श्मिट, बेर्नहार्ट फोल्डमार : (३० मार्च १८७९ - १ डिसेंबर १९३५). जर्मन प्रकाशकीय उपकरण निर्माता. एस्टोनिया येथे त्यांचा जन्म झाला. तारायंत्र चालक, छायाचित्रकार आणि अभिकल्पक म्हणून त्यांनी कामे केली आणि स्वतंत्रपणे ज्योतिषशास्त्र व प्रकाशकी या विषयांचा अभ्यास केला. यतेबॉर्य (स्वीडन) व मिट्वाइड (सॅक्सनी) येथील अभियांत्रिकी विदयालयात काही काळ त्यांनी अध्ययन केले.
श्मिट यांनी १९०५ मध्ये पॉट्सडॅम ॲस्ट्रोफिजिकल ऑब्झर्व्हेटरी या वेधशाळेकरिता पहिला परावर्तक तयार केला. या परावर्तकाचा रंध्रव्यास (ॲपर्चर) ४० सेंमी. आणि केंद्रांतर सु. १ मी. होते. कॅसग्रेन परावर्तकांकरिता गोलीय आरसा वापरून प्रतिमेमध्ये उत्पन्न होणारा गोलीय विपथन हा दोष त्यांनी घालविला.
श्मिट यांनी सु. २० सेंमी. व्यास असलेल्या खगोलीय आरशांची निर्मिती केली, तसेच काही मोठया वस्तुभिंगांमध्ये सुधारणा केल्या. १९०९ मध्ये त्यांनी छोट्या वेधशाळेकरिता एक नवीन क्षैतिज (आडवा) परावर्तक तयार केला. १९२६ मध्ये त्यांची बर्गडॉर्फ येथील हँबर्ग वेधशाळेत नेमणूक झाली. १९२९ मध्ये त्यांना विकाररहित प्रतिमा देणाऱ्या आरशांच्या एका रचनेची कल्पना सुचली आणि त्यानुसार त्यांनी एक ३५ सेंमी. परावर्तनी दूरदर्शक तयार केला (१९३०-३२). खगोल भौतिकीच्या विकासात हा दूरदर्शक महत्त्वाचा ठरला. या दूरदर्शकाच्या साह्याने गुरू, शनी आणि चंद्र यांची त्यांनी उत्कृष्ट छायाचित्रे घेतली. गोलीय विपथन आणि प्रतिमाविकार घालविण्याकरिता अत्यंत लहान वकाकार वृत्तजवलय असलेली शुद्घी पट्टिका वापरल्यामुळे फार मोठया क्षेत्रातील ताऱ्यांच्या प्रतिमांची छायाचित्रे मिळू लागली. हा दूरदर्शक मुख्यत: छायाचित्रणासाठी वापरतात म्हणून त्याला श्मिट कॅमेरा असेही म्हणतात. १.२ मी. आकारमानाचे श्मिट दूरदर्शक मौंट विल्सन आणि मौंट पॅलोमर येथील वेधशाळांत वापरात आहेत.सिवेधशाळा, ज्योतिषशास्त्रीर्यें. श्मिट यांची ही प्रकाशकीय रचना दूरचित्रवाणी प्रेषण, हवाई सर्वेक्षण, वर्णपटविज्ञान व इतर तांत्रिक क्षेत्रांतही उपयुक्त ठरलेली आहे. [⟶ दूरदर्शक].
तरूण वयात झालेल्या अपघातात श्मिट यांना आपला उजवा हात गमवावा लागला, तरी त्यांनी आपली सर्व कामे कोणाचीही मदत न घेता केली. हातानेच आरशांना चकाकी आणण्याकरिता त्यांनी धातूंच्या चकत्यांऐवजी काचेचा वापर केला.
हँबर्ग येथे श्मिट यांचे निधन झाले.
भदे, व. ग.