इन्फ्ल्यूएंझा : विशिष्ट विषाणूंच्या (व्हायरसाच्या) संसर्गामुळे होणाऱ्या तीव्र रोगाला ‘इन्फ्ल्यूएंझा’ अथवा ‘फ्ल्यू’ असे म्हणतात. या रोगाची मुख्य लक्षणे म्हणजे ताप, अवसन्नता (मरगळणे) आणि कित्येक वेळा उपद्रव म्हणून श्वसन तंत्रशोथ (श्वसन व्यूहातील इंद्रियांची दाहयुक्त सूज) ही होत. या रोगाचे इन्फ्ल्यूएंझा हे नाव ‘सर्दीचा प्रभाव’ या अर्थाच्या इटालियन शब्दावरून १७४३ मध्ये जॉन हक्सहॅम यांनी प्रचारात आणले.
या रोगाच्या साथी उद्भवतात. इतर रोगांच्या साथींपेक्षा या साथी फार झपाट्याने पसरतात. अशा साथी त्वरित निर्माण होतात, त्वरित पसरतात व त्वरित नाहीशा होतात. काही साथी जगभरही पसरतात. अशा साथी दर १० ते ४० वर्षांनी येतात. या रोगात श्वसन तंत्रात विकृती होण्याची शक्यता असते, अशावेळी मात्र मृत्युसंख्या जास्त असते.
हा रोग पुरातन काळापासून माहीत आहे पण त्याचे प्रथम वर्णन १६१० मध्ये करण्यात आले. त्यावेळी रोगाची सुरुवात रशियात झाली व दळणवळण-मार्गांनी रोग सर्व जगभर पसरला. त्यानंतर या रोगाच्या कित्येक साथी उद्भवल्या. १९१८ मधील साथ जवळजवळ एकाचवेळी सर्व जगभर पसरून तीत मुख्यतः तरुण लोक मृत्युमुखी पडले.
या रोगाच्या साथी लाटालाटांनी येतात. १८८९-९० च्या हिवाळ्यात पहिली लाट आली, दुसरी १८९१ च्या वसंतऋतूत व तिसरी १८९१-९२ च्या हिवाळ्यात आली. त्याचप्रमाणे १९१८-१९ मध्ये पहिली लाट वसंतऋतूत, दुसरी तीव्र लाट शरदऋतूत व तिसरी लाट १९१९ च्या वसंतऋतूत आली. आतापर्यंतच्या साथींत १९१८-१९ ची साथ फार मारक ठरली. एकट्या भारतात त्यावेळी सु. सव्वा कोटी लोक मृत्युमुखी पडले.
रोगविषाणू : या रोगाने पछाडलेल्या सर्व रोग्यांच्या कफात हीमोफायलस इन्फ्ल्यूएंझी हा सूक्ष्मजंतू सापडतो. परंतु तोच सूक्ष्मजंतू रोगकारण आहे असे म्हणता येत नाही. १९३३ मध्ये या रोगास कारणीभूत असणाऱ्या विषाणूचा शोध लागला. या विषाणूचे अ, ब आणि क असे तीन प्रकार आहेत. अ विषाणू फार मारक असतो, त्या मानाने ब व क विषाणूंमुळे येणाऱ्या साथी सौम्य असतात. डब्ल्यू. स्मिथ, एफ्. डब्ल्यू. अँड्रूज आणि पॅट्रिक लेडलॉ यांनी लंडन येथे १९३३ साली अ प्रकारचा विषाणू वेगळा केला.
या रोगाच्या विषाणूबद्दल अजून विशेष ज्ञान झालेले नाही. त्याच्या संशोधनाकरिता लंडन येथे जागतिक इन्फ्ल्यूएंझा केंद्र स्थापण्यात आले असून इतरत्रही दुय्यम केंद्रे आहेत. दोन साथींच्या मधल्या काळात हा विषाणू कोठे नाहीसा होतो त्याबद्दल निश्चित कल्पना नाही. अ विषाणुसंसर्गात फुप्फुसाचे उपद्रव अधिक दिसतात.
रोगाचा परिपाककाल (रोगबाधा झाल्यापासून रोगाची लक्षणे दिसेपर्यंतचा काल) साधारणपणे एकदोन दिवसच असतो. रोगाचा प्रसार, रोगी माणसाच्या खोकण्याशिंकण्यामुळे विषाणू हवेत उडून प्रत्यक्ष संसर्गाने होतो. रोग्याचे हातरुमाल, कपडे, भांडी वगैरे गोष्टींमुळेही संसर्ग होऊ शकतो. म्हणजे खऱ्या अर्थाने हा रोग वायुजन्य म्हणता येत नाही. विषाणू श्वसन तंत्रात शिरून तेथील श्लेष्मकलेतील (अस्तरासारख्या पातळ थरातील) कोशिकांचा (सूक्ष्म घटकांचा, पेशींचा) नाश करून तीव्र शोथ उत्पन्न करतो.
लक्षणे : रोगाची सुरुवात एकाएकी थंडी भरून ताप येऊन होते. अतिशय थकवा येऊन सर्वांगात वेदना होऊ लागतात. ताप ३९° ते ४०° से. पर्यंत चढतो, डोके फार दुखते. शरीराच्या सर्व स्नायूंमध्ये तीव्र वेदना होणे हे महत्त्वाचे लक्षण होय. दुसर्या दिवशी खोकला, घसा खवखवणे व घोगरा आवाज ही लक्षणे दिसू लागतात. खोकला कोरडा असल्यामुळे फार त्रास होतो. सु. ९० टक्के रोग्यांत तीनचार दिवसांत ताप कमी होतो व रोग्याला बरे वाटते, पण अशक्तपणा फार असतो. तीनचार दिवसांत ताप निघाला नाही तर श्वसन तंत्रात उपद्रव झाला असे समजावे.
काही रोग्यांत सुरुवातीपासूनच लक्षणे तीव्र असतात. ताप त्वरित ४०° से. किंवा त्यापेक्षा जास्त चढतो. रोगी काळानिळा पडतो व थोड्याच वेळात मृत्युमुखी पडतो. काही रोग्यांत दोनतीन दिवसांमध्ये सूक्ष्म श्वासनलिका आणि फुप्फुसे येथे शोथ होतो. तीव्र पूयमय श्वासनलिकाशोथ होऊन श्वासोच्छ्वास फार जलद चालतो. दर मिनिटाला त्याचे प्रमाण ५० ते ६० पर्यंत असते, त्या मानाने नाडीचे प्रमाण ११० ते १२० च्या वर जात नाही. चेहरा व कान फिकट अंजिरी रंगाचे किंवा चेहरा निस्तेज व ओठ व कान काळेनिळे पडतात. खोकला फार त्रासदायक असून कफ सफेद, फेसाळ किंवा हिरवा पूयुक्त, चिकट अथवा रक्तमिश्रित असतो. छाती तपासल्यास सर्वत्र घोरल्यासारखा घुरघूर आवाज ऐकू येतो. मृत्यूपूर्वी रोग्याला वात होऊन तो बडबडू लागतो.
या रोगाचा जठरांत्र-इन्फ्ल्यूएंझा असा एक प्रकार आहे. त्यात वांती व अतिसार ही लक्षणे असून मलावाटे रक्त जाते.
उपद्रव : खुद्द विषाणुसंसर्गामुळे फारसे उपद्रव होत नाहीत परंतु इतर जंतुसंसर्गांमुळे उपद्रव संभवतात. महत्त्वाचे उपद्रव म्हणजे श्वासनलिकाशोथ व फुप्फुसगोलाणू (न्यूमोकॉकस), मालागोलाणू (स्ट्रेप्टोकॉकस) वगैरे सूक्ष्मजंतूंच्या फुप्फुससंसर्गामुळे होतात. नासाकोटरशोथ (नाक व कवटी यांचा संबंध जोडणार्या हवायुक्त पोकळीची दाहयुक्त सूज), मध्यकर्णशोथ, तोंडावर जर (पुरळ) उतणे हेही उपद्रव होतात. प्रसुप्त क्षयरोग जोराने उपटतो. काही वेळा रोगानंतर फार घाम येतो व तो साधारणपणे एक आठवडाभर येत राहतो. गरोदरावस्थेत हा रोग झाल्यास गर्भपात होण्याचा संभव असतो.
चिकित्सा : या रोगावर प्रतिबंधक असा उपाय अजून उपलब्ध नाही. पूर्वी प्रतिबंधक लस टोचीत पण तिचा विशेष फायदा दिसून आला नाही. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि रोज पोटॅशियम परमँगॅनेटाचा ४००० त १ याप्रमाणे विद्राव करून त्याच्या गुळण्या कराव्या. अलीकडे तीन्ही प्रकारांच्या विषाणूंपासून एकच लस तयार करण्याचे प्रयत्न चालू असून त्यामुळे या रोगावर प्रभावी प्रतिबंधक उपाय सापडण्याची शक्यता आहे.
या रोगावर अजून हमखास असा कोणताही उपाय उपलब्ध नाही. लक्षणानुवर्ती चिकित्सा आणि उत्तम शुश्रूषा एवढेच करणे शक्य आहे. उपद्रव टाळण्यासाठी पेनिसिलिनासारखी प्रतिजैव औषधे [→ प्रतिजैव पदार्थ ] उपयुक्त आहेत.
रानडे, म. अ.
आयुर्वेदीय चिकित्सा : आयुर्वेदात याला वात-कफ-ज्वर म्हणतात. हा नाक व घसा यांमध्ये विकृती निर्माण करून येणारा वात कफात्मक ज्वर होय. यात पडसे, डोके दुखणे, सर्व अंग दुखणे ही चिन्हे प्राधान्याने असतात. हा धातूंच्या दृष्टीने मांसगत ज्वर असतो. प्रथम थोडा घाम काढून लंघन घ्यावे म्हणजे मल, मूत्र व घाम ही व्यवस्थित रीतीने येऊ लागतात भूक लागते व अंग दुखणे थांबते. लंघन देत असताना तहानेच्या वेळी केवळ ऊन पाणी प्यावयास द्यावे म्हणजे तहान कमी होऊन भूक लागेल अंगाचे जाड्य नाहीसे होईल भूक लागल्यावर पातळ पेज देऊन क्रमाने नेहमीच्या अन्नावर आणावे. पडसे फार असेल व अंग दुखत असेल तर त्रिभुवनकीर्ती मधाबरोबर द्यावी. अंग फारच दुखत असेल तर आले व मध यांचेबरोबर महायोगराज गुग्गुळ द्यावा. पिंपळीचे चूर्ण घालून गुळवेलीचा काढा द्यावा. पडवळ, निंब, त्रिफळा, मनुका, नागरमोथा व कुडा यांचा काढा द्यावा.
जोशी, वेणीमाधवशास्त्री
इन्फ्ल्यूएंझा, पशूंतील : माणसामध्ये होणाऱ्या ह्या रोगाच्या दोन साथींच्या दरम्यानच्या काळात रोगविषाणू कोठे असतात ह्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेपुढे एक समस्या आहे. माणसाच्या व डुकराच्या रोगामध्ये काही संबंध असल्याची माहिती पुष्कळ दिवसापासून आहे. डुकरातील परजीवी (दुसर्यावर उपजीविका करणाऱ्या) प्रकारातील फुप्फुसकृमीत माणसाच्या रोगाचे विषाणू (अ प्रकार) सापडले आहेत. ह्या फुप्फुसकृमींचे डिंभ (अळीसारखी अवस्था) मातीतील किड्यांत (मृत्तिकाकृमींत) वास करतात व दहा वर्षे पर्यंत जगतात.
जागतिक आरोग्य संघटनेने १९५७ मध्ये असे निवेदन केले की, दोन साथींच्या मधल्या काळात रोगविषाणू डुकरांच्या ऊतकांत (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांत) सापडत नसले तरी पण संक्रामित (संसर्गित) डुकर-क्षेत्राच्या मातीतील किड्यांमध्ये अव्यक्त स्वरूपाचे विषाणू असण्याचा संभव असून, मातीतील किडे खाणाऱ्या डुकरात ते वाढू शकतात. तथापि डुकराच्या श्वसनतंत्रात रोगविषाणू सापडणे कठीण असते. काहींचे मत असे आहे की, डुकरेही मानवी विषाणूमुळे दुय्यम प्रकाराने संक्रामित होतात, तर इतरांच्या मते विषाणूंचा साठा डुकरामध्येच आहे.
डुकरांचा इन्फ्ल्यूएंझा : हा श्वसनेंद्रियांचा तीव्र प्रकारचा रोग असून थंडीमध्ये होतो. रोग एकाएकी उद्भवतो व कळपातील लहान पिणार्या पिलांत तसेच तरुण डुकरांत संसर्गजन्य (एकाच वेळी) अशी लक्षणे दिसतात. ती मनुष्यातील साथीच्या रोगाप्रमाणेच असून रोगविषाणू माणसाच्या रोगविषाणूसारखेच असतात.
अमेरिकेच्या मध्यपश्चिम भागात १९१८ मध्ये माणसांत साथीचा इन्फ्ल्यूएंझा चालू असताना डुकरांच्या इन्फ्ल्यूएंझाची प्रथम माहिती मिळाली व दोहोंतील रोगविषाणू सारखेच असल्याचे कळून आले. डॉर्सेट, नाइल्स व मॅक्ब्राईड या शास्त्रज्ञांनी डुकराचा रोग माणसातूनच आल्याबद्दलची खात्री करण्याबद्दलचे श्रेय कोएन ह्यांस दिले. ह्या शास्त्रज्ञांनीच रोगाला डुकरांचा इन्फ्ल्यूएंझा किंवा फ्ल्यू हे नाव सुचविले. पुढेपुढे जसजसा दोन्ही रोगकारणांचा अभ्यास केला गेला, तसतसा डुकरामधील रोग माणसापासूनच आला, ह्या विचाराला पूर्वीपेक्षा विशेष चालना मिळाली.
लक्षणे : शिंका येणे, खोकला व कष्टमय श्वासोच्छ्वास, शरीराचे तापमान क्वचित ४०° से. पेक्षा जास्त, भ्रमिष्टपणा थोडीफार अशक्तता, कष्टदायक (हटकून येणारा) खोकला ही लक्षणे आढळतात. मृत्यूचे प्रमाण शेकडा तीस. रोगापासून पूर्ण बरे होणे क्वचितच शक्य असते. बरी झालेली जनावरे रोगवाहक असू शकतात.
चिकित्सा : रोग्याला निराळे ठेवतात व पथारीसाठी उबदार गवत वापरतात. रोगाच्या सुरुवातीसच सल्फा औषधे देणे उपयोगी ठरले आहे.
रोगप्रतिबंध : हिवाळ्यात कॉड माशाचे तेल उपयोगी ठरते. दलदलीची, सर्द, थंड तसेच वाऱ्याचे झोत येणारी जागा व अपुरी पथारी टाळणे तसेच अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील) किरणांचे दिवे वापरणे व अन्नाबरोबर प्रतिजैव औषधांचा वापर ह्यामुळेही रोगप्रतिकारशक्ती वाढते.
घोड्यांचा इन्फ्ल्यूएंझा : घोड्यांमध्ये या रोगाचे गांभीर्य कमीजास्त असले तरी तो सर्व जगभर आढळतो. ह्या तीव्र विषाणुजन्य संसर्गजन्य रोगात निरनिराळे उपद्रव संभवतात.
कारणे : अन्न, पाणी, आसरा यांशिवाय पुष्कळ दिवस बाह्य वातावरणात उघड्या पडलेल्या म्हणजेच प्रदर्शनात दाखविण्यासाठी ठेवलेल्या किंवा विक्रीकेंद्रातून वा व्यापाऱ्याच्या ठाणातून खरेदी केलेल्या तरुण घोड्यांना सामान्यपणे रोग झालेला आढळतो. रोगप्रसार संपर्काने (उदा., घोड्यांनी एकमेकांना हुंगण्यामुळे) किंवा अप्रत्यक्ष म्हणजे अन्न, खरारा करावयाची साधने, तबेल्यातील भांडी, उपकरणे वगैरेंच्या संपर्काने होतो. रोगसंक्रमण (रोगबाधा) झाल्यानंतर २ ते ५ दिवसांनी रोगलक्षणे आढळू लागतात.
लक्षणे : ही दोन प्रकारची असतात. (१) सौम्य व (२) मारक : ह्या प्रकारालाच ‘गुलाबी डोळा’ असे नाव आहे.
(१) सौम्य प्रकारात रोगाची मुदत १० ते १५ दिवस असते. रोगी मलूल होतो, खाणे नाकारतो. शरीराचे तापमान ३९·५° से. पर्यंत वाढते. नाडी जलद व मंद होते. कधीकधी तिच्या प्रमाणावर परिणाम होत नाही पण मंद तसेच हलकी बनते.
(२) मारक प्रकारात लक्षणप्रणाली वरीलप्रमाणेच असली तरी ती तीव्र असते. शिवाय उपद्रव होण्याचाही मोठा धोका संभवतो. सर्वांत गंभीर लक्षणे म्हणजे पडसे व परिफुप्फुसशोथ (फुप्फुसावरील आवरणाची दाहयुक्त सूज) ही होत. यामुळे परिणामी मृत्यूही संभवतो. काही रोग्यांत अतिसार व परिणामी कावीळ उद्भवते. रोग्याचा ताप वाढतो, बाह्य श्लेष्मकला पिवळसर होतात. घोडा मंद होतो, अन्न वर्ज्य करतो व त्याला दुर्गंधीयुक्त, मातट रंगाचे जुलाब वारंवार होतात. इतर काही रोग्यांत पायांचे स्नायू व कंडरा (नाड) रोगपीडित होतात. घोडा एका किंवा अधिक पायांनी लंगडतो व हात लावल्यास त्याला वेदना होत असल्याचे जाणवते.
चिकित्सा : कोणत्याही औषधचिकित्सेपेक्षा रुग्णाची परिचर्या (देखभाल) विशेष महत्त्वाची आहे. ह्या रोगाचे पुष्कळ रोगी उबदार घर, हवेशीर व मोकळेपणाने फिरू शकता येईल अशी बंदिस्त जागा, खाण्यासाठी सुलभपणे पचण्यासारखे खाद्य पदार्थ, स्वच्छ गव्हाच्या भुशाची पथारी, उबदार कपड्यांचे पांघरूण, योग्य प्रमाणात लवणमिश्रित पिण्याचे शुद्ध पाणी वगैरेंमुळे बरे होतात.
प्रतिजैव व सल्फा औषधे दुय्यम प्रकारच्या आक्रमणावर परिणामकारक असतात तसेच उपद्रवाचा धोका कमी करतात. डोळे लवणयुक्त पाण्याने तसेच तोंड व नाक खाण्याचा सोडा व पाणी ह्यांनी वारंवार धुण्याने घोड्याला तरतरी येते. शुद्ध हवा विशेष महत्त्वाची आहे. लौकरात लौकर तज्ञाची मदत घेतल्यास उपयुक्त ठरते.
सकृद्दर्शनी घोडा बरा झाला तरी तो जड कामाला जुंपल्यास रोग उलटण्याचा संभव असतो, तसेच तो पुष्कळ काळापर्यंत रोगवाहक असू शकतो, ह्या दोन गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते. रोगातून बरा झाल्यानंतर योग्य काळजी घेणे जरूरीचे असते.
मांजरांचा इन्फ्ल्यूएंझा : पाळीव मांजराच्या श्वसनमार्गाचा संसर्ग म्हणजेच हा रोग होय. १९४४ मध्ये बेकर या शास्त्रज्ञांनी असे सिद्ध केले की, ह्या रोगाचे कारण एक विषाणू असून, ते एका मांजरातून दुसऱ्यात तसेच प्रयोगादाखल मांजरातून पांढऱ्या उंदरांत दाखल होऊ शकतात. थोड्याच अवधीत हॅम्रे व रेक ह्या दोन शास्त्रज्ञांनी विषाणूंचे स्पष्ट असे वर्णन केले.
संप्राप्ती (कारणे) : रोग अतिशय संसर्गजन्य असून रोगी मांजरे सहसा मेली नाहीत तरी अशक्त होतात व बरी होण्यास जास्त अवधी लागतो. रोगाच्या सुरुवातीस ज्वर, अन्न न खाणे ही लक्षणे आढळतात. डोळ्यांतून व नाकातून श्लेष्मलपूयी (पूमिश्रित चिकट) स्त्राव वाहातो. रोग्याला पुष्कळ शिंका येतात व खोकला येतो. बहुतेक रोग्यांत फुप्फुसशोथाची (फुप्फुसावर सूज आल्याची) लक्षणे स्पष्टपणे आढळत नाहीत तरी देखील पुष्कळांना अग्रखंडाचा (पुढील भागाचा) फुप्फुसशोथ झालेला असतोच. रोगकाळ दोन आठवडे असून नंतर रोग्याला हळूहळू बरे वाटू लागते.
श्वसनमार्गावर तसेच नेत्र श्लेष्मकलेवर (डोळ्याच्या आतील अस्तरासारख्या त्वचेवर) क्षते (लहान जखमा) आढळतात. ह्या भागांच्या श्लेष्मकला लालसर होऊन सुजतात. तीव्र लक्षणे असलेल्या रोग्याला मारून शवपरीक्षा केली तरच फुप्फुसशोथाची क्षते आढळतात. रोगी बरा होता जातो तसतशी क्षते दिसेनाशी होतात. घनीभवन (घट्ट वा भरीव) झालेल्या फुप्फुसाचा भाग गुलाबी भुरकट रंगाचा दिसतो. रोगपरिपाककाल ६ दिवसांपासून १० दिवसांपर्यंत असतो.
प्रयोगशाळेतील प्राण्यांमधील इन्फ्ल्यूएंझा : पांढरे उंदीर, गिनीपिग, ससे वगैरे प्राण्यांना सौम्य प्रकारची शुद्धीहारके (बेशुद्ध करण्याची औषधे) देऊन रोगविषाणू टोचल्याने रोग उत्पन्न करता येतो असे बेकर या शास्त्रज्ञांनी सिद्ध केले. त्यापूर्वी रोगसंक्रमण नाकातून करण्यासाठी वापरलेल्या मात्रेच्या ५० पट मात्रा वापरूनही रोग दाखल करता येत नव्हता, पण नंतर हॅम्रे व रेक ह्या शास्त्रज्ञांनी अंड्यामध्ये रोगविषाणू वाढवून ते उंदरांच्या मेंदूंमध्ये टोचून रोगसंसर्ग साध्य केला. मोठ्या गिनीपिगमध्ये व सशांत रोगामुळे ताप व फुप्फुसशोथ ही लक्षणे आढळली तरी त्यांना मृत्यू येत नाही. लहान गिनीपिग, उंदीर वगैरेंत हीच लक्षणे आढळतात, पण ती मृत्युमुखी पडतात. उंदीर दुसर्या किंवा तिसर्या दिवशी, हॅम्स्टर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी व लहान गिनीपिग पाचव्या ते सातव्या दिवशी मरतात.
पंडित, र. वि.; बापट, श्री. ह.
संदर्भ : Harrison, T. R. & others, Eds. Principles of Internal Medicine, New York, 1962