हाफीज : (सु. १३२६– सु. १३९०). थोर फार्सी कवी. जन्म इराणमधील शिराझ येथे. कुराण आणि अन्य ईश्वरविद्याविषयक अभ्यास त्याने केला होता. ज्याला कुराण पाठ आहे, अशा व्यक्तीला ‘हाफीज’ म्हटले जाते. हाफीजचे पूर्ण नाव महंमद शमसुद्दीन हाफीज असे होते. हाफीजने धार्मिक ग्रंथांवर भाष्ये लिहिली होती. तसेच राजकवी म्हणून शिराझच्या दरबारी त्याला आश्रय होता तथापि १३६८–६९ च्या सुमारास राजदरबारी त्याच्यावर गैरमर्जी झाल्यामुळे तो त्याच्या मानाच्या स्थानापासून वीस वर्षे वंचित राहिला होता. त्याच्या कवितेत अनेक ऐतिहासिक घटना, विविध व्यक्तींची चरित्रात्मक शब्दचित्रे, तसेच शिराझमधील जीवनाचे तपशील येतात. हाफीज ⇨ सूफी पंथीय होता.
गझल हा काव्यप्रकार हाफीजने मुख्यत्वेकरून हाताळला आणि पूर्णत्वास नेला. आपल्या गझलांतून त्याने सूफी पंथाचे विचार मांडले तथापि कवितेच्या घाटाच्या सीमा काटेकोरपणे न पाळता गझलांशी निगडित अशा सांकेतिक विषयांनाही त्याने ताजेपणा आणि सूक्ष्मार्थ प्राप्त करून दिला. हाफीजच्या कवितेला फार्सी भाषिकांमध्ये जी असामान्य लोकप्रियता प्राप्त झाली, तिचे कारण त्याची साधी, बोलभाषेतली, पण नादमधुर भाषा हे आहे. विशेष म्हणजे मानवतेबद्दलचे प्रेम आणि ढोंगीपणाचा तिटकारा हे त्याच्या कवितेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. तसेच नित्याच्या अनुभवांना वैश्विक पातळीवर नेऊन ईश्वराच्या अखंड शोधाशी त्यांचे नाते जोडण्याचे त्याच्या प्रतिभेचे सामर्थ्य मोठे होते. पश्चिमी जगात त्याच्या कवितांचीअनेक भाषांतरे झाली आहेत. फिफ्टी पोएम्स (इं. भा. १९४७) हे अरबेरीने केलेले एक उल्लेखनीय भाषांतर होय. तसेच गटर्र्ड बेल आणिएच्. विल्बरफोर्स क्लार्क हे त्याचे इंग्रजी अनुवादक होत.
शिराझ येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.
“