हिगिन्झ, विल्यम : (? १७६३–? जून १८२५). आयरिश रसायनशास्त्रज्ञ. आणवीय सिद्धांत मांडणाऱ्यांपैकी एक. विशेषतः त्यांनी रासायनिक संयोगावर भाकीत करता येईल अशा अनेक कल्पना सुचविल्या. रासायनिक संयोग म्हणजे त्यातील प्रत्येक मूलद्रव्याच्या ठराविक द्रव्यमानाच्या अलग कणांचे एकत्रीकरण होय.
हिगिन्झ यांचा जन्म कॉलोऑनी (स्लायगो, आयर्लंड) येथे झाला. ते १७८६ मध्ये ऑक्सफर्ड येथे मॅट्रिक झाले. त्यांनी ऑक्सफर्ड येथील पेम्ब्रोक कॉलेज येथे १७८८ मध्ये प्रवेश घेतला, परंतु लगेच शिक्षण सोडून ते लंडनला गेले. ब्रायन हिगिन्झ या त्यांच्या काकांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना प्रायोगिक रसायनशास्त्रात आवड निर्माण झाली. ब्रायन यांच्या एक्सपेरिमेंट्स अँड ऑब्झर्व्हेशन्स रिलेटिंग टू ॲसिटस ॲसिड या ग्रंथात सर्व प्रयोगांचे तपशील देण्यास विल्यम यांनी मदत केली. ते १७९२ मध्ये ॲपोथेकरीज हॉल ऑफ आयर्लंड येथे रसायनशास्त्रज्ञ होते. तसेच त्यांनी आयरिश लिनन बोर्ड येथे रसायनशास्त्रज्ञ म्हणून काम केले (१७९५–१८२२). ते रॉयल डब्लिन सोसायटीच्या खनिजशास्त्रीय संग्रहालयाचे पर्यवेक्षक होते आणि तेथेच ते १८०० मध्ये प्राध्यापक झाले.
हिगिन्झ यांनी व्यापारी क्षारामधील (अल्कलीमधील) भेसळीचे अभिज्ञान आणि विरंजन रसायनशास्त्र यांसंबंधी संशोधन कार्य केले. त्यांनी आयर्लंडमध्ये एसे ऑन द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ ब्लिचिंग (१७९९) हा ग्रंथ प्रकाशित करून नवीन रासायनिक तंत्रविद्येची ओळख करून दिली. त्यांनी रासायनिक आणवीय सिद्धांतात महत्त्वाचे योगदान दिले, परंतु त्याचे श्रेय इंग्रज शास्त्रज्ञ ⇨ जॉन डाल्टन यांनाच दिले गेले. डाल्टन यांच्यापेक्षा अधिक स्पष्ट व अचूकपणे चिन्हशास्त्र प्रणाली हिगिन्झ यांनी मांडली परंतु त्यांनी लिहिलेल्या एक्सपेरिमेंट्स अँड ऑब्झर्व्हेशन्स ऑन द ॲटॉमिक थिअरी अँड इलेक्ट्रिकल फेनॉमेना (१८१४) या ग्रंथाच्या आठ खंडांमध्ये डाल्टन यांच्या कार्यावर टीका करेपर्यंत हिगिन्झ यांच्या कार्याची दखल घेतली गेली नाही.
हिगिन्झ यांचे डब्लिन (आयर्लंड) येथे निधन झाले.
एरंडे, कांचन
“