आरोग्यविज्ञान : ज्या विज्ञानात स्वास्थ्यसंरक्षणाच्या तत्त्वांच्या व नियमांचा विचार केला जातो त्या विज्ञानाला आरोग्यविज्ञान किंवा स्वस्थवृत्त असे म्हणतात. या विज्ञानाचे आयुर्वेदीय विवरण स्वस्थवृत्त या स्वतंत्र नोंदीत केले आहे [→ स्वस्थवृत्त ].

आरोग्य म्हणजे नुसता रोगाचा अभाव नव्हे. भोवतालच्या परिस्थितीनुरूप शरीर व मन कार्यक्षम असणे, मनाला उत्साह व शरीराला जोम असून जीवन सुखी असणे या गोष्टींचा आरोग्य या संज्ञेत अंतर्भाव होतो. या दृष्टीने आरोग्य या संज्ञेपेक्षा स्वास्थ्य हा शब्द अधिक अर्थवाही आहे.

आरोग्यविज्ञान हे मानवाइतकेच प्राचीन आहे. व्यक्तींच्या आरोग्यविषयक प्रश्नांचा विचार वेदकालापासून केला गेला आहे. स्वच्छता, शुचिर्भूतता, खाद्यपेयांतील वर्ज्यावर्ज्य, पोषाख, दैनंदिन दिनचर्या, विटाळ, भोग व विश्रांती यांवर देशकालानुसार धर्म म्हणून जे निर्बंध घातले गेले ते बरेचसे स्वास्थ्यसंवर्धनासाठी होते. प्राचीन काळी भारतात जी जातिसंस्था उत्पन्न झाली तिचे मूळ वैयक्तिक स्वास्थ्यशास्त्रात असावे असे तज्ञांचे मत आहे. मनुष्यसमाज जसजसा संघटित होत गेला, त्याच्या वसाहती वाढू लागल्या, गावे व शहरे निर्माण होत गेली, तसतसे आरोग्याच्या दृष्टीने काही सार्वजनिक निर्बंध आणि उपाययोजना करणे जरुरीचे वाटू लागले. अलीकडच्या काळात तर या विज्ञानात खूपच प्रगती झाली असून इतर अनेक विज्ञानांच्या मदतीने सार्वजनिक आरोग्य नीट रहावे यासाठी यंत्रणा उभारण्यात आल्या असून काही तत्त्वे, नियम आणि कायदेही करण्यात आले आहेत. ⇨ जागतिक आरोग्य संघटना ही याच विचारांतून स्थापन झालेली असून, तिच्यामार्फत जगातील सर्व देशांना मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात येतात तसेच अनेक रोगांचे निर्मूलन करण्याच्या योजना, बालसंगोपन, आहार वगैरे विषयांसाठी ही संघटना खूप खटपट करीत आहे. मनुष्यजातीच्या स्वास्थ्यसंरक्षणाच्या कामी हा एक फार महत्त्वाचा उपक्रम आहे.

स्वास्थ्यशास्त्राचे दोन स्थूल भाग मानण्यात येतात : वैयक्तिक स्वास्थ्य आणि सार्वजनिक स्वास्थ्य.

वैयक्तिक स्वास्थ्य : आरोग्यविषयक नियमांचे पालन प्रत्येक व्यक्तीने केले नाही, तर सार्वजनिक आरोग्याचे प्रयत्‍न व्यर्थ होतात. मनुष्याच्या सवयींवर त्याचे आरोग्य अवलंबून असते म्हणून लहानपणापासूनच सवयींना योग्य वळण द्यावे लागते. माती खाणे, तोंडात बोटे वा कपडे घालणे, तोंड उघडे ठेवणे अशा सवयी लागणार नाहीत अशी बालपणीच काळजी घ्यावी लागते. आरोग्यदायक सवयी लहानपणापासून लावणे अवश्य असते. खाद्यपदार्थ स्वच्छ, शुद्ध आणि सकस असावेत. खाण्याच्या वेळा नियमित असाव्या. दूषित खाद्यपेये टाळणे, पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबद्दल दक्षता घेणे, संशयास्पद पाणी उकळून, गाळून आणि क्लोरीनसारखे जंतुनाशक पदार्थ घालून वापरणे, मलोत्सर्गाची नियमित सवय वगैरे गोष्टी वैयक्तिक स्वास्थ्य रक्षणात येतात. घामाच्या रूपाने शरीरातील निरुपयोगी व दूषित पदार्थ बाहेर टाकले जात असल्यामुळे नियमित स्‍नान करावे. स्‍नानाने श्रमपरिहार होऊन आल्हाद वाटतो; झोप चांगली येते व त्यामुळे शरीराला विश्रांती मिळते. झोपेनंतर व काही खाल्ल्यानंतर दाततोंड धुणे, बाहेरून आल्यानंतर हातपाय, नाक व डोळे धुणे, हाताची नखे स्वच्छ ठेवणे, नियमित व्यायाम घेणे, कपडे स्वच्छ धुणे, साबण, दंतधावक, पाणी पिण्याची भांडी अलग असणे वगैरे गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहेत.

राहत्या जागेची व परिसराची स्वच्छता ठेवणे, उंदीर, ढेकूण, पिसवा, झुरळे होऊ न देणे वगैरे गोष्टी स्वतःच्या व समाजाच्या दृष्टीने आवश्यक आहेत. सार्वजनिक आरोग्यासाठी जी नियंत्रणे व नियम असतील त्यांचे पालन केले पाहिजे. रोगप्रसार होऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाय योजणे हे स्वतःच्या व समाजाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. संसर्गजन्य रोगाची स्थानिक आरोग्यसंस्थेला माहिती पुरविण्याकडे दुर्लक्ष झाल्यास ते समाजाला आरोग्यविघातक होते.

सार्वजनिक स्वास्थ्य : आरोग्यप्रद गोष्टी उपलब्ध करून देणे, त्याला विघातक असणाऱ्या गोष्टींचे निर्मूलन करणे, रोगप्रतिबंधक उपाय योजणे, रोगचिकित्सेची सोय करणे वगैरे गोष्टी सार्वजनिक स्वास्थ्याची मूलतत्त्वे आहेत. त्यात पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो : (१) राहण्याच्या जागांची निवड, खाजगी व सार्वजनिक इमारतींची मांडणी व बांधणी यांवर नियंत्रण. (२) शुद्ध हवा, पाणी व खाद्यपेये उपलब्ध होतील अशी उपाययोजना करणे. (३) केरकचरा, मलमूत्र, सांडपाणी व मृतांची योग्य विल्हेवाट लावणे. (४) माशा, डास, उंदीर, पिसवा, इ. रोगवाहकांचे निर्मूलन करणे. (५) रोगराई होऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाय योजणे. (६) रोगचिकित्सेची तजवीज करणे. (७) यात्रा, बाजार वगैरे सार्वजनिक ठिकाणी आरोग्यविषयक दक्षता घेणे. (८) आरोग्यमय जीवनाचे महत्त्व पटविण्यासाठी प्रचार करणे.

या सर्व गोष्टींची जबाबदारी पार पाडण्याकरिता स्थापत्य अभियांत्रिकी आणि वैद्यक या शास्त्रांची मदत आवश्यक असते. इमारतबांधणी, शुद्ध पाणी पुरवठा, मलमूत्र व सांडपाणी यांची विल्हेवाट या गोष्टी स्थापत्य अभियांत्रिकीच्या कक्षेतल्या असून त्यांचा विचार ⇨ रोगप्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यक या सदरात येतो [→ वाहितमल संस्करण व विल्हेवाट सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य ]. कारखाने आणि इतर औद्योगिक क्षेत्रांतील कामगारांच्या आरोग्याचा सर्वांगीण विचार कारखान्यातील वैद्यकीय व्यवस्था या सदरात येतो [→ औद्योगिक वैद्यक ].

आरोग्यदायक आणि आरोग्यपोषक उपायांची व्यवस्था खाजगी, सामाजिक, ग्रामीण, निमसरकारी आणि सरकारी संस्थांमार्फत उपलब्ध होण्याची व्यवस्था असते. तरीही जनतेने स्वतःच्या व समाजाच्या आरोग्यासाठी जे करणे अवश्य असते, ते तिच्याकडून अवश्य तर सक्तीने करून घ्यावे लागते. त्याकरिता कायदे व नियम करून त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता अवश्य ती यंत्रणा व साधने उपलब्ध ठेवावी लागतात. अर्थात अशी साधने विनामूल्य किंवा अल्पमूल्यात मिळवून देण्याची जबाबदारी शासनावर असते.

नवजात अर्भके अगदी नाजूक असल्यामुळे कोणत्याही आरोग्यविघातक गोष्टींचा प्रभाव त्यांच्यावर त्वरित होतो. म्हणून लहान मुलांचे आरोग्य सांभाळण्यावर आरोग्यविज्ञानाचा विशेष भर असतो. सुदृढ बालके जन्माला यावी म्हणून त्यांच्या आईवडिलांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे आधुनिक काळात अवश्य समजले जाते. ⇨ कुटूंबनियोजन, ⇨ प्रसवपूर्व परिचर्या आणि ⇨ प्रसवोत्तर परिचर्या या गोष्टी या दृष्टीने आवश्यक असून त्याकरिता खास यंत्रणा केलेली असते. गरोदर आणि नवप्रसव स्त्रियांना योग्य तो सल्ला, औषधपाणी, आहार वगैरे गोष्टी या यंत्रणेमार्फत केल्या जातात. प्रसूतिसमयी योग्य ते उपचार करण्याची सोय व तज्ञांची मदत प्रसूतिगृहामार्फत उपलब्ध होते.

लहान मुलांना विशिष्ट रोगांपासून संरक्षण देण्यासाठी प्रतिबंधक लस टोचण्याची व्यवस्थाही आरोग्य खात्यामार्फत होते. देवी, बालपक्षाघात, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षय आणि घटसर्प यांच्याविरुद्ध प्रतिबंधक उपाय म्हणून लस टोचण्याची व्यवस्थाही नगरपालिकांसारख्या स्थानिक संस्थांमार्फत केली जाते.

अन्न, पाणी व हवा यांच्यामार्फत शरीरात आरोग्यविघाताक जंतू प्रवेश करतात अथवा जखमेतून संसर्ग करतात. काही रोग संसर्गजन्य तर काही रोगवाहकांमार्फत पसरतात. म्हणून अन्नादिकांच्या शुद्धतेकडे सार्वजनिक आरोग्य खात्याला सतत लक्ष द्यावे लागते.

हवा शुद्ध राहील व भरपूर प्रमाणात खेळेल अशी व्यवस्था करावी लागते. औद्योगिक कारखान्यातील धुरामुळे अगर त्यात उत्पन्न होणाऱ्या वायूमुळे आणि धुळीमुळे हवा शुद्ध राहत नाही. म्हणून योग्य ते उपाय करणे हे आरोग्यविज्ञानाच्याच कक्षेत येते. कुजणारे पदार्थ, मलमूत्र, केरकचरा यांमधून दुर्गंधी व जंतू निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांची वेळच्या वेळी विल्हेवाट लावणे हे सार्वजनिक आरोग्य खात्याचे महत्त्वाचे काम आहे. हे पदार्थ त्वरित निकालात काढणे अशक्य असल्यास तात्पुरता उपाय म्हणून त्यांवर जंतुनाशक द्रव्यांचे फवारे मारतात.

पिण्याच्या पाण्यातून अपायकारक जंतूंचा शरीरात प्रवेश होऊ शकतो म्हणून शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे फार महत्त्वाचे आहे. जेथे असे शुद्ध पाणी पुरविता येणे शक्य नसते तेथे पिण्याच्या पाण्यावर लक्ष ठेऊन अशा पाण्याच्या साठ्यात भांडी घासणे, कपडे धुणे, स्‍नान करणे, जनावरे धुणे वगैरे कारणांनी ते अशुद्ध होणार नाही. अशी दक्षता घ्यावी लागते. पाण्याच्या साठ्याजवळ कोणी अनधिकृत व्यक्ती पोचू शकणार नाही हे पाहणे जरूर आहे. नारू झालेला माणूस पाण्यात उतरला, तर त्याच्या पायातील नारूची अंडी पाण्यात उतरून त्यांचा संसर्ग दुसऱ्याला होऊ शकतो. विहिरीला पायऱ्या असल्यास त्या बंद करून पाण्यापर्यंत कोणी पोचणार नाही अशी व्यवस्था करावी लागते. शक्यतर विहिरीचे तोंड बंद करून पंपाने पाणी काढण्याची व्यवस्था असावी म्हणजे पाणी दूषित होण्याचा संभव नाहीसा होतो. विहिरीच्या भोवती चांगली फरशी करून तेथून पाणी झिरपून परत विहिरीत जाणार नाही अशी व्यवस्था करणे जरूर असते. पाण्याची वारंवार तपासणी करून ते दूषित झालेले नाही याची खात्री करून घ्यावी लागते. जरूर तेव्हा पाण्यात क्लोरीन किंवा पोटॅशियम परमँगॅनेट यांच्यासारखी जंतुनाशक औषधेही वापरावी लागतात.

खाद्यपदार्थ व भाजीपाला शुद्ध व स्वच्छ असावे यासाठी बाजार, मंडई व दुकाने यांवर नियंत्रण ठेवावे लागते. त्याठिकाणचा परिसर स्वच्छ राहील, धूळ, माशा वगैरे खाद्यपदार्थांवर बसणार नाहीत अशी तजवीज करावी लागते. खराब झालेल्या व खाण्याला अपायकारक असलेल्या पदार्थांचा नाश करावा लागतो. उपाहारगृहे व खाणावळी यांच्या स्वच्छतेबद्दल व तेथील नोकरांच्या निरोगीपणाबद्दल खात्री करून घ्यावी लागते. त्यासाठी खास नियम करून त्यांची सक्त अंमलबजावणी करावी लागते.

ज्या ठिकाणी पुष्कळ लोक एका वेळी जमतात अशी ठिकाणे म्हणजे शिक्षणसंस्था, वसतिगृहे, मंडई, बाजार, सभागृहे, नाट्यगृहे, सार्वजनिक वाहनांचे अड्डे, जत्रा वगैरे ठिकाणी आरोग्यकारक सुखसोईंकडे विशेष लक्ष पुरवावे लागते. यात्रेसारख्या प्रसंगी दळणवळणाच्या साधनांच्या सुलभ सोयीमुळे दूर अंतरावरून पुष्कळ लोक एकत्र जमतात. अडीअडचणीत राहून, मिळेल ते खाऊन राहण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते म्हणून यात्रेसारख्या प्रसंगी खास माणसे नेमून स्वच्छतेबद्दल काळजी घ्यावी लागते.

अन्नपदार्थांपैकी दुधाबद्दल विशेष जपावे लागते. गोठे, दुभती जनावरे, दुधाची भांडी यांची व दुध हाताळणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता पाळण्याची विशेष खबरदारी घ्यावी लागते तसेच दूध योग्य कसाचे आहे की नाही याबद्दल वारंवार तपासणी करणे अगत्याचे असते.

रोग उत्पन्न झाल्यास त्यांचा परिहार करण्यासाठी रुग्णालयांची व्यवस्था असणे जरूर आहे. संसर्गजन्य आणि साथीचे रोग यांच्या नियंत्रणासाठी खास यंत्रेणीची जरूरी असते [→ साथ व साथीचे नियंत्रण ]. रुग्णाला रुग्णालयात पोचविण्यासाठी रुग्णवाहक गाड्यांची व्यवस्था करणे अवश्य असते.

आरोग्य खात्याचे आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे समाजात प्रचार करून, स्वच्छता व आरोग्य यांबद्दल वेळोवेळी माहिती पुरविणे हे होय. त्याकरिता स्वास्थ्य प्रदर्शने, श्राव्यदृश्यप्रचार आणि शिक्षण संस्थांमधून विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व पटवून देणे व त्यांची वेळोवेळी तपासणी करणे ह्या गोष्टी कराव्या लागतात.

जन्ममृत्युनोंद, मृत्युकारणांचे विश्लेषण वगैरे गोष्टी सांख्यिकीशास्त्राच्या (संख्याशास्त्राच्या) मदतीने करून समाजाला वेळोवेळी सूचना देणे हेही आरोग्यविज्ञानाचे एक महत्त्वाचे अंग आहे.

नागरी आणि ग्रामीण जीवनपद्धतींमध्ये फरक असल्यामुळे नागरी आरोग्याच्या दृष्टीने काही गोष्टींकडे विशेष लक्ष पुरवावे लागते. नगरांची वाढ फार झपाट्याने होत असल्यामुळे काही कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते. उदा., वाढत्या शहरांतून उत्पन्न होणाऱ्या झोपडपट्ट्या व त्यांपासून जनतेच्या आरोग्याला असणारा धोका. अशा झोपडपट्ट्या नाहीशा करणे शक्य नसल्यास त्यांना निदान किमान सुखसोई पुरविणे जरूर असते. पाणी, मुताऱ्या, संडास, उजेड वगैरे गोष्टी झोपडपट्ट्यांमध्ये उपलब्ध करून सार्वजनिक आरोग्याला असणारा धोका शक्य तेवढा कमी करण्याचा प्रयत्‍न करणे, हे महानगरपालिकांचे कर्तव्य आहे. शिवाय सार्वजनिक मुताऱ्या व संडास योग्य अंतरावर बांधून ते स्वच्छ ठेवणे, लोकांच्या मनोरंजनासाठी मोकळी मैदाने, बागा, वस्तुसंग्रहालये बांधणे या गोष्टीही नगरांमध्ये अत्यावश्यक असतात. सार्वजनिक कसाईखाने बांधून तेथे मारली जाणारी जनावरे रोगग्रस्त नाहीत अशी खात्री करण्यासाठी विशेष यंत्रणा ठेवावी लागते. सांसर्गिक रोग असलेल्या प्रदेशांतून येणाऱ्या प्रवाशांमुळे ते रोग नगरात फैलावू नयेत म्हणून विलग्नवासाची (क्वारंटाइनची) सोय करणे, लहान लहान उद्योगधंदे उदा., पिठाच्या गिरण्या, स्फोटक पदार्थ तयार करणे कारखाने, विजेवर चालणारे कारखाने वगैंरेसारख्या उद्योगांसाठी परवाना पद्धत घालून देऊन त्यांपासून सार्वजनिक आरोग्याला अपाय होणार नाही अशी तजवीज करणे वगैरे अनेक जबाबदाऱ्या नगरपालिकांवर कायद्याने घातल्या असून त्या पार पाडण्यासाठी त्यांना खास अधिकारही देण्यात आलेले असतात.

नागरी जीवनाच्या मानाने ग्रामीण जीवनात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणीपुरवठा. खेड्यांमध्ये विहिरीशिवाय इतर पाणीपुरवठा क्वचितच असतो. विहिरींवर नियंत्रण कसे ठेवावे याबद्दल वर थोडक्यात सांगितलेच आहे. अलीकडे या प्रश्नाकडे विशेष लक्ष देण्यात येत असल्यामुळे शक्य तितक्या अधिक खेड्यांतून नळाने पाणी पुरविण्याचा प्रयत्‍न सरकारमार्फत होत आहे. सांडपाण्याची व्यवस्था खेड्यांमध्ये उघड्या गटारांतूनच होते. परंतु त्यापासून घाण व डास उत्पन्न होऊन आरोग्याला धोका उत्पन्न होतो. त्यासाठी खेड्यांमध्येही सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न मोठा बिकट झालेला असून त्यावर काही उपाय योजणे जरूर झाले आहे. खेड्यांमध्ये ग्रामपंचायती स्थापन करून त्यांच्यामार्फत असले प्रश्न स्थानिक सहकार्याने सोडविण्याचा प्रयत्‍न होत आहे.

संदर्भ :  1. Bedi, Y. P. Handbook of Hygiene and Public Health, New Delhi, 1962.

2. Ghosh, B. N. A Treatise on Hygiene and Public Health, Calcutta, 1959.

3. Shepard, W. P. Essentials of Public Health, Philadephia, 1952.

४. भावे, वि. ना.; देवधर, न. शं.; भावे, सु. वि. संपा. आपण व आपले आरोग्य, पुणे , १९७१.

फाटक, लीला