‘ए. ई.’ : (१० एप्रिल १८६७–१७ जुलै १९३५). आयरिश कवी आणि विचारवंत. खरे नाव जॉर्ज विल्यम रसेल. जन्म आयर्लंडमधील लर्गन येथे. होमवर्ड : साँग्ज बाय द वे (१८९४), द अर्थ ब्रेथ (१८९७), द डिव्हाइन व्हिजन (१९०४), बाय स्टिल वॉटर्स (१९०६) हे त्याच्या महत्त्वाच्या काव्यग्रंथांपैकी काही होत. त्याची कविता मुख्यतः गूढगुंजनात्मक आहे. आयर्लंडमधील दंतकथांच्या आधारे काही साधीच, पण मनोहर काव्यरचनाही त्याने केली आहे. आयर्लंडच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या व राजकीय जागृतीच्या चळवळींत त्याचे स्थान मोठे आहे. द आयरिश स्टेट्समनचा तो संपादक होता (१९२३–३०). तो उत्तम चित्रकारही होता. इंग्लंडमधील बोर्नमथ येथे तो मरण पावला.