आभासी सूर्य : सूर्याच्या (किंवा चंद्राच्या ) दोन्ही बाजूंस दिसणारे दोन तेजस्वी प्रकाशपुंज. आभासी सूर्याचा खऱ्या सूर्याजवळचा भाग तांबूस असतो. काही वेळा दोहोंपेक्षा जास्त आभासी सूर्य दिसतात. आभासी सूर्य नेहेमी एका पांढऱ्या वर्तुळाने (आभासी वृत्त) जोडलेले असतात. उभ्या अक्षाभोवती सममित (समप्रमाणात पसरलेले) असणारे बर्फाचे सूक्ष्म स्फटिक विशिष्ट दिशेने खाली पडत असताना त्यांच्यामधून प्रकाशाचे लोलकीय प्रणमन (प्रकाश किरणांचे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात दिशा बदलून जाणे, वक्रीभवन) झाल्यामुळे आभासी सूर्य दिसतात. त्यांचे सूर्यापासूनचे कोनीय अंतर, सूर्य क्षितिजावर असताना २२ पासून, ते सूर्याचा उन्नत कोन ६० असताना, सु. ४५ पर्यंत वाढते. सूर्य क्षितिजावर असताना आभासी सूर्य आतल्या  प्रभामंडलावर असतात, तर सूर्य वर आला म्हणजे ते बाहेरच्या प्रभामंडलावर जातात.

शिरोडकर, सु. स.