ऑपॉस्सम : स्तनिवर्गाच्या शिशुधानस्तनी गणातल्या (शिशुधानी म्हणजे जिच्यात पिल्लाची वाढ पूर्ण होते ती मादीच्या उदरावरील पिशवी)
डायडेल्फिडी कुलातला हा प्राणी आहे. या कुलातल्या सगळ्याच प्राण्यांना ऑपॉस्सम हे लौकिक नाव आहे. सामान्य ऑपॉस्सम मूळचा दक्षिण अमेरिकेतला, पण हजारो वर्षांपूर्वी त्याचा उत्तर अमेरिकेत शिरकाव झाला आणि तेथे त्याची आजही भरभराट होत आहे. हा हल्ली उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळतो. याचे शास्त्रीय नाव डायडेल्फिस मार्सुपिॲलिस आहे. उत्तर अमेरिकेतील ऑपॉस्सम डायडेल्फिस व्हर्जिनिॲना या वेगळ्या जातीचा आहे असे काही लोक मानतात. शिशुधानस्तनी गणाच्या तुटक प्रसाराच्या दृष्टीनेही या प्राण्याला महत्त्व आहे.
सामान्य ऑपॉस्सम साधारणपणे मांजराएवढा व करड्या रंगाचा असतो. अंगावरील केस दाट व लोकरीसारखे शेपूट लांब, परिग्राही (धरण्याकरिता उपयोगात येणारे) तिच्यावर खवले व तुरळक केस मुस्कट लांबोडके पाय आखूड पण मागचे जास्त लांब पायांवर प्रत्येकी पाच बोटे आंगठा इतर बोटांसमोर आणता येतो बोटांवर नखर (नख्या) असतात पण आंगठ्यावर नसतात.
ऑपॉस्सम बहुधा झाडांवर राहतात भक्ष्य मिळविण्याकरिता ते संध्याकाळी व रात्री बाहेर पडतात फळे, किडे, कोंबड्या आणि लहान पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेले) प्राणी ते खातात. हिवाळ्यात ऑपॉस्सम बरेच झोपतात पण ही शीतनिष्क्रियता (हिवाळ्यातील गुंगी) नसते.
मादीच्या उदरावर शिशुधानी असते. गर्भावधी (गर्भारपणाचा काळ) १२-१३ दिवसांचा असतो मादीला दर खेपेस २० पर्यंत पिल्ले होतात पण सगळी जगत नाहीत जन्माच्या वेळी पिल्लाची लांबी सु. १·२५ सेंमी. आणि वजन सु. २ ग्रॅम असते मादी पिल्लांना शिशुधानीत ठेवते प्रत्येक पिल्लू स्तनाग्र तोंडात धरून चिकटून राहते. पिल्ले झपाट्याने वाढतात व शंभर दिवसांनंतर शिशुधानीतून बाहेर पडून मादीच्या पाठीवर केसांना घट्ट चिकटून काही दिवस राहतात.
शत्रूने हल्ला केल्यावर ऑपॉस्सम मेल्याची बतावणी करून बराच वेळ पडून राहतो व आपला बचाव करतो.
कर्वे, ज. नी.
“