हॉकिंग, स्टीव्हन विल्यम : (८ जानेवारी १९४२ ). इंग्रज सैद्धांतिक भौतिकीविज्ञ. त्यांनी स्फोट होणाऱ्या कृष्णविवरां-संबंधीचा सिद्धांत पुंजयामिकी आणि सापेक्षता सिद्धांत यांवरून तयार केला. त्यांनी त्यामध्ये अवकाश-काल विलक्षिततांचा सुद्धा उपयोग केला.
हॉकिंग यांचा जन्म ऑक्सफर्ड (ऑक्सफर्डशर, इंग्लंड) येथेझाला. त्यांनी गणित व भौतिकी या विषयांचे अध्ययन युनिव्हर्सिटी कॉलेज, ऑक्सफर्ड (बी.ए., १९६२) आणि ट्रिनिटी हॉल, केंब्रिज (पीएच्.डी., १९६६) या ठिकाणी केले. त्यांची ऑक्सफर्ड येथील गॉनव्हिले अँड कायस कॉलेज येथे फेलो म्हणून निवड झाली. १९७७ मध्ये ते केंब्रिज येथे गुरुत्वाकर्षणीय भौतिकी विषयाचे प्राध्यापक झाले. १९७९ मध्ये त्यांची गणित विषयाच्या ल्यूकेशिअन प्राध्यापक पदावर नियुक्ती झाली.या पदावर आयझॅक न्यूटन यांनी एकदा काम केले होते.
हॉकिंग १९६० च्या दशकात सुरुवातीला पार्श्विक कर्कशीभवनामुळे ( बरा न होणाऱ्या विर्हासी तंत्रिका-स्नायू विकारामुळे) विकलांग झाले. त्यांनी वाढत राहणाऱ्या विकलांग परिणामांना न जुमानता संशोधन चालूच ठेवले. त्यांनी मुख्यतः व्यापक सापेक्षता क्षेत्रात आणि विशेषतः कृष्णविवराच्या भौतिकी-मध्ये संशोधन केले. १९७१ मध्ये त्यांनी महास्फोटानंतर (बिग बँग-नंतर) निर्माण झालेल्या विविधप्रकारच्या वस्तूंच्या संरचना सुचविल्या. या वस्तूंचे वस्तुमान एक अब्ज टना-एवढे असले, तरी त्यांनी प्रोटॉना-इतकाच अवकाश व्यापलेला असतो.या वस्तू (छोटी कृष्णविवरे) एकमेव असून त्यांमध्ये प्रचंड वस्तुमान आणि गुरुत्वाकर्षण असते आणि त्यांनी गुरुत्वाकर्षण नियमांचे पालन करणे आवश्यक असते. तसेच त्यांचे अतिसूक्ष्म आकार असले तरी त्यांना पुंजयामिकीचे नियमसुद्धा लागू करता येणे आवश्यक असते. १९७४ मध्ये हॉकिंग यांनी रीतसर सुचविले की, पुंजयामिकीच्या भाकितानुसार कृष्णविवरांमधून ऊर्जा बाहेर पडेपर्यंत आणि शेवटी स्फोट होईपर्यंत उप-आणवीय कण उत्सर्जित होत असतात. हॉकिंग यांच्या संशोधनामुळे कृष्णविवरांच्या गुणधर्मांचे सैद्धांतिक वर्णन करण्यास मोठा उत्साह निर्माण झाला. पूर्वी असे समजले जात होते की, या वस्तूंसंबंधी काहीही माहिती मिळू शकणार नाही. हॉकिंग यांचे कार्य महत्त्वाचे होते, कारण त्यामुळे या गुणधर्मांचे संबंध रूढ ऊष्मागतिकी आणि पुंजयामिकी नियमांशी जोडता येत असल्याचे दिसून आले.
हॉकिंग यांना भौतिकी विषयामधील कार्यांबद्दल अनेक असाधारण मानसन्मान मिळाले. १९७४ मध्ये रॉयल सोसायटीने त्यांची वयाने सर्वांत लहान असलेल्यांमध्ये फेलो म्हणून निवड केली.
हॉकिंग यांची प्रकाशने पुढीलप्रमाणे : द लार्ज स्केल स्ट्रक्चर ऑफ स्पेस-टाइम (१९७३ सहलेखक जी. एफ्. आर्. एलिस), सुपरस्पेस अँड सुपरग्रॅव्हिटी (१९८१), द व्हेरी अर्ली युनिव्हर्स (१९८३) आणि सर्वांत चांगली विक्री झालेले अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम : फ्रॉम द बिग बँग टू ब्लॅक होल्स (१९८८).
सूर्यवंशी, वि. ल.
“