आर्माडा : १५८८ साली स्पेनने इंग्लंडविरुद्धच्या युद्धात वापरलेल्या आरमारी काफिल्याचे नाव. या काफिल्यात ६८ अव्वल व ६२ इतर जहाजे, ८,००० खलाशी व १९,००० सैनिक, ४९४ कमी पल्ल्याच्या अवजड व ६३० लांब पल्ल्याच्या हलक्या तोफा होत्या. यांशिवाय फ्लँडर्सच्या ड्यूक ऑफ पार्माच्या नेतृत्वाखाली ३०,००० सैन्य आर्माडाच्या मदतीस येणार होते. या काफिल्याचा सेनापती ॲडमिरल सांताक्रूथ होता पण त्याच्या मृत्यूनंतर त्या पदावर मेडिना-सिडोन्या याची नियुक्ती करण्यात आली.  स्पेनचा आर्माडा अजिंक्य मानला जाई.  याउलट इंग्लंडचे सैन्यबळ कमी असूनही हॉवर्ड, ड्रेक, हॉकिन्झ अशा अतिकुशल दर्यावर्दींचे नेतृत्व त्यास लाभले होते. सुरुवातीस ड्रेकने स्पेनच्या ताब्यातील कॉर्दोव्हावर छुपा हल्ला करून चुणूक दाखविली.  त्यातच आर्माडास निसर्गाचा कोपही सहन करावा लागला.  पुढे इंग्रजी नौदलाने आर्माडास तीन ठिकाणी गनिमी युद्धाने तोंड दिले व प्लिमथजवळ आर्माडाचा जवळजवळ धुव्वा उडविला.

संदर्भ : 1. Lewis, M. The Spanish Armada, New York, 1960.

             2. Mattingly, G. Defeat of hte Spanish Armada, London, 1959.

                                                                                                                                                              

पाटणकर, गो. वि.