एअर इंडिया इंटरनॅशनल : आंतरराष्ट्रीय हवाई वाहूत करणारा भारतीय निगम. एअर इंडिया इंटरनॅशनल कॉर्पोरेशन १ ऑगस्ट १९५३ मध्ये सरकारी निगम म्हणून ‘एअर कॉर्पोरेशन्स ॲक्ट १९५३’ नुसार स्थापन करण्यात आला. यापूर्वी ८ जून १९४८ मध्ये एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेडने मुंबई-लंडन द्वारा कैरो व जिनीव्हा अशा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीस प्रारंभ केला. त्यावेळी एअर इंडियाजवळ कॉन्स्टेलेशन ७४९ ह्या जातीची तीन विमाने होती. १९५३ पासून एअर इंडियाने आपल्या मार्गांमध्ये व विमानांच्या काफिल्यात हळूहळू वाढ करीत आणली. एअर इंडियाचे संचालक मंडळ पंधराजणांचे असून निगमाच्या स्थापनेपासून जे. आर्. डी. टाटा हे अध्यक्ष आहेत. एअर इंडियाचे प्रमुख कार्यालय, वाणिज्यविषयक व अन्य कार्यालये मुंबई येथे असून जगामध्ये निगमाची कार्यालये जिनीव्हा, लंडन, न्यूयॉर्क, नैरोबी, टोकिओ, सिडनी व फिजी बेटामधील नंदी या ठिकाणी आहेत.
एअर इंडिया, बी. ओ. ए. सी. (ब्रिटिश) व क्वांटास (ऑस्ट्रेलियन) या तीन विमान-कंपन्यांमध्ये प्रवाशांच्या वाहतुकीच्या संबंधात, एक त्रिपक्षीय भागीदारीचा करार एप्रिल १९६० मध्ये करण्यात आला असून, त्यायोगे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीच्या तीव्र स्पर्धेला यशस्वीपणे तोंड देणे एअर इंडियास शक्य झाले आहे. या तिन्ही कंपन्यांनी मलेशियन एअरवेज व एअर न्यूझीलंड या दोन विमान-कंपन्यांशी सिंगापूरृजाकार्ता व ऑस्ट्रेलिया या मार्गांवरील हवाई वाहतुकीबाबत भागीदारीचे करार केले आहेत. याखेरीज एअर इंडियाने एरोफ्लोट (सोव्हिएट एअरलाइन्स), सी. एस्. ए. (चेकोस्लोव्हाक एअरलाइन्स), मिडल ईस्ट एअरलाइन्स, जपान, एअरलाइन्स, ईस्ट आफ्रिकन एअरवेज आणि एडन एअरवेज या हवाई कंपन्यांशी प्रवासी वाहतुकीच्या संबंधात करार केले आहेत.
सध्या एअर इंडियाजवळ तेरा बोईंग जेट विमानांचा ताफा आहे. ३४६ प्रवासी बसू शकतील आणि दर ताशी ९६० किमी. वेग असलेली ‘सम्राट अशोक’ व ‘सम्राट शहाजहान’ नामक दोन जंबो जेट विमाने वाहतुकीसाठी एप्रिल १९७१ मध्ये आणण्यात आली १९७२ अखेर आणखी दोन जंबो जेट विमाने (‘सम्राट अकबर’ आणि’सम्राट राजेंद्र चोला’) एअर इंडियाला उपलब्ध झाली. यासाठी निर्यात-आयात बँक व अमेरिकेतील व्यापारी बँक यांच्याकडून एअर इंडियाने ९० कोटी रुपयांची कर्जे घेतली असून सात वर्षांत कर्जांची परतफेड करावयाची आहे. प्रत्येक विमानाची किंमत १९ कोटी रुपये आहे.
एअर इंडियाने १९६९-७० मध्ये ४,०२,६०९ प्रवाशांची ने-आण केली त्याच वर्षी मालवाहतुकीपासूनचे महसुली उत्पन्न रु. ११·३९ कोटी झाले परिचालन महसूल रु. ६६·१४ कोटी होता निगमाला कर आणि व्याजपूर्व नफा रु. ३.९६ कोटी मिळाला. १९६९ च्या मार्च अखेरीस एअर इंडियाकडे ८,८२१ नोकरवर्ग होता. त्याचप्रमाणे एअर इंडियाची १९७२ अखेर ३५ मुख्य केंद्रे व ९३ उपकेंद्रे अशी एकूण ११८ विक्रीकेंद्रे पाच खंडांत कार्य करीत होती. १९७०-७१ मधील एअर इंडियाचा निव्वळ परिचालन नफा रु. ४·५८ कोटी झाला. मॅजिक कार्पेट ह्या नावाचे एक पाक्षिक एअर इंडिया प्रसिद्ध करते. जगभरच्या सर्व विमान-कंपन्यांना वाढचे परिव्यय व उतरत्या मिळकती ह्या समस्यांना तोंड द्यावे लागत असूनही, एअर इंडियास १९६९-७० मध्ये परिचालन महसुलात (एकूण रु. ६६·१४ कोटी) रु. ६·६४ कोटींनी वाढ करता आली, हे एक वैशिष्ट्यच मानले पाहिजे याचे कारण असे की, एअर इंडियाने आपल्याजवळच्या दहाही विमानांचा कमाल उपयोग (प्रतिदिनी १०·९० तास) करून घेतला. १९७१-७२ साली एअर इंडियाचा परिचालन महसूल रु. ७८·५६ कोटी, परिचालन खर्च रु. ७७·७८ कोटी व परिचालन नफा रु. ७८ लक्ष होता.
एअर इंडियाने १९७१ मध्ये स्वतःच्या संपूर्ण मालकीच्या दोन कंपन्या स्थापन केल्या. ‘एअर इंडिया चार्टर्स लिमिटेड’ ही पहिली सनदी कंपनी आठवड्यातून तीनदा भारत-इंग्लंड व भारत यूरोप या मार्गांवर हवाई वाहतूक करते. ‘हॉटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ ह्या दुसऱ्या कंपनीतर्फे मुंबई येथे दोन सेंटॉर हॉटेलांचे बांधकाम चालू आहे.
पहा : भारतीय हवाईमार्ग निगम.
“