उरल अल्ताइक भाषासमूह: यूरोप व आशियातील काही भाषांना उरल अल्ताइक या नावाने संबोधण्याची प्रथा आहे. या भाषांचे भौगोलिक दृष्टीने तीन वर्ग होतात : पहिला उरलियन भाषा या नावाने ओळखला जाणारा वर्ग. फिनो-उग्रिक व सामोयेद असे या वर्गाचे दोन भाग आहेत. जवळजवळ सर्व फिनो उग्रिक भाषा यूरोपात बोलल्या जातात. उत्तरेकडे लॅपिश, फिनिश व एस्टोनियन या असून पूर्वेला पेर्मियन ही झिरियन व व्होतियाक यांनी बनलेली शाखा आहे. निझ्नी-नोवगोरड व ओरेनबुर्ग यांच्या दरम्यान चेरेमिस व मोर्दव्ह या भाषा आहेत. यूरोप व आशियाच्या संधिप्रदेशात उरल पर्वतात सामोयेदला लागून ओस्तियाक व व्होगुल आहेत. मध्य यूरोपात डॅन्यूबच्या खोऱ्यापासून ट्रान्सिल्व्हेनियातील कार्पेथियन पर्वतापर्यंत हंगेरियन पसरलेली आहे, तर चार बोली समाविष्ट असलेली सामोयेद ही उरल पर्वत, हिमसागर यांच्या आसपास भटकणाऱ्या जमातींकडून बोलली जाते. दुसरा वर्ग तुर्की भाषांचा आहे. हा बॉझ्नियातील ओस्मानली बोलीच्या प्रदेशापासून पूर्व सायबीरियातील याकूत या बोलीपर्यंत पसरलेला आहे. तिसऱ्या वर्गात मंगोल (मोंगोल), मांचू व तुंगूझ बोली आणि कदाचित कोरियनचा समावेश होतो.
या भाषांच्या अंतर्गत घटनेत विलक्षण ऐक्य असले, तरी बाह्य रूपातील भिन्नताही तीव्र आहे त्यामुळे या ऐक्याचा विचार करणारे भाषाशास्त्रज्ञ त्यांना एककुटुंबीय मानतात, तर बाह्य रूपाचा विचार करणारे अभ्यासक त्यांच्यात कोणताच संबंध नाही असे म्हणतात. एका बाजूला मंगोल, मांचू, तुंगूझ या भाषा या कुटुंबाची मूळ वैशिष्ट्ये बाळगून आहेत : शब्दाच्या क्रमाबाबत कडकपणा, शब्दाच्या वर्गातील संदिग्धता, क्रियापदात पुरुषवाचक व स्वामित्ववाचक प्रत्ययाचा अभाव इत्यादी. याउलट अगदी पश्चिमेकडील लॅपिश, फिनिश, हंगेरियन इ. भाषांत अगदी यूरोपियन स्वरूपाचा शब्दक्रम, क्रियापदाची पुरुषवाचक रूपे अशी वैशिष्ट्ये आढळतात. शब्दांचे वर्गही बरेच स्पष्ट होतात.
भाषिक घडणीनुसार या भाषांचे तीन गट पडतात : प्राचीन मंगोल व काही अर्वाचीन मंगोल बोली, मांचू व काही तुंगूझ बोली हा एक. दुसरा तुर्की व काही अर्वाचीन मंगोल बोली (बुरिआत इ.), काही फिनो उग्रिक भाषा (व्होगुल, ओस्तियाक, चेरेमिस व काही अंशी मोर्दव्ह). तिसरा लॅपिश, फिनिश, पेर्मियन, हंगेरियन. सामोयेदचे स्थान दुसऱ्या गटात दिसते.
पूर्व व पश्चिमेकडील भाषांतील भेदांना काही कारणे आहेत. उदा., स्वीडिश भाषेच्या प्रभावाने फिनिश मध्ये अतिशय क्रांतिकारक स्वरूपाचे बदल घडून आलेले आहेत. असा प्रभाव लॅटिनचा हंगेरियनवर पडला आहे. त्यामुळे इंडो-यूरोपियन भाषांच्या अभिव्यक्तीचे अनुकरण करून या भाषा बदलल्या आहेत, हे स्पष्ट होते.
पूर्वेकडच्या भाषांतर परकुटुंबातील प्रतिष्ठित भाषांचा असा प्रभाव पडला नाही. शेजारच्या चिनी किंवा तिबेटी भाषांची मदत त्यांचे मूळ रूप टिकवून धरावयासाठीच झाली.
उरलियन भाषा: ज्या विशिष्ट लक्षणांमुळे या भाषा एकाच गटाच्या आहेत असे विधान करता येते, ती लक्षणे अशी : त्यांची ध्वनिसंस्था मर्यादित आहे. त्यांत स्फोटक, घर्षक, सीत्कार, अर्धस्फोटक, द्रव व अनुनासिके यांचा समावेश होतो. व्यंजनसंयोग न होऊ देण्याकडे या भाषांचा कल असून किती व कोणते ध्वनी शब्दारंभी यावेत किंवा शब्दान्ती यावेत, याचे नियम कडक आहेत. स्वरांत विशेष वैचित्र्य आढळत नाही. रूपपद्धती एकत्रीकरणात्मक आहे म्हणजे अनेक शब्द एकत्र गोवून वाक्य बनते. जवळजवळ सर्व भाषांत ही सारखी आहे. वाक्यरचना साधी आहे. गुंतागुंतीची वाक्यरचना काही भाषांतच आढळते.
प्राचीन काळी उरलियन भाषा उरल पर्वत व बाल्टिक समुद्र यांच्या दरम्यान पसरलेल्या होत्या. पण इंडो यूरोपियन व तुर्की यांच्या आक्रमणापुढे माघार घ्यावी लागून त्या पश्चिमेकडे, उत्तरेकडे व उरलच्या पूर्वेकडील प्रदेशात पसरल्या. बऱ्याच काळानंतर सामोयेद सायबीरियात गेले आणि सोळाव्या व अठराव्या शतकांत व्होगुल व ओस्तियाकही तिथे घुसले. डॅन्यूबच्या खोऱ्यात येऊन स्थिर होण्यापूर्वी (इ.स. ८९६) हंगेरियानांनाही बरीच भ्रमंती करावी लागली. हंगेरियानांशिवाय इतर उरलियन भाषांच्या लोकांनी फारशी महत्त्वाची ऐतिहासिक कामगिरी बजावलेली नाही.
अल्ताइक भाषा: तुर्की, मंगोल व तुंगूस या गटांतील साम्यस्थळे महत्त्वाची आहेत. ती ध्वनिव्यवस्थेत किंवा शब्दसंग्रहात किंवा वाक्यरचनेत सापडतात. पण भाषांचे कौटुंबिक संबंध ज्यावरून निश्चित करता येतात, अशा रूपपद्धतीत फारच थोडा पुरावा हाती येतो. तो म्हणजे शब्दाची अवयवात्मक घडण आणि व्यकरणातील फरक प्रत्ययांतून व्यक्त करण्याची सवय.
अर्थघटकांच्या सादृश्यातून भाषिक संबंध विशेष पक्के करता येतात. या दृष्टीने तुर्की व मंगोल या दोन गटांत ते प्रस्थापित करून दाखविता येतात. पण ज्या कारणांनी या भाषांच्या तुलनात्मक अभ्यासाचे काम कठीण झाले आहे ती अशी : (१) त्यांच्या भाषिकासंबंधीच्या माहितीचा अभाव, (२) या भाषिकांत आढळणारा स्थैर्याचा म्हणजे एकाच प्रदेशात दीर्घ काळ राहण्याच्या सवयीचा अभाव, (३) या स्थैर्याच्या आभावामुळे सहजासहजी स्वभाषा टाकून दुसरी भाषा स्वीकारण्याची तयारी, (४) एकाच गटाच्या बोलीत असणारा सादृश्याचा अतिरेक व (५) बहुतेक बोलींत आढळणारी भाषिक परिवर्तनाची मंद गती.
तीन गटांची सामान्य वैशिष्ट्ये: ध्वनिपद्धती: स्वराकर्षण म्हणजे एकाच शब्दातील भिन्न स्वरांचा परस्परांवर पडणारा प्रभाव, या आकर्षणाचा काही व्यंजनांवर होणारा परिणाम. उदा., पुढच्या स्वरांच्या सान्निध्यात व्यंजनांचे तालव्यीकरण. तुंगूझशिवाय इतर भाषांत शब्दारंभी सघोष व्यंजन येऊ न देण्याची प्रवृत्ती. अर्धस्वरांना फारसे महत्त्व नसणे. अंत्य न चा डळमळीतपणा. अभिव्यक्तीचा ठामपणा किंवा काटेकोरपणा या कारणांव्यतिरिक्त व्यंजनयुग्मांचा उपोयग न करणे. शब्दाच्या सुरुवातीला संयुक्त व्यंजने कधीही नसणे. बंद अवयवात शेवटी संयुक्त न येणे. आलेच तर त्यातले आधीचे व्यंजन र किंवा ल असणे.
रूपपद्धती : लिंगभेद नाही. वचने दोनच : एक व अनेक. अनेक वचनाचा वापर फार काटेकोर नाही. धातूंचा विकाररहित उपयोग. धातू नामवाचक किंवा क्रियावाचक असतात. शब्दसिद्धीचे कार्य व व्याकरणाचे कार्य प्रत्यय लावून होते. शब्द व प्रत्यय स्पष्ट असतात. म्हणून अल्ताइकचा परिचय हा प्रत्ययाचा उपयोग करण्याच्या हुशारीवर अवलंबून आहे. हे विधान तुर्कीविषयी जास्त अंशी खरे आहे. प्रत्ययांचे दोन वर्ग पडतात: शब्दसिद्धीचे प्रत्यय व व्याकरणात्मक प्रत्यय (नामाचे किंवा क्रियापदाचे कार्य व्यक्त करणारे). शब्दारंभीचा भाग हा धातुवाचक असतो कारण त्यापूर्वी काहीही येऊ शकत नाही. भारतीय आर्यभाषांप्रमाणे शब्दयोगी अव्ययांचा उपयोग आहे. शब्दांचा रूपांना कोणताही विकार होत नसल्यामुळे रूपपद्धती स्पष्ट व व्याकरणनियमबद्ध आहे. अपवाद जवळजवळ नाहीत. क्रियापदांच्या प्रयोगवाचक प्रत्यायांची संख्या फार मोठी आहे.
नामाच्या वापरात अस्थिरता असून एकच शब्द नाम, विशेषण किंवा क्रियाविशेषण म्हणून वापरता येणे शक्य असते. विशेषत: विशेषण व क्रियाविशेषण यांच्यात गोंधळ अधिक. धातुसाधित नामांची संख्या मोठी असून ही नामे महत्त्वाची आहेत. क्रियापदाला लागणारा प्रत्यय द्विविध असतो. एक भाग काळ, अर्थ इ. क्रियाविषयक माहिती पुरवतो, तर दुसरा कर्त्यासंबंधी. मुळात अल्ताइक भाषा एकावयवी व दोन अवयव असल्यास स्वरान्त होती, असे दिसते.
वाक्यरचना : परस्परसंबंधी शब्दांत व्यवच्छेदक घटक आधी व मुख्य घटक नंतर येतो. विशेषणवाचक शब्द विशेष्यापूर्वी येतो. नाम व विशेषण क्रियापदाने जोडलेले किंवा विधानवाचक रचनेत असल्यास नाम आधी येते. वाक्य व उपवाक्य एकमेकांना जोडताना उपवाक्याला सामासिक नामाचे रूप देण्यात येते.
उभयान्वयी अव्यये व संबंधी सर्वनामांचा अर्थातच पूर्ण अभाव आहे. नामांना जोडण्याचे काम त्यांना जवळजवळ ठेवून होते. पण दोन नामे शेजारी असल्यावर ती एकामागून एक अशी आहेत, की ‘आणि’ ने जोडलेली आहेत, की ‘किंवा’ ने जोडलेली आहेत हे समजणे संदर्भानेच ठरते.
काही महत्त्वाच्या उरल – अल्ताइक भाषा : (१) हंगेरियन (किंवा माग्यार) :फिनो–उग्रिक गटातील सर्वात जास्त संख्येने बोलली जाणारी ही भाषा आहे. बहुतेक भाषिक हंगेरीत राहतात पण काही चेकोस्लोव्हाकिया, यूगोस्लाव्हिया व रूमानियातही आहेत. काही फ्रान्स, ऑस्ट्रिया, अमेरिका या देशांतही स्थायिक झालेले आहेत. हंगेरियन बोलीत सारखेपणा फार आहे. त्यांचे आठ गट मानले जातात. फिनो–उग्रिक भाषांतील सर्वात जुना पुरावा असणारी हंगेरियन ही भाषा आहे. इ. स. १००० पासून काही शब्द व नावे सापडतात आणि पहिले लिखित साहित्य तेराव्या शतकातील आहे. तिची लिपी रोमन आहे. [ → हंगेरियन भाषा ].
(२) फिनिश : फिनिशच्या पुढील बोली आहेत: सूऑमी किंवा फिनलंडची फिनिश व कारेलियन. फिनलंडबाहेर सूऑमी ही रशिया, स्वीडन, नॉर्वे या देशांत बोलली जात असून देशांतर केलेले लोक मोठ्या प्रमाणात अमेरिकेत व ऑस्ट्रेलियातही आहेत. सूऑमीची लिखित परंपरा सोळाव्या शतकापासून आहे. [ → फिनिश भाषा].
(३) तुर्की : तुर्की भाषा तुर्कस्तान, रशिया, इराण, चीन, अफगाणिस्तान, बल्गेरिया, इराक, रूमानिया, ग्रीस, सिरिया, सायप्रस व ईजिप्त या देशांत बोलल्या जातात. १९४७ च्या अंदाजानुसार हे लोक पाच कोटींहून अधिक होते.
तुर्कीचा पहिला लिखित पुरावा आठव्या शतकातला असून तो थडग्यांवरील लेखांच्या स्वरूपात आहे. त्यातील ओरखोनचे लेख बऱ्याच लांबीचे असून त्यांचे चिनी भाषांतरही दिलेले आहे. दहाव्या-अकराव्या शतकांच्या सुमाराला या भाषेत बौद्ध,मॅनिकिअन (मणिसंप्रदाय ) व ख्रिस्ती धर्मसाहित्य सापडते. अकराव्या शतकात बोधपर इस्लामी लेखनही आहे. ऑटोमन साम्राज्याच्या स्थापनेनंतर (१३००) साहित्याची भरभराट झाली. १८५० नंतर ते इराणी व अरबी प्रभावापासून मुक्त झाले आणि त्याच्यावर पाश्चिमात्य साहित्याची (विशेषत: फ्रेंचची )छाप पडू लागली.
(४) मंगोल : भौगोलिक दृष्ट्या मंगोलचे तीन गट पडतात: अफगाणिस्तानची मंगोल, मांचुरियाच्या उत्तरेला ननीच्या खोऱ्यातील दाहुर आणि चीनमध्ये कान्सू प्रांतातील मोंगोर, सेरा योगूर, सानच्वान, सांता व आराग्वा.
लेखनिविष्ट मंगोल तेराव्या शतकात अस्तित्वात आली आणि सोळाव्या शतकात या भाषेला साहित्यिक दर्जा प्राप्त झाला. मंगोलमध्ये ऐतिहासिक साहित्य बरेच आहे. त्यातील १२४० ते १२४२ दरम्यानचा मंगोलांचा गुप्त इतिहास प्रसिद्ध आहे. मंगोल साहित्याचा बराचसा भाग बौद्ध ग्रंथांचा असून लोकसाहित्यही समृद्ध आहे. [ → मंगोल भाषा-साहित्य ].
संदर्भ: 1. Encyclopedie Francaise, Paris, 1937.
2. Meillet, Antoine Cohen, Marcel, Les Langues du Monde, Paris, 1954.
कालेलकर, ना. गो.
“