उत्ताप विच्छेदन : फक्त उष्णतेच्या साहाय्याने एखाद्या पदार्थात रासायनिक बदल करून त्यापासून दुसरे अनेक पदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेला उत्ताप विच्छेदन असे म्हणतात. या प्रक्रियेत मूळ पदार्थातील अणू किंवा रेणू यांची पुनर्रचना होऊन नवीन पदार्थ बनतात. एकापेक्षा जास्त पदार्थ सुरुवातीलाच रासायनिक प्रक्रियेत भाग घेत असल्यास आणि जरी प्रक्रिया घडण्यासाठी उष्णता वापरली, तरी होणारे रासायनिक बदल हे उत्ताप विच्छेदनीय नसतात. ते बदल ⇨ ज्वलन किंवा ⇨ हायड्रोजनीकरणाने होणाऱ्या बदलासारखे असतात. उत्ताप विच्छेदनाने मूळ पदार्थाच्या रेणूंची पुनर्रचना होऊन कमी रेणुभाराचे पदार्थ मिळतात. त्याचप्रमाणे रेणुभारात बदल न होता समघटकीकरण (रेणूंची पुनर्रचना करून नवीन पदार्थ बनविण्याची प्रक्रिया) होऊन त्याच रेणुभाराची समघटकी (सारखेच घटक असलेली परंतु निरनिराळे गुणधर्म व संरचना असलेली) संयुगे मिळतात. तसेच अनेक रेणू एकत्र येऊन उच्च रेणुभाराची संयुगे (बहुवारिके) तयार होतात. परंतु ज्या ऊष्मीय प्रक्रियांत रासायनिक बदल घडविण्यासाठी उत्प्रेरकाची (विक्रियेत भाग न घेता तिची गती वाढविणाऱ्या पदार्थाची) जरूरी असते किंवा ज्या प्रक्रियांत इतर प्रकारच्या ऊर्जांचा (उदा., जंबुपार म्हणजे वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य प्रारणाचा) उपयोग करून रासायनिक बदल घडवून आणण्यात येतो, अशा प्रक्रियांचा उत्ताप विच्छेदनात समावेश केला जात नाही.

नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या पदार्थांचा अभ्यास करण्यासाठी प्रारंभी रसायनतज्ञांनी वापरलेल्या रासायनिक पद्धतींपैकी ही एक पद्धत आहे. मर्क्युरिक ऑक्साइड तापवून ऑक्सिजन तयार करणे व नैसर्गिक रबराचे उत्ताप विच्छेदनाने आयसोप्रेनामध्ये रूपांतर करणे ही या प्रकारच्या प्रक्रियेची उदाहरणे होत. लाकडाच्या उत्ताप विच्छेदनाने पूर्वी मिथेनॉल बनवीत असत.

आधुनिक उद्योगधंद्यांत उत्ताप विच्छेदन प्रक्रिया मोठ्या प्रमाणात वापरली जाते. खनिज तेलाचे भंजन (खनिज तेलातील जड पदार्थांचे तुकडे पाडून हलक्या पदार्थांचे उत्पादन वाढविण्याची प्रक्रिया), काजळीचे उत्पादन, एथिलीन, बायफिनिल व कीटोने यांची रासायनिकरीत्या निर्मिती, दगडी कोळशाचे कार्बनीकरण करून (हवेशिवाय दगडी कोळसा तापवून) कोक, कोळशापासून मिळणारी रसायने व कोल गॅस यांची निर्मिती ह्या धंद्यांत उत्ताप विच्छेदनाची प्रक्रिया वापरली जाते. चुनखडी भाजून चुना बनविणे हाही उत्ताप विच्छेदनाचा एक प्रकार आहे.

औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या बहुतेक सर्व उत्ताप विच्छेदीय प्रक्रिया उच्च तापमानावरच केल्या जातात. अशा प्रक्रियांत मूळ पदार्थाची रासायनिक संरचना मोडून काढण्यासाठी उष्णतेची पातळी राखणे जरूर असते. द्रव, बाष्प, वायू व घन ह्या चारही अवस्थांचा या प्रक्रियांत उपयोग केला जातो. ऊष्मागतिकीदृष्ट्या (उष्णतेच्या इतर ऊर्जा प्रकारांत होणाऱ्या रूपांतराचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राच्या दृष्टीने) या प्रक्रियेत दाब फायदेशीर नसतो, तरीही वायूचे घनफळ कमी करण्यासाठी, विक्रिया वेग वाढविण्यासाठी किंवा द्रव अवस्थेसाठी दाबाचा वापर करतात. तसेच निर्वात स्थितीचाही वापर केला जातो.

सैद्धांतिक व प्रायोगिक दृष्टीने हायड्रोकार्बनांचे उत्ताप विच्छेदन उत्तम होते. मिथेनावर १,३०० से. पर्यंत उष्णतेचा परिणाम होत नाही. १,३००–१,४०० से. तापमानावर त्याचे अपघटन (घटक सुटे होण्याची प्रक्रिया) होऊन हायड्रोजन व काजळी मिळते. इतर वायुरूप अल्केनांचे वायुरूप ४००–६००से. च्या दरम्यान उत्ताप विच्छेदन होते. द्रव अल्केनांचे वायुरूप अल्केनांप्रमाणे अपघटन होते.

ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनांचे उत्ताप विच्छेदन होते. बेंझिनाचे ७५०–८०० से. ला उत्ताप विच्छेदन होऊन बायफिनिल बनते. टोल्यूइनाचे ६००–६५० से, ला उत्ताप विच्छदेन होते. हे विच्छेदन ॲलिफॅटिक स्थितीवर होते. यापेक्षा जास्त तापमानावर बेंझीन, नॅप्थॅलीन, अँथ्रॅसीन, फेनँथ्रीन व बहुवलयी हायड्रोकार्बने मिळतात.

प्राथमिक अल्कोहॉलांचे [→ अल्कोहॉल] ६०० से. तापमानाला अपघटन होऊन ओलेफिने व पाणी किंवा आल्डिहाइडे व हायड्रोजन बनतात. तृतीयक अल्कोहॉलांचे कमी तापमानास अपघटन होऊन ओलेफिने व उच्च तापमानास कीटोने बनतात. ॲलिफॅटिक अमाइनांचे उत्ताप विच्छेदन अल्कोहॉलांप्रमाणेच होते.

ईथराचे १८०–२५० से. ला समघटकीकरण होते. आल्डिहाइडे व कीटोनांचे ७०० से. ला उत्ताप विच्छेदन होते. अमोनियम सायनेटाचे उत्ताप विच्छेदन करून १८२८ मध्ये व्होलर यांनी यूरिया तयार केला. यूरियाचे पुढे अपघटन करून अमोनिया व आयसोसायनिक अम्ल मिळते.

औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची कार्बनी रसायने ही उत्ताप विच्छेदन प्रक्रियेनेच तयार करण्यात येत आहेत. खनिज तेल, नैसर्गिक वायू (खनिज इंधन वायू) व दगडी कोळसा या मूळ पदार्थांपासून बरीच रसायने उत्ताप विच्छेदनाने मिळवितात.

खनिज तेल : खनिज तेलाचे भंजन करून पेट्रोल, रॉकेल इ. तेले तसेच एथिलीन, प्रोपिलीन, ब्युटिलीन, सायक्लोहेक्झेन इ. विविध रसायने मिळतात. त्यांपासून पुढे इतर बरीच रसायने बनवितात [→ खनिज तेल रसायने].

नैसर्गिक वायू : नैसर्गिक वायूतील मिथेन, एथेन, प्रोपेन व ब्युटेन या वायूंचे उत्ताप विच्छेदन करून काजळी, मिथेनाल, फॉर्माल्डिहाइड, क्लोरोफॉर्म इ. रसायने मिळवितात. वरील रसायनांच्या निर्मितीत रेणु-पुनर्रचनेसाठी समघटकीकरण, विहायड्रोजनीकरण (हायड्रोजनाचे अणू काढून टाकणे), ऊष्मीय बहुवारिकीकरण (रेणूंच्या जोडणीने मोठे रेणू बनविणे) व ॲरोमॅटीकरण (वलययुक्त रचना असलेली कार्बनी संयुगे बनविणे) ह्या चार उत्प्रेरकीय उत्ताप विच्छेदनी प्रक्रिया वापरल्या जातात [→ नैसर्गिक वायु].

दगडी कोळसा : दगडी कोळशाचे ७९०–१,०१० से. किंवा ५१०–७९० से. या तापमानावर उत्ताप विच्छेदन करून कोक, बेंझीन, नॅप्थॅलीन, टोल्यूइन, झायलीन व क्रेसोल ही रसायने मिळतात. त्यांपासून पुढे ॲनिलीन, टीएनटी, रंजके, प्लॅस्टिके इ. रसायने संश्लेषणाने (घटक द्रव्यांपासून कृत्रिम रीतीने) बनवितात [→ कोळसा, दगडी]. ऑईल शेलापासून (एक प्रकारच्या बिट्युमेनयुक्त खडकापासून) उत्ताप विच्छेदनाने ⇨ शेल तेल व वायू मिळतात. त्यांपासून पुढे संश्लेषित इंधने व कार्बनी रसायने बनवितात.

मिठारी, भू. चिं.