शेलर, माक्स : (२२ ऑगस्ट १८७४-१९ मे १९२८). जर्मन तत्त्वज्ञ. जन्म म्यूनिक येथे. त्याचे वडील प्रोटेस्टंट ख्रिस्ती, तर आई ज्यू होती. १९२० च्या सुमारास त्याने कॅथलिक पंथाचा स्वीकार केला. शिक्षण म्यूनिक, बर्लिन, येना आणि हायडल्बर्ग विदयापीठात. १९०१ मध्ये येना विदयापीठात त्याने अध्यापनास आरंभ केला. पश्चिमी तत्त्वज्ञानातील ⇨रूपविवेचनवादाचा (फिनॉमिनाँलॉजी) प्रवर्तक ⇨एटमुंट हुसर्ल ह्याच्याशी शेलरच्या अनेकवार भेटी झाल्या होत्या. हुसर्लच्या, तसेच ⇨ फ्रँझ ब्रेन्टानो ह्यांसारख्या त्याच्या शिष्यांच्या प्रभावाखाली शेलर रूपविवेचनवादाकडे वळला. हुसर्लच्या सूचनेवरून १९०७ साली तो म्यूनिक विदयापीठात रूजू झाला. तेथे तो १९१० पर्यंत होता. त्यानंतर गटिंगन आणि बर्लिन येथे त्याने अध्यापन केला. १९१७ पर्यंत त्याने त्याच्या महत्त्वपूर्ण गंथाचे लेखन केले. त्यानंतर काही काळ (१९१७-१८) जर्मनीच्या परराष्ट्र कार्यालयात त्याने काम केले. १९१९ मध्ये तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सीस, कोलन येथे झाली.
शेलर हा हुसर्लच्या रूपविवेचनवादात्मक तत्त्वज्ञानाचा अग्रेसर प्रवक्ता होता. ⇨ फ्रिड्रिख व्हिल्हेल्म नीत्शे, ⇨ व्हिल्हेल्म डिल्टाय आणि ⇨ आंरी बेर्गसाँ ह्यांचा तत्त्वज्ञानीय कार्यक्रम आपण पुढे चालवत आहोत, असा त्याचा दावा होता. त्याने मुख्यतः नीतिशास्त्र, धर्म, मानसशास्त्र व समाजशास्त्र ह्या क्षेत्रांत वैचारिक योगदान दिले.
शेलरने आपल्या ज्ञानमीमांसेत ज्ञानाचे त्रिविध वर्गीकरण केले : (१) वैज्ञानिक ज्ञान, जे मुख्यतः विशेषांसंबंधी असते. (२) तात्त्विक ज्ञान, जे सामान्यांविषयी, सारतत्त्वांविषयी (एसन्सिस) असते आणि (३) सद्वस्तुसंबंधीचे, ईश्वरसंबंधीचे व मोक्षासंबंधीचे ज्ञान. मूल्यविचाराच्या क्षेत्रात शेलरवर ⇨ इमॅन्युएल कांट चा मोठा प्रभाव होता पण रूपविवेचनवादाच्या द्वारा कांटच्या नीतिशास्त्रापलीकडे जाण्याचा त्याने प्रयत्न केला. नैतिक तत्त्वे अनुभव निरपेक्षपणे निष्पन्न होतात, ही कांटची भूमिका स्वीकारीत असतानाच अनुभवनिरपेक्षता आणि तर्कबुद्घी (रीझन) यांचे कांटप्रणीत समीकरण त्याने अमान्य केले. अनुभवनिरपेक्षतेची धाव तर्कबुद्धीच्या पलीकडे जाते व तिचा संबंध माणसाच्या भावभावनांशीही पोहोचतो, असा ⇨ फ्रिड्रिख व्हिल्हेल्म योझेफ फोन शेलिंग याचा दावा होता. यातूनच भावनिक अनुभवपूर्व (इमोशनल ए-प्रायोराय) ही कल्पना त्याने मांडली.
शेलरच्या मतानुसार मूल्यांचे अस्तित्व हे काही गूढ कोडे नव्हे. ज्याप्रमाणे रंग हा डोळ्यांचा आणि नाद हा श्रुतीचा विषय असतो, त्याचप्रमाणे मूल्ये ही आपल्या भावनेचे खरे विषय असतात. शेलरच्या मूल्यविषयक तत्त्वज्ञानाचे तीन भाग आहेत : पहिला, मूल्यांचा श्रेणिक्रम दुसरा, मूल्यांच्या अनुभवाचे प्रकार व तिसरा, त्यांच्या सापेक्षत्वाची समस्या. मूल्यांचा श्रेणिक्रम आपल्या आवडीनिवडींवर अवलंबून असतो. अशा आवडीनिवडींत चार गुण मुख्य असतात : (१) नाशवंत व चंचल मूल्यांपेक्षा आपण स्थिर मूल्ये जास्त पसंत करतो. (२) मूल्यांचे विभाजन न करता, ज्यांचा रसास्वाद बहुसंख्य मानवांना घेता येईल, ती मूल्ये अधिक बरी, असे आपण मानतो. (३) ज्या मूल्यावर दुसरे अधिष्ठित असते, ते मूल्य अधिक बरे आणि (४) ज्या मूल्यांमुळे आपल्याला गंभीर स्वरूपाचे समाधान होते, ते इतरांपेक्षा उच्च् असते असे आपण समजतो.
अनुभवांच्या दृष्टीनेही मूल्यांचे चार प्रकार आहेत : (१) सुखदु:खांची मूल्ये. ही मुख्यतः वैयक्तिक असतात. (२) कल्याणविषयक मूल्ये. ह्यांमुळे जीवन, आरोग्य व सामाजिक कल्याण ह्यांची अभिवृद्धी होते. (३) सांस्कृतिक मूल्ये. ह्यांत सौंदर्य, न्याय व सत्य ह्यांचा समावेश होतो व शेवटी (४) पवित्रतेची मूल्ये. ही धार्मिक अनुभवाचे विषय असतात. शेलरच्या मते, आदर्श व्यक्तिमत्त्वात धार्मिक मूल्यांना सर्वोच्च महत्त्व असते. त्यांच्या खालोखाल सांस्कृतिक, त्यांच्या नंतर सामाजिक आणि सर्वांत शेवटी आर्थिक मूल्याचे स्थान असते. प्रत्येक प्रकारच्या मूल्यांचा स्वतंत्र परिघ असतो. त्यांमध्ये विरोध निर्माण झाल्यास उच्च् मूल्यांसाठी उर्वरित मूल्यांचा परित्याग करणे इष्ट ठरते.
मूल्यांचा श्रेणिक्रम लावल्यावर त्यांच्या सापेक्षतेच्या समस्येचा उलगडा शेलरने एक दृष्टांत देऊन केला आहे. मूल्यांची श्रेणी ही पर्वतश्रेणीसारखीच असते. आपण बहुधा पर्वताच्या दऱ्याखोऱ्यांतच राहत असल्यामुळे आपल्याला तिथल्या विशिष्ट स्थानांचा लळा लागलेला असतो. अशा स्थानांतील प्रत्येकाचे विशिष्ट माहात्म्य असते. ह्या स्थानमाहात्म्याला सापेक्ष म्हणण्याऐवजी दृष्टिकोण म्हणणे योग्य होईल. असे दृष्टिकोण साहजिकच संकुचित असतात. परमेश्वराचे स्थान सर्वोच्च असल्यामुळे तो ज्या सर्वोच्च् शिखरावर विराजमान असतो, तेथून जगाकडे पाहिल्यावर आपल्याला समग सत्याचे आकलन होऊ शकते. ऑन द इटर्नल इन मॅन (१९२१, इं. भा. १९६०) ह्या त्याच्या गंथात शेलरने असे सांगितले आहे, की केवळ बुद्धीने आपणास परमसत्याचे ज्ञान होऊ शकत नाही. तिचा आश्रय घेऊन आपल्याला जगाच्या बाह्य यांत्रिकतेच्या अंतरंगात दडलेल्या ध्येयांच्या अस्तित्वाची जाणीव कदाचित होऊ शकेल परंतु जोपर्यंत या बुद्धीला धार्मिक भावनेची जोड मिळू शकत नाही, तोपर्यंत आपल्याला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वोच्च शिखर गाठता येणार नाही. शेलरच्या मते प्रेम व सहानुभूती ह्यांच्याव्दारे मानवाच्या व्यक्तिमत्त्वाचा परिष्कार होऊन त्यांत सर्व मूल्यांचा समन्वय करणे शक्य आहे.
शेलरचे काही उल्लेखनीय गंथ असे : ऑन द रिलेशन्स बिट्वीन लॉजिकल अँड एथिकल प्रिन्सिपल्स (१८९९, इं. शी.), द ट्रान्सेंडेंटल अँड सायकॉलॉजिकल मेथड्स (१९००, इं. शी.), ऑन द फिनॉमिनॉलॉजी अँड थिअरी ऑफ सिंपथी, अँड ऑफ लव्ह अँड हेट (१९१३, इं. शी.), फॉर्मॅलिझम इन एथिक्स अँड नॉन फॉर्मल एथिक्स ऑफ व्हॅल्यूज (भाग १ व २, १९१३ १९१६, इं. भा.१९७३),सोसायटी अँड फॉर्म्स ऑफ नॉलेज (१९२६, इं. शी.), मॅन्स प्लेस इन नेचर (१९२८, इं. भा. १९६१), फिलॉसॉफिकल पर्स्पेक्टिव्ह्ज (१९२९, इं. भा. १९५८).
फ्रँकफुर्ट-आम-मेन (प. जर्मनी) येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ : 1. Frings, M. S. Max Scheler : A Concise Introduction into the World of a Great Thinker, Pittsburgh, 1965.
2. Frings, M. S. Max Scheler : Centennial Essays, The Hague, 1974.
3. Schuetz, Alfred, “Max Scheler’s Epistemology and Ethics”, Review of Mataphysics, Vol. II, 1957.
4. Spiegelberg, H. The Phenomenological Movement: A Historical Introduction, Hague, 1971.
जोशी, ना. वि.
“