इब्न एझ्रा, अब्राहम बेन मेअर : (सु.१०९०–११६४). बायबलवरील एक प्रसिद्ध ज्यू मीमांसक. टोलिडो (स्पेन) येथे जन्मला. आबेन-ईझ्रा ह्या नावानेही तो प्रसिद्ध आहे. त्याच्या बालपणाविषयीची फारशी माहिती ज्ञात नाही तथापि त्याचे तरुणपण अँडलूझीयामध्ये गेले असावे. त्यावेळी त्याची तत्कालीन कवी व तत्त्वज्ञ जूडा हालेव्ही ह्याच्याशी मैत्री झाली. त्याने उत्तर आफ्रिका व ईजिप्त ह्या प्रदेशांत प्रवास केला. त्यानंतर ११४० साली रोम, ११४४ मध्ये लूका व ११४५ मध्ये मँट्युआ ह्या शहरांना त्याने भेटी दिल्या ११५५ मध्ये तो फ्रान्सला व ११५८ मध्ये इंग्लंडला गेला ११६० साली काही दिवस त्याचे वास्तव्य नार्बॉनमध्ये होते. वरील प्रवासांची माहिती त्याच्या विविध ग्रंथात उद्धृत केलेल्या तारखांवरून आढळते.
त्याने आपले बहुतेक लेखन उत्तर आयुष्यात पूर्ण केले असावे. त्याला जरी बायबलवरील टीकेमुळे प्रसिद्धी प्राप्त झाली असली, तरी त्याने तत्वज्ञान, काव्य, व्याकरण, गणित, ज्योतिष वगैरे इतर विषयांवरही विपुल लेखन केले आहे. त्याचे लेखन मुख्यत्वे हिब्रू भाषेतच असून काही लॅटिनमध्ये आहे. याशिवाय त्याने काही अरबी ग्रंथांचे हिब्रूत भाषांतर केले. त्यामुळे ‘इस्पांनो-ज्यू’ संस्कृतीचा प्रसार झाला. त्याचे सर्व आयुष्य भ्रमंतीतच गेले. तो आयुष्याच्या अखेरीस रोममध्ये राहत होता व तेथेच वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी मरण पावला असावा. काहींच्या मते तो स्पेनमधील कालाऑरा येथे मृत्यू पावला.
देशपांडे, सु. र.