ऑल्पोर्ट, फ्लॉइड एच् : (? १८९०–   ). अमेरिकन सामाजिक मानसशास्त्रज्ञ. मिलवॉकी येथे जन्म. हार्व्हर्ड विद्यापीठात शिक्षण. १९२२ पर्यंत तेथेच अध्यापन केल्यानंतर नॉर्थ कॅरोलायना व सिराक्यूस या विद्यापीठांत मानसशास्त्र विभागाचे प्रमुख. १९५६ मध्ये सेवानिवृत्त.

एक शास्त्र म्हणून सामाजिक मानसशास्त्राचा विकास घडवून आणण्याचे बहुतांश श्रेय त्यांच्याकडे जाते. समूहमनाच्या संकल्पनेवर त्यांनी हल्ला केला, स्पष्टीकरणाचा आभास उत्पन्न करणाऱ्यासंज्ञांना विरोध केला व सामाजिक मानसशास्त्राने व्यक्ती हाच अभ्यासविषय मानून व्यक्तींच्या सामाजिक वर्तनाच्या प्रत्यक्ष निरीक्षणावर भिस्त ठेवली पाहिजे, या मुद्यांवर भर दिला.

त्यांचा सोशल सायकॉलॉजी (१९२४) हा ग्रंथ सामाजिक मानसशास्त्रातील एका प्रमुख प्रवाहाचे उगमस्थान ठरला. त्यांनी अवलंबिलेल्या अभ्यासपद्धती, छोट्या छोट्या गटांवरील त्यांचे प्रयोग, क्षेत्राभ्यास, अभिवृत्तिमापनाचे प्रयत्न, प्रेरणा-संघर्षविषयक फ्रॉइडच्या संकल्पनांची त्यांनी केलेली वर्तनवादी मीमांसा, सामाजिक संदर्भात संरक्षण प्रयुक्त्यांचा त्यांनी दर्शविलेला कार्यभाग या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. यांतून अनेक संशोधकांनी प्रेरणाही घेतली असून सामाजिक मानसशास्त्रातील ही शाखा वेगाने समृद्ध होत आहे.

राष्ट्र, धर्म, कायदा व औद्योगिक कारखाने यांच्या संबंधात दिसून येणाऱ्यावर्तनबंधांचे ऑल्पोर्ट यांनी प्रेरणा, अभिवृत्ती व सवयी या संकल्पनांच्या साहाय्याने जे विश्लेषण केले, तेही महत्त्वाचे आहे.

पुढे पुढे केवल वर्तनवादी सिद्धांत त्यांना अपुरा व असमाधानकारक वाटू लागला. व्यक्तिव्यक्तींचे संबंध व त्यांतून निर्माण होणारी सामाजिक रचना, सामाजिक मानदंड व सामूहिक कृती या प्रश्नांकडे त्यांनी आपले लक्ष वळवले.

ऑल्पोर्ट यांचे इतर महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे इन्स्टिट्यूशनल बिहेव्हियर (१९३३) व थिअरीज ऑफ पर्सेप्शन अँड द कन्सेप्ट ऑफ स्ट्रक्चर (१९५५) हे होत.

अकोलकर, व. वि.