सेन, देवेंद्रनाथ : (? १८५५–? १९२०). बंगाली कवी. गाझीपूर (उत्तर प्रदेश) येथे मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ‘पाटणा कॉलेजिएट स्कूल’ येथे त्यांचे प्रारंभीचे शिक्षण झाले. त्यांचे पुढचे उच्च शिक्षण कोलकाता येथील ‘प्रेसिडेन्सी कॉलेज’ मध्ये झाले. अलाहाबाद विद्यापीठातून ते एम्. ए. झाले. त्यांनी कायद्याची पदवी घेतली व गाझीपूरच्या जिल्हा न्यायालयात काही काळ वकिली केली. उत्तरायुष्यात त्यांनी कोलकाता येथे ‘श्रीकृष्ण पाठशाळा’ या विद्यालयाची स्थापना केली व काही वर्षे ही माध्यमिक शाळा चालवली. त्यांनी लहान वयातच काव्यलेखनाला सुरुवात केली. ‘अद्भुत रोदन’ व ‘अद्भुत सुख’ या त्यांच्या सुरुवातीच्या दोन कविता होत. सेन हे रवींद्रनाथ टागोरांचे समकालीन होते व त्यांच्या काव्याचे चाहते होते. सेन ह्यांच्या काव्यावर प्रारंभीच्या काळात बिहारीलाल चक्रवर्ती व मायकेल मधुसूदन दत्त या कवींचा प्रभाव होता. काव्याची भाषा व विषयांची निवड या संदर्भांत मधुसूदन दत्त यांचा प्रभाव त्यांच्या काव्यलेखनावर विशेषत्वाने जाणवतो. सेन यांनी भावकविता, प्रेमगीते, सुनीते इ. लिहिली. त्यांपैकी त्यांची सुनीतरचना ही मधुसूदन दत्त यांच्या सुनीतांनी प्रभावित झाली आहे. सेन यांचे पहिले तीन लहान कवितासंग्रह-फुलबाला, उर्मिला व निर्झरिणी-ते गाझीपूर येथे असताना १८८० साली प्रकाशित झाले. फुलबाला ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहात अठरा फुलांचे प्रतीकात्मक वर्णन असून, त्या फुलांना सचेतन स्त्रीरूपे बहाल केली आहेत व त्यांत स्त्रियांच्या अंगी असलेल्या विविध गुणांची प्रशंसा केली आहे. अशोक गुच्छ (१९००) हा त्यांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह होय. हरिमंगल (१९०५) या त्यांच्या काव्यसंग्रहात श्रीकृष्ण पाठशाळेतील विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कविता अंतर्भूत आहेत. १९१२ हे वर्ष त्यांच्या कारकीर्दीत काव्यनिर्मितीच्या दृष्टीने खूपच फलदायी ठरले. कारण ह्या एकाच वर्षात त्यांचे शेफाली गुच्छ, पारिजात गुच्छ, गंधमंगल, अपूर्व-नैवेद्य, अपूर्व-शिशुमंगल, श्रीकृष्ण-मंगल, अपूर्व-व्रजांगना, गोलप-गुच्छ व ख्रिस्तमंगल हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले.
बंगाली भावकाव्यात त्यांना स्वतःचे असे खास स्वतंत्र स्थान आहे. तीव्र भावावेग व कल्पनाशक्ती हे त्यांच्या कवि-व्यक्तिमत्त्वाचे गुण त्यांच्या काव्यातून प्रतीत होतात. त्यांचा ओढा वस्तुनिष्ठतेकडे असला, तरी वृत्तीने ते स्वच्छंदतावादी कवी होते. त्यांच्या स्वच्छंदतावादी काव्याविष्कारात वास्तवतेच्या छटांचे मिश्रण आढळते. मात्र स्वच्छंदतावादातील गडद नैराश्य वा जगाविषयीची उदासीनता त्यांच्या काव्यात आढळत नाही. अवतीभवतीच्या गोष्टींतील सौंदर्य न्याहाळणारा हा आनंदयात्री कवी होता. त्यांचे सर्वोत्तम काव्य हे प्रेमकाव्य असून त्यात वैवाहिक प्रेमाची महती वर्णिली आहे. लहान मुले व स्त्रिया यांच्याविषयी त्यांना विशेष ममत्व होते. त्यांची वृत्ती धार्मिक होती. भगवान श्रीकृष्णाचे ते परम भक्त होते आणि लहान मुलात गोपाळ व स्त्रीमध्ये दुर्गादेवी त्यांना दिसत असे. त्यांच्या काव्यातून ह्याचे प्रत्यंतर येते. त्यांच्या काव्यातून साध्या, सरळ ऐहिक आनंदाची रसिकांना प्रचिती येत असल्याने त्यांची कविता रसिकप्रिय ठरली. त्यांच्या सुनीतरचनाही वैशिष्ट्यपूर्ण व बंगाली काव्यात श्रेष्ठ प्रतीच्या मानल्या जातात.
इनामदार, श्री. दे.