‘द हेअर ड्रेसर’ (सु. १८००).

उतामारो, कितागावा : (?–१७५३ –? १८०६). ‘उकियो ए’ या जपानी चित्रकला-संप्रदायातील एक प्रमुख चित्रकार व काष्ठठशांच्या रंगीत छापचित्रांचा निर्माता. त्याच्या जन्मस्थळाबाबत मतभेद आहेत. तरुणपणी येडो (सध्याचे टोकिओ) येथे वास्तव्य व तोरियामा सेकिएन या कवि-चित्रकाराच्या मार्गदर्शनाखाली चित्रकलेचे शिक्षण. १७८१ मध्ये पहिले नाव (कितागावा होशो) बदलून ‘कितागावा उतामारो’ असे नाव स्वीकारले. त्सुताया जुझाबुरो या प्रकाशकाने उतामारोस १७८४ च्या सुमारास आश्रय व प्रोत्साहन दिले. या काळातील उतामारोच्या चित्रांवर कियोनागा या चित्रकाराचा दाट प्रभाव होता. ‘ए कलेक्शन ऑफ इन्सेक्ट्स’ (१७८८) या इंग्रजी शीर्षकार्थाच्या तसेच शिओही नो त्सुतो (इं. शी. ए ग्रुप ऑफ शेल कलेक्टर्स, १७८९) या आपल्या चित्रसंग्रहांत निसर्गातील प्राणी, कीटक, फुले, शंख, इत्यादींचे सूक्ष्म अवलोकन करून त्याने सूचक रंगरेखांनी त्यांचे चित्रण केले आहे. १७९० मध्ये त्याने प्रहसनात्मक काव्यांसाठी तयार केलेल्या चित्रांचा संग्रह प्रसिद्ध केला. याच सुमारास त्याच्या निकटवर्ती नात्यातील स्त्रीचा मृत्यू घडला. त्यानंतर त्याने नव्या शैलीतील स्त्रियांची चित्रे काढली. ही चित्रे स्त्रियांच्या उरोभागापर्यंतची व काळ्या अभ्रकाच्या पार्श्वभूमीवर रेखाटलेली होती. किन्तारो व यामाऊबा यांच्या कथेवर आधारलेली विपुल चित्रे त्याने १७९९ च्या सुमारास काढली. हिदेयोशी ॲम्युझिंग हिमसेल्फ विथ हिज फाइव्ह कॉन्क्यूबाइन्स या चित्रामुळे त्याच्यावर सरकारी रोष होऊन त्यास ५० दिवस तुरुंगवास घडला. उतामारो उकियो ए संप्रदायातील सर्वश्रेष्ठ कलावंत मानला जातो. त्याच्या काष्ठठशांच्या रंगीत छापचित्रांमुळे त्यास पश्चिमी जगात लोकप्रियता लाभली. हा मान मिळविणारा उतामारो हा पहिलाच जपानी कलावंत होय. त्याने काढलेली निरनिराळ्या सामाजिक स्तरांतील स्त्रियांची चित्रे, त्यांचे सौंदर्य, देहसौष्ठव, केशभूषा व वस्त्रभूषा या दृष्टींनी लोकप्रिय व गौरवास्पद ठरली. त्याच्या चित्रसंग्रहांपैकी  ‘द ट्‌वेल्व्ह अवर्स ऑफ द ग्रीन हाऊसेस’  हा संग्रह, तसेच कॅचिंग द फ्‍लाइजथ्री गैशा  यांसारखी काही चित्रे संस्मरणीय ठरली आहेत. नागासाकीच्या डच व्यापाऱ्यांनी त्याच्या हयातीतच त्याने काढलेली छापचित्रे यूरोपात पाठविली होती. ‘न्यूयॉर्क पब्‍लिक लायब्ररी’ येथे त्याच्या १३३ छापचित्रांचा संग्रह आहे.

संदर्भ : Kondo, Ichitaro; Trans. Terry, Charles S. Kitagawa Utamaro, Tokyo, 1956.

दिवाकर, प्र. वि.