इंद्रियार्थवाद : (फीनॉमेनॅलिझम). इंद्रियार्थवाद ही एक ज्ञानमीमांसेची उपपत्ती आहे. तिचे प्रतिपादन असे आहे, की मानवाचे ज्ञान इंद्रियगोचर वस्तूंपुरतेच मर्यादित असते. ज्ञानेंद्रियांना प्रतीत होणारी वेदनेच – प्रत्यक्षानुभवात येणाऱ्या गोष्टीच – आपणास ज्ञात होतात. त्यांच्यापलीकडचे काहीही आपल्या ज्ञानकक्षेत येत नाही. अनेक तत्त्ववेत्ते अनुभवांतल्या इंद्रियगोचरांच्या आधाराने अनुभवातीत सद्वस्तूंविषयी निष्कर्ष काढीत बसतात परंतु त्यांच्या चिंतनात केवळ कल्पनेचा व इच्छांकित विचारांचा विलास असतो, तार्किक औचित्य नसते. यास्तव आपण प्रत्यक्षानुभवात आढळून येणाऱ्या गोष्टींचे भौतिक शास्त्रांच्या मदतीने ज्ञान मिळवावे, इंद्रियगोचर घटना आणि त्यांचे निसर्गसिद्ध नियम जाणून घ्यावेत आणि याच विश्वसनीय ज्ञानवैभवात समाधान मानून राहावे, हेच इष्ट होय.
इंद्रियार्थवाद हा अज्ञेयवादास पुष्कळच जवळचा आहे. इंद्रीयार्थवाद म्हणतो, की आपणास फक्त वेदनदत्तेच ज्ञात होतात, अन्य काही नाही तर अज्ञेयवाद म्हणतो, की आपणास इंद्रियानुभवापलीकडील सद्वस्तू सदैव अज्ञात आणि अज्ञेय राहते. अज्ञेयवादानुसार, इंद्रियानुभवापलीकडे काही ना काही सत्-तत्त्व असते परंतु त्याचे स्वरूप आपणास कळू शकत नाही. कांट (१७२४–१८०४), हॅमिल्टन (१७८८–१८५६), मॅन्सल (१८२०–१८७१), स्पेन्सर (१८२०–१९०३), टी. एच्. हक्सली (१८२५–१८९५) आदी विचारवंत अज्ञेयवादी होत [→ अज्ञेयवाद].
इंद्रियानुभवापलीकडे कोणती सद्वस्तू आहे आणि तिचे स्वरूप कसे आहे, या गूढ प्रश्नांविषयी इंद्रियार्थवाद कसलेच तर्क लढवीत बसत नाही. त्याची भूमिका आदर्शवाद, चैतन्यवाद, जडवाद, वास्तववाद यांहून निश्चितच भिन्न आहे. हे अन्य वाद अनुभवातीत सद्वस्तूंविषयी आत्मविश्वासपूर्वक विधाने करतात. आदर्शवादाच्या मते अनुभवातीत सद्वस्तू मनोज्ञ, पूर्ण व आदर्शरूप असते चैतन्यवादानुसार ती चैतन्यमय असते जडवादानुसार ती जडवस्तुरूप असते तर वास्तवादानुसार ती इंद्रियगोचर वस्तूंसारखी असते परंतु इंद्रियार्थवाद ‘त्या पलीकडच्या’ वस्तूविषयी काहीच बोलत नाही.
इंद्रियार्थवाद हा सुसंगत अनुभववादच होय. अनुभवांमध्ये फक्त इंद्रियगोचर वस्तूच प्रतीत होतात, त्यापलीकडील द्रव्य, जडवस्तू, चैतन्य अथवा आत्मा काहीही आढळत नाही. यास्तव या द्रव्यादी गोष्टी सत्य नसून निव्वळ कल्पित असतात, असे म्हणणे अनुभववादी विचारवंतास क्रमप्राप्त होते. ⇨ जॉन लॉकने (१६३२–१७०४) अनुभववादाचे प्रभावी प्रतिपादन केले परंतु ही सुसंगत भूमिका त्याने स्वीकारली नाही. ⇨ डेव्हिड ह्यूमने (१७११–१७७६) मात्र ती स्वीकारली. ‘भौतिक वस्तू म्हणजे केवळ वेदनांचा समुच्चय असतो’ आणि ‘कार्यकारणभाव म्हणजे नियमितपणे आढळून येणारा वेदनांचा अनुक्रम होय’, या इंद्रियार्थवादी प्रतिज्ञा त्यानेच प्रथम उच्चारल्या [→ अनुभववाद]. अनुभवगत गोष्टींचे भौतिकशास्त्रीय ज्ञान हेच खरे ज्ञान होय, हा ⇨ ऑग्यूस्त काँतने (१७९८–१८५७) पुरस्कारलेला ⇨ प्रत्यक्षार्थवाद इंद्रियार्थवादास जुळणारा होता. जे. एस्. मिल (१८०६–१८७३) याने इंद्रियार्थवादाची तत्त्वे स्पष्टपणे प्रतिपादिली. ‘भौतिक वस्तू म्हणजे वेदनांची कायम शक्यता असते’, ही त्याने केलेली व्याख्या प्रसिद्ध आहे. ⇨ अर्न्स्ट माख (१८३८–१९१६) आणि विसाव्या शतकातील तार्किक प्रत्यक्षार्थवादी तत्त्ववेत्ते यांचीही विचारसरणी इंद्रियार्थवादींच आहे [→ तार्किक प्रत्यक्षार्थवाद].
भाषिक विश्लेषणाचा आश्रय करणारे आधुनिक विचारवंत इंद्रियार्थवादाचे प्रतिपादन अभिनव रीतीने तार्किक विधानांच्या परिभाषेत करतात. ते म्हणतात, की भौतिक वस्तुविषयक विधानांचे प्रत्यक्ष अथवा शक्य वेदनदत्तांविषयीच्या विधानांत रूपांतर करता येते. उदा., ‘खोलीतले टेबल टणक व खडबडीत आहे’, असे आपण म्हणतो. या विधानाचा अर्थ असा, की ‘जर आपण त्या टेबलास स्पर्श केला व त्यावरून आपला हात फिरविला, तर आपणास टणकपणाची व खडबडीतपणाची वेदानदत्ते जाणवतील’. म्हणजेच त्या टेबलापासून मिळणारी स्पर्शवेदने प्रत्यक्ष प्रचीतीत उतरलेली नसली, तरी ती शक्य कोटीतली असतात. त्याचप्रमाणे, एखाद्या बंद खोलीतले टेबल या घटकेला कुणीही पाहत नसले अथवा स्पर्शित नसले, तरीही ते अस्तित्वात आहेच आहे, असे आपण म्हणतो. याचा अर्थ एवढाच, की जर एखादा निरीक्षक या घटकेला त्या बंद खोलीत गेला, तर त्याला तेथे त्या टेबलाची रंगस्पर्शादी वेदनदत्ते अनुभवता येतील. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा आपण अनुपस्थित असलेल्या अथवी प्रत्ययास न आलेल्या भौतिक पदार्थांविषयी बोलतो, तेव्हा तेव्हा आपण या शक्य कोटीतल्या वेदनमालिकांविषयीच बोलत असतो म्हणजेच ‘प्राप्य’ अशा वेदनदत्तांविषयीची सापेक्ष विधाने प्रतिपादन करीत असतो. सारांश, भौतिक वस्तुवाचक विधानांचे प्रत्यक्ष अथवा शक्य अशा वेदनदत्तांविषयीच्या सापेक्ष विधानांत भाषांतर करता येते, अशी अलीकडल्या इंद्रियार्थवादाची शिकवण आहे.
परंतु ‘भौतिक वस्तुवाचक केवल विधाने = प्रत्यक्ष वा शक्य वेदनदत्तांविषयीची सापेक्षा विधाने’ हे समीकरण निर्दोष आहे, असे म्हणता येत नाही. या समीकरणातील दोन बाजूंमध्ये असलेला केवल विधान आणि सापेक्ष विधान या दोहोंत व्यक्त झालेला कालनिर्देश तंतोतंत सारखा नसतो. केवल विधान हे प्रत्यक्ष घडलेल्या अथवा घडत असलेल्या घटनेचा निर्देश करते तर सापेक्ष विधान हे घडू शकणाऱ्या, पण प्रत्यक्ष न घडलेल्या घटनांचा हवाला देते. सारांश, या समीकरणात एकप्रकारचा शब्दच्छल आढळून येतो. या शब्दच्छलाने विचारांचा नाहक गोंधळ उडतो. विशेषतः या समीकरणाच्या आश्रयाने जेव्हा आपण कार्यकारभावाची मीमांसा करू लागतो, तेव्हा तर हा गोंधळ पराकोटीस जाऊन पोहोचतो.
संदर्भ : 1. Ayer, A. J. Foundations of Empirical Knowledge, London, 1940.
2. Ayer, A. J. The Problem of Knowledge, London, 1956.
3. Hirst, R. J. The Problems of Perception, London, 1959.
4. Price, H. H. Perception, London, 1932.
केळशीकर, शं. हि.