उल्का व अशनि : अवकाशात असंख्य लहान घन पदार्थ फिरत असतात. बहुधा ते धूमकेतूंचे अविशिष्ट तुकडे असतात. त्यांना उल्काभ (मिटिअरॉइड) म्हणतात. जेव्हा उल्काभ पृथ्वीकडे आकर्षिला जातो तेव्हा पृथ्वीच्या वातावरणातून जाताना त्याचे हवेशी घर्षण होऊन तो तापतो व काही क्षण आकाशात एक चमकती रेखा उमटवीत काही मार्ग आक्रमून दिसेनासा होतो. या आविष्काराला उल्का (मिटिअर) पडणे असे म्हणतात. त्यालाच ‘तारा तुटणे’ असेही म्हणतात. उल्का बहुधा वातावरणातच जळून नष्ट होतात. परंतु क्वचित उल्काभ पूर्णतया जळून जाण्यापूर्वीच पृथ्वीवर पडतो. अशा बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येऊन पोहोचलेल्या पृथ्वीबाहेरच्या पदार्थाला अशनी (मिटिअराइट) म्हणतात. उल्काभांची प्रत्यक्ष माहिती अल्प प्रमाणातच मिळू शकते. परंतु उल्का व अशनी यांच्या अभ्यासावरून उल्काभांसंबंधी अप्रत्यक्ष माहिती मिळविता येते. म्हणून या नोंदीमध्ये उल्का व अशनी यांसंबंधीची विस्तृत माहिती पुढे दिलेली असून तीमध्येच उल्काभांसंबंधीच्या अप्रत्यक्ष माहितीचा समावेश केलेला आहे. उल्कांसंबंधीची माहिती ज्योतिषशास्त्र, उच्चवातावरणविज्ञान व रेडिओ संदेशवहन यांच्या दृष्टीने उपयुक्त असते, तर अशनींसंबंधीची माहिती भूविज्ञान व भौतिक रसायनशास्त्र यांच्या दृष्टीने महत्त्वाची असते.

उल्का

एकटी तेजस्वी उल्का पडल्याचे किंवा उल्कावृष्टी झाल्याचे उल्लेख ग्रंथांमधून आढळतात. मात्र उल्का किंवा अशनी हे पृथ्वीबाहेरून येत असावेत हे एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यत मान्य नव्हते. १८३३ साली झालेल्या लिओनीड (सिंह राशीत उद्‌गम असणाऱ्या) उल्कावृष्टीमुळे अध्ययनाला चालना मिळाली.

भिन्न भिन्न आकारमानांचे व द्रव्यमानांचे (वस्तुमानांचे) उल्काभ आंतरग्रहीय अवकाशात फिरत असतात. ते प़ृथ्वीच्या वातावरणात येईपर्यंत दिसत नाहीत. परंतु उल्काभ उच्च वातावरणात शिरला म्हणजे त्याच्या गतिज ऊर्जेचे उष्णता, प्रकाश व आयनीभवन (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट निर्माण होणे) या स्वरूपांमध्ये रूपांतर होऊन तो तापून नंतर चमकू लागतो. उल्काभाच्या आकारमानावर उल्केच्या प्रकाशाची तीव्रता अवलंबून असते. काही उल्काभ इतके सूक्ष्म असतात की, त्यांच्यामुळे उल्का हा आविष्कार दिसत नाही. बहुतेक उल्काभ मोहरीपासून वाळूच्या कणापर्यंतच्या आकारमानाचे असतात. त्यांच्यामुळे आकाशात कोठेतरी आगकाडी ओढल्याप्रमाणे एकदम क्षणभर प्रकाशाचा ठिपका दिसतो. असे उल्काभ वातावरणात जळून जातात. त्यांच्यामागे तेजोरेषा दिसत नाही. बहुधा त्यांची भासमान प्रत [पृथ्वीवरील निरीक्षकाला दिसणारी तेजस्वीपणाची प्रत,→ प्रत] एकापेक्षा कमी असते. अशा उल्कांना ‘तुटलेले तारे’ म्हणतात. त्यांचे पुढील टोक जरी ताऱ्यासारखे दिसत असले तरी प्रत्यक्षात ते तारे नसतात. काही उल्काभ यापेक्षा मोठे किंवा अधिक द्रव्यमानाचे असतात. त्यांच्या उल्का तेजस्वी ग्रहांसारख्या व कधीकधी पूर्णचंद्राएवढ्या तेजस्वी दिसतात. सामान्यत: त्यांची प्रत गुरूच्या प्रतीपेक्षा अधिक असते. त्यांच्यापैकी काहींचा प्रकाशही पडतो. त्यांच्यामुळे निर्माण होणारी तेजोरेषा काही मिनिटांपर्यंत व कधीकधी एक तासापर्यंतही दिसते. अशा उल्कांना अग्‍निगोल म्हणतात. ते विविधरंगीही असू शकतात. ते बऱ्याच दूरवरून व पुष्कळ काळ दिसू शकतात. ते भूपृष्ठाजवळून जाताना हवेत तरंग निर्माण होऊन मोठा आवाजही होतो. ९ फेब्रुवारी १९१३ रोजी कॅनडात सु. ५५ किमी. उंचीवर ५०–६० अग्‍निगोल गटागटांनी जाताना दिसले, ढगांच्या गडगडाटासारखा आवाज आला व काही घरेही हादरली. काही अग्‍निगोल त्यांच्या मार्गाच्या शेवटच्या टप्प्यात स्फोट पावून फुटतात. फुटताना मोठा आवाज होतो व आघात-तरंगही (हवेचा दाब व घनता यांत आकस्मिक बदल होऊन वेगाने जाणारे तरंगही) निर्माण होतात. सामान्यत: त्यांचे तुकडे अशनीच्या रूपात पृथ्वीवर पडतात. अशा अग्‍निगोलांना बोलाइड म्हणतात.)

तेजोरेषा : बहुतेक मोठ्या किंवा उच्च वेगाने येणाऱ्या उल्कांच्या मार्गात अल्पकाळ दिसणारी प्रकाशाची रेषा मागे राहते, तिला तेजोरेषा म्हणतात. अगदी प्रथम उल्का प्रकाशाच्या ठिपक्यासारखी दिसते. नंतर तिच्यामागे प्रकाशाचा अगदी आखूड पट्टा दिसतो व शेवटी तिच्या मार्गावर प्रकाशाची रेखा दिसते. उष्णतेने उल्काभाचे पृष्ठ वितळते व त्यातून चकाकणारे कण बाहेर पडतात. त्यांच्यामुळे प्रथम चमकणारा आखूड पट्टा व नंतर तेजोरेषा निर्माण होते. तेजोरेषा उल्का दिसेनाशी झाल्यावरही काही सेकंदांपासून क्वचित काही मिनिटांपर्यत दिसत राहते. बहुसंख्य तेजोरेषा अंधुक व अल्पकालीन असतात. त्या सामान्यत: पृथ्वीच्या पृष्ठापासून ७० ते १३० किमी. उंचीपर्यंतच्या पट्‌ट्यात दिसतात. तेजस्वी अग्‍निगोलांच्या तेजोरेषा ठळक असतात. अपवादात्मक बाबतीत त्या तासापेक्षाही अधिक काळ दिसत राहतात. त्या विविधरंगी असतात. तेजोरेषेच्या रंगाचा अग्‍निगोलच्या रासायनिक संघटनाशी संबंध असणे संभवनीय आहे. अग्‍निगोलांच्या तेजोरेषांत धूर व धूळ यांचे ढगही असतात. ते संध्याकाळी चांगले दिसू शकतात. काही तेजोरेषा दिवसा दिसू शकतात. वातावरणातील वरच्या थरांमधील वाऱ्यामुळे काही तेजोरेषा हालताना, तर काही नागमोडी झालेल्या दिसतात. तेजोरेषांच्या निरिक्षणांवरून या वरच्या थरांतील वाऱ्यासंबंधीची (वेग, दिशा इ.) माहिती मिळू शकते. उल्कांची उंची व वेग ठरविण्यासाठी तेजोरेषांच्या निरिक्षणाचा उपयोग होतो.

उल्कावृष्टी : असंख्य उल्काभ सूर्याभोवती निरनिराळ्या कक्षांमध्ये व वेगवेगळ्या गतींनी फिरत असतात. त्यांच्यापैकी पुष्कळ उल्काभ गटागटांनी एकत्र फिरत असतात. अशा गटाला उल्कासमूह

उल्काप्रवाहातील उल्काभांच्या वाटणीची प्रतिकृती : (१) सूर्य, (२) पृथ्वीची कक्षा, (३) उल्का प्रवाह.

 म्हणतात. असे अदमासे पाचशे समूह माहीत आहेत. उल्कासमूहातील उल्काभ माळेतील मण्यांप्रमाणे बऱ्याच प्रमाणात कक्षाभर पसरलेले असतील तर त्यांना उल्काप्रवाह म्हणतात (पहा आकृती). जेव्हा अशा उल्काप्रवाहाची कक्षा पृथ्वीच्या कक्षेने छेदली जाते व त्या छेदनबिंदुजवळ पृथ्वी असते तेव्हा पृथ्वीवर पुष्कळ उल्का पडताना दिसतात. या आविष्काराला उल्कावृष्टी म्हणतात. उल्कासमूह किंवा उल्काप्रवाह यांपैकी नसलेल्या उल्कांना एकांड्या उल्का म्हणतात. ह्या नियमितपणे दिसत नाहीत. उलट उल्कावृष्टी नियतकालिक असतात. काही उल्कावृष्टी दरवर्षी, काही दोन वर्षातून तर काही ठराविक वर्षानी एकदा दिसतात. उल्कावृष्टी किती प्रमाणात व किती काळ होईल हे उल्काभांच्या दाटीवरून व उल्काप्रवाहाच्या रुंदीवरून व उल्काप्रवाहाच्या रुंदीवरून ठरते. उल्काप्रवाहाचा दाट भाग छेदला गेल्यास पुष्कळ उल्का पडताना दिसतात. उलट विरळ भागातून पृथ्वी गेल्यास त्यामानाने कमी उल्का पडतात. एका वृष्टीतील उल्कांची गती जवळजवळ सारखी असते. व त्या आकाशातील एका बिंदुमधून आल्यासारख्या दिसतात. त्या बिंदुला उल्काउद्‌गमबिंदु म्हणतात. हा बिंदू ज्या तारकासमूहात असतो म्हणजेच उल्का ज्या तारकासमूहातून आल्यासारख्या वाटतात, त्या तारकासमूहाचे नाव उल्कावृष्टीला देतात. उदा., लिओनीड किंवा सिंहवृष्टी. जर एकाच तारकासमूहात असे दोन बिंदू येत असतील, तर त्या बिंदूला सर्वात जवळ असणाऱ्या ताऱ्याचे चिन्ह उल्कावृष्टीच्या नावाआधी लावतात. उदा., ईटा-ॲक्वॅरीड. म्हणजे या उल्कावृष्टीचा उद्‌गमबिंदू ईटा-ॲक्वॅरीड या ताऱ्याजवळ आहे. काही उल्काप्रवाह सूर्याच्या दिशेकडून पृथ्वीकडे येत असतात. त्यांच्यामुळे उल्कावृष्टी दिवसा होते आणि रेडिओ तंत्राच्या (रेडिओ तरंगांचा उपयोग करणाऱ्या तंत्राच्या) साहाय्याने तिचे वेधही घेता येतात. ती रात्री दिसत नाही. अशा वृष्टीला दिन-उल्कावृष्टी म्हणतात. कोष्टक क्र. १ मध्ये निरनिराळ्या उल्कावृष्टींची नावे, त्यांची उद्‌गम स्थाने व त्या केव्हा होतात हे दिलेले आहे. कोष्टकात दिलेल्या तारखांना दाट उल्कावृष्टी होते. मात्र त्यांच्या आगेमागे काही दिवस उल्का पडताना दिसतात, परंतु त्यांचे प्रमाण कमी असते.


इ. स. १८३३ मध्ये झालेली लिओनीडवृष्टी रात्रभर दिसली. सु.दोन लाख उल्का पडल्या असाव्यात. बहुतेक उल्का तेजस्वी होत्या, पण अशनी पडला नाही. भाकीत केल्याप्रमाणे ही उल्कावृष्टी पुन्हा १८६६ साली झाली. तिच्या अभ्यासावरून ग्रहांप्रमाणेच उल्कासमूहही सूर्याभोवती विवृत्ताकार (लंबवर्तुळाकार) कक्षेत फिरत असतात असे दिसून आले. त्याच सुमारास जोव्हान्नी स्क्यापारेल्ली या इटालियन ज्योतिषशास्त्रज्ञांनी उल्कासमूह पूर्वी वेध घेतलेल्या धूमकेतूच्या कक्षेत फिरत असावा असे प्रतिपादन केले. १८७२ साली पृथ्वी बीला धूमकेतूच्या कक्षेतून जाताना उल्कावृष्टी झाल्याने त्यांच्या म्हणण्यास दुजोरा मिळाला. तेव्हापासूनच उल्कावृष्टी व धूमकेतू यांच्यात संबंंध असावा हा विचार पुढे आला.

कोष्टक क्र. १. निरनिराळ्या उल्कावृष्टी व त्यांची उद्गम स्थाने 

उल्कावृष्टीचे नाव 

उद्गम स्थान 

वृष्टीचा दिनांक 

काड्रँटीड 

उत्तर मुकुटाच्या उत्तरेला 

३ जानेवारी 

कोमा बेर्निसीड 

अरुंधती केश 

१७ जानेवारी 

व्हर्जिनीड 

कन्या 

१३ मार्च 

लिरीड 

वीणा 

२१ एप्रिल 

ईटा-ॲक्वॅरीड 

कुंभ (ईटा तारा) 

४ मे 

डेल्टा-ॲक्वॅरीड 

कुंभ (डेल्टा तारा) 

३० जुलै 

आल्फा कॅप्रिकॉर्नीड 

मकर (आल्फा तारा) 

१ ऑगस्ट 

पर्सीड 

ययाती 

१२ ऑगस्ट 

ड्रॅकोनीड (किंवा गियाकोबिनीड) 

कालिय 

१० ऑक्टोबर 

ओरिऑनीड 

मृग 

२२ ऑक्टोबर 

लिओ मायनॉरीड 

लघुसिंह 

२४ ऑक्टोबर 

टॉरीड (उत्तर) 

वृषभ (उत्तर) 

१ नोव्हेंबर 

म्यू-पेगॅसीड 

उच्चैःश्रवा (म्यू तारा) 

११ नोव्हेंबर 

टॉरीड (दक्षिण) 

वृषभ (दक्षिण) 

१६ नोव्हेंबर 

लिओनीड 

सिंह 

१७ नोव्हेंबर 

अँड्रोमेडीड (किंवा बिलीड) 

देवयानी 

२३ नोव्हेंबर 

जेमिनीड 

मिथुन 

१४ डिसेंबर 

उर्सीड 

सप्तर्षी 

२२ डिसेंबर 

दिन-उल्कावृष्टी 

   

ओमिक्रॉन सेटीड 

तिमिंगल 

१९ मे 

एरिटीड 

मेष 

८ जून 

झीटा-पर्सीड 

ययाती (झीटा तारा) 

९ जून 

बीटा-टॉरीड

वृषभ (बीटा तारा)

३० जून

मोठ्या ग्रहांमुळे उल्कासमूहाची कक्षा बदलून उल्कावृष्टीवर परिणाम होऊ शकतो. कारण समूहातील कणांचे एकमेकांतील आकर्षण इतके कमी असते की, ग्रहाजवळ जाताच ते खेचले जाऊन समूह विरळ होतो. लिओनीडवृष्टीवर असा परिणाम झालेला दिसतो. १८३३ नंतर १८६६ साली लिओनीडवृष्टीच्या उल्का पडल्या. परंतु १८९९, १९०१, १९३१ या साली ती अधिकाधिक विरळ होत गेल्याचे दिसून आले.

उल्काउद्‍गमबिंदू : उल्कावृष्टीच्या वेळी चाकाच्या तुंब्यातून त्याच्या आऱ्यांच्या दिशांनी बाहेर पडाव्यात तशा, उल्का आकाशातील एका बिंदूमधून अपसारित होऊन आलेल्या (निघालेल्या) दिसतात. एका वृष्टीकरिता हा बिंदू ठराविकच असतो. या बिंदुला उल्काउद्‌गमबिंदू म्हणतात. खरे म्हणजे तो बिंदू नसून एक लहानसे क्षेत्रच असते. एका उल्कावृष्टीतील उल्कांचे पथ भगोलावर (निरिक्षक हा मध्य असलेल्या व अनिश्चित त्रिज्या असलेल्या काल्पनिक गोलावर) काढून मागे वाढविल्यास बहुतेक सर्व या क्षेत्रात मिळताना दिसतील. उल्कांची अशी अरीय मांडणी केवळ भासमयच असते. प्रत्यक्षात उल्का समांतर मार्गांनीच येत असतात. उल्का कोणत्या दिशेने येतील, हे या बिंदूच्या आकाशातील स्थानावरून ठरत असते व याच्या स्थानावरूनच उल्कावृष्टीला नाव देतात. ते स्थान निश्चित करण्यासाठी छायाचित्रण व रेडिओ पद्धती वापरतात. छायाचित्रण पद्धती रेडिओ पद्धतीमध्ये दहापट अचूक आहे. छायाचित्रण पद्धतीने स्थान निश्चितीमध्ये चापाच्या ०·१° इतकीही चूक होत नाही. एकाच उल्कावृष्टीच्या उद्‍गमबिंदूचे दूरदूरच्या केंद्रांवरून दिसलेले स्थान एकच आढळून आल्यामुळे उल्का बाह्य अवकाशातून येतात, वातावरणात निर्माण होत नाहीत, हे सिद्ध करता आले व तेव्हापासूनच उल्कांचे शास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक निश्चित शाखा झाली. पर्सीडवृष्टीचा उद्‌गमबिंदू विषुवांश ४६° , क्रांती + ५८° व जेमिनीडवृष्टीचा विषुवांश ११३°, क्रांति + ३२° या जागी असतो [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति].

संख्या : ठराविक काळात किती उल्का दिसतील हे सांगणे कठीण आहे. कारण किती उल्का दिसू शकतील हे ऋतू, रात्रीचा कालखंड व आकाशाची पारदर्शकता यांच्यावर अवलंबून असते. निरभ्र आकाशात अधिक उल्का दिसण्याची शक्यता असते. पूर्वरात्रीपेक्षा उत्तर-रात्री ३ ते ५ पट उल्का दिसतात. कारण उत्तररात्री निरीक्षकाला पुढून व मागून येणाऱ्या उल्का दिसतात, तर पूर्वरात्री फक्त मागून येणाऱ्याच दिसतात. तसेच वर्षाच्या जानेवारी-जुलै या पूर्वार्धापेक्षा जुलै-डिसेंबर या उत्तरार्धात दिसणाऱ्या उल्कांची संख्या दुप्पट असते. या दोन्हींचे मुख्य कारण पृथ्वीच्या अक्षीय व कक्षीय गती होत. उल्केचा तिच्या कक्षेतील सूर्यकेंद्रीय वेग व पृथ्वीचा वेग यांची सदिश बेरीज (परिणाम व दिशा असलेल्या राशींची म्हणजे सदिशांची बेरीज करण्याच्या नियमानुसार बेरीज) केली असता उल्केचा भूकेंद्रीय वेग मिळतो. उल्का अधिक वेगाने येत असल्यास दर तासाला येणाऱ्या उल्कांची संख्याही वाढेल. वर्षाच्या उत्तरार्धात उल्कावृष्टीमुळेही उल्कांच्या संख्येत वाढ होत असते. वेगवेगळ्या दिशांनी येणाऱ्या उल्कांच्या संख्येतही भिन्नता असते. पूर्वेकडून ५० टक्कयांपेक्षा अधिक उल्का येतात. उत्तरेकडून, दक्षिणेकडून किंवा पश्चिमेकडून येणाऱ्या उल्कांची संख्या मात्र जवळजवळ सारखी असते.

उल्कावृष्टी नसताना कोणत्याही निरिक्षण केंद्रापासून निव्वळ डोळ्यांनी दर तासाला सामान्यत: २५ उल्का पाहणे शक्य असते. एकाच निरीक्षकाला संपूर्ण आकाशावर दृष्टी ठेवून त्या सर्व हेरणे शक्य नसते. तथापि, सामान्यत: एका निरीक्षकाला दर तासाला ५–१० किंवा सरासरीने ८ उल्का दिसू शकतात. सर्व पृथ्वीवर दिवसाला २·४ कोटी दृश्य उल्का पडतात. यांशिवाय डोळ्यांनी न दिसणाऱ्या कोट्यावधी उल्का पडतच असतात. काहींच्या मते रोज २० कोटी दृश्य उल्का पडत असाव्यात व दहा हजार अब्ज कण पृथ्वीच्या वातावरणात शिरत असावेत. बहुसंख्य कण धुळीच्या रूपातच वातावरणातून हळूहळू खाली येत असतात. एका दिवसात येणाऱ्या अशा सूक्ष्म अशनींचे वजन १,००० टनांपेक्षाही अधिक होत असावे, असाही अंदाज आहे. इतर ग्रह व सूर्य यांच्यावरही असे सूक्ष्मकण मोठ्या प्रमाणात पडत असावेत. हे सर्व कण पृथ्वीच्या पृष्ठभागावर सारख्याच प्रमाणात विखुरले तर प्रतिवर्षी पृथ्वीचे वजन प्रत्येक चौ. किमी. ला ०·७ ते ७ किलोग्रॅमने वाढावयास हवे.


उंची : उल्का किती उंचीवर दिसू लागेल व ती किती उंचीवर लुप्त होईल हे उल्काभाच्या आकारमानावर व त्याच्या वेगावर अवलंबून असते. सामान्यत: जमिनीपासून ७० ते १३० किमी. उंचीवरच्या वातावरणीय पट्ट्यात उल्का दिसतात. अपवाद म्हणून काही या मर्यादांच्या खाली किंवा वर दिसतात. १६० किमी. उंचीच्या वर मात्र बहुधा उल्का दिसत नाही. सर्वसामान्य उल्का ९० किमी. उंचीवरच लुप्त होते. उल्केचा भूकेंद्रीय वेग अधिक असल्यास ती अधिक उंचीवर प्रथम दिसते. सेकंदाला ७२ किमी. वेगाने येणारी उल्का १०४ किमी. उंचीवर, तर सेकंदाला २४ किमी. वेगाने येणारी उल्का ८८ किमी. उंचीवर सर्वांत अधिक तेजस्वी दिसेल. मोठ्या उल्का अधिक तेजस्वी असतात व बऱ्याच खालपर्यंत दिसतात. अंधुक उल्का अधिक उंचीवरच लुप्त होतात पण अग्‍निगोल ३० किमी. उंचीपर्यत दिसू शकतात. उल्कांची उंची छायाचित्रण व रेडिओ निरीक्षणांद्वारे ठरविता येते.

वेग : उल्काभ सूर्याभोवती भिन्नभिन्न गतींनी व वेगवेगळ्या कक्षांत फिरत असतात. ते पृथ्वीच्या गतीच्याच दिशेने आल्यास म्हणजेच उल्केच्या व पृथ्वीच्या गतीची दिशा एकच असल्यास उल्केची गती कमी भासते. सैद्धांतिक दृष्ट्या कणाचा वेग ११ ते ७२ किमी. से. या दरम्यान असला तरच उल्का हा आविष्कार दिसतो. तेजस्वी अग्‍निगोलापासून ८ प्रतीपर्यंतच्या सर्व प्रकारच्या उल्कांचे छायाचित्रण व रेडिओ तंत्रांद्वारे काढलेले सर्व वेगही याच मर्यादांच्या दरम्यान असल्याचे आढळून आले आहे. ७२ किमी. से. यापेक्षाही अधिक वेगाच्या काही उल्का असतात. परंतु त्यांची संख्या खूप कमी म्हणजे एक टक्क्याहूनही कमी आहे. निरीक्षणाने काढलेला वेग उल्केच्या खऱ्या वेगापेक्षा किंचित कमी असतो कारण वातावरणाच्या विरोधाने खरा वेग कमी होत असतो, म्हणून उल्केचा खरा वेग काढण्यासाठी काही दुरूस्त्या कराव्या लागतात.

द्रव्यमान : सामान्यत: उल्कांची द्रव्यमाने व घनफळे ही फार सूक्ष्म असतात. उल्केभोवतालच्या तप्त वायूंमुळे उल्का मोठी दिसत असते. उल्कांचे निश्चित द्रव्यमान ठरविणे कठीण आहे. बहुसंख्य उल्का वाळूच्या कणाएवढ्याच असतात. उल्केची प्रत, तिच्या पथाची लांबी, ती किती काळ दिसली व निरीक्षकापासूनचे तिचे अंतर ही माहीत असल्यास उल्केने उत्सर्जित केले की प्रकाश-ऊर्जा काढता येईल. परंतु गतिज ऊर्जेचा बराच मोठा भाग प्रकाशाव्यतिरिक्त म्हणजे उष्णता व इतर ऊर्जामध्येही खर्च होणे शक्य असते. त्यामुळे काही गृहीतांच्या आधारे गतिज ऊर्जा व तीवरून द्रव्यमानाबद्दल अंदाज करता येतो. यावरून गुरूइतपत तेजस्वी उल्केचे वजन ४ ग्रॅ., शुन्य प्रतीच्या उल्केचे सु.१ ग्रॅ., ध्रुवाइतपत तेजस्वी उल्केचे ४० मिग्रॅ. व केवळ दिसणाऱ्या उल्केचे १ मिग्रॅ. असावे असा अंदाज आहे.

द्रव्याचे स्वरूप : अशनींच्या विश्लेषणाने प्रत्यक्षपणे किंवा उल्कांच्या निरीक्षणाने अप्रत्यक्षपणे उल्काद्रव्याचे रासायनिक संघटन व संरचना यांच्याबद्दलची माहिती मिळते. पहिल्या पद्धतीत पदार्थ प्रत्यक्ष हाताळता येत असल्यामुळे समस्या सोपी होऊन केवळ पुरेसे अशनी शोधून काढण्याचाच प्रश्न उरतो.

उल्कांच्या वर्णपटांवरून त्यांच्यात कोणती मूलद्रव्ये असतात हे समजते. अशा प्रकारे त्यांच्यात लोह, कॅल्शियम, सिलिकॉन, निकेल, गंधक, सोडियम मॅग्‍नेशियम इ. बरीच मूलद्रव्ये असल्याचे आढळून आले आहे. उल्कांच्या व अशनींच्या वर्णपटांमध्ये सारखेपणा असला तरी त्यांच्यात महत्त्वपूर्ण भेदही आहेत. या दोन्ही प्रकारच्या वर्णपटांवरून बहुसंख्य उल्का आश्मिक (पाषाणरूप) असतात असे दिसून आले आहे. कारण अगदी थोडेच वर्णपट धात्विक उल्कांचे असावेत असे दिसून येते.

प्रत व दीप्तीची कारणे : काही उल्का चंद्राएवढ्या तेजस्वी असतात, तर काही डोळ्यांनी दिसतही नाहीत. उल्केची तेजस्विता तिच्या भासमान तारकीय प्रतीने किंवा जास्तीत जास्त प्रकाशाने वर्णिली जाते. उल्केची दीप्ती तिचे आकारमान व वेग यांच्यावर अवलंबून असते. ३० ग्रॅ. वजनाचा उल्काभ ३० किमी./से. वेगाने वातावरणात शिरल्यास शून्य प्रतीची व वाटाण्याएवढा उल्काभ ६४ किमी./से. वेगाने आल्यास दोन प्रतीची उल्का निर्माण होईल. अनुभवी निरीक्षक त्याच्या भागातील ५ ते ० प्रतीच्या दहा टक्क्यांपेक्षा कमी व शून्य प्रतीपेक्षा तेजस्वी सर्व उल्का पाहू शकतो, असा अंदाज आहे. ३ किंवा ४ प्रतीपर्यंतच्या उल्कांची माहिती छायाचित्रणाने व १४ प्रतीपर्यंतच्या उल्कांची माहिती रेडिओ पद्धतीने मिळू शकते.कमी तेजस्वितेच्या उल्कांची संख्या वाढत जाते. प्रत एका अंकाने कमी (अंधुक) झाल्यास उल्कांची संख्या २ ते ४ पटींनी वाढते. डोळ्यांच्या निरीक्षणांच्या बाबतीत ती साडेतीन पटींनी आणि रेडिओच्या व दुर्बिणीच्या साहाय्याने वेध घेता येणाऱ्या उल्कांच्या बाबतीत ती अडीच पटींनी वाढते. यापेक्षा सूक्ष्म उल्कांसंबंधीची माहिती अत्यल्पच आहे.

उल्काभ वातावरणात शिरताना हवेच्या रेणूंवर आदळत असतो. त्याची काही गतिज ऊर्जा त्या रेणूंना मिळते. ती बहुतेक सर्व उष्णतेत रूपांतरित होते. त्यामुळे रेणू तापतात व उल्काभाच्या पुढील भागावर संपीडित (दाबल्या गेलेल्या) व तप्त हवेची टोपीच तयार होते. तिच्यातील उष्णता उल्काभाच्या पृष्ठावरील पातळ थराला मिळते. त्यामुळे प्रथम तो वितळतो व नंतर त्याची वाफ होते. अशा तर्‍हेने उल्केभोवती प्रदीप्त हवेचे व बाष्पीभूत द्रव्याचे उल्काकणापेक्षा खूप मोठे आवरण तयार होते. ते तिच्या मागील पथावरही पसरत जाते. या प्रदीप्त वाफेमुळेच मुख्यत: उल्केची दीप्ती निर्माण होते. उल्केची दीप्ती, उल्केची पूर्ण वाफ होऊन ती नाहीशी होईपर्यंत किंवा तिचा वेग ठराविक वेगापेक्षा कमी होईपर्यंत म्हणजेच काही सेकंद क्वचित थोडी मिनीटे टिकून राहते. दीप्त वायूंमुळे उल्केच्या वर्णपटात ठळक रेषा दिसतात.

उल्कांच्या अभ्यासाच्या पद्धती : उल्केची दीप्ती, वेग, उंची, पथ, कक्षा, द्रव्यमान इत्यादींबद्दलची माहिती मिळविण्यासाठी उल्कांचे निरीक्षण केले जाते. डोळ्यांनी किंवा दुर्बिणीतून निरीक्षण करण्याची चाक्षुष पद्धती, छायाचित्रण पद्धती, वर्णपट पद्धती व रेडिओ पद्धती या चार पद्धती उल्कांचे निरीक्षण करण्यासाठी वापरल्या जातात. या साधनांच्या आवाक्याबाहेरच्या सूक्ष्म धुळीचा अभ्यास कृत्रिम उपग्रहांच्या मदतीने करतात.

चाक्षुष पद्धती : पुष्कळ वर्षे निरीक्षणे केवळ डोळ्यांनीच करावी लागत असत. अशा निरीक्षणांकरिता ताऱ्यांचा एक नकाशा व घड्याळ एवढे साहित्य पुरेसे असते. ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर दिसलेला उल्केचा पथ निरीक्षक आपल्या नकाशावर काढतो व उल्केची प्रत, रंग, तसेच तेजोरेषा व उल्का किती काळ दिसली इत्यादींची नोंद करतो. पुरेशा (६४ किमी.) अंतरावरील दुसऱ्या केंद्रावरून त्याच उल्केचे निरीक्षण केले असल्यास तिची उंची व उद्‌गमबिंदूचे स्थान ही ठरविता येतात. ही पद्धत तितकीशी अचूक नाही. पुष्कळ वेळा सामान्य माणसाला अत्यंत तेजस्वी उल्का किंवा अग्‍निगोल योगायोगाने दिसतात. अशा अग्‍निगोलाच्या पथासंबंधी अंदाज करण्यास व अशनी पडला असल्यास तो शोधून काढण्यास अशा नकळत झालेल्या निरीक्षणांचाही तज्ञाला उपयोग होऊ शकतो. कारण सर्वसामान्यपणे निरीक्षणात कोणत्या चुका होतात याची त्याला कल्पना असते. द्विनेत्री (बायनॉक्युलर) व दुर्बिण यांचा उपयोग करून १२-१३ प्रतीपर्यंतच्या अंधुक उल्कांचेही निरीक्षण करता येते. परंतु दुर्बिणीतून आकाशाचा लहानसाच भाग दिसू शकतो त्यामुळे निरीक्षणात येणाऱ्या उल्कांच्या संख्येवर मर्यादा पडते.


छायाचित्रण पद्धती : या पद्धतीने मिळणारी माहिती अधिक अचूक असते. परंतु अंधुक उल्कांची छायाचित्रे निघू शकत नाहीत. शिवाय उल्कांचा कोणीय वेग जसजसा वाढत जातो तसतसे त्यांचे छायाचित्रण करणे कठीण असते. त्यामुळे निरीक्षणांवर मर्यादा पडतात. उल्का केव्हा कोठे पडेल हे आधी समजत नाही. त्यामुळे कॅमेरे सतत लावून ठेवावे लागतात. ते स्थिर किंवा फिरते ठेवलेले असतात. सामान्यत: २० ते ८० किमी. अंतरावर दोन सारखे कॅमेरे एकाच वेळी लावून ठेवलेले असतात. जेव्हा पुरेशी तेजस्वी उल्का कॅमेऱ्यापुढून निखळते तेव्हा तिचे छायाचित्र टिपले जाते. दोन्ही कॅमेर्‍यांतील एकाच उल्केच्या छायाचित्रांवरून तिची उंची व तिच्या पथाबद्दलची आवश्यक ती माहिती मिळू शकते. उल्केची कक्षा व वेग काढण्यासाठी सामान्यत: कॅमेऱ्यात फिरती झडप (शटर) बसवितात. त्यामुळे वस्तुभिंग ठराविक कालांतराने लागोपाठ एकदा झाकले जाते व उघडे राहते. या योजनेमुळे उल्केच्या तेजोरेषेच्या छायाचित्रात ठराविक कालांतराने खंड पडतात. या खंडांची लांबी व उल्केची उंची यांच्यावरून तिचा वेग व वेगावरून तिची कक्षा काढता येते.

उल्कांच्या छायाचित्रणासाठी वापरण्यात येणारा कॅमेरा विशिष्ट प्रकारचा असतो. त्याचे दृष्टिक्षेत्र विस्तृत असते. रंध्रव्यास मोठा असतो व भिंग कमी केंद्रांतराचे असते [→  कॅमेरा]. त्यामुळे आकाशाचा बराच मोठा भाग कॅमेऱ्याच्या टप्प्यात येऊ शकतो व अधिकात अधिक प्रकाश कॅमेऱ्यात जाऊन छायाचित्रण पट्टीवर लहानशा क्षेत्रात एकत्रित होऊ शकतो. अशा प्रकारच्या ‘सुपर-श्मिट’ या विशिष्ट प्रकारच्या उल्का कॅमेऱ्याने सावकाश पडणाऱ्या पाच प्रतीपर्यंतच्या व वेगाने पडणाऱ्या तीन प्रतीपर्यतच्या उल्कांची छायाचित्रे घेता येतात. अशा कॅमेऱ्याने तासात सु. चार उल्कांची छायाचित्रे टिपली जातात.

वर्णपट पद्धती : ह्या निरीक्षण पद्धतीची सुरुवात १८९७ साली झाली. त्यानंतर अशी थोडीच निरीक्षणे करण्यात आलेली आहेत. या पद्धतीने तेजस्वी उल्कांचेच निरीक्षण करता येते. छायाचित्रणात या पद्धतीपेक्षा २-३ प्रतींनी अंधुक असलेल्या उल्कांचेही निरीक्षण करता येते. साध्या कॅमेऱ्याच्या भिंगापुढे लोलक किंवा विवर्तन जालक [वर्णपट मिळविण्याचे एक साधन, → विवर्तक जालक] बसवून त्याचा उल्का-वर्णपटलेखक म्हणून उपयोग करता येतो. येथे उल्केच्या तेजोरेषेचा प्रकाशउद्‌गमासारखा उपयोग होतो. अशा एका कॅमेऱ्याच्या साहाय्याने दरवर्षी दहापेक्षा कमीच उल्का-वर्णपट मिळू शकतात. सामान्यत: अशा कॅमेऱ्यामध्ये फिरती झडप असते. उल्कांच्या वर्णपटांवरून त्यांच्यातील मूलद्रव्ये कोणती, त्यांचा निळसर रंग व दीप्ती ही कशी निर्माण होतात, त्यांचे द्रव्य कोणते इत्यादींबद्दलची माहिती मिळते

रेडिओ (रडार ) पद्धती : उल्केच्या तेजोरेषेवरून रेडिओ तरंग परावर्तित होतात याचा पुरावा दुसऱ्या महायुद्धाच्या काही वर्षे आधी मिळाला होता. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतरच या तंत्राचा विकास झपाट्याने झाला. या तंत्रामुळे दिवसा किंवा ढगाळ हवेतही उल्कांचे वेध घेणे शक्य झाले असून त्यांच्या साहाय्याने महत्त्वाचे दिवसाचे उल्काप्रवाह किंवा दिन-उल्कावृष्टी शोधून काढण्यात आलेल्या आहेत. उल्का उच्च वातावरणातून जात असताना त्या भागात उष्ण व आयनीभूत वायूंचा स्तंभ निर्माण होतो. त्यावरून रेडिओ तरंग व रडारचे स्पंद परावर्तित होऊ शकतात. यामुळेच रेडिओ निरीक्षणे शक्य होतात. उल्केच्या अशा आयनीभूत तेजोरेषेची लांबी काही किलोमीटरांपासून १६० किमी. पर्यंत असते. ती पुष्कळ मिनिटांपर्यंतही टिकून राहते व तिचा रेखीय परावर्तकासारखा उपयोग होतो. तिच्यापासून केंद्रापर्यत काढलेली सरळ रेषा तिला लंब असल्यास रेडिओ तरंगांचे जास्तीत जास्त परावर्तन होते. रेडिओ पद्धतीने चौदा प्रतीपर्यंतच्या उल्कांचे वेध घेता येतात व उल्केचा वेग, तिचा पथ, उद्‌गमबिंदू, उच्च वातावरणातील वाऱ्यांची दिशा व वेग इ. निश्चित करता येतात.

उत्पत्ती : उल्का सूर्यकुलातील आहेत की सूर्यकुलाबाहेरून येतात व त्या आकाशातील कोणत्या पदार्थापासून निर्माण झाल्या आहेत, यांसंबंधी निरनिराळी मते मांडण्यात आलेली आहेत. पहिल्या बाबीबद्दल पुष्कळशी एकवाक्यता आढळते, पण त्या कशा निर्माण झाल्या असाव्यात हे निश्चित सांगता येत नाही. परंतु उल्कांची उत्पत्ती धूमकेतू व लघुग्रह [बहुश: मंगळ व गुरू यांच्या दरम्यान कक्षा असलेले लहान उपग्रह, → लघुग्रह] यांच्या इतिहासाशी निगडीत असावी असा सर्वसामान्य विचार आढळून येतो.

उल्केच्या वेगावरून ती सूर्यकुलातील आहे की नाही हे ठरविता येते. ७२ किमी./से. पेक्षा अधिक भूकेंद्रीय वेग असलेला कण सूर्यकुलाबाहेरून आला असावा असे म्हणता येते. छायाचित्रण व रेडिओ यांसारख्या आधुनिक तंत्रांचा उपयोग करून उल्कांचा वेग, उद्‌गमबिंदू, त्यांची खरी कक्षा इ. निश्चित करण्यासाठी काळजीपूर्वक निरीक्षणे करण्यात आलेली आहेत. त्यावरून सूर्यकुलाबाहेरून उल्का आल्या असतील तर त्या आठव्या प्रतीपेक्षा अंधुक व अगदी थोड्याच आल्या असाव्यात असा अंदाज आहे. म्हणजे बहुसंख्य उल्का सूर्यकुलातीलच असाव्यात.

काही उल्कासमूहांच्या कक्षा जवळजवळ धूमकेतूंच्या कक्षांशी जळणाऱ्या अशा आहेत. त्यावरून उल्काभ हे धूमकेतूंचे तुकडे असावेत अशी परिकल्पना मांडली जाते. काही उल्कावृष्टींचा व धूमकेतूंचा संबंध दाखविण्यात येतो. उदा., लिओनीडवृष्टी व टेंपल (१८६६ साली सापडलेला पहिला म्हणजे १८६६-१) धूमकेतू पर्सीडवृष्टी व १८६२-३ धूमकेतू ओरिऑनीड आणि ईटा – ॲक्वॅरीडवृष्टी व हॅलीचा धूमकेतू बिलीडवृष्टी व १८५२-३ धूमकेतू ट़ॉरीडवृष्टी व एंकेचा धूमकेतू ड्रॅकोनीडवृष्टी व गियाकोबिनी धूमकेतू आणि लिरीडवृष्टी व १८६१-१ धूमकेतू. परंतु जेमिनीड, क्वॅड्रँटीड व डेल्टा-ॲक्वॅरीड या उल्कावृष्टीशी कोणत्याही धूमकेतूचा संबंध दिसत नाही. तसेच काही धूमकेतू पृथ्वीच्या कक्षेत येतात परंतु उल्कावृष्टी होत नाही.

धूमकेतूपासून उल्कासमूह कसा निर्माण होत असावा याची कल्पना खालील विवेचनावरून येईल. सूर्यापासून दूर असताना धूमकेतूच्या गाभ्यातील निरनिराळ्या खनिजांचे लहान कण गोठलेल्या वायूंमुळे (उदा., अमोनिया, मिथेन) एकमेकांना सैलपणे चिकटून राहिलेले असतात. जसजसा धूमकेतू सूर्याजवळ येऊ लागतो तसतसे वायूंचे बाष्पीभवन होत जाते व कण सुटे होतात. नंतर असा सुट्या कणाचा समूह निर्माण होतो. ग्रहांमुळे, विशेषत: गुरूमुळे किंवा इतर विशिष्ट प्रेरणांमुळे कण विक्षोभित होऊन किंचित वेगळ्या कक्षांत विखुरले जातात. नंतर दीर्घकाळ एकाच कक्षेत परंतु पूर्ण कक्षाभर विखुरण्याची क्रिया चालू राहते. जेव्हा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वांत जवळ येतो तेव्हा जोरात वृष्टी होते व कण पुरेसे विखुरलेले असतील, तर ती काही तास किंवा काही दिवसही होत राहते.

उल्का व अवकाश प्रवास : अवकाशयानाच्या उल्काकणांशी टकरी होणे, हा अवकाश प्रवासातील एक धोका आहे. उच्च वेगाने येणारा लहानसा उल्काभ यानावर आदळल्यास मुक्त होणारी गतिज ऊर्जा तेवढ्याच वजनाच्या टीएनटीच्या स्फोटक ऊर्जेच्या हजारोपट असू शकेल. मोहरीएवढ्या कणामुळे यानाच्या आवरणास भोक पडून त्यातील हवा काही सेकंदांतच बाहेर पडू शकेल. द्राक्षाएवढ्या उल्काभाने तर यान बहुधा नष्टच होईल. मात्र अशा गंभीर अपघाताची संभाव्यता अत्यल्पच असते. कारण पहिल्या प्रकारचा अपघात काही दिवसांतून तर गंभीर अपघात पुष्कळ वर्षातून एखादा घडण्याचा संभव असतो. धूमकेतूंच्या कक्षा व लघुग्रांचे पट्टे टाळून हा धोका आणखीही कमी करता येईल.


उल्का व हवामान : जागतिक पर्जन्यमानावर उल्कांचा परिणाम होत असावा अशी एक शक्यता आहे. वातावरणाच्या खालच्या भागात तयार होणाऱ्या पावसाच्या थेंबांपैकी काही थेंब तरी धूलिकणांसारख्या सूक्ष्म केंद्रकांभोवती संघटन होऊन (एकत्रितपणे साचून) तयार होत असतात. उल्काद्रव्याचे अतिसूक्ष्म कण हळूहळू खाली येत असतात. त्यांना उल्कांच्या उंचीपासून हवामानाच्या पट्ट्यापर्यत येण्यास जवळजवळ महिना लागतो. उल्कावृष्टी व तिच्यानंतर एक महिन्याने येणारा पाऊस यांच्यामधील संबंध दाखविण्यासाठी काही सांख्यिकीय पुरावे आहेत. उल्का व हवामान यांच्यासंबंधीचे अन्वेषण (संशोधन) कुतूहलजनक असले, तरी मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणे अतिशय अवघड आहे. १९६० च्या सुमारास उल्का व हवामान यांच्यासंबंधी काही निष्कर्ष काढण्यात आले होते, तथापि ते विश्वासार्ह नव्हते.

कृत्रिम उल्का : अवकाशात फेकण्यात येणाऱ्या अँल्युमिनियमाच्या लहान गोळ्यांना (व्यास १·२५ सेंमी.) देण्यात आलेले नाव. १६ ऑक्टोबर १९५७ रोजी न्यू मेक्सिको येथून अशा शंभराहून अधिक गोळ्या एरोबी या अन्वेषक रॉकेटाद्वारे प्रथम ८० किमी. उंच फेकण्यात आल्या. नंतर तेथे त्यांना एका स्फोटक प्रयुक्तीने ताशी सु. ६४,००० किमी. वेग देण्यात आला. त्यांच्यापैकी पुष्कळ गोळ्या बाह्य अवकाशात निघून जाऊन धूमकेतूंच्या कक्षांसारख्या कक्षांत सूर्याभोवती फिरत राहिल्या असाव्यात किंवा सूर्यात विलीन झाल्या असाव्यात असे मानतात. या प्रयोगाने उल्का-भौतिकीमध्ये अन्वेषणाचे एक नवीन दालन उघडले गेले.

अशनी

मोठे उल्काभ वातावरणातून येताना पूर्ण जळून जाण्यापूर्वीच पृथ्वीवर पडतात. अशा अपार्थिव पदार्थांना अशनी म्हणतात. उल्काभांच्या मानाने अशनींची संख्या अल्प असते, कारण बहुसंख्य उल्काभ वातावरणातच जळून जातात. पृथ्वीवर ते क्वचितच आढळतात. सामान्यत: उल्कावृष्टी होते तेव्हा अशनी पडत नाही. अशनी एकटा पडतो किंवा वातावरणात फुटून अनेक तुकडेही पडतात. कधी कधी अशनीच्या आघाताने भूपृष्ठावर विवर निर्माण होते. ॲरिझोनातील अशनिविवर व लोणार सरोवर ही याची ठळक उदाहरणे आहेत.अशनीला बहुधा तो जेथे पडला किंवा सापडला तेथून जवळात जवळ असलेल्या गावाचे नाव देतात. उदा., होबा. पृथ्वीवरील खडकात न आढळणारी वैशिष्ट्ये अशनीत असल्यामुळे तो प्रत्यक्ष पडताना दिसला नाही, तरी निराळा ओळखता येतो. त्यामुळेच पडताना नोंद न झालेलेही कित्येक अशनी सापडले आहेत. १९५२ साली जगातील एकूण अस्सल अशनींची संख्या १, ५०२ होती. १९६० पर्यंत ती संख्या सु. १,७०० झाली. १९७० पर्यंत जगात सु. २,००० अशनींचे भाग संग्रहित केले गेले, त्यांपैकी ७२७ अशनी एकट्या अमेरिकेत आहेत. अशनींप्रमाणे सूक्ष्म अशनी व वैश्विक धूळही (अवकाशातील अतिसूक्ष्म वस्तुकण) पृथ्वीवर येत असते. आतापर्यत पृथ्वीवर पडलेल्या या सर्व पदार्थाचा तिच्या संपूर्ण पृष्ठावर सु. २·५ सेंमी जाडीचा थर होऊ शकेल.

अशनींमुळे सूर्यकुलातील द्रव्याचे रासायनिक संघटन व संरचना यांच्याबद्दल प्रत्यक्ष माहिती देणारे साधन उपलब्ध झाले असून पृथ्वीच्या अंतरंगाची माहितीही यांच्यामुळे अप्रत्यक्षपणे मिळू शकते. शिवाय बाहेरून येणाऱ्या पदार्थांवर वातावरणाचे होणारे परिणाम व उच्च वातावरण यांच्याबद्दलची माहिती अशनींच्या अभ्यासाने मिळू शकते. अशनी हा ज्योतिषशास्त्र व भूविज्ञान यांच्यातील एक दुवा आहे. यामुळे अशनींचे शास्त्रीयदृष्ट्या फार महत्त्व आहे.

अशनिपात : अशनिपाताची निश्चित नोंद सर्वप्रथम चिन्यांनी केलेली आढळते. अशनिपात विरळाच व केव्हातरी होतात. त्यांच्यात उल्कावृष्टीसारखा नियमितपणा नसतो. परंतु त्यांच्यामुळे निर्माण होणारा प्रकाश व आवाज यांच्यामुळे ते लक्षात राहतात. त्यामुळे पूर्वीपासून त्यांची नोंदही ठेवली गेली.

अशनी पडताना सामान्यत: आकाशात एक तेज: पुंज लोळ दिसतो. तो घिरट्या घालतो व चकचकीत तेजोरेषा मागे राहते. कधीकधी अशनी वातावरणातच फुटतो तेव्हा गडगडाटासारखा मोठा आवाज होतो. कारण त्याच्या द्रव्यमानाबरोबर आलेल्या आघात तरंगांमुळे ध्वनी निर्माण होतो व नंतर त्याचे प्रतिध्वनी येत राहतात. कधीकधी काळे तुकडे पडताना दिसतात. तुकडे विवृत्ताकार क्षेत्रात विखरून पडतात. मोठे तुकडे वेग कमी न झाल्याने या क्षेत्राच्या दुरवरच्या भागात जाऊन पडतात व लहान तुकड्यांची गती हवेने रोखली जाऊन ते जवळच पडतात. पडताना अशनीचा वेग कमी होत जातो व सामान्यत: शेवटी तो केवळ गुरूत्त्वाकर्षणामुळे पडतो. त्याचे द्रव्यमानही कमी होत जाते. त्यामुळे बहुधा तो जमिनीत एक मीटरापेक्षा अधिक घुसत नाही. एकदा तर एका सरोवरातील काही सेंमी. जाडीच्या बर्फावर अशनी पडला, परंतु बर्फ फुटला नाही. मात्र मोठे अशनी अधिक जोराने आदळत असावेत. दिवसा अशनिपात झाल्यास स्थानपरत्वे सामान्यत: काळा ढगही दिसतो. नॉर्मंडीत झालेल्या अशनिपाताच्या वेळी एका गावी अग्‍निगोल व दुसऱ्या गावी काळा ढग दिसला होता.

इ. स. १८०० सालापासून ६२७ आश्मिक, २९ धात्विक व १० धातवाश्मिक प्रकारचे अशनी प्रत्यक्ष पडताना पाहिले गेले आहेत. १९३० साली सर्वांत अधिक म्हणजे तेरा अशनी पडले. परंतु १८३२ व १८८० साली एकही अशनी पडल्याची नोंद नाही. ३० जून १९०८ रोजी मध्य सायबीरियात सर्वांत मोठा अशनिपात झाला. सु. १३० टन वजनाच्या एका अशनीच्या आघातामुळे अतितप्त तेजस्वी पदार्थ उंच फेकले गेले व लहानसा भूकंपच झाला. तेथून ४,८०० किमी. दूर असलेल्या येना येथे व जगात इतरत्रही त्याची नोंद केली गेली. ३२ किमी. परिसरातील झाडे पडली वा जळून गेली. स्फोटाने हवेत निर्माण झालेले तरंग ६,००० किमी. अंतरावरच्या लंडन व ९,६०० किमी. अंतरावरील वॉशिंग्टन येथे नोंदले गेले. उच्च वातावरणात उडालेल्या धुळीमुळे नंतरच्या दोन रात्री उत्तर युरोपभर आकाशात तेजस्वी प्रकाश दिसत होता. १९ जुलै १९१२ रोजी होलब्रुकजवळ (ॲरिझोना) अशनिपात झाला. अशनी पडण्यापूर्वी ६० किमी. अंतरापर्यत ऐकू जाईल एवढा मोठा गर्जनेसारखा आवाज झाला व पाच किमी. लांब व पाऊण किमी. रूंद एवढ्या क्षेत्रातून चौदा हजाराहून अधिक अशनी गोळा करण्यात आले. १९२० साली सीमेनजवळ झालेल्या अशनिपातामुळे हवेत स्फोट होऊन १९ किमी. लांब व तीन किमी. रुंद क्षेत्रात तुकडे विखरून पडले व ७ अशनी सापडले. १७ फेब्रुवारी १९३० रोजी पॅरागूल्ड ( आरकॅन्सॉ, अमेरिका ) येथे प्रत्यक्ष पडताना दिसलेला अशनी सु. दोन मीटर आत घुसला, तो खणून काढावा लागला.

अशनिवृष्टी : मान्यत: जमिनीवर पडण्यापूर्वी अशनी फुटतात. परंतु कधीकधी यापेक्षाही अधिक उंचीवर ते फुटतात व खाली येताना या तुकड्यांचे आणखी बारीक तुकडे होतात. असे तुकडे एकत्रितपणे पडल्यास अशनिवृष्टी झाली असे म्हणतात. सामान्यत: अशनिवृष्टीत विविध आकाराचे व आकारमानाचे पुष्कळ अशनी पडतात. १८६८ साली पोलंडमध्ये पूलटूस्कजवळ सु. एक लाख, १९१२ साली होलब्रुकजवळ (ॲरिझोना, अमेरिका) चौदा हजार, १८०३ मध्ये लेगलजवळ (फ्रान्स) दोन ते चार हजार व १८०८ साली स्टॅनर्म (मोरेव्हिया) येथे दोनशे ते चारशे आश्मिक अशनी व १९४७ साली सायबीरियात कित्येक हजार धात्विक अशनी पडल्याची नोंद आहे.


प्रकार : रासायनिक संघटनानुसार अशनींचे तीन मुख्य प्रकार पाडले असून संरचनेनुसार त्यांचे उपप्रकार पाडण्यात येतात. धात्विक व आश्मिक या दोन प्रकारांच्या दरम्यान असलेल्या सर्व जातींचे अशनी असू शकतात. त्यामुळे काटेकोर वर्गीकरण करणे कठीण आहे. काचमय अशनी (टेक्टाइट) हा संपूर्णतया भिन्न असा प्रकार आहे.

(१) आश्मिक:हे मुख्यत: कॅल्शियम, मॅग्‍नेशियम, अँल्युमिनियम व लोह यांच्या सिलिकेटांचे बनलेले असतात. ते पृथ्वीवरील खडकांसारखे दिसतात. संरचनेनुसार काँड्रयुल (गोलसर गोळ्या) असलेले काँड्राइट व काँड्र्युल नसलेले अकाँड्राइट असे दोन उपप्रकार आहेत. काँड्राइटांचे खनिजांवरून व अकाँड्राइटांचे कॅल्शियमाच्या प्रमाणानुसार आणखी प्रकार पाडले आहेत.

(२) धात्विक : हे साधारणपणे मुख्यत: लोह (९१%), काही प्रमाणात निकेल (८%) व अल्पसे कोबाल्ट (०·६%) अशा मिश्रधातूंचे बनलेले असतात. कधीकधी त्यांच्यांत सिलिकेटी द्रव्याचे कण समाविष्ट झालेले असतात. निकेलाचे प्रमाण व संरचना यांच्या नुसार धात्विकांचे तीन उपप्रकार पडतात : (अ) हेक्झॅहेड्राइट (नॉयमान रेषा व षट्‌फलकीय पाटन) व सहा टक्क्यांपेक्षा कमी निकेल असलेले ॲटॅक्साइट. (आ) ऑक्टॅहेड्राइट (विडमानस्टाटेन संरचना, निकेल ६–१४%). (इ) विपुल निकेल असलेले ॲटॅक्साइट (निकेल १४–३०%). नॉयमान रेषा, विडमानस्टाटेन संरचना इ. संज्ञांचे स्पष्टीकरण संरचना या शीर्षकाखाली दिले आहे.

(३) धात्वाश्मिक : हा वरील दोन प्रकारांमधला संक्रमी गट असून ह्याच्यात दोन्हींची वैशिष्ट्ये आढळतात.

(४) काचमय अशनी : अठराव्या शतकात सर्वप्रथम झेकोस्लोव्हाकियात व १८६० मध्ये इतरत्र गोलसर काचेचे तुकडे सापडले. त्यांना सामान्यत: टेक्टाइट म्हणतात. कधीकधी त्यांना जेथे आढळले त्या ठिकाणांवरूनही नावे दिली आहेत. त्यांचा रंग गडद हिरवा ते उदी असून रासायनिक संघटन वेगवेगेळे असते. ते भूपृष्ठावर किंवा आधुनिक कल्पाच्या किंवा इतर निक्षेपांत (साठ्यांत) आढळतात. रासायनिक संघटनांच्या बाबतीत किंवा दिसण्यात ते आश्मिक अशनी पेक्षा पूर्णपणे भिन्न असून ते प्रत्यक्ष पडताना दिसल्याचे माहीत नाही.१९०० च्या सुमारास स्वेस यांनी ते काचमय अशनी असावेत असे सुचविले. त्यांच्या उत्पत्तीबद्दल पुष्कळ मते आहेत, परंतु ती संदिग्ध आहेत.

बाह्यस्वरूप व अभिज्ञान : बहुतेक अशनी ओबडधोबड किंवा खडबडीत दिसतात. त्यांच्यापैकी पुष्कळ काहीसे शंक्वाकार (शंकूच्या आकाराचे) असतात. वातावरणातील हवेच्या झोताने कोपरे उडविले जाऊन त्यांना शंक्वाकार आलेला असतो. उच्च वेग असताना अशनीच्या पृष्ठावरील वितळलेले द्रव्य एकसारखे निघून जात असते. काही द्रव्य बाष्पीभवनानेही निघून जाते. वेग पुरेसा कमी झाला म्हणजे अशनीवरील उरलेले वितळलेले द्रव्य गोठून त्याच्याभोवती चमकदार व मऊ कवच तयार होते. या कवचावर प्रवाहरेखा, विशिष्ट तऱ्हेने पडलेले खळगे व पोकळ्या असतात. त्यांच्यावर वाऱ्याच्या झोताची दिशा कळू शकते. जमिनीवर बराच काळ राहिल्यास अपक्षयाने किंवा क्षरणाने (वातावरणी क्रियेमुळे झीज होऊन) खळगे मोठे होणे शक्य असते. अशनीच्या कवचावरून तो किती काळ वातावरणात होता याचा अंदाज करता येतो व खाली येताना त्याचे तुकडे कसकसे होत गेले याबद्दलही अनुमान करता येते. आश्मिक अशनीचे कवच गडद काळे व एक मिमी. पेक्षा पातळ असते. काहींच्या पृष्ठावर धातुरूप लोहाचे चकचकीत ठिपके असतात पण अंतरंग पांढरट करडे असते. धात्विक अशनीचे कवच अत्यंत पातळ व काळे असते. ते पडताक्षणीच पाहिले तर दिसते. नंतर  ऑक्सिडीभवनाने लगेच गंजू लागते. दोन अशनी एकाचेच तुकडे असल्याशिवाय त्यांचे स्वरूप अगदी सारखे नसते.

अशनींच्या वरील वैशिष्ट्यांमुळे सर्वसामान्य अशनी पृथ्वीवरील खडकांपासून वेगळे ओळखता येतात. काही अशनी मात्र अनुभव खास साधने वापरल्याशिवाय ओळखता येत नाहीत. पृथ्वीवर शुद्ध रूपात लोखंड विरळाच आढळते. धात्विक अशनी अधिक जड असतात. आश्मिक अशनीही त्यांच्यासारख्या पदार्थाच्या तुलनेने सापेक्षत: जडच असतात. त्यामुळे जड पदार्थ (दगड) आढळल्यास त्याची काळजीपूर्वक तपासणी होणे आवश्यक असते. अशनीचे कवच अंतरंगापेक्षा दिसायला वेगळे असते. कवच नसल्यास धातूंचे किंवा सिलिकेटांचे लहान गोलसर कण आतील करड्या भागावर जडवल्यासारखे असतात. यांमुळे ते सहज ओळखू येतात. अपक्षयाने अशनींचा रंग सामान्यत: उदी झालेला असतो. धात्विक अशनी तीव्र चुंबकीय असतात. आश्मिक अशनीतही पुरेसे लोह असल्यामुळे तेही चुंबकीय असतात.

अशनीमध्ये मूल्यवान असे काहीही नसते. त्याच्या द्रव्यापासून मिळणारी शास्त्रीय माहिती हीच मूलत: महत्त्वाची असते. त्याची किंमतही निश्चित नसते. फुटणे. विक्रिया होणे, भाजला जाणे, बेफिकीरीने हाताळला जाणे इत्यादींमुळे अशनी खराब होतो व त्याची किंमत आणि शास्त्रीय मूल्य ही कमी होतात.

रासायनिक संघटन : पृथ्वीवरील खडकांत आढळणारी मूलद्रव्येच अशनीतही आढळतात, परंतु त्यांचे प्रमाण भिन्न असते. लोह, निकेल, मॅग्‍नेशियम, कोबाल्ट व गंधक ही मूलद्रव्ये पृथ्वीवरील खडकांपेक्षा अशनींत अधिक प्रमाणात असतात तर ऑक्सिजन, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, सोडियम व पोटॅशियम ही कमी प्रमाणात असतात. मात्र काही अपवाद सोडता अशनीतील मूलद्रव्यांच्या समस्थानिकांची (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांची) सापेक्ष विपुलता पृथ्वीवरील त्याच मूलद्रव्यांच्या समस्थानिकांच्या सापेक्ष विपुलतेशी मिळतीजुळती असते. त्यामुळे अशनीतील मूलद्रव्ये पृथ्वीवरील मूलद्रव्यांसारखीच आहेत याची खात्री पटते.

अशनींच्या रासायनिक वर्णपटीय विश्लेषणांवरून त्यांच्यात एकूण बावन्न मूलद्रव्ये सापडल्याचे सिद्ध झाले आहे. या मूलद्रव्यांमध्ये पृथ्वीवर न आढळणारे असे एकही मूलद्रव्य नाही. लोह हे सर्वांत महत्त्वाचे मूलद्रव्य असून ऑक्सिजन, सिलिकॉन, निकेल, मॅग्‍नेशियम, गंधक, ॲल्युमिनियम, कोबाल्ट व कॅल्शियम ही आठ मूलद्रव्येही महत्त्वाची आहेत. एकोणीस मूलद्रव्ये अल्प प्रमाणात आणि पंचवीस मूलद्रव्ये अत्यल्प प्रमाणात आढळतात. त्यांचे अस्तित्व वर्णपटाद्वारेच कळू शकते.

अशनीतील कार्बनी द्रव्याचे कसून अनुसंधान झालेले आहे. कार्बनी द्रव्य जैव उत्पत्तीचे (सजीवापासून झालेले) असावे असे दर्शविणारे थोडे पुरावे असले, तरी बहुतेक सर्व पुरावे त्याच्या अजैव उत्पत्तीसच दुजोरा देणारे आहेत. यावरून अशनीमध्ये सूक्ष्मजंतू सापडल्याबद्दलचा दावा विश्वासार्ह नाही असे दिसते. अशनीतील कार्बनी द्रव्य कसे निर्माण झाले असावे, याची सविस्तर कल्पना देणारा नवा सिद्धांत अद्यापि प्रयोगावस्थेत आहे.


खनिज संघटन : अशनीतील खनिजांची संख्या पृथ्वीवरील खनिजांपेक्षा कमी आहे. कारण पृथ्वीवरील पुष्कळ खनिजे स्फटिकीभवनाने किंवा रूपांतरणाने (उष्णता व दाब यांचा परिणाम होऊन ) झालेली असतात. शिवाय ऑक्सिजन विपुल असलेली व सजल विद्रावांनी निक्षेपित (तळाशी गाळ साचून) होणारी काही खनिजे पृथ्वीवर विपुल आहेत. परंतु ती अशनीत आढळत नाहीत. अशनीतील अगदी थोड्याच खनिजांत पाण्याचा अंश असतो. जी खनिजे केवळ अशनीतच आढळतात ती प्रयोगशाळेत सहज तयार करता येतात. परंतु पाणी व ऑक्सिजन यांनी त्यांचे त्वरित अपघटन होते, म्हणून ती पृथ्वीवर आढळत नसावीत. यावरून ती जेथे तयार झाली तेथील परिस्थिती पृथ्वीपेक्षा कमी ऑक्सिडीकारक असावी. धात्विक अशनी म्हणजे मुख्यत: लोह, निकेल व कोबाल्ट यांच्या मिश्रधातू असतात. आश्मिक अशनींचे खनिज संघटन काहीसे पृथ्वीवरील अत्यल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण अत्यल्प असलेल्या ) खडकांसारखे असते. अशनीतील पुढील खनिजे पृथ्वीवरही आढळतात : ट्रॉयलाइट, पाधरोटाइन, कोहेनाइट, ट्रिडिमाइट, डायोप्साइड, ऑलिव्हीन, ग्रॅफाइट, हिरा, कॅमॅसाइट (FeNi) व टीनाइट (FeNi). परंतु ओल्डहॅमाइट (CaS), डाउब्रीलाइट (FeCr2S4), श्रायबर्साइट, रॅब्‌डीनाइट [(Fe,Ni) P] व लॉरेन्साइट (FeCl2 ) ही खनिजे केवळ अशनीतच आढळतात. यांवरून अशनी दुसरीकडे तयार झाल्यानंतर पृथ्वीवर आले असावेत असे दिसते.

संरचना : आश्मिक अशनी व ज्वालामुखी खडक यांच्यात साम्य असले तरी त्यांच्यात वैशिष्ट्यपूर्ण भेदही आहेत. आश्मिक अशनीत स्तर तसेच क्वॉर्ट्‌झ हे खनिज आढळत नाही. त्यांच्यातील खनिजे वैशिष्ट्यपूर्ण रीतींनी एकत्र आलेली असतात. त्यामुळे अतिजटिल संरचना निर्माण होते. त्यांच्या पातळ छेदाचे सूक्ष्मदर्शकाने निरीक्षण करून संरचना चांगल्या तर्‍हेने पाहता येते.

आश्मिक अशनींमध्ये खनिजांच्या स्फटिकांची किंवा तुकड्यांची सरमिसळ झालेली असते. सामान्यत: त्यांच्यात निकेलयुक्त लोखडांचे सूक्ष्मकण आढळतात. नव्वद टक्के आश्मिक अशनींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण गोलसर गोळ्या असतात. त्यांना काँड्र्युल म्हणतात. काँड्र्युल कधीकधी डोळ्यांनाही दिसू शकतात तर कधीकधी सूक्ष्मदर्शकानेच पाहता येतील इतके सूक्ष्म असतात. ते सामान्यत: ऑलिव्हीन व पायरोक्सीन या खनिजांचे बनलेले असतात व त्याच द्रव्यांच्या आधारकात (अधिक सूक्ष्मकणी भागात) जडवल्यासारखे दिसतात. त्यामुळे काँड्र्युल आधारकापासून स्पष्टपणे वेगळे दिसतात, परंतु ते आधारकापासून सहज वेगेळे करता येत नाहीत.काँड्र्युलाचा पातळ छेद सूक्ष्मदर्शकाने पाहिल्यास त्यात कधीकधी अरीय (आऱ्यासारखी) किंवा पट्टित (पट्टे असलेली) रचना दिसते. 

काही धात्विक अशनी कापून त्यांचे पृष्ठ गुळगुळीत करून त्यांवर सौम्य अम्‍ल लावल्यास पट्ट्या पट्ट्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकृती दिसतात. त्यांना विडमानस्टाटेन संरचना किंवा आकृती म्हणतात. या संरचनेत कॅमॅसाइटाच्या (निकेलाचे प्रमाण कमी) पट्ट्याभोवती टीनाइटाचे (निकलाचे प्रमाण अधिक) पट्टे असतात व मधला भाग दोन्हींनी भरलेला असतो. या संरचनेत अष्टफलकाच्या तीन फलकांना समांतर असे पट्टे असतात. त्यामुळे ही संरचना असलेल्या अशनींना ऑक्टॅहेड्राइट नाव पडले.

दुसऱ्या प्रकारच्या अशनींच्या पृष्ठावर अशा तर्‍हेने विडमानस्टाटेन आकृती दिसत नाहीत. त्यांचे पृष्ठ पुष्कळसे सपाट राहते, परंतु त्यावर वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या बारीक सरळ रेषा दिसतात. नॉयमान यांना त्या प्रथम आढळल्यामुळे त्यांना नॉयमान रेषा म्हणतात. अशनी वरील नॉयमान रेषांतील कोन व त्याचे पाटन (ठराविक दिशेत सहज भंग पावण्याचा गुणधर्म) यांच्यामुळे षट्फलकीय पाटन निर्माण होते. त्यामुळे अशा संरचनेच्या अशनींना हेक्झॅहेड्राइट म्हणतात.

विडमानस्टाटेन संरचना असणे हा एखादा पदार्थ अशनी आहे याचा पुरावाच होय. तशाच रासायनिक संघटनाच्या कृत्रिम मिश्रधातूंमध्ये ही संरचना दिसत नाही. अशी मिश्रधातू अगदी सावकाश थंड होऊ दिली तर काहीशी अशी संरचना दिसते. परंतु ती सूक्ष्मदर्शकानेच दिसू शकते. यावरून ही संरचना निर्माण होण्यास हजारो वर्षे लागली असावीत असे दिसून येते. न वितळू देता अशनी ८५०° से. पेक्षा अधिक तापविल्यास ही संरचना कायमची नष्ट होते. असा अशनी ॲटॅक्साइटांपासून वेगळा ओळखता येणे कठीण होते, कारण ॲटॅक्साइटांमध्ये विडमानस्टाटेन आकृती, नॉयमान रेषा किंवा षट्फलकीय पाटन दिसत नाही.

तापमान : वातावरणात घुसण्यापूर्वी उल्काभाचे तापमान ४° से. असते. वातावरणात घुसल्यावर हवेशी घर्षण होऊन त्याचे पृष्ठ व त्याच्यापुढील हवा ही तप्त होतात. परंतु यामुळे त्याचा वेग कमी होत जातो. अशा तर्‍हेने लहान अशनींचा वेग इतका कमी होतो की, ते उष्ण होण्याऐवजी थंडच होत असावे. पडलेले अशनी तप्त होते अशा पूर्वीच्या नोंदी आढळतात. परंतु त्या पडताळून पाहिल्या गेलेल्या नसाव्यात. सुकलेल्या पानांवर अशनी पडूनही ती करपली नाहीत किंवा इमारतीवर पडूनही त्यांना आगी लागल्या नाहीत असे उल्लेख आहेत. १४ जुलै १८६० रोजी भारतातील धरमशाला (हिमाचल प्रदेश) येथे व ४ जुलै १९१७ रोजी अमेरिकेतील कोलबी (विस्कॉन्सिन) येथे पडलेले आश्मिक अशनी लगेच मिळविण्यात आले व ते थंड असल्याचे दिसून आले. कोलबी येथील अशनीवर तर गोठलेले दव आढळले. पृथ्वीवर पडेपर्यंत मोठ्या अशनींचे वेग बरेच अधिक राहू शकतात, त्यामुळे ते पडेपर्यंत गरम होत जाणे शक्य असते. असा अशनी पडताच उचलल्यास हातात धरवणार नाही. मात्र ही वरवरची उष्णता लगेच निघून जाते. अशनीच्या आतल्या भागाचे तापमान मात्र बदलत नसावे, कारण हवेत तो काही सेकंदच असल्यामुळे संवहनाने उष्णता आतपर्यंत जाण्याला संधीच मिळत नसावी. प्रयोगांवरून असे दिसून आले आहे की, उष्णता बहुधा १ सेंमी. पेक्षा अधिक आतपर्यंत जाऊ शकत नाही. धात्विक अशनी चांगले वाहक असल्याने आश्मिकांपेक्षा त्यांच्या अंतरंगात अधिक खोलपर्यंत उष्णता जाते. अशा तर्‍हेने अशनीचे फक्त पृष्ठच तापते व वितळते. त्यामुळे पृष्ठावरचे द्रव्य मऊ होऊन ते हवेच्या झोताने खरवडून काढले जाते. अशा तर्‍हेने खरवडून द्रव्य कमी होण्याच्या प्रक्रियेला अपादान म्हणतात.

आकार, आकारमान व वेग : अशनीचे आकार निरनिराळे असतात. आश्मिक बहुधा गोलसर व खडबडीत असतात. धात्विक त्यामानाने अणकुचीदार असून ते शंक्वाकार, दंडाकार किंवा चपटे असू शकतात. अशनींच्या गोलाईवरून ते कधीतरी द्रव अवस्थेत असावेत असा अंदाज आहे. पृथ्वीवर दीर्घकाळ पडून राहिल्यास अपक्षयाने त्यांचे आकार व आकारमान बदलतात. धात्विक अशनीची खालची बाजू वरच्या बाजूपेक्षा अधिक गंजते. होबा या ६० टन वजनाच्या धात्विक अशनीजवळील गंजाच्या थरावरून त्याचे मूळचे वजन ९० टन असावे असा अंदाज आहे. लोह क्लोराइडाने युक्त अशनी अस्थिर असतात. पडताना अशनीची दिक्‌स्थिती सामान्यतः बदलत नाही म्हणजे अशनीला पुढची व मागची अशा दोन बाजू असतात. पुढची बाजू घुमटाकार असते, त्यामानाने मागची बाजू चपटी व खडबडीतही असते. कधीकधी पुढच्या बाजूला लागूनच वितळलेले द्रव्य साचलेले आढळते. अशनींच्या आकाराप्रमाणेच त्यांच्या कवचावरील प्रवाहरेखा व खळगे हीही महत्त्वाची असतात. त्यांच्यावरून हवेतील अत्यंत गतिमान प्रवासात द्रव्यावर काय परिणाम होतात हे समजते.


अशनी सूक्ष्म धूलिकणापासून होबासारख्या प्रचंड अशनीपर्यंतच्या किंवा त्याहूनही मोठ्या आकारमानाचा असू शकतो. सूक्ष्म अशनी व वैश्विक धूळ ही सूक्ष्म आकारमानाची उदाहरणे होत. होबा अशनीच्या पृष्ठभागाची मापे ३ × ३ मी. अशी आहेत व आनिघिटो अशनी सु. ३·२५ × २ × २ मी. या मापाचा आहे. यांच्यापेक्षाही मोठे अशनी पडले असावेत असे अशनिविवरांवरून म्हणता येते. एक टनापेक्षा अधिक वजनाचे पस्तीस अशनी आहेत. त्यांच्यापैकी बहुसंख्य धात्विक आहेत. मोठे अशनी धात्विक प्रकारचे असतात याचे कारण संपीडित हवेच्या उच्च दाबाने वातावरणात फुटण्याची शक्यता आश्मिक अशनींच्या बाबतीत अधिक असते, हे असावे. नॉर्टन काउंटी (कॅनझस, अमेरिका) हा सर्वात मोठा आश्मिक अशनी १·०८ टन वजनाचा आहे.

सरळ समोरून येऊन आदळणाऱ्या अशनींचा वेग मागून येऊन पृथ्वीला गाठणाऱ्या किंवा चक्राकार येऊन पडणाऱ्या अशनींच्या वेगापेक्षा अधिक असतो. त्यांचे वेग सामान्यतः १२ ते ७२ किमी./से. या दरम्यान असतात. वेगाचाही अशनीच्या आकारावर व आकारमानावर परिणाम होत असतो. कारण अशनी जसाजसा हवेत घुसतो तसतसा त्याचा बाह्य भाग वितळून पृष्ठावरील द्रव्य कात टाकल्या प्रमाणे निघून जात असते. काही महत्त्वाचे अशनी व त्यांची वजने कोष्टक क्र. २ मध्ये दिली असून त्यांच्यापैकी शेवटचा आश्मिक व इतर धात्विक प्रकारचे आहेत.

कोष्टक क्र. २.काही महत्वाचे अशनी व त्यांची वजने 

अशनीचे नाव व स्थान 

वजन (टनांमध्ये) 

होबा (नै. आफ्रिका) 

६०·० 

आनिघिटो (अमेरिका) 

३१·५० 

बाकुबरिटो (मेक्सिको) 

२४·५० 

विलामिट (अमेरिका) 

१४·२० 

चुपॅडेरो-१ (मेक्सिको) 

१४·१० 

मूसी (टांगानिका) 

१२·०० 

मोरिटो (मेक्सिको) 

१०.१० 

चुपॅडेरो-२ (मेक्सिको) 

६·८० 

नॉर्टन काउंटी (अमेरिका) 

१·०८ 

उल्काजन्य व वैश्विक धूळ : उल्काभ वातावरणातून जात असताना तप्त होऊन त्याचे पृष्ठ वितळते व वितळलेले काही द्रव्य बाहेर निघून जाते. असे सूक्ष्मकणी द्रव्य हळूहळू पृथ्वीवर येते, त्याला उल्काजन्य धूळ म्हणतात. उलट १०० मायक्रॉनपेक्षा (१ मायक्रॉन = १०-६ मी.) कमी व्यासाच्या सूक्ष्मकणांपासून म्हणजे सूक्ष्म अशनीपासून वैश्विक धूळ निर्माण होते. ते इतके सूक्ष्म असतात की, वातावरणातून येताना ते तापत नाहीत. त्यामुळे बदल न होता ते पृथ्वीवर येतात. या दोन्ही धुळी ध्रुवांलगतच्या हिमात व समुद्राच्या खोल भागातील गाळात सापडु शकतात. त्या गोळा करण्याचे पुष्कळ प्रयत्नही झालेले आहेत. परंतु त्यांच्यात पृथ्वीवरील धुळींची भेसळ होत असल्यामुळे भेसळ न झालेल्या स्वरूपात त्या मिळविणे अतिशय अवघड असते. त्यामुळे अद्यापि त्यांच्याबद्दलची विश्वासार्ह अशी पुरेशी माहिती मिळू शकली नाही. त्यांच्या अभ्यासासाठी कृत्रिम उपग्रहांचाही उपयोग करतात.

वाटणी : अशनींच्या सांख्यिकीय सर्वेक्षणांवरून असे दिसून येते की, सकाळपेक्षा दुपारनंतर पडलेले अशनी अधिक आहेत (३ : ८). म्हणजे सूर्याभोवती फिरण्याची पृथ्वीची व बहुसंख्य उल्काभांची दिशा एकच असावी. उलट दिशेने फिरणारे उल्काभ कदाचित नसावेतही. कारण सकाळी पडलेल्या अशनींना त्यांच्यापेक्षा अधिक वेगाने फिरणाऱ्या पृथ्वीनेच गाठले असावे. तसेच जूनमध्ये सर्वात अधिक व त्याच्याजवळील महिन्यांमध्ये पुष्कळ अशनी पडले असे दिसून आले. याला शास्त्रीय कारण नसावे. हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात अधिक निरीक्षक काम करतात हेही एक कारण असावे. एकोणिसाव्या शतकात पडलेल्या अशनींच्या अभ्यासावरून दरवर्षी सरासरी चार-पाच अशनी पडल्याचे दिसून येते.

माहीत असलेले अशनी भूभागावर सारख्या प्रमाणात वाटलेले आढळत नाहीत. उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा भूभाग जगाच्या ६% आहे. परंतु जगातील एकूण ज्ञात अशनींपैकी ३३% अशनी त्या देशात आहेत. लोकसंख्येची विषम वाटणी, जमिनीचे स्वरूप व तिचा उपयोग कसा होतो व अशा घटनांबद्दलची लोकांची अभ्यासू व संशोधनात्मक वृत्ती किंवा उत्सुकता ही अशा भौगोलिक विषम वाटणीची कारणे आहेत. ध्रुवीय प्रदेश, जंगले, वाळवंटे, दलदलीचे प्रदेश अशा भागांत लोकवस्ती जवळजवळ नाहीच. त्यामुळे त्या भागात पडणारे अशनी सापडण्याची शक्यता कमी होते. पृथ्वीच्या पृष्ठाचा सु. पाऊण भाग पाण्याने व्यापलेला आहे. महासागरात किंवा समुद्रात पडणारे अशनी हरवल्यातच जमा असतात. कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात झीज कमी होत असल्याने अशनी टिकून राहण्याची शक्यता अधिक असते. शिवाय अशा भागात अशनीचा शोध घेणे सोयीचे असते. उत्तर अमेरिकेत धात्विक अशनीपुष्कळ आहेत. कारण तेथील मुळचे लोक लोखंडाचा कमी उपयोग करीत असावेत. उलट जेथे प्राचीन संस्कृती विकसित झाल्या तेथील धात्विक अशनी बहुधा लोकांनी वापरून टाकले असावेत.

भूवैज्ञानिक दृष्ट्या आश्मिक अशनी जलद बदलतात व ओळखू येईनासे होतात. त्यामानाने धात्विक अशनी हळूहळू बदलतात. पॅसिफिक महासागराच्या खोल भागातील गाळांमध्ये लोह-निकेलाचे गोल (स्फॅर्‍युल्स) विस्तृत भागावर विखुरलेले आढळतात. यावरून तृतीय कल्पात (६·५ ते १·२ कोटी वर्षापूर्वीच्या कालात) पुष्कळ अशनी पडले असावेत असा अंदाज आहे. ठराविक थरांमध्ये सापडलेले काही अशनी निक्षेप तयार होत असताना पडले असावेत असाही अंदाज आहे. ॲगी क्रीक (अलास्का) हा धात्विक अशनी गाळाखाली ४ मीटरांवरील खडकात सापडला. कीज (ओक्लाहोमा) हा आश्मिक अशनी प्लाइस्टोसीन (६ लाख वर्षापूर्वीच्या) शैलसमुहात व क्लॉनडाइक (कॅनडा) हा धात्विक अशनी याच कालातील निक्षेपांत १९ मी. खाली आढळला. सार्डीस (जॉर्जिया) हा धात्विक अशनी मायोसीन कालीन (२ कोटी वर्षांपूर्वीच्या कालातील) थर खणताना सापडला. झपाटा (टेक्सस) मधील इओसीन (५·५ कोटी वर्षापूर्वीच्या) थरांत ४६५ मी. खोलीवर धात्विक अशनी सापडला. तो अस्सल असल्यास सर्वांत जुना ठरेल.

वय : अशनीचे वय म्हणजे तो पृथ्वीवर आल्यानंतर लोटलेला काळ नव्हे, तर अशनी घनीभूत झाल्यापासूनचा एकूण काळ म्हणजे त्याचे वय होय. अशा भूवैज्ञानिक वयाने अशनीच्या उत्पत्तीवरही प्रकाश पडू शकतो. अशनींची वये काढण्यासाठी निरनिराळ्या किरणोत्सर्गी (कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या द्रव्यांचा उपयोग करणाऱ्या) पद्धती वापरल्या जातात. या पद्धतींनी काढलेली वये जवळजवळ सारखी आलेली आहेत. बहुतेक सर्व अशनींमध्ये युरेनियम, थोरियम व पोटॅशियम यांसारखी किरणोत्सर्गी मूलद्रव्ये लेशमात्र असतात. युरेनियम व थोरियम यांच्या मूलद्रव्यांतरणाने (अणुकेंद्रीय विक्रियांनी निराळ्या मूलद्रव्यात रूपांतर होण्याने) हीलियम वायू निर्माण होतो. ताे स्फटिक संरचनेत पकडून ठेवला जातो व बाहेर पडत नाही, असे गृहीत धरतात. नाजूक व सूक्ष्म रासायनिक विश्लेषणाने हीलियम, शिसे, थोरियम व युरेनियम यांचे मापन करून प्रमाण ठरवितात व माहीत असलेल्या मूलद्रव्यांतरणाच्या वेगांवरून अशनीचे वय काढतात. या पद्धतीने पॅनेथ यांनी पुष्कळ अशनींची वये काढली असून ती पृथ्वीच्या वयाशी तुल्य (जुळती) आहेत. पृथ्वीवरील द्रव्यांची वये काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साध्या किरणोत्सर्गी पद्धती अशनीसाठी वापरता येत नाहीत. कारण अशनीवर विश्वकिरणांचा (बाह्य अवकाशातून येणाऱ्या अतिशय भेदक किरणांचा) कितपत भडिमार झालेला आहे, त्याचा घनीभवनापूर्वीचा व नंतरचा इतिहास, तो पृथ्वीवर केव्हा आला इत्यादींबद्दलची माहिती गुंतागुंतीची असली, तरी त्याचे वय ठरविण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असते. परंतु या गुंतागुंतीची अद्यापि पूर्ण उकल झालेली नाही. तथापि शिसे (२०७) – शिसे (२०४) व आरगाॅन (४०) – पोटॅशियम (४०) या पद्धतींनी काढलेली अशनींची वये सर्वांत अचूक असून ती सु. ४·५ × १० वर्षे आली आहेत. यावरून व इतर सर्वसामान्य फलांवरून असे दिसते की, इतर सूर्यकुल निर्माण झाले तेव्हाच अशनी घन स्वरूपात निर्माण झाले असावेत. मात्र त्यांचा त्यानंतरचा इतिहास भिन्न व जटिल असावा.


अशनिविवर (उल्काविवर) : मोठा अशनी वेगाने येऊन पृथ्वीवर आदळल्यामुळे तिच्या पृष्ठावर ज्वालामुखी विवरासारखा खळगा पडतो, त्याला अशनिविवर म्हणतात. अशनीच्या आघातामुळे खडक उचलले जाऊन विवराच्या कडा निर्माण होतात. त्यामुळे विवर वाडग्यासारखे दिसते. मोठ्या अशनींची गती वातावरणाच्या विरोधामुळे अल्प प्रमाणातच घटते. त्यामुळे त्यांची आघाताच्या वेळची गती पुष्कळ असते. ती दर सेकंदाला काही किलोमीटरांइतकी असली, तरी तीमुळे अशनीस प्राप्त होणारी गतिज ऊर्जा आघातानंतर त्याला वितळविण्यास व त्याचे बाष्पीभवन करण्यासही पुरेशी होते. ही गतिज ऊर्जा अल्प काळातच मुक्त होत असल्यामुळे तीव्र स्फोटही होतो. या कल्पनेनुसार ॲरिझोनातील कॅन्यन डिॲब्‍लो (किंवा बॅरिंजर) विवराच्या निर्मितीचे स्पष्टीकरण करता येते. या विवराच्या कडा सभोवतालच्या मैदानापैक्षा ३६ ते ४६ मी. इतक्या उंच असून त्याच्या भोवतालच्या कित्येक किलोमीटरांपर्यंतच्या क्षेत्रात हजारो लहान मोठे अशनी सापडले आहेत. मात्र विवरात अशनी सापडला नाही. त्याच्या भोवताली वाळूच्या कणाएवढे लोह-निकेलाचे असंख्य कणही सापडले आहेत. त्यांच्या संघटनावरून व प्रसारावरून ते धातूंच्या वाफेच्या ढगाचे संघनन होऊ तयार झालेले आहेत, असे दिसून येते. शिवाय कोएसाइट हा उच्च दाबास व तापमानास तयार होणारा सिलिकेचा प्रकारही तेथे १९६० साली सापडला. यांवरून हे विवर अशनिपाताने निर्माण झाले आहे, याची खातरजमा झाली. ते सु. ५०,००० वर्षांपूर्वी निर्माण झाले असावे. मध्ये ऑस्ट्रेलियातील हेनबरी व अरेबियाच्या वाळवंटातील वाबर येथील विवरांच्या अध्ययनावरूनही वरील गोष्टींना दुजोरा मिळाला आहे. वाबर येथे उष्णतेने काही भागाचे बाष्पीभवन झाल्याचे आढळले. कारण तेथे पमिसासारख्या काचमय पदार्थाचे पुंज आढळले असून त्यांतील काळसर किंवा करडसर काचेत लोह-निकेल मिश्रधातूचे असंख्य सूक्ष्म गोलक असल्याचे दिसून आले. सारेमा (एस्टोनिया), वूल्फ क्रीक (ऑस्ट्रेलिया), हॅविलंड व ओडेसा (अमेरिका) इ. विवरे अशनिपाताने निर्माण झाल्याचे सिद्ध झाले आहे. इतर विवरांच्या बाबतीतही अशनिपाताची शक्यता सुचविण्यात आलेली असली, तरी तसे अद्यापि सिद्ध झालेले नाही.

सर्व विवरे भूवैज्ञानिक दृष्ट्या अलीकडची असली तरी ऐतिहासिक दृष्ट्या ती प्राचीनच आहेत. मात्र ३० जून १९०८ रोजी रशियातील तुंगूस्का नदीच्या खोऱ्यात पडलेल्या मोठ्या अशनीमुळे निर्माण झालेली व सिखोटे अलीन अशनिपाताने निर्माण झालेली विवरे ही अगदी नुकतीच तयार झालेली आहेत. २२० टनांचा अशनी दीडशे वर्षांतून एकदा तर बॅरिंजर विवराएवढे विवर निर्माण करू शकेल इतका मोठा म्हणजे सु. ५०,००० टन वजनाचा अशनी लाख वर्षातून एकदाच पडण्याचा संभव असतो.

स्फोटाने निर्माण होणारा खळगा व या विवरांमध्ये पुष्कळ साम्य असले तरी त्यांच्यात भेदही असतात. अशनिविवरे काही बाबतीत चंद्रावरील खळग्यांसारखी असल्यामुळे चंद्रावरील खळगेही अशनिपातामुळे निर्माण झाले असावेत असा शास्त्रज्ञांचा कसायआहे. कोष्टक क्र. ३ मध्ये काही अशनिविवरांसंबधी थोडक्यात माहिती दिलेली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचा खळगा हाही अशनीच्या आघाताने निर्माण झाला असावा, असे अलीकडेच आढळून आले आहे. या विवराचा व्यास सु. १,९०० मी. आहे तर खोली अंदाजे १९० मी. आहे. शास्त्रज्ञांच्या मते दहा लाख वर्षापूर्वी वीस लक्ष टन वजनाचा अशनी पडल्याने हे विवर निर्माण झाले असावे. बेसाल्ट खडक असलेल्या भागातील हे एकमेव असे विवर असावे.

कोष्टक क्र. ३. काही अशनिविवरे व त्यांची वैशिष्ट्ये 

अशनिविवराचे नाव व स्थान 

व्यास (मीटर) 

खोली (मीटर) 

वैशिष्ट्य 

कॅन्यन डिॲब्लो किंवा बॅरिंजर (ॲरिझोना) 

१,२७५ 

१८० 

नमुनेदार व बरेचसे चौरसाकृती विवर. 

ओडेसा (टेक्सस) 

१६० 

६ 

१९२१ मध्ये सापडले. त्यात अशनी सापडले. 

ब्रेनहॅम (कॅनझस) 

५० 

२·७५ 

अशनी सापडले. 

हॅविलंड (कॅनझस) 

— 

— 

लहान उथळ विवर. 

चुब (कॅनडा) 

३,५०० 

— 

अशनी सापडले नाहीत. अशनि पाताने निर्माण झाल्याचे सिद्ध झालेले नाही. 

बॉक्स होल (ऑस्ट्रेलिया) 

१७५ 

१५ 

वर्तुळाकार, अशनी सापडले. 

हेनबरी (मध्य ऑस्ट्रेलिया) 

२००* 

१४ 

१३ विवरांचा गट. एकात १८० किग्रॅ. वजनाचा अशनी सापडला. 

डालगारंगा (प. ऑस्ट्रेलिया) 

६९ 

४·५ 

१९२३ मध्ये येथे धात्विक अशनी सापडले. 

वूल्फ क्रीक (प. ऑस्ट्रेलिया) 

८५० 

४९·५ 

सर्वांत मोठे वर्तुळाकार विवर. 

कांपो देल सिएलो (उ. अर्जेंटिना) 

६८* 

— 

हा विवरांचा गट अशनिपाताने निर्माण झाल्याचे सिद्ध झालेले नाही. 

सारेमा (अझेल, द. अरेबिया) 

९१* 

— 

सात विवरांचा गट. विवरांत पाणी साचलेले आहे. 

वाबर (द. अरेबिया) 

९०* 

१२ 

दोन विवरे. 

अशांटी (प. आफ्रिका) 

५० 

४·५ 

अशनिपाताने निर्माण झाल्याबद्दल शंका आहे. 

आवेल्ल (प. सहारा) 

२५० 

— 

याचे अध्ययन व्हावयाचे आहे. 

काआलिजार्व्ह (एस्टोनिया) 

१०० 

५ 

— 

मेरवेदर (उ. लॅब्रॅडॉर) 

१४० 

३८ 

अशनी सापडले नाहीत. 

कारुंडा (ऑस्ट्रेलिया) 

— 

 

काही अशनी वाळूत पडून निर्माण झालेले सेंमी. विवर. 

तुंगूस्का (रशिया) 

४९* 

४·२५ 

दि. ३० जून १९०८ रोजी झालेल्या अशनिपाताने निर्माण झालेला विवरांचा गट. 

सिखोटे अलीन (रशिया) 

९०* 

१२ 

दि. १२ फेब्रुवारी १९४७ रोजी झालेल्या अशनिपाताने निर्माण झालेला एकशे सहा विवरांचा गट. 

* विवरांच्या गटातील सर्वांत मोठ्या विवराचा व्यास. 

उत्पत्ती : अशनी कोठून येते असावेत याबद्दल मानवाला प्राचीन काळापासून कुतूहल वाटत आलेले आहे. त्यासंबधी निरनिराळे तर्कही केले गेले. ते सूर्यापासून येत असावेत असे ग्रीक मानीत. काहींना ते पृथ्वीवरील तर काहींना चंद्रावरील ज्वालामुखीतून फेकले गेलेले दगड असावेत असे वाटे. अशनी पृथ्वीबाहेरून येतात हे सर्वप्रथम क्लाडनी यांनी १७९४ साली सांगितले. १८३३ च्या उल्कावृष्टीपासून हे मत मान्य होऊ लागले. अशनी पृथ्वावरून येतात याबद्दल आता दुमत नाही. परंतु त्यांच्या उत्पत्तीबद्दल निरनिराळी वादग्रस्त मते मांडण्यात आलेली आहेत. भौतिक व रासायनिक दृष्ट्या अशनी अत्यंत जटिल असे पदार्थ आहेत. त्यामुळे साध्या व सोप्या सिद्धांताने त्यांच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण करता येत नाही. अशनींच्या उत्पत्ती संबंधी दोन मुख्य परिकल्पना आहेत. अशनी अवकाशातील वायू किंवा धूळ यांच्या संघननापासून (एकत्रीकरणाने) निर्माण झालेले पुंज असावेत. या परिकल्पनेनुसार अशनींच्या जटिल संरचना कशा निर्माण झाल्या असाव्यात याचे कोणीही पुरेसे स्पष्टीकरण केलेले नाही. सूर्यकुल व इतर खस्थ पदार्थ ही अशाच तर्‍हेने उल्काभांपासून निर्माण झाले असावेत अशीही कल्पना आहे. दुसऱ्या परिकल्पनेनुसार पृथ्वीप्रमाणे रासायनिक संघटन असलेल्या परंतु पृथ्वीपेक्षा लहान अशा मध्यम आकारमानाच्या ग्रहाचे तुकडे होऊन अशनी निर्माण झाले असावेत व त्याच्या गाभ्यापासून धात्विक व कवचापासून आश्मिक अशनी तयार झाले असावेत. अशनींचा खडबडीतपणा व लहानमोठे आकारमान यांच्यामुळे या मताला दुजोरा मिळतो. शिवाय या परिकल्पनेनुसार अशनींच्या पुष्कळ वैशिष्ट्यांचेही स्पष्टीकरण देता येते. परंतु ८५०° से. ला. नष्ट होणारी विडमानस्टाटेन संरचना अशा ग्रहाचे तुकडे होताना निर्माण होऊ शकणाऱ्या अधिक तापमानात कशी नष्ट झाली नाही? काँड्राइटांमध्ये लोह कोठून आले? काँड्र्युल कले निर्माण झाले? इ. प्रश्नांचे निराकरण होणे आवश्यक आहे. फार पूर्वी गुरू व मंगळ यांच्यामधील एका ग्रहाचे तुकडे होऊन लघुग्रह निर्माण झाले असावेत, अशी लघुग्रहांच्या निर्मितीसंबंधीही एक परिकल्पना आहे. शिवाय काही अग्निगोलांच्या विश्वासार्ह निरीक्षणांवरून त्यांच्या वातावरणात येण्यापूर्वीच्या कक्षा ह्या काही लघुग्रहांच्या कक्षांसारख्या असाव्यात असे दिसून आले. यावरून उल्काभ हे लघुग्रहांचे तुकडे किंवा लघुग्रहांपैकी असावेत अशी परिकल्पना मांडण्यात येते. अशनींच्या उत्पत्तीसंबंधी अधिक माहिती मिळु शकल्यास तिच्यामुळे सूर्यकुलाच्या उत्पत्तीवर व भवितव्यावरही अधिक प्रकाश पडू शकेल.


इतिहास : उल्का व अशनी यांचा इतिहास वेगळा करता येत नाही. उल्कापात भावी संकटाचा सूचक असतो, ही समजूत सर्वत्र आढळते. पूर्वी अशनींची पूजाही केली जात असे. एफेसस (आशिया मायनर) येथील डायना व सायप्रसमधील व्हीनस या देवतांच्या मूर्ती, रोममधील न्यूमाची ढाल, मक्केतील काबा मशिदीच्या भिंतीमधील काळा दगड. सीरियामधील एमेसातील काळा दगड व मेक्सिकोतील चोलुला पिरॅमिडातील दगड हे सर्व अशनी असून ते पूजनीय मानले जातात. लोह हा धातू खगोलातील असावा अशी पूर्वी सर्वत्र समजूत असावी. कारण पुष्कल भाषांमधील अशनीला असलेल्या शब्दाचा आकाशाशी संबंध असलेला आढळतो. प्राचीन काळापासून उल्कापात किंवा अशनिपात यांच्या स्थळकाळाबद्दलच्या नोंदी होत आलेल्या आहेत. त्यांतील काही पुढे दिलेल्या आहेत. चीन, ईजिप्त, ग्रीस व इतरही देशांमधील प्राचीन ग्रंथांमधून उल्का व अशनी यांच्या संबंधीची वर्णने आढळतात. सर्वात जुनी नोंद बुक ऑफ जोशुआमध्ये आहे. चिन्यांनी इ. स. पू. ६८७ मध्ये उल्कापाताची व इ. स. पू. ६४४ मध्ये अशनिपाताची नोंद केलेली आहे. इ. स. पू. ६५४ मध्ये रोमजवळील अल्बांपर्वतावर दगड पडल्याचे लिव्ही यांनी व इ. स.  पू. ४६७ मध्ये ईगस्पॉटामाय येथे अशनी पडल्याचे प्लिनी व प्लूटार्क यांनी लिहून ठेवले आहे. इ. स. पू. ६१६ मध्ये अशनी पडून कित्येक रथ मोडले व दहा माणसे मेली असा चिन्यांनी उल्लेख केलेला आहे. ५९९ साली ईजिप्तमध्ये पडलेल्या उल्का टोळांच्या थव्यांप्रमाणे दिसल्या. १८ फेब्रुवारी १४९२ रोजी एन्‌सिसायम (ॲ्ल्सेस) जवळ अशनी पडला. १५१० साली इटलीमध्ये लाँबर्डी प्रांतात १,१२० दगड पडले. १५९० मध्ये फ्रान्समध्ये तेजस्वी उल्का दिसली. १७५१ साली हर‌ॅशिनाजवळ अशनी पडला. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात क्लाडनी व डी. ट्रॉयली यांनी अशनी हे तुटलेले तारे होत असे सांगितले. १७९० मध्ये फ्रान्स-स्पेन सरहद्दीवरी पिरेनीजजवळ मोठी उल्का पडली. १७९९ साली हंबोल्ट यांनी अँडीजवरून उल्कावृष्टी पाहिल्याचे लिहून ठेवले आहे. १८०३ साळी लेगलजवळ (फ्रान्स) अशनी सापडले. तेव्हापासून अशनी पडतात हे व १८३३ च्या भव्य उल्कावृष्टीपासून ते अपार्थिव असावेत हे मान्य होऊ लागले. १८६८ साली फादर बासील यांनी अशनी प्रत्यक्ष पडताना पाहिला. १९०८ साली सायबीरियात पडलेला अशनी १९३० मध्ये सापडला. १९३२ मध्ये हेनबरी (ऑस्ट्रेलिया) येथे अशनी सापडले. आधुनिक काळात पंचवीस अशनी तरी घरावर किंवा माणसावर पडल्याचे उल्लेख आहेत. 

भारतातील अशनिपातांसंबंधी पुढील माहिती आढळते. १६२० साली जालंदरला पडलेल्या धात्विक अशनीचे (वजन १६० तोळे) जहांगिरांनी वर्णन केलेले आहे. १९ डिसेंबर १७९८ रोजी रात्री आठ वाजता काशी येथे पूर्णचंद्राप्रमाणे तेजस्वी उल्का पडताना दिसली. ती फुटून मोठा आवाजही झाला व तेथून २२ किमी. अंतरावर काळ्या आवरणाचे दगड पडले. आवरण व दगडाचा काही भाग चुंबकीय असल्याचे आढळले. आतील पांढर्याद भागावर काळसर लहान गोल होते, ते इतर भागापेक्षा कठिण होते. १८२७ साली महू येथे आकाशातून पडलेल्या दगडाने एक माणूस मेला. २६ सप्टेंबर १८७३ रोजी खैरपूर संस्थानात (सिंध, पाकिस्तान) विवृत्ताकार क्षेत्रात दगड पडले. १८७९ मध्ये कळंबी (सातारा) येथए अशनी पडला. १८८५ च्या थोडे आधी आकाशातून पडलेल्या दगडाची लोक पूजा करीत असत असा उल्लेख आढळतो. ६ एप्रिल १९९४ रोजी सकाळई ७ वाजता कुट्टिपुरम (मलबार) येथे अशनी पडला. तो कलकत्ताच्या संग्रहालयातील दुसर्यात क्रमांकाचा अशनी असून त्याचे वजन ३८·४३७ किग्रॅ. आहे. तेथील प्रथम क्रमांकाचा अशनीचे वजन ५६·६५७ किग्रॅ. असून त्याची जास्तीत जास्त लांबी ३० सेंमी. आहे. तो आश्मिक प्रकारचा असून २० ऑगस्ट १९२० रोजी सकाळी ११ वाजता मेडुआ (जिल्हा अलाहाबाद) येथे पडला.

भारतात मुंबई व कलकत्ता येथे अशनींची संग्रहालये आहेत. कलकत्त्याचे संग्रहालय आशियातील सर्वांत मोठे असून तेथे परदेशातून मिळविलेले व दुर्मिळ जातींचे नमुने आहेत. त्यामुळे त्याला जागतिक महत्त्वही आहे. तेथे ४६८ अशनी असून त्यांपैकी १४९ धात्विक व ३१९ आश्मिक प्रकारचे आहेत. रूढ कायद्यानुसार देशात कोठेही पडलेला अशनी ही सरकारची मालमत्ता असते. सापडलेला अशनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत कलकत्त्याच्या संग्रहालयाकडे पाठविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कलकत्त्याच्या संग्रहालयाची व्यवस्था भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था पाहते.

ऋग्वेद, अथर्ववेद (संहिता), तैतिरीय ब्राह्मण, महाभारत, पुराणे इत्यादींमधून उल्का व उल्कापातासंबंधी उल्लेख आढळतात. वराहमिहीर यांनी बृहद्संहितेचा तेहतिसावा अध्याय उल्कांसाठी दिला असून त्यात त्यांची शुभाशुभ फलेही दिलेली आहेत. त्यांनीच अशनी हे नाव प्रथम सुचविले.

उल्कापातासंबंधी पुढील लोकसमजुती आहेत. उल्कापात मृत्यू, दुष्काळ, वादळ किंवा रोगाची साथ इ. संकटांचा सूचक असतो. उल्का म्हणजे पुण्यक्षय झाल्याने पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी येणारे पुण्यात्मे, इंद्राच्या दरबारातील ऋषींचे बोलणे चोरून ऐकणाऱ्या चहाडखोरांचे आत्मे, अग्नीच्या हृदयाचे तुकडे किंवा अनल पक्ष्याची विष्ठा होय. देवांचे रथ घासल्यामुळे उल्कापात होतो. उल्का पडल्याचे कोणाला सांगू नये व राम राम म्हणावे.

संदर्भ : 1. Heide, Fritz, Meteorites, Chicago, 1964.

    2. McKinley, D. W. R. Meteor Science and Engineering, New York, 1961.

    3. Moore, C. B. Ed., Researches on Meteorites, New York, 1962.    

ठाकूर, अ. ना.