इख्वान अस्-सफा : ‘शुद्ध धर्मनिष्ठ (सफा) बांधव (इख्वान)’ या नावाची धार्मिक विचारवंतांची संघटना इस्लामच्या शिया पंथाच्या इस्माइली उपपंथीयांनी दहाव्या शतकात बसरा येथे स्थापन केली होती. या विचारवंत आणि अभ्यासू पंडितांचे नेते अबु सुलेमान मुंहमद ऊर्फ अल्‌ मक्‌दिसी आणि अबुल हसन हे दोघेजण होते. एकमेकांच्या मदतीने धार्मिक ज्ञान अधिक शुद्ध आणि अचूक करून कियामतदिनी स्वर्ग प्राप्त करणे, हे ध्येय संघटनेने आपल्यासमोर ठेवले होते. इस्लामच्या तिसऱ्या शतकापासून अरबी पंडितांनी त्यावेळच्या जगातील सर्व ज्ञान आत्मसात करून ग्रीक, रोमन, फार्सी, संस्कृत ग्रंथांचे अरबीत भाषांतर करण्याचे महान कार्य अंगावर घेतले होते. पुढील शतकांत या पंडितांनी तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र, गणित, ज्योतिष इतिहास, भूगोल, रसायनशास्त्र, भौतिक शास्त्रे, धर्मशास्त्र इ. विषयांत स्वतंत्र अभ्यास आणि लेखन करण्यास सुरुवात केली. या पंडितांचे वेगवेगळे गट होते. इख्वान अस्-सफा हा असाच एक अभ्यासगट होता. या अनेक पंडितांनी केलेल्या लेखनाचे संकलन रसाइल इख्वान अस्-सफा  या नावाने प्रसिद्ध आहे. हे संकलन आधुनिक विश्वकोशांच्या धर्तीवर असल्यामुळे हा जगातील पहिला विश्वकोश होता, असे म्हणण्यास हरकत नाही.

रसाइलची एकूण ५१ (काहींच्या मते ५२) प्रकरणे असून त्यांत मुख्यत: गणित, तर्कशास्त्र, भौतिक शास्त्र, मानसशास्त्र, जगदात्मा, धर्मविद्या, साक्षात्कारवादी तत्त्वज्ञान, ज्योतिष, जादू इ. विषय चर्चिले आहेत. दहाव्या शतकातील मुस्लिम समाजाच्या सांस्कृतिक कल्पनांचे आणि ज्ञानाचे प्रतिबिंब या विश्वकोशात उमटले आहे. त्यात पारंपरिक धर्मशास्त्र आणि इतर ज्ञानशाखा यांचा तात्त्विक भूमिकेतून समन्वय केलेला आहे. त्यासाठी कुराणावरही एका विशिष्ट द्दष्टिकोनातून भाष्य केलेले आहे. निरनिराळ्या धर्मांच्या श्रद्धा इस्माइली श्रद्धांशी कशा सुसंगत आहेत, हेही दाखविण्याचा प्रयत्‍न केलेला आहे.

रसाइलमधील विषय आणि आशय यांवर त्यावेळच्या ज्ञात असलेल्या पौर्वात्य तसेच पाश्चिमात्य संस्कृतींच्या ज्ञानसंचिताचा प्रभाव दिसून येतो. सर्वसामान्यपणे ॲरिस्टॉटल आणि मुताझिला यांच्या द्दष्टिकोनांतून कोशाच्या नोंदी लिहिलेल्या आहेत. अरबी साहित्यात या महान ग्रंथाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. या कोशाचे १८५९ साली इंग्रजी भाषांतरही झाले आहे.

संदर्भ : 1. Farrukh, Umar, Ikhwan, al-safa, Beirut, 1953.

            2. Gibbs, H. A. R. Arabic Literature, Oxford, 1963.

            3. The Encyclopaedia of Islam, Vol. III, London, 1970.

नगरकर, व. वि.