आल्डर, कूर्ट : (१० जुलै १९०२–२० जून १९५८). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. १९५० च्या रसायनाशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. जर्मनीमील कोनिगशुटे येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी रसायनशास्त्राचा अभ्यास बर्लिन व कील येथे केला. १९२६ मध्ये त्यांना ‘डॉक्टरेट’ पदवी मिळाली. कील येथे प्राध्यापक म्हणून (१९३४–३६) व आय. जी. फार्बेन यांच्या लिव्हरकुशेन येथील अन्वेषणी (संशोधन) प्रयोगशाळेत (१९३६–४०) त्यांनी काम केले. कोलोन विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात ते १९४० मध्ये प्राध्यापक व नंतर विभागाचे प्रमुख झाले.

कार्बनी रसायनशास्त्रातील डाइन या महत्वाच्या वर्गाच्या संश्लेषणासंबंधीच्या (मूलघटक एकत्र आणून बनविण्यासंबंधीच्या) संशोधनाबद्दल त्यांना ओटो डील्स यांच्याबरोबर नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. मॅलेइक अम्ल  किंवा क्विनोने यांमध्ये ब्युटाडाइनांसारखे दोन एकांतरित द्विबंध असणारी संयुगे यांचा समावेश करणे, ही डाइन संश्लेषणातील आवश्यक विक्रिया होय. डील्स व आल्डर यांनी डाइन व क्विनोन यांच्या विक्रियेसंबंधी एक निबंध १९२८ मध्ये प्रसिद्ध केला. अशाच विक्रियांसंबंधी इतर शास्त्रज्ञांनी यापूर्वी लिहिले होते, पण डील्स व आल्डर यांनी या विक्रियेचे स्वरूप प्रयोगाने प्रथम सिद्ध केले व बऱ्याच वलयी (आंगठीप्रमाणे बंद रचना असलेल्या) संयुगांच्या संश्लेषणासाठी या विक्रियेचा उपयोग करून दाखविला. या विक्रियेचे वैशिष्ट्य हे की, क्रियाशील रासायनिक कारकाशिवाय ही विक्रिया होऊ शकते. या विक्रियेने प्लॅस्टिकसारखे पदार्थ तयार केले जातात. बरेच वनस्पतिज पदार्थ निसर्गात डाइनसमावेशन विक्रियेने बनतात, असे आढळून आले आहे. ते कोलोन येथे मृत्यु पावले.

मिठारी, भू. चिं.