हाराकिरी : शत्रू राष्ट्राबरोबर युद्धात पराभूत झाल्यानंतर स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी मानी योद्धे शत्रूच्या ताब्यात जाण्याऐवजी आत्महत्या म्हणजेच ‘हाराकिरी’ करीत. ही प्रथा जपानमध्ये विशेष प्रचलित होती.

 

जपानवरील शत्रूंच्या आक्रमणास प्रत्युत्तर देणे आणि अंतर्गत व बाह्य कारवायांना पायबंद घालणे, यांसाठी जपानमध्ये ‘जपानी संरक्षण संघटना’ स्थापन करण्यात आली होती. ही संघटना सरंजामशाही पद्धतीची पुरस्कर्ती होती. ⇨ सामुराई लढवय्ये लोक या संघटनेचे प्रमुख घटक होते. त्यांचा पराभव झाला किंवा ते अवमानित झाले की, आत्मबलिदान करण्यासाठी हाराकिरी करीत असत. जपानच्या सुरुवातीच्या सरंजामशाही काळात ‘ सेप्पूकू’ (जपानी संज्ञा) प्रथेला कर्मकाण्डाचे स्वरूप प्राप्त झाले. सेप्पूकू या संज्ञेचा अर्थ ‘पोट फाडणे’ असा आहे. पुढे एडो काळात (१६००–१८६८) पाच प्रकारच्या शिक्षांपैकी ती एक सन्मान्य शिक्षा होती. सामुराई वर्गातील एखाद्या योद्ध्याने गैरमार्गाचा अवलंब केल्यास ती व्यक्ती स्वेच्छेने हाराकिरी करी.

 

हाराकिरी करण्याची एक विशिष्ट अशी पद्धत होती. यासाठी स्वतःचे पोट सुरीने फाडून ती सुरी डावीकडून उजवीकडे आणि नंतर ती गळ्यात खुपसून घेऊन आत्मबलिदान करण्याचा हा प्रकार होता. हे करणे म्हणजे अत्यंत वेदना देणारे असे कृत्य असून त्यामध्ये सामुराई लढवय्ये लोकांचे धैर्य, स्वनियंत्रण आणि कृतार्थता व्यक्त होत असे. ते कृत्य दृढनिश्चयाचे प्रतीक मानले जाई.

 

जपानमध्ये सामुराई हा पारंपरिक लढवय्ये सैनिकांचा वर्ग होता. त्यांना लढण्याचा हक्क वंशपरंपरेने मिळाला होता. प्रत्येक कुलात हा वर्ग वैशिष्ट्यपूर्ण मानला गेला होता. संरक्षणाबरोबरच कुलाच्या संगोपनाचीहीया वर्गावर जबाबदारी असे.

 

हाराकिरी ही दोन प्रकारची होती. (१) ऐच्छिक व (२) आवश्यक. ऐच्छिक हाराकिरीचा उदय बाराव्या शतकातील युद्धपर्वात झाला होता. शत्रू राष्ट्राबरोबरच्या युद्धात पराभूत झाल्यानंतर त्याच्या हाती पडून अपमानित जीवन जगण्यापेक्षा आत्मबलिदान ही ऐच्छिक हाराकिरी संबोधली जात होती, तर आवश्यक हाराकिरी ही देहान्त शिक्षेच्या स्वरूपात असे. याची सुरुवात पंधराव्या शतकातील असून १८७३ पर्यंत ही पद्धत रूढ होती. विधिवत केली जाणारी ही आत्महत्या होती.प्रामुख्याने साक्षीदार असताना हा विधी पार पाडला जाई. शिवाय सेप्पूकू-साठी पोषाख, वेळ, स्थळ, निरीक्षक व मदतनीस असत. तुरुंगातील व्यक्तीला लाल आसनावर बसवून तिच्या मागे मित्र, नातेवाईक उभे करायचे. नंतर टेबलावर कैद्यासमोर एक सुरी ठेवण्यात येऊन त्यावर तो कैदी आपले डोके खुपसून हाराकिरी करीत असे. त्या वेळी हा प्रकार बऱ्याच प्रमाणात प्रचलित होता. समूह सेप्पूकूचे प्रकारही जपानमध्ये आढळतात. किरा योशिनाकाचा खून केल्याबद्दल ४७ रोनिन (मालक नसलेले सामुराई) यांना शासनाकडून सेप्पूकूची आज्ञा देण्यात आली. याशिवाय क्वचित् प्रसंगी आपल्या मालकाविषयी असलेली निष्ठा सिद्ध करण्यासाठी, शासनाची आणि श्रेष्ठ लोकांनी मांडलेली धोरणे पसंतीस न उतरल्याने त्यांचा निषेध करण्यासाठी किंवा आपल्या कर्तव्यात कसूर झाल्यामुळे प्रायश्चित्त म्हणूनही हाराकिरी केल्याची उदाहरणे आढळतात.

 

जपानच्या इतिहासामध्ये सामुराई या लढवय्ये लोकांच्या हाराकिरीला बरेच महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. सेप्पूकूचा निर्देश १८७३ च्या फौजदारी कायद्यात केलेला नव्हता परंतु मेजी राजवटीत (१८६८–१९१२) ही प्रथा प्रचारात असल्याची अनेक उदाहरणे आढळतात. दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांकडून पराभव झाल्यावर जपानने शरणागती पतकरल्याचे जाहीर केले (१९४५). त्या वेळी अनेक मानी सैनिकांनी हाराकिरी केल्याची नोंद इतिहासात आढळते. नोव्हेंबर १९७० मध्ये जपानी कादंबरीकार मिशिमा युकिओ याने आपल्या काही अनुयायांसह सनसनाटी आविर्भावात नाट्यमय रीत्या हाराकिरी केली. जपानमध्ये अद्यापि या प्रथेचा अभिमानाने उल्लेख केला जातो मात्र हाराकिरीचे प्रमाण अत्यल्प आहे.

 

देशपांडे, सु. र.