हिप्पी : विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रस्थापित चालीरीती व परंपरा यांना झुगारून स्वच्छंद व स्वैर वर्तन करणाऱ्या तरुणांची चळवळ. ‘कळि’ या इंग्रजी शब्दाचा भावार्थ उत्तेजनार्थ आरोळी किंवा संवाद साधणे असा आहे. या चळवळीचा प्रारंभ अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत झाला आणि तीत गौरवर्णीय मध्यम वर्ग व उच्चभ्रू कुटुंबांतील मुलामुलींनी सहभाग घेतला. साधारणतः १५–२५ वर्षे वयोगटातील ही तरुण मंडळी होती. १९६०–८० दरम्यान ही चळवळ कॅनडा, ग्रेट ब्रिटन व अन्य देशांत प्रसृत झाली. हिप्पींना मानवता व शांतता या संकल्पनांवर प्रेम करणारा समाज अभिप्रेत होता. याच तत्त्वावर त्यांनी अमेरिकेच्या व्हिएटनाम युद्धातील (१९५७–७५) सहभागाला कडाडून विरोध केला. काही हिप्पींची अशी धारणा होती की, आश्चर्यकारक जादुई बदल समाजात घडतील, जेव्हा सर्व माणसे प्रामाणिकपणे आपल्या भावना व्यक्त करून नैसर्गिक रीत्या जीवन व्यतीत करतील. 

 

हिप्पींचे छोटे छोटे समूह किरकोळ काम करून आपल्याकडील मालमत्ता वा ऐवज एकमेकांत वाटून राहत असत मात्र त्यांच्यापैकी काही नोकरी वा उद्योग करण्यास राजी नव्हते. त्यांना स्वच्छंदी, स्वैर जीवन हवे असल्यामुळे त्यांनी भ्रमंती अंगीकारली होती. त्यामुळे रस्त्याच्या कडेला, फूटपाथवर, उद्यानात, समुद्रकाठी किंवा एखाद्या सार्वजनिक जागी ते वास्तव्यास जात. ते काही वेळा लोकांना फुले देऊन आपला प्रेमळ हेतू व्यक्त करीत, म्हणून त्यांना ‘पुष्प मुले’ (फ्लॉवर चिल्ड्रेन) म्हणत. लोकांना आकर्षित करण्याकरिता बहुतेक सर्व हिप्पी लांब केस वाढवून, रंगीबेरंगी कपडे घालून किंवा तोकड्या कपड्यांत कधीकधी अनावृत, पादत्राणांशिवाय पायी हिंडत. त्यांच्यापैकी बहुतेकजण ब्रह्मानंद प्राप्त करण्यासाठी एल्एस्डी, मॅरिज्युआना, हेरॉईन यांसारख्या मादक द्रव्यांचे सेवन करीत. रॉक अँड रोल संगीतशैली सादर करणारा बिटल्स हा इंग्रजी संगीतकारांचा जथा त्या वेळी इंग्लंडमध्ये लोकप्रिय होता. त्यांचे लांब केस, चित्रविचित्र पोशाख आणि मोहजालात अडकविणारी औषधी द्रव्ये (मादक पदार्थ) हे तरुण हिप्पींत प्रविष्ट झाले. शिवाय कादंबरीकार केनकेसी, कवी ॲलन गिन्सबर्ग, संगीतकार जोन बाएझ, बॉब दीलन, टिमोथी लीरी ही तत्कालीन मंडळी हिप्पींना गुरूसमान होती कारणत्यांपैकी ॲलन गिन्सबर्गच्या काव्यात समलिंगी संभोग आणि मादक द्रव्यांचे सेवन यांवर भर होता, तर टिमोथी लीरी या मानसशास्त्रज्ञाने अशी उपपत्ती मांडली होती की, मादक द्रव्यांच्या सेवनाने मुक्ती प्राप्त होते. 

 

हिप्पींची विचारसरणी (तत्त्वज्ञान) मूळ शासकीय संस्था झिडकारणारी, कौटुंबिक जीवन व आधुनिक शिक्षणपद्धती नाकारणारी होती. त्यांच्या मते औपचारिक शासनपद्धती ही जुलमी व अराजकाकडे नेणारी आहे. एकपत्नीकत्व (मॉनॉगॉमस) प्रचलित कुटुंबपद्धती ही आता जुनाट झालेली आहे. विस्तृत कुटुंब, सामूहिक विवाह आणि लैंगिक स्वातंत्र्य ही काळाची गरज आहे. हे अप्रस्तुत तत्त्वज्ञान आचरणात आणणारी हिप्पी चळवळ आपल्या स्वैर व स्वच्छंदी जीवनशैलीने समाजात परिवर्तन घडवून आणू शकत नाही, याची प्रचिती आल्यानंतर संपुष्टात आली आणि त्यातील काही तरुणांनी व्यावहारिक मार्ग अवलंबून राजकारणात प्रवेश केला, तर काही कॉर्पोरेट कंपन्यांत नोकरीस लागले. 

गेडाम, आनंद