अकार्यक्षम असते. तंत्रिकीय घटकांत श्रवणतंत्रिका ( श्रवणमज्जा ) आणि तिचा मेंदूतील मार्ग यांत दोष असू शकतो. श्रवण साहाय्यकांचा उपयोग मुख्यत: संवाहक श्रवणन्यूनतेमध्ये केला जातो परंतु दुसऱ्या प्रकारातसुद्धा काही मर्यादित प्रमाणात त्यांचा लाभ मिळण्याची शक्यता असते. आधुनिक शल्यचिकित्सा तंत्रामुळे आता आंतरकर्णावर शस्त्रक्रिया करून संवेदी घटकांवरील उपचार शक्य होत आहेत. तंत्रिकीय घटकाच्या बाबतीत मात्र ती शक्यता नाही [⟶संवेदना तंत्र].बहिरेपणावर मात करून दैनंदिन व्यवहार व्यवस्थित ( नीट ) चालू ठेवण्याच्या प्रयत्नांत विविध प्रकारचे उपाय प्राचीन काळापासून माणसाने शोधून काढले आहेत. जास्तीत जास्त प्रमाणात ध्वनितरंग गोळा करून ते कर्णपटलाकडे केंद्रित करण्यासाठी कानामागे हाताची ओंजळ धरून कानाची पाळी पुढे ढकलण्याची क्रिया प्रत्येक व्यक्ती कळत-नकळत करीत असते. हाच परिणाम साधण्यासाठी मोठे शिंपले, प्राण्यांची पोकळशिंगे, उलटे धरलेले कर्णे यांसारख्या वस्तूही ऐतिहासिक काळात वापरलेल्या आढळतात. दोन गलबतांमधील दर्यावर्दी एकमेकांशी संभाषण करण्यासाठी अशाच कर्ण्यांचा उपयोग करीत. सतराव्या व अठराव्या शतकांत श्रवणन्यून व्यक्तींसाठी शिंगाच्या आकाराची अनेक साधने कुशल कारागिरांनी पुठ्ठा, धातूंचे पत्रे, कासवाचे कवच, काच यांसारख्या पदार्थांचा वापर करून तयार केली. उच्चभ्रू अधिकारी व्यक्तींसाठी त्यांचा श्रवणदोष लपविणारी पोकळ ध्वनिगाहक सिंहासने उपलब्ध असत( उदा.,पोर्तुगालचा राजा, गोवा, १८१९). हवेतून ध्वनीचे संवहन कर्णपटलापर्यंत करण्याव्यतिरिक्त, मस्तकांच्या हाडांच्या सहज जाणविणाऱ्या भागांवर टेकणारी ‘अस्थिवहन ’ उपकरणे ही एकोणिसाव्या शतकापासून प्रचारात आली. व्हल्कनाइट किंवा तत्सम वजनाला हलक्या पदार्थांचा वापर करून कानाच्या आत घालण्याची किंवा कानामागे टेकविण्याची विविध आकारांची साधने या शतकात लोकांनी वापरून पाहिली.
कृत्रिम साधनांच्या विकासाबरोबरच कर्णबधिरांना प्रशिक्षण देऊन बोलणाऱ्या व्यक्तीच्या ओठांचे निरीक्षण करण्याची कला या काळात अस्तित्वात येत होती. हातांच्या खुणांची भाषाही त्यांना शिकविली जात होती. या क्षेत्रात ध्वनिसंकेत पद्धतीचा विकास करणारे अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांच्या कुटुंबात हे प्रशिक्षणाचे कार्य आधीच्या दोन पिढयंपासून चालू होते. त्यांनी स्वत: दूरध्वनीचा ( टेलिफोनचा ) शोध लावल्यानंतर (१८७६) विजेचा उपयोग कर्णबधिरांसाठी उपयुक्त उपकरणे तयार करण्यासाठी कसा करता येईल, याचा विचार सुरू केला. त्यांनी तयार केलेले श्रवण साहाय्यक प्रायोगिक स्वरूपाचे व बोजड असल्यामुळे व्यवहारात येऊ शकले नाहीत परंतु ध्वनिगहणाची यांत्रिक स्वरूपाची उपकरणे मागे पडून ध्वनिवर्धनासाठी विद्युत् ऊर्जेचा उपयोग करता येईल, हे त्याव्दारे स्पष्ट झाले.
विजेचा उपयोग करून टेलिफोनच्या धर्तीवर रचना केलेले एक उपकरण १८९५ मध्ये मिलर रीज यांनी ॲकोलॅलियन या नावाने उपयोगात आणले. मेजावर ठेवून तिघांनी वापरता येण्यासारख्या या उपकरणात काही फेरबदल करून हचिसन यांनी ॲकोफोन तयार केला. फर्डिनांड आल्ट यांनी १९०६ मध्ये प्रचारात आणलेला श्रवण साहाय्यक या क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा ठरला. कार्बन ध्वनिग्राहक, चुंबकीय कर्णश्रवणी व विद्युत् घटमाला असे तीन महत्त्वाचे घटक असलेले हे साधन मूळ नमुना म्हणून पुढे ठेवून नंतर अनेक वर्षे किरकोळ फेरफार असलेले नमुने निर्माण होत राहिले. १९३०च्या सुमारास कर्णश्रवणीच्या जागी लहान आकाराचा अस्थिकंपनकही उपलब्ध झाला. निर्वात नलिका [१९२१ ⟶ इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति ] आणि ट्रँझिस्टर (१९५२) या अभियांत्रिकीमधील दोन क्रांतिकारक शोधांचा परिणाम ध्वनिवर्धनाच्या क्षेत्रात फार दूरवर झाला. त्यांचा उपयोग श्रवण साहाय्यकांच्या रचनेत करून घेतल्यामुळे ही उपकरणे प्रथम अधिक प्रभावी व नंतर अधिक सुटसुटीत झाली. तसेच कार्बन ध्वनिग्राहकांची जागा स्फटिकी ध्वनिगाहकांनी आणि स्फटिकी कर्णश्रवणींनी घेतल्यामुळे आकलन होऊ शकणाऱ्या ध्वनितरंगांच्या कंप्रतेचा आवाका वाढला. धूळ, मळ, घाम, शारीरिक हालचाल, मस्तकाची स्थिती यांचा ध्वनिवर्धकाच्या कार्यक्षमतेवर अनिष्ट परिणाम होण्याचे प्रमाण कमी झाले. मृदीय किंवा तत्सम् पदार्थांच्या वापरामुळे उष्णता रोधकता, आर्द्रता रोधकता, मजबुती यांसारखे गुणधर्म वाढू लागले. लहान आकारमानाचे विद्युत् घट उपलब्ध झाल्यामुळे अधिक लहान आणि सर्व घटक एकत्र असलेली व सहजासहजी लक्षात न येणारी साधने निर्माण करणे शक्य होऊ लागले.
सध्या प्रचारात असलेल्या आधुनिक श्रवण साहाय्यकांच्या रचनेत पुढील प्रमुख घटक असतात : (१) ध्वनिगाहक : ( सूक्ष्मश्रावक ). ध्वनिरूप ऊर्जेचे रूपांतर विद्युत् प्रवाहात करणारे हे ऊर्जापरिवर्तक साधन सुपरिचित आहे. एका विशिष्ट दिशेकडून येणारा ध्वनी अधिक प्रमाणात गहण करणारा ध्वनिग्राहक वापरून परिसरातील गोंगाटाचा उपद्रव कमी करता येतो.
(२) विवर्धक : क्षीण प्रवाहाची शक्ती वाढविण्यासाठी त्याचा विद्युत् दाब वाढविण्याचे कार्य हा घटक करतो. ही क्रिया लाभांक या एककात व्यक्त केली जाते. कमी किंवा मध्यम तीव्रतेच्या ध्वनिनिर्मितीसाठी ( १२५ डेसिबेलपर्यंत ) एका प्रकारचे आणि त्याहून अधिक तीव्रतेसाठी निराळे ढकलओढ पद्धतीचे विवर्धक वापरले जातात [⟶ इलेक्ट्रॉनीय विवर्धक].
(३) विद्युत् स्रोत : सामान्यत: १.३ ते १.५ व्होल्टची लहान आकारमानाची सतत स्थिर प्रवाह देणारी शुष्क घटांची प्रणाली किंवा एकच शुष्क घट विजेचा पुरवठा करू शकतो. पुन:पुन्हा विद्युत् प्रभारित करून वरचेवर वापरण्यासारखे विद्युत् घटही कधीकधी उपयोगात आणतात.
(४) गरिमानियंत्रक : आवाज लहानमोठा करण्यासाठी विवर्धकावर परिणाम घडविणारा हा नियंत्रक म्हणजे एक विद्युत् रोधक असतो. त्याची रोधक क्रिया हवी तशी कमी-जास्त करता येते. ध्वनिग्राहकावर त्याचा काहीही परिणाम होत नसतो.
(५) कर्णश्रवणी : ( कर्णभाषी ). विद्युत् प्रवाहाचे परत ध्वनीत रूपांतर करणारा हा घटक म्हणजे एक छोटासा ध्वनिवर्धकच असतो. पारंपरिक पद्धतीच्या, अल्प किंमतीच्या उपकरणात हा भाग स्वतंत्र असून फक्त तोच कानात लावलेला असे बाकीचे पूर्ण उपकरण अन्यत्र ( उदा., खिशात ) ठेवलेले असे. एका लहानशा रज्जूने विवर्धकाला जोडलेली ही कर्णश्रवणी इतरांना सहज दिसत असे. नवीन प्रकारच्या साधनात श्रवणीसह सर्व भाग एकाच आवरणात समाविष्ट असतात. संपूर्ण उपकरण कानाच्या मागे, कानाच्या पाळीवर किंवा चष्म्याच्या काडीच्या स्वरूपात काढता-घालता येते. या उपकरणात ध्वनिवर्धक आत लपविलेला असतो व त्यातून बाहेर येणारा आवाज एका लहानशा नलिकेव्दारे कानात सोडला जातो. अधिक परिणामकारक ध्वनिग्रहणासाठी बाह्यकर्णाच्या आकाराचा साचा तयार करून त्यानुसार कर्णरंधावर घट्ट बसू शकेल असे साधन तयार करता येते. त्यात ध्वनिप्रदान करणारी नलिका नसते केवळ एका सूक्ष्म छिद्रातून ध्वनितरंग बाहेर पडतात व सरळ कानाच्या पडद्यावर आदळतात. बाह्यकर्णाचे रचनात्मक दोष, दीर्घकालिक संकरामणजन्य विकार, सारखा कान वाहणे यांसारख्या कारणांमुळे हवेतील ध्वनिवहनाचा वापर करणे कठीण असल्यास अस्थिकंपनकाचा उपयोग करून घ्यावा लागतो. अशा उपकरणात कानामागील कठीण उंचवट्यावर टेकणारा अस्थिकंपनक कर्णश्रवणीची जागा घेतो. कवटीच्या हाडातून कंपने थेट आंतरकर्णापर्यंत पोहोचतात. अशा कंपनकासाठी ऊर्जा अधिक लागते. त्यामुळे वरचेवर विद्युत् घट बदलावा लागतो. ऐकू येणारा आवाज तितकासा स्पष्ट नसतो. तसेच श्रवण साहाय्यक घट्ट बसण्यासाठी पट्टा वापरावा लागल्याने थोडासा त्रास होतो. शस्त्रक्रिया करून अशा प्रकारचे साहाय्यक त्वचेखालीही बसविता येतात.
या प्रमुख घटकांशिवाय अधिक सुविधा देणारे काही इतर घटक उपकरणात समाविष्ट करता येतात. ध्वनीचा स्वर बदलणे ( खर्ज किंवा उच्च करणे ) दूरध्वनीवरील संभाषण अधिक स्पष्ट होण्यासाठी उद्गहण ( पिक-अप ) यंत्रणा जोडणे विशिष्ट कंप्रतेचे श्रवणदोष सुधारण्यासाठी निवडक कंप्रतांचे ध्वनिवर्धन करणे उपकरणाची अधिकतम गरिमा नियंत्रित करून कानठळ्या बसविणारे आवाज टाळणे पूर्णपणे बधिर कानातील ध्वनिग्राहकाचे संदेश दुसऱ्या कानाकडे वळवून ध्वनिग्रहणामधील दिशा ओळखण्याची क्षमता सुधारणे यांसारखी कामे हे अतिरिक्त घटक करू शकतात.
उपकरणाच्या वापरास सुरूवात केल्यावर काही दिवस आवाज मोठा वाटणे, घुमणे, शब्दोच्चर स्पष्टपणे न समजणे, थरथरल्यासारखे जाणवणे, शीळ ऐकू येणे यांसारखी लक्षणे काही व्यक्तींना त्रासदायक ठरतात. त्यांतील काही दोष सरावाने कमी होतात इतरांसाठी श्रवणतज्ञ उपकरणात आवश्यक ते फेरफार करून देतात. क्वचित प्रसंगी उपकरण पूर्णपणे बदलून निराळ्या प्रकारचे दुसरे उपकरण स्वीकारावे लागते. श्रवण साहाय्यकाच्या उपयोगाआधी तज्ञांचे मार्गदर्शन, श्रवणमापन क्रियेची चाचणी व शक्य असल्यास श्रवणन्यूनतेच्या कारणांवर उपचार या गोष्टी आवश्यक आहेत. मध्यकर्णातील जंतुसंकामण, बाह्यकर्णातील अडथळे इत्यादींवर आधीच उपचार केल्यास उपकरणाचा उपयोग अधिक परिणामकारक ठरतो. श्रवणन्यूनतेची गंभीरता, व्यक्तीची दैनंदिन कामाची पद्धत, उपकरण हाताळण्याचे कौशल्य आणि आर्थिक कुवत या सर्वांचा विचार करून उपकरण निवडणे इष्ट असते.
आदर्श श्रवण साहाय्यकाच्या निर्मितीत पुढील अपेक्षांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जातो : (१) प्रवेश करणाऱ्या आवाजाची गरिमा व बाहेर पडणाऱ्या आवाजाची गरिमा यांचे गुणोत्तर तीव्रतेच्या विविध पातळ्यांवर स्थिर रहावे. (२) गरिमा नियंत्रकाच्या मदतीने विवर्धनाचा लाभांक कितीही वाढविला, तरी आवाजाची गुणवत्ता मूळ आवाजाप्रमाणेच (तद्रूप) टिकून राहावी. कंप्रतेत किंवा स्पष्टपणात फरक होऊ नये. (३) कधीकधी मूळ कंप्रतेच्या पुनर्निर्मितीबरोबरच त्या कंप्रतेला सहसंवादी अशा कंप्रता ( दोन, तीन किंवा चार पट कंप्रतेचे तरंग ) निर्माण होतात. अशा प्रकारची विकृती कमीत कमी असावी. (४) इलेक्ट्रॉनीय उपकरणांमध्ये पुन:पोषण (प्रतिसंभरणे ) हा उपद्रव अनेकदा उद्भवतो. ध्वनितरंग, चुंबकीय क्षेत्र, कंपायमानता, इलेक्ट्रॉनिकी प्रवाह इ. कारणांमुळे संभवणारा हा परिणाम सुयोग्य रचना आणि व्यवस्थित घट्ट बसणारे उपकरण यांनी शक्यतो टाळला जावा. (५) आर्द्रता, तापमान, त्वचेवरील स्राव, सौंदर्यप्रसाधने, धूळ, वाहनांचे हादरे, परिसरातील सामान्यत: आढळणारे विद्युत् चुंबकीय बदल इत्यादींमुळे कार्यक्षमतेत बाधा येऊ नये.
आधुनिक अंकीय संकेत संस्करण तंत्रज्ञानामुळे विवर्धनातील अनेक दोष आता दूर होत आहेत. तसेच अधिक सुबक, सुटसुटीत आणि बळकट उपकरणे तयार होत आहेत.
ज्या व्यक्तींना श्रवण साहाय्यकांपासून काहीही फायदा होत नाही अशा पूर्णपणे श्रवणहीन व्यक्तींसाठी कर्णशंबूक आरोपण शस्त्रक्रिया आता उपयुक्त ठरू लागली आहे. या शस्त्रक्रियेमध्ये जो श्रवण साहाय्यक त्वचेखाली बसविला जातो तो एका बाह्य वाक्संस्करक उपकरणाला ( संगणकीकृत ) जोडलेला असतो. संस्करण झालेले संकेत श्रवण साहाय्यकात जाऊन तेथून एका तारेतून कर्णशंबुकाच्या आत प्रवेश करून श्रवणतंत्रिकेला उद्दीपित करतात. त्यामुळे निर्माण होणारी संवेदना आणि बोलणाऱ्याच्या ओठांची हालचाल व इतर संवेदना यांच्या मदतीने व्यक्तीला काही प्रमाणात अर्थबोध होतो. तसेच मूकबधिर व्यक्तीस बोलायला शिकण्यास मदत होते.
पहा : अपंग : कल्याण व शिक्षण कान ध्वनि वाचा वैदयकीय उपकरणे.
संदर्भ : 1. Berkow, R. (Ed.) The Merck Manual of Medical Information, New Jersey, 1997.
2. Pollack, M. C. (Ed.) Amplification for the Hearing-Impaired, Orlando, Florida, 1988.
श्रोत्री, दि. शं.
“