श्रवण : भारतीय नक्षत्रमालिकेतील सत्तावीस नक्षत्रांपैकी हे बाविसावे नक्षत्र आहे (अभिजितसह असणाऱ्या २८ नक्षत्रांच्या मालिकेत याचा कमांक २३ आहे). हे नक्षत्र मकर राशीत व गरूड (ॲक्विला) या पाश्चात्त्य तारकासमूहात येते. यात तीन तारे असून ते सरळ रेषेत दिसतात. यांपैकी आल्फा (अल्टेर) हा सर्वांत मोठा तारा इतर दोन ताऱ्यांच्या मध्ये असून त्याचे स्थान होरा १९ ता. ४८.३ मि. व कांती ८º ४४’ [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धती] येथे आहे. याची ⇨ प्रत + ०.८, वर्णपटीय प्रकार ए ७ आणि तेजस्विता प्रकार V [⟶ तारा ] असून याचे पृष्ठीय तापमान ८,००० के . आहे. सोळा ⇨ प्रकाशवर्षे अंतरावरील हा श्वेत तारा सूर्यापेक्षा किंचितच मोठा असला तरी तो सूर्याच्या दहापट तेजस्वी आहे. याच्या दक्षिणेचा बीटा (अल्शेन) व उत्तरेचा गॅमा (तारझेद) हे या नक्षत्रातील इतर दोन तारे मंद आहेत. या तीन ताऱ्यांची सरळ रेषा उत्तरेस वाढविल्यास ती ⇨ अभिजित या मोठय ताऱ्यामधून जाते. अल्टेर, अभिजित व हंस या ताऱ्यांनी तयार होणारा त्रिकोण आकाशनिरीक्षकांच्या परिचयाचा आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यास रात्री नऊच्या सुमारास हे नक्षत्र मध्यमंडलावर येते. आकाशगंगा या नक्षत्रातून जाते.
फलज्योतिषानुसार या नक्षत्राची देवता त्रिविकम आहे आणि हे नक्षत्र शुभ, चर, ऊर्ध्वमुख व सुलोचन मानतात. याचे वैदिक नाव श्रोणा आहे. वामन अवताराच्या कथेशी श्रवण नक्षत्राचा संबंध जोडला जातो. यातील तीन तारे हे वामनाने टाकलेल्या तीन पावलांचे निदर्शक मानतात.
पहा : नक्षत्र.
ठाकूर, अ. ना.