एटव्हॅश, योझेफ : (१३ सप्टेंबर १८१३ – २ फेब्रुवारी १८७१). हंगेरियन लेखक व मुत्सद्दी. बूडा येथे जन्म. त्याचे शिक्षण खाजगी रीत्या झाले आणि तत्त्वज्ञान व कायदा या विषयांचा अभ्यासक्रम त्याने बूडापेस्ट येथील विद्यापीठात पूर्ण केला (१८३१). विद्यार्थीदशेतच तो यशस्वी कादंबरीकार म्हणून मान्यता पावला होता. शिक्षण संपल्यावर त्याने यूरोपभर प्रवास केला. १८३६ – ३७ या काळात त्याने इंग्लंड व फ्रान्स येथील सामाजिक स्थितीचा अभ्यास केला व त्यामुळे उदार लोकहितवाद व यूरोपीय समाजवाद या विचारसरणींनी तो भारला गेला. १८३८ पर्यंत काही किरकोळ स्वरूपाच्या सरकारी नोकऱ्या केल्यानंतर त्याने स्वत:ला सर्वस्वी वाङ्मय व राजकारण या विषयांना वाहून घेतले. या काळात त्याने काही स्वच्छंदतावादी ऐतिहासिक कांदबर्या लिहिल्या असल्या, तरी त्यांतून तत्कालीन वस्तुस्थितीचे विशेष सूचन झालेले आहे. Karthausi (१८३९–४१), A falu jegyzoje (१८४५, इं. भा. द व्हिलेज नोटरी, १८५०) आणि Magyarorszag 1514-ben (तीन खंड, १८४७) या त्याच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. १८४८ मध्ये तो शिक्षणमंत्री झाला पण त्याच वर्षी त्याने ते पद सोडले व तो म्यूनिकला गेला. या दरम्यान त्याने द इन्फ्लूअन्स ऑफ द रूलिंग आयडियाज ऑफ द नाइन्टींथ सेंचूरी ऑन द स्टेट (दोन खंड, १८५१–५४) ह्या इंग्रजी शीर्षकार्थाचा राजकारणावरील महत्त्वपूर्ण विवेचक ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यात लोकसत्ताक शासनाच्या मूलभूत तत्त्वांची चर्चा आहे. १८५१च्या सुमारास तो हंगेरीस परतला. हंगेरियन अकादमीचा तो प्रथम उपाध्यक्ष (१८५६) व मागाहून अध्यक्ष (१८६६) झाला. १८६७ मध्ये तो पुन्हा शिक्षणमंत्री झाला. तेव्हापासून अखेरपर्यंत राष्ट्रीय शिक्षणपद्धतीत उदारमतवाद व आधुनिकता आणण्यासाठी तो सतत प्रयत्नशील होता. शिक्षणाविषयीच्या आपल्या कल्पना त्याने Noverek (१८५७, इं. शी. द सिस्टर्स) या कादंबरीत प्रगट केल्या आहेत. तुरुंगांच्या सुधारणा घडवून आणण्यासाठीही त्याने प्रयत्न केले. त्याच्या सर्वच साहित्यात त्याच्या सामाजिक व राजकीय विचारांचे प्रतिबिंब उमटले आहे. त्याच्या कवितांत भावनाविवशता व स्वच्छंदता यांचा प्रत्यय येतो. त्याच्या कथांनी हंगेरियन साहित्यात शेतकर्याची नवी प्रतिमा निर्माण केली. स्वच्छंदतावादी कादंबऱ्यांची चलती असताना त्याने वास्तववादाचा पुरस्कार केला. आधुनिक हंगेरियन वाङ्मयात त्याचे स्थान मोठे आहे. बूडापेस्ट येथे त्याचे निधन झाले.
इनामदार, श्री. दे.