ऑक्सिजन–न्यूनता : ज्या अवस्थेमध्ये शरीरातील ऊतकांना (समान रचना व कार्य असलेल्या शरीरातील सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या समूहांना) ऑक्सिजन वायूचा पुरवठा कमी पडतो, त्या अवस्थेला ऑक्सिजन–न्यूनता (ऑक्सिजनाची कमतरता) असे म्हणतात. या अवस्थेला पुढील चार कारणे संभवतात :
(१) हवेतील ऑक्सिजनाचा दाब कमी असणे :गिर्यारोहक आणि वैमानिकांना उंच गेल्यानंतर विरल वातावरणातील ऑक्सिजनाचा दाब कमी पडल्यामुळे फुप्फुसांतून पुरेसा ऑक्सिजन शोषिला जात नाही.
अशीच परिस्थिती इतर कित्येक वेळाही उत्पन्न होऊ शकते. पाण्यात बुडणे, घशात अथवा श्वासनलिकेमध्ये बाह्य पदार्थ अडकणे, फुप्फुसशोथ [→ न्यूमोनिया],फुप्फुसाच्या वायुकोशांतील शोफ (सूज), श्वसनस्नायूंचा पक्षाघात, दमा, वातवक्ष (छातीत हवा अगर वायू अडकल्याने फुप्फुसाचे कार्य अंशत: किंवा पूर्णपणे बंद पडणे) वगैरे विकारांत ऑक्सिजनाचा दाब नेहमीइतकाच असला तरी पुरेसा ऑक्सिजन रक्तात शोषिला न गेल्यामुळे ऑक्सिजन–न्यूनता संभवते.
(२) रक्तातील तांबड्या कोशिकांमधील हीमोग्लोबिन कमी पडल्यामुळे पुरेसा ऑक्सिजन शोषिला जात नाही. तसेच कार्बन मोनॉक्साइडासारख्या दुसऱ्या वायूचा हीमोग्लोबिनाशी संयोग झाल्यास ऑक्सिजन शोषिला जाण्याची क्रिया कमी पडून ऑक्सिजन – न्यूनता संभवते.
(३) हृद्विकारामुळे अथवा वाहिन्यांतील रक्तप्रवाहास अडथळा उत्पन्न झाल्यामुळे रक्तप्रवाह मंद होतो व त्यामुळे ऑक्सिजन–न्यूनता संभवते.
(४) सायनाइडासारख्या विषांचा ऊतकांशी संयोग झाल्यास त्यांची ऑक्सिजन वापरण्याची शक्ती नाहीशी होते व त्यामुळेही ऑक्सिजन–न्यूनता संभवते.
लक्षणे: ऑक्सिजन–न्यूनता आकस्मित झाल्यास मेंदूला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मनुष्य एकदम बेशुद्ध पडतो. थोड्याच वेळात ऑक्सिजन न मिळाल्यास मृत्यू ओढवतो.
ऑक्सिजन–न्यूनता हळूहळू वाढत गेल्यास प्रथम मन:स्थिती उद्दीपित आणि प्रफुल्ल होते, पुढे मनावरील ताबा सुटल्यासारखा होऊन निष्कारण ओरडणे, भांडणे वगैरे लक्षणे दिसतात. भूक नाहीशी होऊन वांत्या होतात, तहान लागते, थकवा लवकर येतो. हृद्स्पंदन जोराने व वेगाने होऊ लागून रक्तदाब काही वेळ वाढतो परंतु थोड्याच वेळानंतर हृद्कोशविस्तार होऊन (हृदयाच्या कप्प्याचा विस्तार होऊन) रक्तदाब कमी होतो. शरीराला नीलवर्णता (त्वचा निळी होणे) येते. श्वास उथळ, वेगाने व जोराने चालून थोड्या श्रमानंतरही धाप लागते. मद्यातिरेकासारखी सर्व लक्षणे दिसतात. हृद्विकार अथवा वाहिनीरोधामुळे अशी न्यूनता उत्पन्न झाल्यास मूळ विकाराची लक्षणे दिसतात. सायनाइडासारख्या विषामुळे ऊतकांची, विशेषतः मेंदूतील ऊतकांची ऑक्सिजन शोषून घेण्याची क्रियाच बंद पडल्यामुळे काही सेकंदांत मृत्यू येतो.
वातानुकूलन : हिमालयासारख्या उंच पर्वतावर जाणारे गिर्यारोहक टप्प्याटप्प्याने वर चढत जातात. त्यामुळे त्यांना ऑक्सिजनाच्या कमी दाबाची हळूहळू सवय होत जाते. त्या काळात रक्तातील तांबड्या कोशिकांची संख्या वाढत जाऊन अधिक हीमोग्लोबिन रक्त परिवहनात गेल्यामुळे अधिक ऑक्सिजन शोषिला जाऊन ऊतकांना पुरेसा ऑक्सिजन मिळू शकतो. श्वसनक्रिया उद्दीपित होऊन श्वास खोल घेतला जातो, त्यामुळे वायुकोश संपूर्णपणे उघडले जाऊन जास्त ऑक्सिजन शोषिला जाणे शक्य होते.
साधारणपणे ६,००० मी. उंचीवर हवेतील ऑक्सिजनाचा दाब समुद्रसपाटीच्या दाबाच्या निम्मा असतो व त्यापुढे तो दाब कमी कमी होत जाते. म्हणून उंच प्रवास करणाऱ्या विमानामध्ये ऑक्सिजनाचा वायु–दाब वाढविण्यासाठीच विशेष व्यवस्था करावी लागते अथवा मुखवट्यावाटे ऑक्सिजन पुरवावा लागतो.
पहा : वैमानिकीय वैद्यक.
कापडी, रा. सी.