इव्हॅनव्हो: रशियाच्या मध्य औद्योगिक विभागातील इव्हॅनव्हो ओब्लास्टचे प्रमुख ठिकाण व महत्त्वाचे औद्योगिक केंद्र. लोकसंख्या ४,३४,००० (१९७२). हे मॉस्कोच्या ईशान्येस २३३ किमी. व गॉर्कीच्या वायव्येस १८५ किमी. असून ऊवोत्य नदीकाठी आहे. १९१७ च्या क्रांतीपूर्वी येथे २३ कापडाच्या गिरण्या असल्यामुळे तेव्हाच हे ‘रशियाचे मँचेस्टर’ म्हणून ओळखले जात असे. आजही हे रशियातील कापडाचे प्रमुख केंद्र असून, त्याशिवाय येथे कापड उद्योगाकरिता लागणारी यंत्रसामग्री तसेच रंग, खाणयंत्रे, याऱ्या, कातडीकाम व पादत्राणे, लाकूड, अन्नपदार्थ इत्यादींचे उद्योग आहेत. हे शिक्षणाचे केंद्र असून कापड, रसायन, कृषी, मृदा, वैद्यक वगैरेंच्या तांत्रिक उच्च शिक्षणाकरिता येथे संस्था आहेत.
शाह, र. रू.