उवएसमाला : जैन महाराष्ट्रीतील एक धार्मिक ग्रंथ. या ग्रंथाच्या कर्त्याचे नाव धर्मदासगणी. परंपरा त्याला महावीराचा समकालीन मानते. तथापि हे असंभवनीय दिसते कारण उवएसमालेची भाषा उत्तरकालीन वाटते. धर्मदासगणी इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकात होऊन गेला असावा. या ग्रंथाचे ४ विश्राम (भाग) असून एकूण गाथा ५४४ आहेत. दृष्टांतादाखल ब्रह्मदत्त, जंबूस्वामी, कालकाचार्य, गोशाल, श्रेणिक, जमाली, चाणक्य इ. पौराणिक व ऐतिहासिक पुरुषांच्या कथा सांगून या ग्रंथात वैराग्याचा उपदेश केला आहे. कथांमध्ये जागोजाग उपदेशपर सुभाषिते आहेत. या ग्रंथावर जयसिंह, सिद्धर्षी, रामविजय आणि रत्नप्रभसूरी यांनी टीका लिहिल्या आहेत. प्रस्तुत ग्रंथाने प्रभावित होऊन त्याच्या धर्तीवर अनेक कथाग्रंथ लिहिले गेले. उदा., मलधारी हेमचंद्रकृत उपदेशमाला, जयकीर्तिकृत सीलोवएसमाला (शीलोपदेशमाला) इत्यादी.
तगारे. ग. वा.