ऋणत्रय : जन्माला आलेल्या मानवावर तीन ऋणे म्हणजे तीन कर्जे असतात. त्यांना ‘ऋणत्रय’ म्हणतात. तीन ऋणे फेडणे म्हणजे त्यांचे ‘अपाकरण’. ऋषिऋण, देवऋण व पितृऋण ही ती तीन ऋणे होत. चार आश्रमांपैकी ब्रह्मचर्य व गृहस्थ या पहिल्या दोन आश्रमांमध्येच ही तीन ऋणे फेडायची असतात.
ऋषींनी केलेले वेद हे पहिले ऋषींचे ऋण. वेदांच्या अध्ययनाने त्याची फेड होते. देवांनी सृष्टी उत्पन्न केली व ती सृष्टी चालविली आहे हे दुसरे देवांचे ऋण. यज्ञ करण्याने त्याची फेड होते. ही दोन ऋणे समाजरक्षणाची अंगे आहेत. पितरांनी म्हणजे पूर्वजांनी टिकविलेली वंशपरंपरा एका पिढीने पुढे नेण्याची जबाबदारी हे पितृऋण. त्याची फेड पुत्रोत्पादनाने होते. हे ऋणत्रय फेडल्यानंतरच वानप्रस्थ व संन्यास घेणे योग्य होय, असे मन्वादी स्मृतिकार म्हणतात.