आबेल, नील्स हेन्‍रिक : (५ ऑगस्ट १८०२ – ६ एप्रिल १८२९). नॉर्वेजियन गणितज्ञ. समीकरण सिद्धांत व फलन सिद्धांत या शाखांत विशेष कार्य आणि आधुनिक गणिताचे एक आद्य प्रवर्तक. त्यांचा जन्म ख्रिस्तिअनसँड भागातील फिंडो येथे झाला. ऑस्लो येथील शाळेत शिकत असताना त्यांचे शिक्षक बी. एम्. होंबो यांनी गणिताचा अभ्यास करण्यासाठी आबेल यांना प्रोत्साहन दिले. नॉर्वेजियन सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे बर्लिन विद्यापीठात शिकण्याची त्यांना संधी लाभली. तेथे क्रेले नावाच्या वास्तुशिल्पज्ञांशी आबेल यांची ओळख झाली. क्रेले यांनी गणिताच्या संशोधनास वाहिलेल क्रेलेज जर्नल नावाचे नियकालिक स्थापन केले. या सुप्रसिद्ध नियतकालिकाच्या पहिल्या काही अंकांत आबेल यांनी लेख लिहिले होते.

बीजगणितीय पद्धतींनी पंचघाती व त्यापेक्षा अधिक घातांची समीकरणे सोडविणे अशक्य असल्याचे आबेल यांनीय प्रथम सिद्ध केले. द्विपद श्रेढींसंबंधीच्या एका महत्त्वाच्या निबंधात त्यांनी अभिसारी श्रेढीचे [→ श्रेढी] तत्त्व, विशेषत: घात श्रेढींकरिता त्याचा उपयोग करून, विशद केले. बीजातीत फलनांविषयीच्या [→ फलन] आपल्या प्रबंधात त्यांनी बैजिक फलनांच्या समाकलनाचा [→ अवकलन व समाकलन] सिद्धांत मांडला. यालाच आबेल सिद्धांत म्हणतात. हा सिद्धांतच पुढे आबेलीय समाकल व आबेलीय फलने यांच्या उपपत्तीस आधारभूत झाला. हा प्रबंध १८२६ मध्ये त्यांनी फ्रेंच इन्स्टिट्यूटला सादर केला, तथापि अपेक्षेप्रमाणे त्यांना यश मिळू शकले नाही. पुढे त्यांना क्षयरोग झाला व क्रेले यांनी बरीच खटपट करून त्यांच्याकरिता मिळविलेल्या बर्लिन विद्यापीठातील गणिताच्या प्राध्यापकपदावर रुजू होण्यापूर्वीच आरेंडाल येथे आबेल मृत्यू पावले. समीकरण सिद्धांत व विवृत्तीय फलने या विषयांवरील त्यांचे लेख विशेष प्रसिद्ध आहेत. या लेखांतच आबेलीय समीकरणे व आबेलीय गट [→ गट सिद्धांत] यांसंबधीचे सिद्धांत त्यांनी दिलेले होते. होंबो यांनी १८३९ मध्ये आबेल यांच्या लेखांचे संपादन केले. १८३० मध्ये फ्रेंच ॲकेडेमीतर्फे ‘ग्रां प्री’ हे पारितोषिक (त्यांच्या मृत्यूनंतर) त्यांना देण्यात आले.

गुर्जर, ल. वा.