हार्टमान, निकोलाय : (२० फेब्रुवारी १८८२ –९ ऑक्टोबर १९५०). विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील एक ख्यातकीर्त जर्मन तत्त्वचिंतक. त्याचा जन्म लॅटव्हियातील (रशिया) रिगा या गावी एका मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबात झाला. त्याने सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन सेंट पीटर्झबर्ग, डोपार्ट व मार्बर्ग विद्यापीठांत उच्चशिक्षण घेतले आणि पदवी संपादन केली. पहिल्या महायुद्धकाळात (१९१४–१८) त्याने लष्करी सेवा केली. त्यानंतर त्याने अनुक्रमे मार्बर्ग (१९२०–२५), कोलोन (१९२५–३१), बर्लिन (१९३१–४५) व गटिंगेन (१९४५–५०) या विद्यापीठांत तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून अध्यापन केले.

 

शिक्षकी पेशात असताना हार्टमानने तत्त्वज्ञान व त्याला आनुषंगिक नीतिशास्त्रावर जर्मन भाषेत विपुल लेखन केले. त्याच्या ग्रंथांपैकी ‘प्लेटोज लॉजिक ऑफ बीइंग’ (१९०९, इं. शी.), ‘द बेसिस ऑफ द मेटॅफिजिक्स ऑफ नॉलेज’ (१९२१, इं. शी.), ‘द फिलॉसफी ऑफ जर्मन आयडिॲलिझम’ (दोन खंड, १९२३–२९, इं. शी.), ‘एथिक’ (तीन खंड, १९२६, इं. शी.), ‘फौंडेशन्स ऑफ ऑन्टॉलॉजीङ्ख (१९३५, इं. शी.) ‘पॉसिबिलिटी अँड रिॲलिटी’ (१९३८, इं. शी.) ‘द स्ट्रक्चर ऑफ द रिअल वर्ल्ड’ (१९४०, इं. शी.), ‘न्यू वेज ऑफ ऑन्टॉलॉजी’ (१९४२, इं. शी.), ‘फिलॉसफी ऑफ नेचर’ (१९५०, इं. शी.), ‘ ॲस्थेटिक’ (१९५३, इं. शी.) हे विशेष मान्यवर झाले असून त्याच्या तत्त्वचिंतनाची मीमांसा त्यात आढळते. त्याच्या ग्रंथांचे इंग्रजीत अनुवाद झाले असून काही ग्रंथांच्या आवृत्त्याही निघाल्या आहेत.

 

हार्टमानवर प्लेटोच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता. तत्पूर्वी नव-कांट मताचाही पगडा त्याच्या तत्त्वचिंतनात दृग्गोचर होतो पण पुढे त्याच्या तत्त्वज्ञानपर लेखनात तो पगडा कमी झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. मानवी बुद्धीमुळे ज्ञात निसर्गाचे स्वरूप ठरते, असा जो निष्कर्ष इमॅन्युएल कांट याने काढला, तो चुकीचा आहे, असे हार्टमानचे प्रतिपादन आहे. ज्ञानप्रक्रियेत त्या प्रक्रियेहून भिन्न असलेल्या वस्तूचे साक्षात ज्ञान होते. ज्ञानात ज्ञानविषयाला प्राधान्य आहे, ज्ञात्याला नाही. ज्ञान पुरुषतंत्र नसून वस्तुतंत्र आहे, म्हणून सत्ताशास्त्र (ऑन्टॉलॉजी) हाच मूळ तत्त्वज्ञानाचा गाभा होय. त्याच्या मते, सत्ताशास्त्र हे मूलभूत असून ज्ञानशास्त्र हे त्याच्यावर आधारित असते. अनुभवक्षेत्रात जे वस्तुतत्त्व आपल्याला सामोरे आलेले असते, त्याचे प्रकारभेद आणि श्रेणिभेद करण्याचा मोठा प्रपंच हार्टमानने केला. अर्थात त्याचे तत्त्वज्ञान आत्यंतिक वास्तववादी आहे. प्लेटोप्रमाणेच गणितातील तत्त्वे, नैतिक मूल्ये इत्यादींनाही मानवी बुद्धीबाहेर स्वतंत्र अस्तित्व आहे, असे तो मानतो. या समस्यांचा ऊहापोह करणे, त्यांच्या सर्व बाजू मांडणे व त्यांतून निघणारी परस्पर-विरोधी विधाने स्पष्ट करणे, हे त्याच्या मते तत्त्वज्ञांचे विशेषकरून काम आहे आणि या पद्धतीलाच तो ‘ॲपोरेटिक्स’ हे नाव देतो. त्याच्या मते, भौतिक द्रव्य, प्राणिमात्र, त्याचा विकास, मानव, त्याचे ज्ञान, त्याची कृत्ये ही सर्व सत्ताशास्त्राची अंगे आहेत. सत्तेची दोन रूपे असून एक विशेषगुणयुक्त दिक्कालबद्ध व दुसरे सामान्य किंवा चिद्रूप होय. हीदोन्ही रूपे वास्तव जगाची असून ज्ञानापासून स्वतंत्र आहेत. तार्किकदृष्ट्या दुसरे रूप प्राथमिक व मूलभूत आहे. सर्वसामान्य संकल्पनात्मक रूप प्रत्यक्षाचे रूप निश्चित करते. वास्तव रूप इंद्रियामार्फत ज्ञात होते, तर मानसिक रूप अंतःप्रज्ञेद्वारा ज्ञात होते.

 

हार्टमान सत्तेची स्तरबद्ध योजना मांडून सर्वांत खाली जडद्रव्य,त्यानंतर वनस्पती, प्राणिमात्र, मानव व समाज अशी उतरंड दर्शवितो.त्यांचे विभाजन दिक्कालयुक्त गुणनिष्ठ पदार्थ व चेतनयुक्त गुणनिष्ठ पदार्थअसे करता येईल. निर्जीव व भौतिक पातळीवरच्या वस्तू , घटना आणि सजीव प्राणी पहिल्या श्रेणीचे, तर मानसिक आणि आध्यात्मिक घटना दुसऱ्या श्रेणीच्या आहेत. जसजसे खालच्या स्तरापासून वरच्या स्तरासजावे, तसतसे वरचे स्तर खालच्या स्तरांच्या वर्चस्वापासून स्वतंत्र होत असल्याचे दिसते. प्राणिमात्र व वनस्पती या मुख्यत्वे भौतिक पदार्थांवर अवलंबून असतात. मानवामध्ये प्राणिमात्रास लागू असणाऱ्या जीवशास्त्रीय नियमांचे वर्चस्व आढळते पण वनस्पतींचे नाही. आध्यात्मिक स्तरावर मानसिक मूळ प्रवृत्तीचे आधिक्य नाहीसे झाल्याचे आढळते. या स्तरबद्ध विश्वाचे ज्ञान करून घेताना विज्ञानसुद्धा ह्याच तत्त्वावर आपल्या विषयांचे विभाजन करते.

 

या वास्तववादी भूमिकेवरच हार्टमानने आपल्या नीतिशास्त्राची उभारणी ‘एथिकङ्ख या त्रिखंडात्मक ग्रंथात केली आहे. पहिल्या खंडात त्याने नीतिशास्त्राच्या स्वरूपाविषयी चर्चा केली आहे आणि ‘ॲपोरेटिक्सङ्ख पद्धतीचा उपयोग करून या शास्त्रातील विसंगती दाखविली आहे. त्यात कांटच्या मतावर तो टीका करतो. नैतिक इच्छेचे स्फुरण आत्मतत्त्वातून होते, असे त्याचे म्हणणे आहे. दुसऱ्या खंडात तो विविध मूल्यांची चर्चा करतो आणि तिसऱ्या खंडात प्रेरणेच्या स्वतंत्रतेबद्दल आपले मत मांडतो. त्याच्या मते प्रेरणेचे स्वातंत्र्य म्हणजे कुठल्याही पूर्वनियोजित विषयापासून स्वातंत्र्य होय. कृतीचे नैतिक बंधकत्व वस्तुगत स्वयंनिष्ठ मूल्यांपासून निर्माण होते, असे त्याचे म्हणणे आहे. विशिष्ट परिस्थितीत मूल्यांचा जो आकृतिबंध अनुस्यूत असतो, तो नैतिक कृतीचे जनक आणि समर्थक कारण होय. सृष्टीच्या विकासक्रमात मूल्यसंवेदनांचाही विकास होतो. मूल्यांचे अस्तित्व भावनात्मक रीतीने ज्ञात होत असले, तरी ती वस्तुनिष्ठच आहेत, या मुद्द्यावर तो भर देतो. नैतिक मूल्ये व त्यांना आशय पुरविणारी इतर मूल्ये, असे मुख्य मूल्यप्रकार असून उदारमनस्कता, बंधुभाव, न्याय, परस्परांवरील विश्वास आदी मूल्ये नैतिक होत पण त्यांचे अस्तित्व तात्त्विक रीत्या सिद्ध करता येत नाही. मूल्यांचे स्तरीकरण, दृढीकरणइ. सहा नियम त्याने सांगितले आहेत.

 

हार्टमानच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव १९७० च्या दशकात जर्मनीमध्ये होता. नंतर तो कमी झाला तथापि तो अलीकडे इंग्लंडमध्ये आढळतो.

 

अल्पशा आजाराने गटिंगेन येथे त्याचे निधन झाले.

 

संदर्भ : Heimsoeth, H. Heiss, H. Nicolai Hartmann : The Thinker and His Work, Gottingen, 1952.  

 

दीक्षित, श्री. ह.