हार्लेम : नेदर्लंड्समधील एक इतिहासप्रसिद्ध शहर व नॉर्थ हॉलंड प्रांताचे मुख्यालय. लोकसंख्या १,५०,६७० (२०११). हे देशाच्या पश्चिम भागात, ॲमस्टरडॅमच्या पश्चिमेस सु. १८ किमी. व उत्तर समुद्र किनाऱ्यापासून सु. ७ किमी.वर स्पार्ते नदीकाठी वसलेले आहे. पूर्वी-पासूनच हे शहर ट्यूलिप फुलांच्या उत्पादनासाठी व त्यांच्या कंदांच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध असून ते रेल्वे प्रस्थानक आहे.

 

या शहरासंबंधीचे दहाव्या शतकापासूनचे उल्लेख उपलब्ध आहेत. मध्ययुगात हार्लेम हे रोमन कॅथलिक बिशपच्या अधिकारक्षेत्रातील शहर होते. बाराव्या शतकात या शहराला तटबंदी करण्यात आली होती. तेव्हापासून हॉलंडच्या काउंटचे (विल्यमचे) निवासस्थान येथे होते. १२४५ मध्ये हॉलंडच्या काउंटने शहराला सनद दिली. १३४६ व १३५१ मधील हॉलंडच्या यादवी युद्धांत या शहराचे अतोनात नुकसान झाले होते.१५७२-७३ मध्ये डचांच्या बंडाविरुद्ध स्पॅनिशांनी या शहराला वेढाघातला होता. या संघर्षात येथे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली होती. १५७७ मध्ये याचा नेदर्लंड्सच्या संयुक्त राज्यात समावेश करण्यात आला. तेव्हापासून याच्या विकासास प्रारंभ झाला व सतराव्या शतकात हे शहर औद्योगिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांत सर्वोच्च शिखरावर पोहोचले होते. या शतकात फ्रान्स हाल्स, याकॉप व्हान रॉइस्डाल इ. प्रसिद्ध डच चित्रकारांच्या कलाकृतींच्या निर्मितीचे तसेच ट्यूलिप फुलांच्या निर्मितीचे व निर्यातीचे केंद्र म्हणून यास खूप महत्त्व होेते. सुरुवातीच्या काळात लोकर विणकाम व मद्य निर्मिती हे येथील प्रमुख उद्योग होते. अठराव्या शतकात हे शहर औद्योगिक दृष्ट्या मागे पडले होते परंतु एकोणिसाव्या शतकापर्यंत येथे रेशीम विणकाम, छपाई, मुद्राक्षर ओतशाळा, चॉकोलेट व कोको,यंत्रे, रसायने, कापड, रेल्वे दुरुस्ती कर्मशाळा इ. निर्मिती उद्योगांचा विकास झाला. दुसऱ्या महायुद्धापासून अनेक परदेशी कंपन्यांनी (विशेषतः अमेरिकेची संयुक्त संस्थाने) येथे विविध उद्योग विकसित केले आहेत.

 

शहराचा मध्यभाग मध्ययुगीन कालवे, तटबंदी, खंदक, उतरत्या छपरांची वैशिष्ट्यपूर्ण घरे यांसाठी प्रसिद्ध आहे. तेराव्या शतकातील टाउन हॉल (सतराव्या शतकात याचा काही भाग वाढविण्यात आला), ८० मी. उंचीचे ग्रेट चर्च (सेंट बाव्हो चर्च १३९७–१४९६), मीट मार्केट (१६०३), ॲम्स्टरडॅम गेट इ. येथील ठिकाणे प्रसिद्ध आहेत. ग्रेट चर्च- मधील फ्रान्स हाल्सचे थडगे, १७३८ मधील ख्रिस्त्यान म्यूलरने बनविलेला पाइप ऑर्गन ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. यांशिवाय मध्ययुगीन अनेक चर्चे, रोमन कॅथलिक कॅथीड्रल, विविध डच कलाकारांनी बनविलेल्या चित्रकृतींचे संग्रहालय, जुनी हस्तलिखिते व डच साहित्य जतन केलेली पब्लिक लायब्ररी (स्था. १५९६), डच सोसायटी ऑफ सायन्सेस (१७५२), अनेक बागा, समुद्र किनाऱ्याच्या पुळणी, शहराच्या परि-सरातील ट्यूलिप फुलांची शेती, एका कथेनुसार येथील बंधाऱ्याची गळती स्वतःच्या बोटाने थांबवणाऱ्या मुलाचे स्मारक ही या शहरातील वैशिष्ट्ये आहेत. चल टंकप्रकारांच्या छपाईचे तंत्र शोधून काढणाऱ्यांपैकी एल्. जे. कॉस्टर या चर्च अधिकाऱ्याचे व फ्लो शिल्पकार क्लाउस स्लूटर याचे हे जन्मग्राम म्हणून प्रसिद्ध आहे.

 

चौंडे, मा. ल.