एटव्हॅश, रोलँड बॅरन फोन : (२७ जुलै १८४८ – ८ एप्रिल १९१९). हंगेरियन भौतिकीविज्ञ. गुरुत्वाकर्षण व भूचुंबकत्वासंबंधी विशेष अभ्यास. त्यांचा जन्म बूडापेस्ट येथे झाला. बूडापेस्ट व हायड्लबर्ग येथे शिक्षण घेतल्यानंतर १८७२ मध्ये त्यांची बूडापेस्ट विद्यापीठात भौतिकीच्या प्राध्यापकपदावर नेमणूक झाली. पुढील वर्षीच ते हंगेरियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य व पुढे १८८९ मध्ये अध्यक्ष झाले. १८९४ – ९५ मध्ये ते शिक्षणमंत्री होते.

त्यांनी १८८५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या केषाकर्षणासंबंधीच्या (अत्यंत बारीक नलिकेत किंवा तंतूत द्रव चढण्याच्या क्रियेसंबंधीच्या) प्रबंधात पृष्ठताणातील (द्रव पदार्थाच्या पृष्ठभागावरील ताणातील) तपमानानुसार होणाऱ्या बदलासंबंधीचा नियम दिलेला आहे. १८९० नंतर त्यांनी गुरुत्वाकर्षण व भूचुंबकत्वाचा विशेष अभ्यास केला. गुरुत्वाकर्षणातील बदल अचूकपणे व तत्परतेने मोजण्यासाठी त्यांनी द्विभुज परिपीडन (पीळ पाडणारी) तुला (एटव्हॅश तुला) तयार केली. जमिनीखालील खनिजे शोधण्यासाठी ही तुला एक अत्यावश्यक उपकरण झालेली आहे. वस्तूंचे एकमेकींमधील आकर्षण हे त्यांतील पदार्थांच्या गुणधर्मांवर अवलंबून नसते असे त्यांनी १९०९ मध्ये एका प्रबंधाद्वारे दाखविले व त्याकरिता त्यांना गॉटिंगेन विद्यापीठाचे ‘बेनेक पारितोषिक’  मिळाले. पृथ्वीवरील गतिशील वस्तूंच्या गुरुत्वाकर्षणातील बदलांचाही त्यांनी अभ्यास केला होता. ते बूडापेस्ट येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.