ऑस्ट्रियन वारसा युद्ध : (१७४०–१७४८). ऑस्ट्रियातील हॅप्सबर्ग गादीच्या वारसासाठी झालेले युद्ध. हॅप्सबर्ग सम्राट सहावा चार्ल्स २० ऑक्टोबर १७४० मध्ये निपुत्रिक मरण पावला. त्याने आपली मुलगी माराया टेरीसाला वारसा मिळावा, अशी तजवीजसर्व यूरोपीय राष्ट्रांच्या संमतीने केली होती. प्रशियाचा फ्रीड्रिख ह्यास ही गोष्ट मान्य नव्हती शिवाय चार्ल्सच्या मृत्यूनंतर माराया व्यतिरिक्त बव्हेरियाचा चार्ल्स ॲल्बर्ट, सॅक्सनीचा राजा तिसरा ऑगस्टस व स्पेनचा राजा पाचवा फिलिप हे उमेदवार हॅप्सबर्ग गादीसाठी पुढे आले. साहजिकच तेढ वाढून युद्ध उद्भवले. ही संधी साधून प्रशियाच्या फ्रीड्रिखने ऑस्ट्रियाचा सायलीशिया प्रांत बळकाविला आणि फ्रान्स, बव्हेरिया, सॅक्सनी आणि स्पेन यांच्या साहाय्याने ऑस्ट्रियावर मे १७४१ मध्ये हल्ला केला. दरम्यान टेरीसाने इंग्लंडशी मैत्रीचा करार केला. फ्रीड्रिखने ऑस्ट्रियन सैन्याचा मे १७४२ मध्ये पराभव केला. तेव्हा टेरीसाने त्याला सायलीशियाचा दक्षिण भाग देऊन इतरांपासून वेगळे केले. नंतर आपल्या विरोधकांचा जून १७४३ मध्ये संपूर्ण पराभव केला. परंतु ह्या ऑस्ट्रियन यशाने असुरक्षित वाटून फ्रीड्रिखने पुन्हा युद्धात भाग घेतला. ड्रेझ्डेनच्या तहान्वये (डिसेंबर १७४५) प्रशियाचा सायलीशियावर हक्क मान्य करण्यात आला. १७४६ च्या जूनमध्ये रशिया ऑस्ट्रियाच्या मदतीस आला. सरतेशेवटी एक्स-ला-शपेलच्या तहान्वये (ऑक्टोबर १७४८) सर्वांनी इतरांचे जिंकलेले प्रदेश त्या त्या राष्ट्रांस परत केले आणि टेरीसाच्या हक्कास मान्यता मिळून वारसायुद्ध संपले.
ह्या यूरोपीय युद्धामुळे तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणातील स्वार्थी तत्त्वशून्य मनोवृत्तींचे चांगलेच दर्शन घडते.
देशपांडे, अरविंद