हिरॉफिलस : (इ. स. पू. सु. ३३५– सु. २८०). अलेक्झांड्रियन शल्यवैद्य व शारीरतज्ञ. हिरॉफिलस हे मानवी शवाचे सार्वजनिक रीत्या विच्छेदन करणारे पहिले शल्यवैद्य असून त्यांना शरीररचनाशास्त्राचा जनक समजतात.
हिरॉफिलस यांचा जन्म कॅल्सिडॉन (बिथिनिया) येथे झाला. ग्रीकांच्या वैद्यकीय इतिहासात प्रथमच थोड्या काळासाठी मानवी शवाचे विच्छेदन करण्यावरील बंदी उठविण्यात आली, तेव्हा हिरॉफिलस यांनी मेंदूमधील(मस्तिष्कातील) विवरांचे संशोधन केले. त्या अवयवास त्यांनी तंत्रिका तंत्राचे केंद्र असल्याचे नमूद केले होते. त्यांनी मेंदूवरील दृढावरणांच्या सांध्यावर असलेली कोटरे शोधून काढली. ही कोटरे हिरॉफिलस यांच्यानंतर ‘टॉरक्युलर हीरॉफिलाई’ म्हणून ओळखली जाऊ लागली. तसेच त्यांनी तंत्रिका स्कंधांचे प्रेरक तंत्रिका व संवेदी तंत्रिका असे वर्गीकरण केलेआणि तंत्रिका कंडरा व रक्तवाहिन्या यांच्यापेक्षा त्या वेगळ्या असल्याचेदाखविले. हिरॉफिलस यांनी डोळा, लालाग्रंथी, यकृत, अग्निपिंड आणि स्त्री-पुरुषांच्या जनन-अवयवांचा सखोल अभ्यास केलेला होता. त्यांनी जठराच्या खालच्या टोकाशी असलेल्या ग्रहणी व अष्ठीला ग्रंथी यांचे वर्णन करून त्यांना नावे दिली. ⇨ हिपॉक्राटीझ यांच्या वैद्यक परंपरेत शरीरातील चार रसांचा – रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त – समतोल असणे आवश्यक असल्याचे मानले जात होते. यावरून हिरॉफिलस यांनी औषधे, आहार तसेच शारीरिक कसरती यांच्या रोगनिवारक शक्तीविषयीचे विशेष महत्त्व सांगितले होते. नाडीचे ठोके मोजणारे हिरॉफिलस हे पहिले ग्रीकवैद्य होय. त्यासाठी त्यांनी पाणघड्याळाचा वापर केला होता.
हिरॉफिलस यांनी जवळपास नऊ ग्रंथांचे लेखन केल्याची नोंद आहे. त्यात हिपॉक्राटीझवरील टिका, सुईणींकरिता मार्गदर्शन, शरीररचनाशास्त्र आणि आकस्मिक मृत्यू यांविषयीच्या लेखनाचा समावेश होतो. मात्र, हे सर्व ग्रंथ इ. स. २७२ मध्ये अलेक्झांड्रिया ग्रंथालयाच्या विध्वंसात नष्ट झाले.
हिरॉफिलस यांचे बिथिनिया येथे निधन झाले.
वाघ, नितिन भरत
“