इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सायंटिफिक युनियन्स : (I C S U). निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये चालू असलेले शास्त्रीय विषयांतील सैद्धांतिक व अनुप्रयुक्त (व्यवहारात उपयोगी पडणारे) संशोधन एकमेकांच्या सहकार्याने घडवून आणण्यास मदत करणारी आंतरराष्ट्रीय संस्था. ही संस्था १९१९ साली रोम येथे सुरू करण्यात आली. यापूर्वी इंटरनॅशनल रिसर्च कौन्सिल ही संस्था अशाच प्रकारचे काही कार्य करीत होती.

या संस्थेचे सर्वसाधारण काम पाहण्याकरिता एक सर्वसाधारण सभा आहे. या सभेत निरनिराळ्या देशांतील उच्च शिक्षण संस्था, संशोधन संस्था व राष्ट्रीय सरकारे यांनी पाठविलेले साठ सभासद असतात. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या चौदा शास्त्रीय संघटनांचे प्रतिनिधी असतात. या सभेची बैठक दर दोन वर्षांनी भरते व त्यात सभेचे सर्वसाधारण धोरण ठरविले जाते. या सभेने निवडलेल्या अठ्ठावीस सभासदांचे एक कार्यकारी मंडळ असते. त्यात चार मुख्य अधिकारी, राष्ट्रांच्या प्रतिनिधींपैकी दहा सभासद व शास्त्रीय मंडळांचे चौदा प्रतिनिधी असतात. यातील वित्त समिती खर्चाचे अंदाजपत्रक तयार करते. त्यावरून सभासदांच्या वर्गणीची रक्कम ठरविण्यात येते. या संस्थेचा एक विशेष निधी आहे. हा निधी १९५६ साली सुरू करण्यात आला. याच्याद्वारे मोठ्या प्रकल्पांचा खर्च भागविण्यासाठी बाहेरची मदत मिळविण्यात येते.

या संस्थेबरोबर सहकार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या शास्त्रीय संघटना पुढील प्रमाणे आहेत : इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन (IAU, आंतरराष्ट्रीय ज्योतिषशास्त्रीय संघटना), इंटरनॅशनल जिऑग्रॉफिकल (भूगोलविषयक) युनियन (IGU), इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल (गणितीय) युनियन (IMU), इंटरनॅशनल सायंटिफिक रेडिओ युनियन (URSI), इंटरनॅशनल युनियन ऑफ बायोकेमिस्ट्री (जीवरसायनशास्त्र) (IUB), इंटरनॅशनल युनियन ऑफ बायॉलॉजिकल (जीववैज्ञानिक) सायन्सेस (IUBS), इंटरनॅशनल युनियन ऑफ क्रिस्टॅलॉग्राफी (स्फटिकविज्ञान) (IUCR), इंटरनॅशनल युनियन ऑफ जिओडेसी (भूगणित) अँड जिओफिजिक्स (भूभौतिकी) (IUGG), इंटरनॅशनल युनियन ऑफ जिऑलॉजिकल (भूवैज्ञानिक) सायन्सेस (IUGS), इंटरनॅशनल युनियन ऑफ हिस्टरी अँड फिलॉसफी ऑफ सायन्स (विज्ञानाचा इतिहास व तत्त्वज्ञान) (IUHPS), इंटरनॅशनल युनियन ऑफ फिजिऑलॉजिकल (शारीरक्रियावैज्ञानिक) सायन्सेस (IUPS), इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्री (शुद्ध व अनुप्रयुक्त रसायनशास्त्र) (IUPAC), इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड फिजिक्स (शुद्ध व अनुप्रयुक्त भौतिकी) (IUPAP), आणि इंटरनॅशनल युनियन ऑफ थिऑरेटिकल अँड ॲप्लाइड मेकॅनिक्स (सैद्धांतिक व अनुप्रयुक्त यामिकी) (IUTAM).

निरनिराळ्या शास्त्रीय विभागांचे काम करण्यासाठी स्वतंत्र समित्या नेमलेल्या आहेत. कमिटी ऑन स्पेस रिसर्च (अवकाशासंबंधीच्या संशोधनासाठी नेमण्यात आलेली) ( C O S P A R ) ही समिती ⇨ आंतरराष्ट्रीय भूभौतिक वर्ष (इंटरनॅशनल जिओफिजिकल इयर, IGY ) संपल्यावर १९५८ साली भूभौतिक वर्षाचे कार्य चालू ठेवण्यासाठी व त्याची जोपासना करण्यासाठी स्थापन करण्यात आली. शास्त्रीय संशोधनासाठी अग्निबाण आणि उपग्रहांचा उपयोग करणाऱ्या सर्व राष्ट्रीय संस्थांचे सहकार्य मिळविण्याकरिता ही समिती खटपट करते. उपग्रह व अग्निबाणांच्या मार्गाचा शोध घेणे व त्यांची नोंद ठेवणे, दूरमापन (दूर अंतरावरून भौतिक राशींचे मापन करणे), गतिकी (गतिशास्त्र), जागतिक क्षोभरहित (शांत) सौर वर्ष, जागतिक संदर्भ वातावरण, अवकाश जीवविज्ञान, अवकाश तंत्रांचा उपयोग करून वाऱ्यांचे नियंत्रण करणे, माहिती गोळा करणे व प्रसिद्ध करणे अशा विविध विषयांकरिता उपसमित्या नेमलेल्या आहेत. अवकाशातील प्रयोगांमुळे कालांतराने होऊ शकणाऱ्या दुष्परिणामांसंबंधी अभ्यास करण्यासाठी आणखी एक मिश्रसमिती नेमलेली आहे.

फेडरेशन ऑफ ॲस्ट्रॉनॉमिकल अँड जिओफिजिकल सर्व्हिसेस (FAGS) ही संघटना १९५६ साली सुरू झाली. इंटरनॅशनल टाइम ब्यूरो (कालमापन संस्था), इंटरनॅशनल पोलर मोशन (ध्रुवीय गती) सर्व्हिस, परमनंट सर्व्हिस ऑफ जिओमॅग्नेटिक इंडाइसेस (भूचुंबकीय स्थिरांक), इंटरनॅशनल ग्रॅव्हिमेट्रिक ब्यूरो (वजन-मापन संस्था), इंटरनॅशनल कमिशन ऑफ ॲटमॉस्फेरिक ओझोन (वातावरणीय ओझोन वायू), परमनंट सर्व्हिस ऑफ अर्थ टाइड्स (भरती-ओहोटी), इंटरनॅशनल उर्सिग्रॅम अँड वर्ल्ड डे (रेडिओ संदेश व जागतिक दिनमान) सर्व्हिस, मीन सी लेव्हल (सरासरी सागरी पातळी) सर्व्हिस इ. सेवांचा या संघटनेच्या कार्यात समावेश होतो. या संघटनेतर्फे क्‍वार्टरली बुलेटिन ऑफ सोलर ॲक्टिव्हिटी, इंटरनॅशनल सीस्मॉलॉजिकल समरी, टेबल्स ऑफ जिओमॅग्नेटिक इंडाइसेस, Bulletin Mensuel du Bureau Central International de Seismologie, Bulletin Horaire इ. नियतकालिके प्रसिद्ध करण्यात येतात. या संघटनेच्या संचालकांचे कार्यालय टोरँटो, कॅनडा येथे आहे.

आय सी एस यू ॲबस्ट्रॉक्टिंग बोर्ड हे मंडळ १९४९ मध्ये सुरू झाले. हे मंडळ रशियातील ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक इन्फर्मेशन या संस्थेबरोबर सहकार्य करते व भौतिकी, रसायन-शास्त्र व जीवविज्ञान या विषयांतील नवीन माहितीचे सारांश ताबडतोब प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करते. या मंडळाचे कार्यालय पॅरिस येथे आहे.

इंटरनॅशनल जिओफिजिकल कमिटी (IGC) ही समिती आंतरराष्ट्रीय भूभौतिक वर्षाचे (IGY) कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी १९५९ मध्ये स्थापन करण्यात आली. या समितीकडे वातावरणविज्ञान, अणुकेंद्रीय प्रारण, उच्चतर वातावरणविज्ञान, भूचुंबकत्व, ध्रुवीय प्रकाश (ध्रुवीय प्रदेशात आढळणारा विविधरंगी प्रकाशीय आविष्कार) आणि वाती प्रकाश (उच्च वातावरणात आढळणारा प्रकाशीय आविष्कार), सौर क्षोभावस्था, आयनांबर [आयानीभूत थर असलेला वातावरणाचा भाग, → आयनांबर], विश्वकिरण (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर पडणारे अतिशय भेदक किरण). महासागरविज्ञान व भूकंपविज्ञान हे विषय सोपविण्यात आले आहेत. आय जी वाय आणि आय जी सी यांनी जमविलेल्या माहितीचा पूर्ण विनियोग करणे, आय जी वाय द्वारे स्थापन झालेल्या जागतिक निरीक्षण केंद्रांचे कार्य व्यवस्थित चालू ठेवणे, आय जी वाय व आय जी सी यांनी तयार केलेल्या माहितीपर साहित्याचे प्रकाशन करणे व त्या साहित्याची चिकित्सा व उपयोग करण्यास प्रोत्साहन देणे, ही या समितीची मुख्य कामे आहेत. या समितीचे कार्यालय पॅरिस येथे आहे.

सायंटिफिक कमिटी ऑफ अंटार्क्टिक रिसर्च (ICAR) या समितीचे काम १९५८ सालापासून सुरू झाले. आय जी वायचे १९५८ सालातील काम संपल्यावर अंटार्क्टिकासंबंधी शास्त्रीय माहिती गोळा करण्याचे काम सामुदायिकरीत्या चालू ठेवण्यासाठी ही संस्था प्रयत्‍न करते. या संस्थेची कचेरी स्कॉट पोलर रिसर्च इन्स्टिट्यूट, केंब्रिज, इंग्‍लंड येथे आहे.

सायंटिफिक कमिटी ऑन ओशियानिक रिसर्च (ICOR) या समितीचे काम १९५७ साली सुरू झाले. सागरी हवामान, समुद्रातील जीव उत्पत्ती आणि निरुपयोगी झालेल्या किरणोत्सर्गी द्रव्यांची सागरामध्ये विल्हेवाट अशा विविध विषयांसंबंधी जागतिक स्वरूपाच्या शास्त्रीय कार्यास उत्तेजन देण्यासाठी ही समिती प्रयत्‍न करते. या समितीने १९६२ मध्ये सुरू झालेल्या युनेस्कोच्या जागतिक हिंदी महासागर मोहिमेत महत्त्वाचे कार्य केले. हिची कचेरी हँबर्ग येथे आहे.

स्पेशल कमिटी फॉर द इंटरनॅशनल बायॉलॉजिकल प्रोग्रॅम (SCIBP) या समितीचे कार्य १९६३ साली सुरू झाले. ही समिती जागतिक लोकसंख्येची वाढ व नैसर्गिक परिस्थितीतील गरजा यांसंबंधी संशोधन करते. या समितीची कचेरी रोम येथे आहे.

स्पेशल कमिटी फॉर द इंटरनॅशलन इयर्स ऑफ द क्वाएट सन (IQSYC) ही इंटरनॅशनल जिओफिजिकल कमिटी या समितीची एक उपसमिती म्हणून १९६२ मध्ये सुरू झाली. तिलाच १९६३ मध्ये आय सी एस यूची खास समिती करण्यात आली. ही समिती सूर्यावरील परिस्थिती शांत असणाऱ्या वर्षी करावयाच्या आंतरराष्ट्रीय संशोधनाची सर्व व्यवस्था पाहते. या समितीचे कार्यालय लंडन येथे आहे.

वरील समित्यांखेरीज इंटर-युनियन कमिटी ऑन रेडिओ मिटिओरॉलॉजी (IUCRM, १९५९), इंटर-युनियन कमिशन ऑन सोलर-टेरेस्ट्रियल फिजिक्स (IUCSTP, १९६६), इंटर-युनियन कमिशन ऑन स्पेक्ट्रॉस्कोपी (वर्णपटविज्ञान) (IUCS, १९६६), इंटर-युनियन कमिशन फॉर स्टडीज ऑफ द मून (IUCM, १९७०) इ. संघटनांतर्गत समित्या महत्त्वाचे कार्य करीत आहेत. तसेच विकसनशील राष्ट्रांत विज्ञान व तंत्रविद्या यांच्या प्रसारास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कमिटी ऑन सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी इन डेव्हलपिंग कंट्रिज (COSTED) या समितीची १९६६ मध्ये स्थापन करण्यात आली. विज्ञानाच्या शिक्षणाचा सर्वांगीण अभ्यास करण्यासाठीही १९६८ मध्ये एक समिती नेमण्यात आली.

संदर्भ : Europa Publications, Ltd. The Europa Year Book, Vol. I. London, 1972.

ओक, वा. रा.