शोभेचे दारूकाम : (आतषबाजी). ⇨ बंदुकीची दारू आणि इतर ज्वलनशील व वाफेच्या रूपात उडून जाणाऱ्या बाष्पनशील पदार्थांचे नियंत्रित रीतीने ज्वलन करून स्थिर अथवा गतीयुक्त लहानमोठे आवाज, विविध रंगी प्रकाश, धूर, ठिणग्या व ज्वाला इत्यादींच्या निर्मितीच्या प्रकियेला शोभेचे दारूकाम म्हणतात. या बाबींची संयुक्तपणे निर्मिती करून सुंदर आकृती व दृश्ये निर्माण करून असाधारण व प्रेक्षणीय आविष्कार दाखविले जातात. अशा प्रकारच्या शोभेच्या दारूकामासाठी लागणारी विविध साधने व सामगी बनविण्याची आणि ती वापरण्याची कला व विज्ञान म्हणजे शोभेचे दारूकाम होय. लष्करी तसेच उदयोगधंदे व मनोरंजन यांसारख्या बिगरलष्करी कामांसाठी शोभेचे दारूकाम वापरतात. उदा., एखादे क्षेत्र प्रकाशमान करण्यासाठी तेजस्वी प्रकाश आणि संदेशवहनासाठी सांकेतिक रंगीत प्रकाश वा धूर निर्माण करणे याचा लष्करी कामांसाठी उपयोग होतो.
उदयोगधंद्यात प्रचंड तापमान व उष्णता निर्माण करण्यासाठी शोभेच्या दारूकामाचे तंत्र वापरतात. मनोरंजनासाठी रंगीबेरंगी तारका, ज्योती, ज्वाला, आकृती, दृश्ये, अक्षरे इ. यांव्दारे निर्माण करतात. यात मुख्यत्वे बंदुकीची दारू म्हणजे काळे चूर्ण वापरतात. बंदुकीच्या दारूत पोटॅशियम नायट्रेट (सोरा किंवा सॉल्ट पीटर), गंधक व लोणारी कोळशाची पूड यांचे विविध प्रमाणांतील मिश्रण केलेले असते. यांशिवाय शोभेच्या दारूकामात राळ, खनिज तेल, चरबी, गमअरेबिक, तसेच अँटिमनी, आर्सेनिक, पारा यांची विविध संयुगे आणि लोखंड, पोलाद, अँटिमनी, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, जस्त, तांबे इ. धातु-अधातंची चूर्णे वगैरे ज्वलनशील व स्फोटक पदार्थ वापरतात. बंदुकीच्या दारूमुळे शोभेचे दारूकाम हे धोकादायक ठरू शकत असल्याने त्याची हाताळणी तज्ञ मंडळीच करतात. नाही तर हानिकारक अपघात होऊ शकतात. रामलीला, दिवाळी, गणेशोत्सव, नाताळ यांसारखे धार्मिक व इतर उत्सव, स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन तसेच विवाह-समारंभ, विजयोत्सव, राज्याभिषेक इ. सोहळे साजरे करण्यासाठी शोभेच्या दारूकामाचा वापर करतात.
इतिहास : ग्रीक अग्नी, सागरी अग्नी किंवा द्रवरूप अग्नी हा यातील आविष्कार ६७० साली कॅलिनिकेस या अभियंत्यांनी बायझँटियमला आणला. तो पुढील चार प्रकारे वापरीत : (१) जहाजाच्या नाळेत पक्क्या बसविलेल्या तांब्याच्या मोठया नलिकांमधून जळत्या द्रव्याचे पुंजके बाहेर फेकले जातात. (२) स्ट्रेप्टा या बैठकीवर कायमच्या बसविलेल्या अधिक लहान संचलनक्षम नलिकांतून विविध दिशांनी ज्वाला सोडता येतात. (३) चेइरोशीफॉन या नलिका हातात धरून ज्वालांचा फवारा उडविला जातो. (४) आगलाव्या गोळ्यात (गेनेडमध्ये) राळ, गंधक, बिट्युमेन व सोरा यांचे मिश्रण वापरीत. हे मिश्रण उष्णतेने सरल (सुवाह्य) होत असल्याने ते भरण्याच्या व बनविण्याच्या पद्धतीवरून द्रवरूप अग्नी ही संज्ञा आली असावी. यातून लक्ष्यावर अग्नीचा वर्षाव करता येतो. यातून सातव्या शतकात बंदुकीची दारू पुढे आली, तर (१) व (२) यांच्यावरून ‘रोमन कँडल ’आल्या.
बंदुकीच्या दारूचे मिश्रण भरलेली सिगारेटीएवढी नळी ११३० साली चीनमध्ये बनविली होती. ही अशी बंदुकीची दारू १२३० साली बाँबमध्ये वापरली. तिच्या फटाक्यांमधील वापराचा उल्लेख⇨ रॉजर बेकन यांनी केला आहे (१२६७).
आगलावे बाँब व इतर शस्त्रास्त्रे यांचा शोभेच्या दारूकामाशी जवळचा संबंध असल्याने यूरोपात अठराव्या शतकापर्यंत अशा सामगीची निर्मिती व प्रत्यक्ष वापर यांवर लष्कराचे नियंत्रण असे. उदा., इटलीमधील धार्मिक उत्सव, राज्याभिषेक, शाही विवाहसोहळे, विजयोत्सव यांतील शोभेच्या दारूकामाची देखभाल लष्कराकडे असे. रंगीत प्रकाश निर्मिणारी दारू लहान कागदी नळ्यांत भरून त्यांची लाकडी सांगाड्यावर व्यवस्थित रीतीने मांडणी करीत. त्या पेटविल्यावर त्यांतून एखादा देखावा वा ध्वज यांची बाह्यरेषा उजळून ती आकृती दृश्यमान होई. यूरोपात मात्र हालचालीवर भर दिला जाई. शोभेच्या दारूकामाचे प्रयोग जलाशयावर किंवा जलाशयालगत करीत. इंग्लंडमध्ये राजे पहिले जेम्स यांच्या विवाहसोहळ्यानिमित्त टेम्स नदीवर शोभेचे दारूकाम करण्यात आले. त्यात अश्वारूढ सेंट जॉर्ज यांनी पंख असलेल्या ड्नॅगन या काल्पनिक सर्पाला ठार केल्याचे दृश्य दाखविले होते. सार्वजनिक उद्यानांत शोभेच्या दारूकामाचे प्रयोग दाखवून बॉक कुटुंबासारख्या यूरोपातील उद्योजकांनी व कलाकारांनी ते लोकप्रिय केले. लंडनच्या किस्टल राजवाड्यात चार्ल्स टॉमस बॉक यांनी सुरू केलेली शोभेच्या दारूकामाची प्रथा ७० वर्षे चालू राहिली. यातून या कलेची शैली व व्याप्ती ठरली. सुरूवातीस शब्द आणि चित्रे व नंतर व्यक्तिचित्रे रेखाटणारे दारूकाम होई. नंतर विविधरंगी पुष्पाकृती व तिच्यात बदल होत जाऊन पांढरे व्यक्तिचित्र उमटत असे. हा कार्यकम ८० हजारांपर्यंत प्रेक्षक तिकिटे काढून पहात. फान्सच्या ल्वी यांनी या कलेला उत्तेजन दिले, तर बोलोन्या येथील रूग्गीएरी बंधूंच्या कसबामुळे इटालियन शैली टिकून राहण्यास हातभार लागला. अशा प्रकारे अठराव्या शतकात शोभेच्या दारूकामाची लोकप्रियता शिगेला पोहोचली. उदा., १७४८ सालच्या शांतता तहानिमित्त बहुतेक शहरांत करण्यात आलेले शोभेचे दारूकाम.
लष्करी रॉकेटे व स्फोटक क्षेपणास्त्रे यांतून शोभेचे दारूकाम प्रगत झाले. तर रशियातील पहिल्या निकोलस यांनी ऑस्ट्रियन आघाडीवर वॉर्सापासून सेंट पीटर्झबर्गपर्यंत संदेशवहनासाठी शोभेच्या दारूकामाच्या २२० स्थानकांची प्रणाली उभारली होती. विविध गटांमधील पूर्वनियोजित संकेतांसाठी प्रकाश उत्सर्जक व धूम्रकारी पदार्थ वापरून संदेशवहनासाठीही शोभेची दारू वापरण्याचे प्रयोग झाले. त्याचप्रमाणे युद्धकाळात विमान उतरविताना धावपट्टी प्रकाशमान करण्यासाठी छत्रीयुक्त ज्योती, तर रणक्षेत्र उजळण्यासाठी चांदण्या निर्मिणारे गोळे वापरतात.
भारतामध्ये पेशवे काळातील (१७४९-१८१८) शोभेच्या दारूची आतषबाजीविषयी तत्कालीन कागदोपत्री काही नोंदी आढळतात. त्यांवरून शोभेच्या दारूच्या विविध प्रकारांविषयी नावे आढळतात. ती अशी : (१) तावदानी रोषणाई : काचेच्या कमानी करून व त्यांत आरसे लावून शोभेचे दारूकाम करीत. (२) आकाशमंडल तारांगण : दारूकामाची उंच झाडे करून त्यांतून आकाशातील ताऱ्यांप्रमाणे विविध रंगांचे तारे उडवीत असत. (३) नारळी झाडे : उंच झाडे तयार करून त्यांतून तोफेप्रमाणे व बंदुकीसारखे आवाज निघत असत. (४) प्रभाचमक : सूर्योदयाच्या वेळी जशी प्रभा चमकते-झळाळते, त्याप्रमाणे या दारूकामात देखावा दृष्टीस पडत असे. (५) बादलगर्ज : या दारूकामात मेघगर्जनेप्रमाणे गडगडाट होत असे. यांशिवाय बाण, पाणकोंबडी, हातनळे, कोठ्याचे नळी, फुलबाजे, महताफा इ. नेहमीचे काही दारूकामाचे प्रकार असत.
शोभेच्या दारूकामात १८२३ सालाच्या सुमारास पोटॅशियम क्लोरेट (KCIO3) मोठया प्रमाणात वापरण्यात येऊ लागले, तर १८५३ च्या सुमारास गंधकाऐवजी साखर व स्टिअरीन वापरण्यात आले. यामुळे रंग निर्मिणारी अधिक स्थिर क्लोरेट मिश्रणे बनविता आली.मॅग्नेशियमाचे चूर्ण सु. १८६५ साली, पोटॅशियम परक्लोरेट (KCIO4) सु.१८८५ साली व ॲल्युमिनियमाचे चूर्ण सु. १८९४ साली यात वापरात आले. यांच्या ज्वलनाने प्रखर पकाश पडत असल्यामुळे शोभेच्या दारूकामातील झगमगाट मोठया प्रमाणात वाढला व शोभेच्या दारूकामाची मोठी प्रगती झाली. आता टिटॅनियमाचे कातणही वापरतात. सुमारे १८५० साली वापरात आलेल्या कॅलोमेलामुळे रंग भडक करता आले. दुसऱ्या महायुद्धानंतर याच्याऐवजी हेक्झॅक्लोरोबेंझीन व क्लोरिनाची इतर कार्बनी संयुगे वापरात आली.
विज्ञान व तंत्रज्ञान : शोभेचे सर्व प्रकारचे दारूकाम हे ज्वलन या रासायनिक क्रियेचाच आविष्कार असून ही क्रिया इष्ट प्रकारे घडविण्यासाठी पुढील गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.
शोभेच्या दारूकामासाठी वापरल्या जाणाऱ्या मिश्रणात स्वतः जळणारे इंधन व ज्वलनाला ऑक्सिजन पुरविणारी ऑक्सिडीकारके हे आवश्यक घटक असतात. ज्वलनाचे नियंत्रण करणारे आणि विविध रंगाचे प्रकाश व धूर निर्मिणारे पदार्थही या मिश्रणात असतात. मिश्रणातील घटक एकत्र धरून ठेवणारे डिंक, लाख, खळ यांसारखे बंधक पदार्थ आणि तयार वस्तू दमट हवेत सादळू नये म्हणून मेणासारखे जलरोधी पदार्थही आवश्यकतेनुसार मिश्रणात घालतात. यांपैकी लाख, डिंक, खनिज तेल यांसारखे पदार्थ बंधकाशिवाय काही प्रमाणात इंधन म्हणूनही उपयुक्त ठरतात.
मार्गदर्शक तत्त्वे : अशी मिश्रणे तयार करताना घटक पदार्थाची वस्त्रगाळ किंवा त्याहून बारीक पूड प्रथम बनवितात व मग त्या इष्ट प्रमाणात मिसळतात. कणांच्या सूक्ष्मपणामुळे घटकाचे पृष्ठक्षेत्र वाढते. हे मिश्रण अधिकाधिक एकजिनसी बनवितात. यामुळे घटकांतील निकटपणा (साहचर्य) वाढून ज्वलन त्वरेने व सहजपणे होते. या क्रियेत कणांचे आकारमान महत्त्वाचे ठरते. ॲल्युमिनियम, सोडियम, लोणारी कोळसा इ. ज्वलनशील घटकांच्या अतिसूक्ष्म कणांचा धुरळा हवेत तरंगत असल्यास हे कण व ऑक्सिजन यांचे निकट साहचर्य शक्य होते व निमित्तमात्र ठिणगीनेही त्यांचा स्फोट होतो. भुसभुसीत चूर्णाचे ज्वलन सुरू होताच मिश्रणाच्या अंतरंगात ज्वाला अनिर्बंधपणे घुसून पूर्ण मिश्रण एकदम पेटते. काही बाबतींत असा भडका उडणेच अपेक्षित असते उदा., फटाके किंवा विद्युत् प्रकाशी गोळे. उलट चंद्र ज्योतींत असा भडका उडणे अनिष्ट ठरते. कारण तेथे मंद ज्वलन अपेक्षित असते. त्यासाठी विशिष्ट मिश्रणाचे थरावर थर दाबयंत्राव्दारे दाबून त्याच्या घट्ट, टणक वडया वा कांड्या बनवितात. अशी वडी वेष्टनात वा धारक पात्रात बसवितात. ती पेटविल्यास तिच्यातील थर एकामागून एक अशा रीतीने मंदपणे जळत जातात. दाबयंत्र वापरणे शक्य नसल्यास कमीत कमी पाण्यात कालविलेला डिंक, खळ यांच्या मदतीने अपेक्षित मिश्रणाची एकसंध कांडी (वा वडी) बनवून ती सुकवितात व घट्ट करतात उदा., फुलबाज्या.
मिश्रणाला कागदी, पुठ्ठ्याचे, सुतळीचे किंवा पातळ पत्र्याचे पुरेसे मजबूत वेष्टन घातल्यास त्याच्या ज्वलनास बंदिस्तपणा येतो. सामान्यतः वेष्टन कागदी असून मजबुतीसाठी कागदावर सरसाचा लेप देऊन त्याची गजावरील अनेक पदरी गुंडाळी मजबूत करतात. ओली असतानाच अशा नळीचे एक तोंड दोरा घट्ट बांधून बंद करतात व दुसरे टोक सरसाने चिकटवितात. आतील मिश्रण पेटविण्यासाठी त्यातून निघून बाहेर येणारी वात बसवितात. पाण्यातील दारूच्या दाट द्रवात दोरा वा कागद बुडवून व सुकवून ज्वालागाही वात बनवितात. वेष्टनामुळे कोंडलेल्या वायूंचा किंवा ज्वालांचा दाब वाढतो व त्यामुळे उरलेले मिश्रण अधिक जोमाने व वेगाने जळते. फटाक्यात किंवा चिचुंदरीत एकाच प्रकारची दारू असते. मात्र चिचुंदरी जसजशी जळत जाते तसतसे निर्माण होणारे उष्ण वायू व उष्णता हवेत विरून जात राहिल्याने ती सावकाशपणे जळते. उलट फटाक्यातील दारू जळून बनणाऱ्या सर्व वायूचा निचरा वातीसाठी असलेल्या छिद्रातून होऊ शकत नाही. परिणामी वाढलेल्या दाबाने आतील सर्व दारू क्षणार्धात पेटून आतील वायूंच्या जादा दाबाने कागदी वेष्टन फोडून ते जोराने बाहेर पडतात. त्यांच्यामुळे बाहेरच्या हवेला धक्का बसून हवेत तरंग निर्माण होतात. या तरंगांची होणारी जाणीव म्हणजेच फटाक्याचा आवाज (बार) होय. ‘ ॲटम बाँब ’ व ‘ चँपियन फटाके ’काहीसे अधिक मोठे व वेगळ्या आकारांचे असतात. त्यांत दारूच्या पुडीभोवती सुतळी गुंडाळल्याने अधिक बळकटी व बंदिस्तपणा आणलेला असतो.
लष्करी उपयोगाच्या साधनांत ज्वलन टप्प्याटप्प्याने होत जाते. सुरूवातीची ठिणगी पाडणारे मिश्रण सर्वाधिक ज्वालागाही असून ते अत्यल्पच असते. या ठिणगीने पेटणारे पहिल्या टप्प्यातील मिश्रण थोडे अधिक असून त्याच्या ज्वालेने दुसऱ्या टप्प्यातील बेताचे ज्वालागाही मुख्य मिश्रण पेटते. ज्वलन सुरू झाल्यावर ठराविक काळानेच मुख्य मिश्रण पेटावे अशी योजना लष्करी दारूकामात केलेली असते. यासाठी ठिणगी व पुढील टप्प्यावरचे मिश्रण यांच्या दरम्यान सुरूंगाच्या वातीचा ठराविक लांबीचा तुकडा बसवितात. ही वात पूर्वनियोजित वेगाने जळणारी असते. मात्र ज्वलनातून निर्माण होणारे वायू साठणार नाहीत अशी दक्षता घेतात. नाही तर वात झपाटयाने जळून विलंब योजना निष्फळ ठरते. बंदिस्तपणा आवश्यक असणाऱ्या साधनांत वातीऐवजी वेगळ्या मिश्रणाची कांडी वापरतात. हे मिश्रण जळाल्याने राख जादा प्रमाणात व वायू अल्पप्रमाणात निर्माण होतात. परिणामी दाबामुळे भडका उडण्याची शक्यता उरत नाही.
घटक पदार्थ : विशिष्ट दारूकामात कोणत्या घटक पदार्थांचा का व कसा उपयोग होतो हे अपेक्षित शोभेच्या प्रकारावर व घटकांच्या गुणधर्मांवर अवलंबून असते.
इंधने : यात काही धातू , मिश्रधातू , संयुगे व अनेक कार्बनी पदार्थ येतात. मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम व ॲल्युमिनियम – मॅग्नेशियम मिश्रधातू यांची पूड या प्रभावी इंधनाच्या ज्वलनाने अत्युच्च तापमान व त्यामुळे प्रखर दीप्ती मिळते. उदा., हे मुख्य इंधन असणारे विद्युत् प्रकाशी गोळे. विद्युत् फटाक्यांत काळ्या चूर्णाबरोबर ही पूड अल्प प्रमाणात असल्याने ते पेटविल्यावर आवाजाबरोबर प्रकाशही निर्माण होतो. भुईनळ्यांत व चक्रांत या पुडीबरोबर लोखंडाची थोडी भरड पूडही घालतात. यामुळे ठिणग्यांचे कारंजे उडताना दिसते. ठिणग्यांसाठी जादा इंधन लागते. मूळ इंधन जळाल्यावर उरलेले थोडे इंधन हवेत विखरून जळते व ठिणग्या निर्माण होतात. वरील मिश्रण कागदाच्या नळीत भरून व तिचे एकावर एक वेढे देऊन व ते चिकटवून चक्र बनवितात. बाणाप्रमाणे हे चकही प्रतिकियेमुळे त्याच्या आसाभोवती फिरत राहते. सिलिकॉन, तांबडा फॉस्फरस, गंधक, लोणारी कोळसा, कॅल्शियम सिलिसाइड इ. इंधने शोभेच्या दारूकामात वापरली जातात.
ऑक्सिडीकारक पदार्थ : बेरियम, स्ट्राँशियम, सोडियम, पोटॅशियम यांची ऑक्साइडे व नायट्रेट, बेरियम व स्ट्राँशियम यांची पेरॉक्साइडे व कोमेट, पोटॅशियम परक्लोरेट तसेच शिसे, लोखंड, तांबे यांची ऑक्साइडे ही शोभेच्या दारूकामात ज्वलनाला ऑक्सिजन पुरवितात. शिवाय यातील धातूंच्या अणूंचे ज्वलनाच्या उच्च तापमानामुळे विद्युत् भारित आयनांत रूपांतर होते. या उत्तेजित आयनांपासून प्रकाशाला वेगवेगळे रंग प्राप्त होतात उदा., सोडियमाने नारिंगी पिवळा, स्ट्राँशियमाने तांबडा, बेरियमामुळे पोपटी हिरवा, तांब्याने निळा, कॅल्शियमाने विटकरी लाल वगैरे. तांबडा प्रकाश देणाऱ्या गुलकाड्या, चंद्रज्योती व ताडगोळे यांत स्ट्राँशियम नायट्रेट (क्वचित थोडे स्ट्राँशियम पेरॉक्साइड) हा, तर हिरवा प्रकाश देणाऱ्या वस्तूंमध्ये बेरियम नायट्रेट (वा याची इतर लवणे) हा आवश्यक घटक असतो. अँटिमनी व आर्सेनिक संयुगामुळे सफेद प्रकाश निर्माण होतो.
ऑक्सिडीकारकामुळे इंधन त्वरित जळून उच्च तापमान, प्रखर प्रकाश वा मोठा आवाज निर्माण होतो (उदा., ॲल्युमिनियमाचे चूर्ण १ भाग, ॲल्युमिनियमाच्या पट्ट्या १ भाग आणि पोटॅशियम परक्लोरेट २ भाग या मिश्रणाने निर्माण होणारा शुभ्र अग्निप्रपात). या पदार्थांमुळे ऑक्सिजनाचा काही किंवा पूर्ण पुरवठा होतो. पूर्वी सोरा हा ऑक्सिडीकारक पदार्थ वापरीत. नंतर अधिक चांगले म्हणून त्याऐवजी पोटॅशियम क्लोरेट व नंतर परक्लोरेटे वापरात आले. पोटॅशियम क्लोरेट अगदी तत्परतेने ऑक्सिजन पुरवीत असल्याने इष्ट इंधनाबरोबरचे याचे मिश्रण नुसते आपटल्याने वा चुरडल्यानेही पेटते. त्याचा एखादया अम्लाशी (उदा., दारूमधील गंधकाचे संपर्कात तयार होणारे अल्पसे सल्फ्यूरिक अम्ल) संपर्क झाला की क्लोरिक अम्ल (HCIO3) तयार होऊन इंधन नित्याच्या तापमानाला ठिणगीशिवाय पेटते. म्हणून ठराविक मिश्रणातच पोटॅशियम क्लोरेट वापरतात. अशी मिश्रणे व त्यांपासून बनविलेल्या वस्तू अम्ल, उष्णता व आदळआपट यांपासून कटाक्षाने दूर ठेवतात. १८५३ च्या सुमारास अधिक स्थिर मिश्रण बनविण्यासाठी गंधकाऐवजी साखर व स्टिअरीन वापरण्यात येऊ लागले. १८८५च्या सुमारास अधिक सुरक्षिततेसाठी पोटॅशियम क्लोरेटाऐवजी पोटॅशियम परक्लोरेटाचा (KCIO4) वापर सुरू झाला. कायदेशीर व्याख्येनुसार फटाके व फुलबाज्या यांच्यात पोटॅशियम क्लोरेट नसते. आपटबार (लसूणबार), केपांच्या टिकल्या यांत मात्र ते असते.
ज्वलननियंत्रक पदार्थ : वरीलपैकी काही धातूंची कार्बोनेटे व ऑक्झॅलेटे, क्वचित साधी माती हे ज्वलननियंत्रक पदार्थ ज्वलनकियेत मंदपणे सहभागी होतात. यामुळे ज्वलनाचा वेग व तीव्रता आटोक्यात राहतात.
रंगदायक पदार्थ : शोभेच्या दारूकामातील रंगांची तेजस्विता (भडकपणा) वाढविण्यासाठी मिश्रणात कॅलोमेल (Hg2CI2) वापरण्यात येऊ लागले. मात्र १९४० नंतर याच्याऐवजी हेक्झॅक्लोरोबेंझीन (C6Cl6) व क्लोरिनाची इतर कार्बनी संयुगे वापरात आली. धातूच्या इतर लवणांपेक्षा त्यांच्या क्लोराइडांपासून अधिक सुलभतेने आयन निर्माण होतात व इतर रंगांचे उजळ प्रकाश निर्माण होतात. मिश्रणात क्लोरीनयुक्त कार्बनी पदार्थ व इष्ट धातूचे नायट्रेट इ. लवण असल्यास ज्वलन सुरू होताच प्रथम त्या धातूचे क्लोराइड बनते व या क्लोराइडाचे लगेच आयनीकरण होऊन धातूचे विपुल आयन उपलब्ध होतात आणि इच्छित प्रकाश प्रकर्षाने मिळतो. मात्र बहुतेक क्लोराइडे जलशोषक असल्याने ती अशा मिश्रणांत जशीच्या तशी न वापरता वरीलप्रमाणे ऐनवेळी ती निर्माण होतील, असे पाहिले जाते.
बंधक व जलरोधी पदार्थ : राळ, लाख, मेण, डांबर, पॉलिव्हिनिल क्लोराइड (पीव्हीसी) इ. पदार्थ चूर्ण एकत्र बांधून ठेवणारे बंधक व जलरोधक म्हणूनही उपयुक्त आहेत. तसेच डिंक, खळ इ. बंधक पदार्थ मंदपणे जळणारे असल्याने ते काही प्रमाणात ज्वलनाचे नियंत्रणही करतात. पाण्यातील डिंक, स्पिरिटमधील लाख, अळशीचे तेल हे बंधक पदार्थही वापरले जातात.
सुरक्षितता : बंदुकीच्या दारूसारखे स्फोटक व ज्वालाग्राही पदार्थ शोभेच्या दारूकामातील साधनांमध्ये असल्याने ती धोकादायक ठरू शकतात. अयोग्य रीतीने हाताळल्यास ती पेटून वा स्फोट होऊन प्राणघातक दुखापतीही होऊ शकतात आग लागू शकते व वित्तहानीही होऊ शकते. म्हणून अधिकृत व्यक्तीच त्यांचे उत्पादन व व्यापार करू शकतात. त्यामुळे अशा वस्तूंचे उत्पादन, साठवण, वाहतूक व प्रत्यक्ष वापर करताना अपघाताने जीवित व वित्त हानी होऊ नये यासाठी कायदे कानून केले आहेत.
दारूच्या मिश्रणातील घटक पदार्थांची चूर्णे तयार करणे, ती चाळणे, मिसळणे इ. क्रिया एकमेकींपासून पुरेशा दूर असलेल्या हलक्या बांधकामाच्या खोल्यांत करतात. या खोल्यांची छपरे वजनाला हलकी व केवळ खिळे ठोकून बसविलेली असतात तर त्यांची दारे स्प्रिंगा बसविलेली असतात. यामुळे अपघाती ज्वलनाच्या व स्फोटाच्या वेळी छपरे उडून बाहेर पडतात आणि स्प्रिगांची दारे सताड उघडतात. अशा रीतीने बंदिस्तपणा कमी होऊन मोठे स्फोट होण्याचा धोका टळतो.
अशा खोल्यांत व कारखान्यांत फक्त कामगारच जाऊ शकतात. ते बिनखिळ्यांची पादत्राणे वापरतात. मिश्रणांच्या वडया वा कांड्या बनविण्याच्या दाबयंत्रातील साचे ब्रॉझचे किंवा शिशासारख्या मऊ धातूचे असतात. दाबयंत्रे दूरवरून व आरशात पाहून चालवितात. कारखान्याच्या परिसरात धूम्रपान मनाई असते. तेथे पाणी, वाळूच्या बादल्या इ. आगनिवारणाची साधने सज्ज ठेवलेली असतात.
अधिकृत परवान्यानुसार विशिष्ट इमारतीत विशिष्ट पदार्थ, मिश्रण वा तयार वस्तू यांचा विशिष्ट प्रमाणातील साठा ठेवता येतो. ठरविलेल्या वर्गवारीनुसारच माल बाहेर पाठवितात. उदा., वर्ग १ मध्ये काळे चूर्णयुक्त पदार्थ व वस्तू येतात. शोभेच्या दारूकामातील इतर वस्तूंबरोबर एकाच व शेजारच्या खोल्यांतूनही काळे चूर्ण पाठविता येत नाही. आपटबारही असे स्वतंत्रपणे पाठवितात.
वस्तूंचे प्रकार : मिश्रणाचे संघटन, घटकांची मांडणी व वेष्टन यांनुसार शोभेच्या दारूकामातील तयार वस्तूंचे प्रकार होतात. सध्याच्या बहुतेक वस्तूंच्या रचनेचा तपशील १८०० सालापर्यंत निश्चित झाला होता.
बाण व रॉकेट : यात बहुधा ३० भाग सोरा, ५ भाग गंधक व ४ भाग लोणारी कोळसा असलेले मिश्रण मजबूत कागदी वा पुठ्ठ्याच्या नळीत दाबून ठासून भरलेले असते. नळीचे उघडे तोंड दाबून निमुळते केलेले असते. तेथे मातीची गुडदी (तोटी) असते. तिच्यामुळे वेष्टन जळत नाही. दारूमध्ये तीनचतुर्थांश उंचीपर्यंत निमुळती होत जाणारी शंक्वाकार पोकळी असते. तिच्यामुळे प्रचालक भरड दारूच्या ज्वलनासाठी मोठे क्षेत्र उपलब्ध होते. यामुळे तेथे दारू वेगाने जळते. या कमाल ज्वलनातून बनलेले वायू खालच्या उघडया तोंडातून जोराने बाहेर पडल्याने त्याची प्रतिक्रिया म्हणून बाण गतिमान होऊन वर उडतो. निमुळत्या तोंडाला जोडलेल्या काडीमुळे किंवा कल्ल्यासारख्या रचनेमुळे उड्डाणात बाणाला स्थैर्य प्राप्त होते. उड्डाणाचे शिखर गाठल्यावर प्रचालक दारूने बारीक स्फोटक दारू पेटते. तिच्या स्फोटाने रॉकेटचे तुकडे होऊन व शीर्षातील घटक पेटून विविध शोभिवंत आविष्कार दिसतात. प्रदर्शनीय रॉकेटांत शेवटी जळणाऱ्या शीर्षात (टोपीत) फटाके, मॅग्नेशियम चूर्ण, विविध रंग निर्मिणारी संयुगे, बाँब, छोट्या हवाई छत्र्या इ. असतात. बाणातून बाहेर फेकल्या गेलेल्या जळत्या फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम यांच्यामुळे दृश्याला सौंदर्य प्राप्त होते. अशा रीतीने बाणांचे दोन मुख्य प्रकार होतात. जोराने उडणाऱ्या बाणात सोरा, गंधक व लोणारी कोळसा हे घटक असणारी दारू असते. दुसऱ्या प्रकारच्या बाणात यांच्याबरोबर ठिणग्या, ज्योती, ज्वाला इ. निर्माण करणारे पदार्थ असतात उदा., आर्सेनिक, अँटिमनी व विविध धातूंची लवणे, पोटॅशियम परक्लोरेट वगैरे. बाण वा रॉकेट हा शोभेच्या दारूकामातील सर्वाधिक लोकप्रिय प्रकार अनेक शतकांपासून वापरात आहे.
रोमन कँडल : जळताना यातून बाहेर पडणाऱ्या चांदण्या कठीण द्रव्याच्या असून हवेतून जाताना त्या अनेक सेकंद जळतात. रंगीत चांदण्या निर्मिणाऱ्या मिश्रणाचे संघटन रंगीत प्रकाश निर्मिणाऱ्या मिश्रणासारखे असते (उदा., सोरा ३४ भाग, गंधक ७ भाग, लोणारी कोळसा २१ भाग व डेक्स्ट्रिन १ भाग). यात लांब, अरूंद, बळकट कागदी नळीचे खालचे तोंड चिकणमातीने बंद करतात. तिच्यात काळे चूर्ण, चांदण्या निर्मिणारे मिश्रण आणि खास मिश्रण यांचे तीन थर त्याच कमाने पुन:पुन्हा भरलेले असतात. ही पेटल्यावर हे थर पाठोपाठ पेटत जाऊन घुमणाऱ्या आवाजांची मालिका व सुंदर आविष्कार दिसतात उदा., रंगीत ज्वालांचे लोळ, ठिणग्यांचे कारंजे, विविधरंगी ज्योती.
नागाच्या गोळ्या (वा वडया) व वारूळ : यात मर्क्युरिक थायोसायनेट [Hg(SCN)2)] व थोडा सोरा मिसळलेला गम अरेबिक डिंक असतो. ही गोळी पेटविल्यावर अळी किंवा सापाच्या आकाराचा जाडजूड अवशेष मागे राहतो. अशा एक वा अनेक गोळ्या कथिलाच्या वर्खात आवेष्टित करून नागाचे वारूळ बनवितात. त्यात अमोनियम डायक्रोमेट [ (NH4)2 Cr2O7], सोरा व डेक्स्ट्रिन यांचे मिश्रण असते. हे जळताना हिरवट राखेचा छोटा ढीग बनतो व त्यातून वाढत जाणारा नाग बाहेर पडल्यासारखा दिसतो.
चक्र : (कॅथरीन व्हील किंवा पिन व्हील). यात लांब, लवचिक नळीत काळे चूर्ण बाणाप्रमाणे भरलेले असते. ही नळी जाड कागदाच्या चकतीवर बाहेरील कडेशी चिकटविलेली असते. चकतीच्या मध्यभागी असलेल्या छिद्रात काडी वा तार घातलेली असते. पेटविल्यावर ही चकती काडीभोवती फिरू लागते आणि ठिणग्या वा ज्वाला बाहेर फेकल्या जातात. बांबूच्या कामट्यांच्या चक्राकार साच्याच्या परिघावर बाणाप्रमाणे मिश्रण भरलेल्या दोन (वा अधिक) आखूड नळ्या समोरासमोर असतात. यावरील अनेक नळ्यांच्या मांडणीनुसार चित्रे, अक्षरे, दृश्ये वगैरे आविष्कार दिसू शकतात. कधीकधी मिश्रणात पोलादाचा कीस व बिडाचे चूर्ण वापरून चमचमाट व लुकलुकणे यांची भर घालतात.
ताडगोळे : कागदी लगद्याच्या गोलाकार कवचात स्फोटक काळे चूर्ण, चांदण्या निर्मिणारे मिश्रण भरून बनविलेले हे एक प्रकारचे कवची वा कुलपी गोळे आहेत. यात अल्प काळ जळणारी वातही असते. उखळी तोफेतून असे गोळे काळ्या मिश्रणाच्या स्फोटाने वर फेकले जातात. नंतर त्यातील इतर सामगी कमवार पेटत जाऊन सुंदर दृश्य दिसते. युद्धोपयोगी गोळ्यांतून नियोजित उंचीवर किंवा अंतरावर अपेक्षित रंगाचा धूर निघतो. असे गोळे दिवसा वापरतात. रात्री वापरावयाच्या अशा गोळ्यांमधून धुराऐवजी लाल, हिरव्या इ. इच्छित रंगांचा प्रकाश निर्मिणारे ताडगोळे उडतात. या रंगांचे अर्थ आधीच ठरविलेले असल्याने शेजारच्या क्षेत्रात असणाऱ्या आपल्या सैनिकांना यातून योग्य तो संदेश मिळतो. धूम्र गोलक सोडून आपले सैन्य व शत्रू यांच्या दरम्यान पांढऱ्या धुराचा पडदा उभारतात. यामुळे आपल्या हालचाली शत्रूला कळत नाहीत. शत्रूचा प्रदेश रात्री स्पष्टपणे दिसण्यासाठी प्रखर पांढरा प्रकाश पाडणारे चंद्रज्योतीची दारू भरलेले गोळे वापरतात. दारूचे मिश्रण दाबयंत्राने दाबून असे सर्व दंडगोलाकृती गोळे (ठोकळे) बनवितात. कधीकधी लष्करी वापरासाठी आग लावणारे किंवा विषारी द्रव्य भरलेले रासायनिक गोळे तयार करतात.
चांदण्या व चंद्रज्योती : बाण, ताडगोळे व रोमन कँडल यांतील चांदण्या घट्ट, कठीण, पुंज असून त्या हवेतून जाताना काही सेकंद जळतात. कधीकधी त्या कागदाने आवेष्टित करून त्याला वात लावतात. पुष्कळ वेळा त्या स्फोटक दारूने पेटतात. विद्युत् चांदण्यांत ॲल्युमिनियमामुळे चमकदारपणा येतो. शुभ पांढऱ्या विद्युत् चांदण्यात पोटॅशियम परक्लोरेट, बेरियम नायट्रेट, ॲल्युमिनियम व लाख यांचे मिश्रण वापरतात. रंगीत चांदण्यांतील मिश्रण जवळजवळ रंगीत प्रकाशनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या मिश्रणासारखे असते. लँप ब्लॅक (काजळी) चांदणीने विलो वृक्षासारखा सुंदर देखावा साकार होतो. तिच्यात काजळी, धातुचूर्ण, अँटिमनी सल्फाइड व अल्कोहॉलात विरघळलेली लाख हे मिश्रण असते. विखुरणाऱ्या (स्प्रेडर) चांदण्यांत मुख्यत्वे जस्ताचे चूर्ण (वजनी) असते. पुष्कळदा यातून उडणाऱ्या हिरवट पांढऱ्या ठिणग्या अनेक मीटर अंतरापर्यंत जाऊ शकतात.
रंगीत प्रकाश : विविध रंगांसाठीच्या मिश्रणांत पोटॅशियम क्लोरेट वा परक्लोरेट, गंधक, लाख हे सामान्य घटक असून या मिश्रणांतील त्यांचे व इतर घटकांचे प्रमाण वेगवेगळे असते. लाल रंगासाठी स्ट्राँशियम नायट्रेट हिरव्या रंगासाठी बेरियम नायट्रेट जांभळ्या रंगासाठी स्ट्राँशियम नायट्रेट, कॉपर ऑक्साइड, कॅलोमेल व डेक्स्ट्रिन अंबर रंगासाठी पॅरिस ग्रीन, कॅलोमेल व डेक्स्ट्रिन आणि लष्करासाठीच्या चमकदार गडद हिरव्या रंगासाठी बेरियम नायट्रेट, मॅग्नेशियम, हेक्झॅक्लोरोएथेन व अळशीचे तेल हे मिश्रणातील खास घटक असतात. दिवाळीत वापरण्यात येणाऱ्या लाल व हिरव्या रंगांच्या आगकाड्यांच्या गुलामध्ये असे विशिष्ट घटक असतात.
कारंजे वा अग्निझोत : यात बाणाप्रमाणे दारूचे मिश्रण भरलेले असते. पोलादी अग्निझोतात धातुचूर्ण, सोरा, गंधक, लोणारी कोळसा व पोलादाचा चुरा तर सोनेरी अग्निझोतात धातुचूर्ण, सोडियम ऑक्झॅलेट, अँटिमनी सल्फाइड, ॲल्युमिनियमाचे चूर्ण आणि मोठया चिनी भुईनळ्यात (झाडात) सोरा, तांबडा डिंक व बिडाचे चूर्ण हे खास घटक असतात.
फुलबाज्या : यांच्यात पोटॅशियम परक्लोरेट, बेरियम नायट्रेट, लाख यांसारख्या इतर मिश्रणातील सामान्य घटकांशिवाय लोखंडाचे भरड चूर्ण व पोलादाचे चूर्ण घातल्यास अधिक शुभ फुले तर काजळी घातल्यास अधिक मोठी फुले निर्माण होतात. जस्त व ॲल्युमिनियम धातूंची चूर्णेही यात वापरतात.
लघुनलिका : (लान्सेस). या तेजस्वीपणे जळणाऱ्या सिगारेटच्या आकारमानाच्या नलिका असून पातळ कागदाच्या नळ्यांमध्ये रंग निर्मिती करणारे मिश्रण भरून त्या बनवितात. लाकडी चौकटीवर त्या विशिष्ट आकृतिबंधांत बसवितात. अशा मांडणीतून पेटविल्यावर व्यक्तिचित्र, ध्वज, अक्षरे, देखावा इत्यादींची रूपरेषा दृश्यमान होऊन सुंदर दृश्यनिर्मिती होते.
फटाके : कागदाच्या घट्ट गुंडाळीत काळे मिश्रण (दारू) ठासून भरून व त्याला वात जोडून फटाके बनवितात. अधिक तेजस्वी व मोठा आवाज करणारे फटाके १९२० च्या सुमारास अमेरिकेत बनविण्यात आले. त्यांत पोटॅशियम परक्लोरेट, गंधक व ॲल्युमिनियमाचे चूर्ण हे खास घटक असतात. फटाक्यांच्या कागदी वाती गुंफून त्याची सर वा लड बनवितात.
भारत : भारतात शोभेच्या दारूकामाचा उदयोग एकोणिसाव्या शतकापासून चालू आहे. सुरूवातीला उत्पादन छोट्या प्रमाणावर होत असे. अशा घरगुती कारखान्यांना सुरक्षिततेविषयीच्या नियमांचा फटका बसला. मात्र विसाव्या शतकाच्या सुरूवातीस या उदयोगात वाढ होऊन मुख्यतः तमिळनाडूमध्ये या उदयोगाची केंद्रे उभी राहिली. यांपैकी शिवकाशी हे सर्वांत महत्त्वाचे केंद्र आहे. या राज्यात कोविलपट्टी, सत्तूर येथेही शोभेच्या दारूकामाशी निगडित उदयोग आहेत. शोभेच्या दारूकामाची साधनसामगी निर्माण करणारे बहुतेक कारखाने गामीण भागात असून ते लोकवस्ती, रेल्वेमार्ग, महामार्ग इत्यादींपासून दूर उभे राहिले आहेत. या कारखान्यांच्या इमारती वजनाला हलक्या बांधकाम साहित्याच्या बांधल्या आहेत. येथील विविध कामांचे विभाग एकमेकांपासून काही अंतरावर काहीसे अलग अलग असे बांधले आहेत. येथील उत्पादन शासकीय व कामगार कायद्यांनुसार होते. अर्थात घरगुती व कुटिर उदयोगाच्या स्वरूपाचे उत्पादनही होत असते. अशा असुरक्षित उत्पादनाचा धोका त्या त्या भागाला हानिकारक ठरू शकतो. शोभेच्या दारूकामासाठीची भारतातील उत्पादने जर्मनी, इटली व ब्रिटन येथील उत्पादनांच्या तोडीची आहेत.
स्वस्त मनुष्यबळ, सोऱ्याचा साठा व घाऊक बाजारपेठ या अनुकूल परिस्थितीमुळे शिवकाशी हे या उदयोगाचे भारतातील एक प्रमुख केंद्र बनले आहे. या उदयोगासाठी लागणारे धागा, कापड इ. साहित्यही तेथे उपलब्ध असून ॲल्युमिनियमाचे चूर्ण, टीपकागद इ. साहित्य बाहेरून तेथे येते. स्टँडर्ड फायर वर्क्स, नॅशनल फायर वर्क्स या येथील काही प्रसिद्ध कंपन्या आहेत. शोभेच्या दारूकामाशी निगडित असलेले कागद कारखाने, लेबल छपाई, मुद्रण इ. आनुषंगिक उदयोगही येथे उभे राहिले आहेत.
पहा : आगकाड्या दारूगोळा दिवाळी बंदुकीची दारू रॉकेट स्फोटक द्रव्ये.
संदर्भ : 1. Brock. A. H. Pyrotechnics, 1922.
2. Oglesby, L. S. The Chemistry of Glitter, 1989.
3. Philip, C. A. Bibliography of Fireworks Books, 1985.
4. Plimpton, G. Fireworks : A History and Celebrations. 1989.
काजरेकर, स. ग.
“