आनशान : चीनच्या मांचुरिया भागातील लिओनिंग प्रांतातील शहर. लोकसंख्या सु. १५,००,००० (१९७०). हे मुकडेनच्या दक्षिणेस ९६ किमी., कृषिसमृद्ध प्रदेशात वसलेले असून चीनमधील लोखंड व पोलाद व्यवसायाचे प्रमुख केंद्र समजले जाते. हा भाग जपानी अमलाखाली असताना, येथे स्थापन झालेल्या जपानी कंपन्यांनी १९१८ नंतर येथील पोलाद व्यवसाय नावारूपास आणला. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस येथील अनेक कारखान्यांची मोडतोड झाली पण १९५६ नंतर सर्व कारखान्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. आजही आनशान चीनमधील पोलाद उत्पादनाचे (वार्षिक ६० लक्ष टन) पहिल्या क्रमांकाचे केंद्र समजले जाते. येथे सिमेंटचेही उत्पादन होते.

ओक, द. ह.