ऑलिगोकीटा : ॲनेलिडा संघाच्या कीटोपोडा वर्गातील दोन गणांपैकी एक. यात गांडुळे आणि तत्सम प्राण्यांचा समावेश होतो.
ऑलिगोकीट प्राणी प्रामुख्याने जमिनीतील बिळांत व गोड्या पाण्यात राहणारे आहेत, पण यांच्या बऱ्याच जाती समुद्रकिनाऱ्यावर भरती आणि ओहोटी यांच्यामधील क्षेत्रातदेखील राहतात. हे प्राणी ०·५ मिमी. पासून २ मीटरपर्यंत किंवा त्यापेक्षा लांब असतात.
हे प्राणी दंडगोलाकार असून त्यांच्या शरीराचे बाह्य आणि आंतरिक (आतले) खंडीभवन झालेले (खंड पडलेले) दिसून येते. कोणतेही दोन खंड बाह्यतः वलयाकार खोबणीने विभक्त झालेले असतात. आंतरिक खंडीभवन उभ्या व आडव्या पडद्यांनी होते. बहुतेक देहखंडावर शुक (लहान राठ केसांसारखी संरचना) असतात पण निरनिराळ्या जातींत त्यांची संख्या व मांडणी वेगवेगळी असते. शीर्ष व पार्श्वपाद (खंडांच्या बाजूंवर जोडीने असणारे व पोहण्याकरिता उपयोगी पडणारे स्नायुमय लहान अवयव) नसतात. मुख पुढच्या टोकाशी असून त्यावर एक बारीक मांसल भाग म्हणजे अभिमुख (मुखाच्या पुढे असणारा डोक्याचा भाग) लोंबत असतो. गुदद्वार पश्च टोकाशी असते. बाह्य पृष्ठावर बरीच छिद्रे असतात. काही जनन तंत्राची (जननेंद्रियाची) तर काही वृक्ककांची (नळीसारख्या उत्सर्जन इंद्रियांची) असून ती वेगवेगळ्या खंडांवर उघडतात. यांशिवाय पुष्कळ गांडुळांत शरीराच्या वरच्या पृष्ठावर उघडणारी देहगुहेची (शरीरातील पोकळीची) पृष्ठछिद्रे असतात देहगुहेतील द्रवपदार्थ या छिद्रांतून बाहेर पडून बाह्य पृष्ठावर पसरतो, त्यामुळे त्वचा ओलसर राहते.
बहुतेक ऑलिगोकीटांचे भक्ष वनस्पतीजन्य असते पण काही मांसभक्षक, काही परजीवी (दुसऱ्याप्राण्याच्या शरीरात राहून उपजीविका करणारे) व काही सहभोजी (दुसऱ्याप्राण्याच्या अन्नात वाटेकरी होणारे) आहेत. आहारनाल (अन्नमार्ग) देहगुहाखंडांच्या मालिकेतून शरीराच्या एका टोकापासून दुसऱ्याटोकापर्यंत सरळ गेलेला असतो. मुखगुहा, ग्रसनी (मुखगुहेच्या लगेच मागे असलेला अन्ननलिकेचा अग्र भाग), ग्रसिका (ग्रसनीपासून निघून जठरापर्यंत गेलेला आहारनालाचा नळीसारखा भाग) आणि आंत्र (आतडे) यांचा तो बनलेला असतो. गांडुळाच्या आहारनालात वरील भागांशिवाय बहुधा अन्नपुट (अन्न साठविण्याकरिता आहारनालाचा झालेला पिशवीसारखा विस्तार) व पेषणी (जिच्यात अन्न बारीक केले जाते ती कोठडी) हे भाग असतात. बऱ्याच ऑलिगोकीटांच्या आंत्रात अभिशोषण-पृष्ठ (पचलेले अन्न ज्या पृष्ठावरून शोषून घेतले जाते ते) वाढविणारे आंत्रवलन (आंत्राच्या मध्यपृष्ठीय भित्तीची आंत्राच्या पोकळीत गेलेली दुमड) असते. यामुळे पचलेल्या अन्नाचे अभिशोषण करण्याकरिता जास्त क्षेत्र मिळते.
रक्त लाल असते. रक्तात हीमोग्लोबिन (रक्ताचा लाल रंग उत्पन्न करणारे लोहयुक्त प्रथिन) आणि रंगहीन कणिका (रक्तातील सूक्ष्म घटक म्हणजे कोशिका) असतात. मोठ्या अनुदैर्ध्य (उभ्या) रक्तवाहिकांमधून आणि त्यांच्या शाखांमधून सर्व शरीराला रक्ताचा पुरवठा होतो. पुष्कळ जातींत पार्श्वहृदयांच्या कित्येक जोड्या असतात. शरीराचे बाह्य पृष्ठ श्वसनाचे कार्य करते. काही जलचर ऑलिगोकीटांना क्लोम (कल्ले) असतात. डेरोमध्ये ते गुदद्वाराच्या भोवती असतात.
वृक्कक ही ऑलिगोकीटांची उत्सर्जनांगे (निरुपयोगी द्रव्ये शरीराबाहेर टाकणारी इंद्रिये) होत. त्यांच्या जोड्या असून मांडणी खंडशः असते. वृक्ककनलिकेचे एक टोक देहगुहेत आणि दुसरे बाहेर उघडते आणि त्यातून निरुपयोगी पदार्थ बाहेर पडतात. आंत्रभित्तीचा अगदी बाहेरचा स्तर पिवळ्या कोशिकांचा असतो व त्या उत्सर्जनाचे कार्य करतात.
पृष्ठीय प्रमस्तिष्क-गुच्छिका (मेंदूचे कार्य करणारे तंत्रिका-कोशिकांचे म्हणजे मज्जातंतू-कोशिकांचे पुंज), परिग्रसनी-संयोजक (ग्रसनीच्या भोवतालून गेलेली दोन गुच्छिकांना जोडणारी तंत्रिका) आणि युग्मित (जोडी) अधर तंत्रिका-रज्जू यांचे तंत्रिका तंत्र (मंज्जासंस्था) बनलेले असते. प्रमस्तिष्क-गुच्छिका व अधर तंत्रिका-रज्जू यांपासून तंत्रिका निघतात. बाह्यत्वचेत संवेदी कोशिका असतात. काही ऑलिगोकीटांत दृकबिंदू (डोळ्यांचे कार्य करणारे रंगीत ठिपके) असतात.
सगळे ऑलिगोकीट प्राणी उभयलिंगी (नराची व मादीची जननेंद्रिये एकाच व्यक्तीत असणारे) असतात. कोणत्याही व्यक्तीत अंडाशय (स्त्री-जननग्रंथी) आणि वृषण (पुं.-जननग्रंथी) यांच्या दोनपेक्षा जास्त जोड्या नसतात व त्या शरीराच्या पुढच्या भागात असतात. पर्याणिकेच्या (कातडीच्या फुगलेल्या ग्रंथीमय भागाच्या) स्रावापासून तयार झालेल्या कोशात (अंड्याच्या रक्षणाकरिता तयार केलेल्या आवरणात) अंडी आणि शुक्राणू बंद होतात आणि नवीन प्राणी कोशातच उत्पन्न होतो. पुष्कळ जलीय ऑलिगोकीटांत अनुप्रस्थ (आडवे) विखंडनाने (तुकडे होण्याने) अलिंगी जनन होते. सर्व जातींमध्ये कमीअधिक प्रमाणात पुनरुत्पादनक्षमता (शरीराच्या तुटलेला भाग पुन्हा उत्पन्न करण्याची शक्ती) आढळते.
शरीरक्रियाविज्ञान, पुनरुत्पादन, चयापचय (सजीवाच्या शरीरात सतत होणाऱ्याभौतिक व रासायनिक घडामोडी) इत्यादींच्या संशोधनात्मक प्रयोगांत ऑलिगोकीटांचा उपयोग करतात.
पहा : ॲनेलिडा गांडूळ.
जोशी, मीनाक्षी