ऊझ : (सिंधुजैवपंक). महासागरांच्या, भूखंडांपासून दूर असलेल्या भागातील तळाशी साचलेल्या सूक्ष्म कणी गाळाला (चिखलाला) ऊझ म्हणतात. ऊझे ही मुख्यतः महासागराच्या पाण्याच्या उथळ भागात राहणारे सूक्ष्मजीव मेल्यावर त्यांची कॅल्शियमी व सिलिकामय कवचे महासागरांच्या तळांशी साचत राहून तयार झालेली असतात. अजैव खनिजांचे थोडेसचे कण ऊझात असतात. कॅल्शियमी व सिलिकामय अशा दोन्ही प्रकारची कवचे पाण्यात बुडून खाली जात असतात, त्यांपैकी पहिली अधिक विद्राव्य (विरघळणारी) असतात. सु. ३,६०० मी. खोल जाईपर्यंत बहुतेक कॅल्शियमी कवचे पाण्यात विरघळून जातात. सिलिकामय कवचे अधिक खोल जातात पण सु. ५,३०० मी. खोलीस तीही विरघळून जातात.

ऊझांपैकी मुख्य म्हणजे ग्‍लॉबिजेरिना ऊझ होय. ते ग्‍लॉबिजेरिना नावाच्या सूक्ष्म प्राण्याच्या कवचाचे बनलेले असते. ते पॅसिफिक, हिंदी व अटलांटिक महासागरांच्या तळांवर सु. २,५०० ते ३,६०० मी. खोलीवर आढळते. त्या सर्वांचे मिळून एकूण क्षेत्र पावणे तेरा कोटी चौ. किमी. आहे. रॅडिओलॅरियन ऊझ हे रॅडिओलॅरिया नावाच्या सूक्ष्म प्राण्यांच्या सिलिकामय कवचांचे बनलेले असते. हिंदी व पॅसिफिक या महासागारांतील खोल तळांवर (५,३०० मी.) ते आढळते. एकूण क्षेत्र साठ लक्ष चौ. किमी. आहे. डायाटम ऊझ हे मुख्यतः डायाटम नावाच्या सूक्ष्म वनस्पतींच्या सिलिकामय कवचांचे बनलेले असते. शीत कटिबंधातील महासागरात विशेषतः अंटार्क्टिक महासागरात, सु. ३,९०० मी. खोलीवर ते आढळते. याव्यतिरिक्त अटलांटिक महासागराच्या उष्णकटिबंधातील १,४०० ते २,७०० मी. खोलीपर्यंतच्या भागात टेरोपॉड नावाच्या प्राण्यांच्या कॅल्शियमी कवचांपासून बनलेले ऊझ आढळते.

पहा : महासागरविज्ञान.

ठाकूर, अ. ना.